Balasaheb Bidve Agrowon
यशोगाथा

Improved Agriculture Success Story : बीज अंकुरे अंकुरे...

Team Agrowon

बाळासाहेब बिडवे

शेतीला महासागराची उपमा दिली, तर आमचा मराठवाडा म्हणजे या सागराकाठचा खडकाळ प्रदेश म्हणावा लागेल. त्यातही काही शेतकऱ्यांनी कष्टानं समृद्धीची बेटं फुलवली आहेत. त्यांची ही प्रयोगशील शेतं आमच्यासाठी वाळवंटातील एखाद्या दुर्मीळ झऱ्यासमान असतात. या दुष्काळी भागातील रखरखत्या मातीत मी हिरवाईचे प्रयोग कसे केले आणि त्याहून म्हणजे न थकता निर्धारानं ही प्रयोगशील शेती कशी सुरू ठेवली.

याविषयी मला राज्यभरातून उत्सुकतेने विचारले जाते. तेव्हा मी त्यांना आदरानं सांगतो, मित्रांनो या समृद्धीसाठी माझ्या घरातील प्रत्येक जण घाम गाळतो आहेच; पण आमचे खरे गुपित शेतीमधील ज्ञान, तंत्रज्ञान, शास्त्रीय माहितीत आहे. ते आत्मसात केल्यानेच आज बिडवे परिवाराला मानसन्मान आणि समृद्धी मिळाली आहे. थोडंफार त्याविषयी आज तुम्हाला उलगडून सांगतोय...

जालन्याच्या परतूर तालुक्यातील दुधना नदीच्या खोऱ्यात वसलेले ५०० उंबऱ्याचं सातोना बुद्रुक हे माझं गाव. आमच्या गावाला बावीसशे हेक्‍टरचा शेतशिवार आहे. आता तो ऊस, कपाशी, सोयाबीन, लिंबू, केळी, टरबुजाने फुलून गेला आहे. मात्र पूर्वीपासून अगदी २०१८ पर्यंत आमच्या गावशिवाराला पाण्याची आस होती.

जेव्हा निम्न दुधना धरणासाठी गावाची ५०० एकर घेतली गेली तेव्हा ‘बॅकवॉटर’ अवतरले. त्यातून गावाची शेती फुलू लागली. माझी वडिलोपार्जित बारा एकर शेती होती. गावरान कापूस, तूर, मूग, ज्वारी अशी पिके वडील घ्यायचे. आमच्याकडे दोन बैल, चार-दोन गायी होत्या. दहावीपर्यंत मी याच गावात शिकलो. वर्गात सतत दोन नंबर असायचा. पण मी एकुलता एक असल्यानं वडिलांनी शहरात पाठवलं नाही. शिक्षण सुटले.

काही वर्षात लग्नाच्या बेडीत अडकलो आणि नंतर शेतीच्या तुरुंगात दाखल झालो. तसा लहानपणापासून मी शेतीत राबायचो. शेतीमधील अनेक संकटे मी डोळ्यांनी पाहिलेली. वडिलांच्या जोडीने मी शेती केली आणि तीन एकर जमीन घेतली. पण ही अशी नुसत्या घामाची पारंपरिक शेती करीत बसलो, तर या तुरुंगातून बाहेर पडता येणार नाही हे मी जाणलं. पण नंतर असं ठरवलं, की घाबरून या तुरुंगातून बाहेर का पडावे? या तुरुंगालाच हिरव्या शेतीतून सुंदर बागेचं रूप का देऊ नये? हे स्वप्नं पाहून मी नुसता थांबलो नाही; तर स्वप्नपूर्तीसाठी गावशिवाराच्या बाहेर पडलो. कृषी ज्ञान घेण्यासाठी, तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी.

ज्ञानाचे पहिले फळ

शेती कशी सुधारावी याविषयी माहिती घेण्यासाठी मी भटकंती करू लागलो. अनेकांचे सल्ले घेतले. त्यातून असे ध्यानात आले, की शेती फुलवायची असेल तर कायमस्वरूपी पाणी हवे. मग, वडील आणि मी निर्धार केला. विहीर खोदाईचा निर्णय घेतला. खोदाई सुरू झाली खरी; पण घरातला पैसा संपला. मजुरांनी खोदाई बंद केली. पुढचे तीन वर्षे काहीही करता आले नाही. मी पुन्हा पर्याय शोधू लागलो. आधुनिक तंत्रज्ञानाचा पर्याय हाताशी आला. आहे त्या विहिरीला बोअर मारण्याचा सल्ला मिळाला.

पैसे जमवून २० फुटांचे बोअर मारलं आणि इतकं पाणी लागलं, की विहीर तुडुंब भरून वाहू लागली. पुढे २०१८-१९ च्या दुष्काळातही मी पाच बोअर घेतल्या. त्यांनाही पाणी लागलं. याशिवाय पदरचा अजून पैसा टाकला आणि थेट धरणातून एक पाइपलाइन आणली. आता त्या वाळवंटात सर्व ठिकाणी पाणीच पाणी होते. हे चालू असतानाच मी पुन्हा माहिती घेत राहिलो. प्रयोगशील शेतकऱ्यांच्या गाठीभेटी, शास्त्रज्ञांनी चर्चा, कृषी अधिकाऱ्यांकडून माहिती घेणं सुरुच ठेवलं. मग सल्ला मिळाला की पारंपरिक पिकांऐवजी फळशेती करणे फायद्याचे राहील.

फळशेतीने केले लखपती

फळशेती करायची; पण नेमकी कोणती फळ लावायची हा महत्त्वाचा मुद्दा होता. मराठवाड्याचा पट्टा मोसंबीला साथ देणारा होता. मी मोसंबीची ४०० झाडं लावली. पण, केवळ एका फळपिकावर अवलंबून राहू नये हे शास्त्रीय ज्ञान मला मिळालं. त्यामुळे जोडीला ३०० लिंबूची बाग उभी केली. लिंबू बाग उभारणीचा निर्णय खूप फायद्याचा ठरला. कारण, दुष्काळात मोसंबीचं होत्याचं नव्हतं झालं.

पण, लिंबूबाग चार-पाच नव्हे, तर पुरती सतरा वर्ष मला पैसा देत होती. दरवर्षी लिंबूबाग मला पैसा मिळवून देत होती. शेवटी तर तीन एका हंगामात साडेतीन लाख रुपये मला मिळवून दिले. फळबागेने मला लखोपती केले होते. अर्थात, हे सारे घडले ते आधुनिक शेतीची माहिती घेत राहिल्यामुळेच. कारण मोसंबीची बाग उजाड झाल्यावर मी स्वस्थ बसलो नाही. शास्त्रज्ञ, अभ्यासकांचा सल्ला घेत होतो.

तांत्रिक शेतीविषयक वाचन करीत होते. त्यातून मला डाळिंब लागवडीची प्रेरणा मिळाली. स्वतः विद्यापीठातून रोपे आणून बाग लावली आणि तर चार शेतकऱ्यांनाही लागवडीसाठी मदत केली. या डाळिंब बागेने मला सतरा वर्षे पैसे दिले. त्यानंतर पुन्हा दुसरी लागवड केली. त्याची फळे मला अजूनही पैसा मिळवून देत आहे. आता माझ्याकडे दोन एकर केळी, दीड एकर डाळिंब, सव्वादोन एकर सीताफळ, पाच एकर कपाशी, साडेतीन एकर सोयाबीन अशी सारी नगदी पिके आहेत. सतत प्रयोग करीत राहा, असा मंत्र मला शास्त्रज्ञांनी दिला.

त्यामुळे डाळिंबापाठोपाठ मी मिरची अधिक टरबूज लागवडीचा प्रयोग केला. त्यातून नऊ लाख रुपये मला मिळाले. टरबूज काढून कापूस लावला. कपाशी काढून पुन्हा टरबूज लावले. त्यातच केळीही लावली. एक द्राक्ष बागही लावली होती. ती सात वर्षे सांभाळली. भाकरी फिरवली नाही तर ती करपते. तीच गत आपल्या शेतीची असते. सतत पिके बदला, प्रयोग करा, शास्त्रोक्त लागवड करा, असा सल्ला कृषी शास्त्रज्ञांचा असतो. तो मी पाळतो आणि म्हणून कायम नफ्यात असतो.

(सविस्तर वाचा अॅग्रोवनच्या दिवाळी अंकात)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Upsa Irrigation Scheme : परभणी, मानवत तालुक्यांत उपसा सिंचन योजना प्रस्तावित

Bullet Train : बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुसाट

Crop Loan : पीककर्ज वाटपप्रकरणी दाखल गुन्हे मागे घ्या

Panchganga Sugar Factory : पंचगंगा साखर कारखान्याच्या वार्षिक सभेला गालबोट, कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी

Electricity Bill Waive : कोल्हापुरातील पाणी संस्थांना वीजबिल माफीची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT