नांदेड जिल्ह्यातील बोरी (बु.) येथील मारोती व पारूबाई या व्यवहारे दांपत्याने अत्यंत खडतर कष्ट, संघर्षातून मोलमजुरी व भाजीपाला-फळे विक्री करून एकात्मीक शेती केली. त्यात प्रशंसनीय प्रगती केली. एकेकाळी भूमिहीन असलेल्या व्यवहारे यांची आज १२ एकर शेती आहे. आंबा, हळद, भाजीपाला यांच्यासह डेअरी, दूध संकलन, पोल्ट्री, गिरणी यांच्या माध्यमातून उत्पन्नाचे स्त्रोत प्रशस्त केले. त्यांच्या मुलांना आई-वडिलांचा अभिमान असून त्यांचा हाच वारसा ते पुढे चालवत आहेत. नांदेड जिल्ह्यात कंधार तालुक्यातील बोरी (बु.) येथील मारोती व पारूबाई या व्यवहारे दांपत्याचा भूमिहीन ते बागायतदार हा प्रवास कष्टाचा, जिद्दीचा, व्यावहारिक चातुर्य दाखवणारा आणि प्रेरणादायी असाच आहे. त्यांची वडिलोपार्जीत जमीन नव्हती. कुटूंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी सुरवातीच्या काळात दोघे नवरा-बायको कधी मोलमजुरी करायचे. शेतकऱ्यांकडून भाजीपाला, फळे, बाजरी असा शेतमाल घ्यायचे. आपल्या डोक्यावरील टोपल्यात माल वाहून नेत घरोघरी जाऊन विकायचे. दिवसभर अशी कष्टमय पायपीट केल्यानंतर पैसा हाती पडायचा. पण घरचा खर्च, मुलांची शिक्षणं या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून शिलकी पैसा ठेवायचे. त्यातून मग मारोती यांनी जमीन घेण्यास सुरवात केली. शेतीमालक झाले, प्रगती साधली कष्टांत सातत्य व प्रगती करायची ओढ यातूनच मग शून्यातून चक्क बारा एकर जमिनीपर्यंत मजल गाठणे व्यवहारे कुटूंबाने साध्य केले. आता मुलेही हाताशी येऊ लागली होती. उत्पन्नातील पैसे शिल्लक टाकून मग मन्याड धरणावरून पाइपलाइन करीत सिंचनाची व्यवस्थाही बळकट केली. चिरंजीव प्रभाकर यांनी एमएएमएड पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. आज ते धाकटे चिरंजीव यांच्यासोबत पूर्णवेळ शेतीत गुंतले आहेत. दोघा मुलांची व तीन मुलींची लग्नेही शेतीतील उत्पन्नावरच साध्य केली. आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत वाढवले आज आई-वडिलांसह दोघे बंधू, त्यांच्या पत्नी असे सहाही जण शेतीत विविध जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. आई-वडील वयोमानाने थकले असले तरी ते विक्रीची जबाबदारी आजही ताकदीने सांभाळतात. केवळ पिकांची लागवड न करता या कुटूंबाने पूरक व्यवसायांची जोड देत आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत विस्तारले आहे. एका व्यवसायातील नफा दुसऱ्या व्यवसायासाठी खर्च म्हणून उपयोगात येतो. पिके कृषी विभागामार्फत केशर आंब्याची लागवड रोजगार हमी योजनेतून केली आहे. दहा बाय दहा मीटरवर लागवड केली असून दहा ते पंधरा वर्षे वयाची सुमारे १०० आहेत. सेंद्रिय व्यवस्थापनातून त्यांचे संगोपन केले जाते. आपल्या बागेतील सेंद्रिय आंबा असा फलक त्यांनी लावला असून ग्राहक बागेतून देखील खरेदी करून जातात. प्रत्येक जुन्या झाडाला एकहजार ते १५०० पर्यंत फळे मिळतात. आंबे घरीच गवतामध्ये पिकवण्यात येतात. थेट विक्री केल्यामुळे नफ्यात वाढ होते. हवामान चांगले असेल तर वर्षाला दोन ते तीन लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. अन्य पिके- हळदीची सुमारे दोन एकरांवर लागवड आहे. टोमॅटो, मिरची, मेथी, असा विविध भाजीपाला काही गुंठ्यांत घेण्यात येतो. सर्व शेतमालाची विक्री थेट ग्राहकांनाच होते. मध्यस्थ्यांचा अडसर नसतो. पूरक व्यवसाय शेतीबरोबरच व्यवहारे कुटुंब अनेक जोडव्यवसाय करत असल्याने पैसा सारखा खेळता राहतो. दुग्धव्यवसाय- सुमारे दोन म्हशी आहेत. स्वतःकडील दुधाबरोबरच हे कुटूंब गावातील अन्य शेतकऱ्यांकडील दुधाचेही संकलन करते. शेत गावालगतच रस्त्यावर असल्याने हा व्यवसाय सुलभ झाला आहे. पहाटे पाचपासून आठ वाजेपर्यंत दूध संकलन, त्यातील फॅट तपासणे, पावत्या देणे अशी कामे होतात. संकलनासाठी प्रति लिटर तीन रुपये याप्रमाणे खाजगी दूध कंपनीकडून कमिशन मिळते. महिन्याला या व्यवसायातून सुमारे १० हजार रुपये उत्पन्न मिळते. गोऱ्हे विक्री नांदेड भागात गायीचा लाल कंधारी हा गोवंश फार लोकप्रिय आहे. बाजारातून लाल कंधारीची लहान वासरे ते खरेदी करतात. सुमाके १० महिने त्यांचे पालनपोषण होते. त्यानंतर त्यांची शेतकऱ्यांना विक्री होते. एका जोडीला सुमारे एक लाखपर्यंत किंमत मिळते. या व्यवसायातून सुमारे ३० हजार रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळते. पोल्ट्री या व्यवसायाची जबाबदारी उत्तम यांच्याकडे आहे. शेताच्या बाजूला ५० बाय २० फूट आकारमानाचे एक लाख रुपये खर्चून शेड उभारले आहे. त्यात गावरान कोंबड्याचे संगोपन होते. कोंबड्यांची पिल्ले नगरहून घेतली आहेत. सध्या एक हजार कोंबड्या आहेत. त्यांचे लसीकरण घरीच केले जाते. सध्या ते सव्वा ते दीड किलो पक्षाची विक्री २५० ते ३०० रुपये प्रति किलो या दराने करतात. या व्यवसायातील विक्रीसाठी देखील बाहेर जाण्याची गरज भासत नाही. पीठगिरणी, मिरची कांडप एवढे सर्व करूनही व्यवहारे थांबले नाहीत. तर शेती व घर गावालगतच असल्याची आणखी एक संधी त्यांनी उचलली. पिठाची गिरणी व मिरची कांडप व्यवसायही सुरू केला. या व्यवसायातून महिन्याला पाच ते सात हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. त्याचबरोबर पोल्ट्रीसाठी भरडधान्याचे पीठही उपलब्ध होते. वाचनालयाची उभारणी : आपल्या आई-वडिलांनी शून्यातून केलेल्या प्रगतीचा त्यांच्या मुलांना अभिमान आहे. तसेच खालेल्या खस्तांची जाणीवही आहे. शेतीचा हाच वारसा पुढे टिकवायचा व क्षेत्र वाढवण्याचा विस्तार आहे असे प्रभाकर यांनी सांगितले. आपण उच्चशिक्षित असल्याची जाणीव ठेऊन आपल्या शेतातच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय त्यांनी सुरू केले आहे. दररोज सुमारे पाच दैनिके, साप्ताहिके, मासिके, त्रैमासिके येथे असतातच. शिवाय विविध तीन हजार पुस्तकांचा संग्रह त्यांनी केला आहे. या वाचनालयाचा फायदा गावातील नागरिक व विद्यार्थी घेतात. स्पर्धा परीक्षांची पुस्तकेही येथे उपलब्ध होतात. संपर्क - प्रभाकर व्यवहारे - ८९९९०२८९५२ रमेश देशमुख - ९४२३१५६५९३ (लेखक कंधार, जि. नांदेड येथे तालुका कृषी अधिकारी आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.