महाजन यांनी तयार केलेला कोकम सोडा व आवळा सोडा  
यशोगाथा

कृत्रीम शीतपेयांना शोधला कोकणी नैसर्गिक कोकम सोडा पर्याय

शरीरावर दुष्परिणाम न करणारी आणि आरोग्यदायी नैसर्गिक शीतपेये तयार करण्याची इच्छा होती. त्यामुळेच मुंबईतील करियर सोडून गावी आलो. आज मी उभारलेल्या व्यवसायात पूर्णपणे समाधानी आहे. -विनय महाजन

मुझफ्फर खान 

कोकणातील निसर्गरम्य कोळथर (ता. दापोली, जि. रत्नागिरी) येथील विनय महाजन यांनी शीतपेय उद्योगात स्वतःची ओळख तयार केली आहे. कोकवर्गीय वा कृत्रिम शीतपेयांना पर्याय म्हणून कोकम सोडा व आवळा सोडा या वैशिष्ट्यपूर्ण नैसर्गिक पेयांची निर्मिती त्यांनी केली आहे. महिन्याला सुमारे २० हजार बॉटल्सच्या माध्यमातून दोनशे वितरकांच्या मार्फत हा मूल्यवर्धित प्रक्रिया व्यवसाय यशस्वी केला आहे.  कोकणातील निसर्गरम्य परिसर असलेल्या कोळथर (ता. दापोली, जि. रत्नागिरी) येथील विनय महाजन यांनी गावी दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते मुंबईत गेले. मुंबईच्या एका संस्थेतून मॅकेनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर त्यांनी नोकरी सुरू केली. त्यानंतर विनय उद्योग नावाने फर्म सुरू केली. एका मोठ्या शीतपेय कंपनीचे युनिट मुंबईत सुरू झाले होते. या कंपनीला लागणाऱ्या बाटल्यांचे डिझाईन तयार करण्याचे काम महाजन यांना मिळाले. या युनिटमध्ये प्रति मिनिटाला ४०० बॉटल्सची निर्मिती व्हायची.  नैसर्गिक शीतपेयांची निर्मिती  महाजन शीतपेयातील तज्ज्ञ होते. ते मूळ कोकणचेही असल्याने कोकम आधारीत पेयांचे महत्त्व ते जाणून होते. बाजारातील कोकवर्गीय वा कृत्रिम शीतपेयांच्या तुलनेत नैसर्गिक पेये आरोग्याला अधिक चांगली असल्याचे त्यांचे मत होते. त्यातूनच त्यांनी अशा पेयांची निर्मिती करण्याचे ठरवले. त्यावेळी शीतपेये उद्योगातील ‘कन्सल्टन्सी’चा व्यवसाय कर्मचाऱ्यांवर सोपवून ते १९९३ च्या दरम्यान दापोलीला आले. युनियन बॅंकेकडून पाच लाखांचे कर्ज घेऊन कोळथरे गावी १२०० चौरस फूट जागेत महाजन बिव्हरेजेस नावाने छोट्या युनिटची सुरवात केली. आवळा, लेमन, कोकम आदी पेयांचे उत्पादन सुरू झाले.  व्यवसायाची वाटचाल  सुरवातीची पाच वर्षे मुंबई ते दापोली ये-जा करत दोन्ही व्यवसाय सांभाळले. मुंबईतील मिळणारे उत्पन्न पेयनिर्मितीत वापरले. मुलगा वरुण शालेय शिक्षण घेत होता. पत्नी सौ. वीणा यांनी उत्पादनासंबंधीचे कामकाज सांभाळले. प्रकियेसंबंधीची यंत्रणाही महाजन यांनी बनविली. त्यामुळे यंत्र विकत घेण्याचा खर्च वाचला. कोकम सोडा या दर्जेदार पेयाच्या उत्पादनावर भर दिला.  विक्रीसाठी आवश्‍यक सर्व प्रमाणपत्रे व परवानग्या घेऊन हा कोकम सोडा मार्केटमध्येदेखील आणला. ग्राहकांना हे उत्पादन त्या काळात तसे नवे होते. त्याची चव माहित नव्हती. कृत्रिम शीतपेय उद्योगासमोर  हे उत्पादन टिकवण्याचे मोठे आव्हान होते. मात्र दापोली भागात येणारे पर्यटक आणि स्थानिक ग्राहकांनी या उत्पादनाला चांगला प्रतिसाद देण्यास सुरवात केली. त्यामुळे महाजन यांचा आत्मविश्‍वास वाढला.  उत्पादनाचे मार्केटिंग यशस्वी  सन १९९८ च्या दरम्यान कुडावळे गावात पाच एकर जागा घेऊन व्यवसाय विस्तारला. मंडणगड आणि दापोली तालुक्‍यात विक्री सेवा सुरू केली. सुरवातीला भाडेतत्त्वावर वाहन घेतले. स्थानिक विक्री प्रतिनिधी नेमले. दापोली, मंडणगड तालुक्‍यात पाच ‘रूटस’ निश्‍चित केले. रिटेलर तयार केले. अशा पद्धतीने गावोगावी डिलिव्हरी सुरू केली. आठवड्यातून एकदा एका गावात ते डिलिव्हरीसाठी जात. व्यवसायात जम बसल्यानंतर स्वतःचे वाहन घेतले. सन २०११ च्या दरम्यान मुलगा वरुण कृषी पदवीधर झाला. त्याने वडिलांचा व्यवसाय पुढे चालवण्याचा निर्णय घेतला. आज त्याच्याकडेच संपूर्ण जबाबदारी असते. आज युनिटमध्ये चार ते पाच कामगार कायमस्वरूपी आहेत. सुमारे दोनशेपर्यंत विक्रेते आहेत. रत्नागिरी, मंडणगणसह रायगड जिल्ह्यातील निवडक भागात उत्पादनांची विक्री केली जाते.  महाजन उद्योगाची काही वैशिष्ट्ये 

  • सुरवातीला उत्पादन निर्मितीसाठी २०० लिटर कोकम सिरप लागायचे. आता ही मागणी एक हजार लिटरपर्यंत गेली आहे. दापोली तालुक्‍यातील व्यावसायिकांकडून महाजन सिरप खरेदी करतात. 
  • त्यामुळे कोकम सिरप बनविणाऱ्यांनाही चांगला दर मिळतो. 
  • दरवर्षी सुमारे दोन ते अडीच हजार क्रेटपर्यंत कोकम सोडा उत्पादन. 
  • प्रति क्रेट २४ बॉटल्स. 
  • दर २५ रुपये प्रति २७५ मिलि. 
  • अन्य उत्पादनांमध्ये आवळा सोड्याचेही उत्पादन. 
  • शिवाय ऑरेंज, लेमन, साधा सोडा आदींचेही उत्पादन. 
  • एकूण वार्षिक उत्पादन आठ ते नऊ हजार क्रेट. 
  • उद्योगात ऑफ सिझनही असतो. मागणीनुसार उत्पादनाची आकडेवारी अवलंबून. 
  • वार्षिक उलाढाल -सुमारे १२ लाख रुपये. 
  • नावीन्यपूर्ण उत्पादने निर्मितीची आवड  कोकणात केवळ एक उद्योग सुरू करून चालणार नाही. तर इथे फळफळावळ मुबलक प्रमाणात पिकतात. गरज आहे ती त्यावर योग्य प्रक्रिया करण्याची आणि त्याला मार्केट मिळवण्याची. हीच बाब महाजन यांनी जाणली. त्यांनी बरका फणसापासून चॉकलेट बनविण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर करवंदापासून वाईन बनविणे, आंब्यापासून बार बनविणे, स्ट्रॉबेरी प्रक्रिया आदींच्या  प्रयत्नांमधून त्यांनी आपल्यातील सर्जनशीलता जागृत ठेवली आहे. अशा उत्पादनांना व्यावसायिक संमती वा बाजारपेठ मिळवणे तांत्रिकदृष्ट्या अडचणीचे होत असले तरी प्रयत्न थांबवलेले नाहीत.  समाजसेवेची आवड जपली  महाजन यांनी उद्योग सांभाळताना समाजसेवेचीही आवड जपली आहे. भाजी विक्रेत्यांची संघटना तयार करून व्यवसायासाठी दापोली शहरात हक्काची जागा मिळवून देण्यात त्यांचा पुढाकार आहे.  कुडावळे गावात शालेय मुलांचा गट तयार करून शेतकरी आर्मी असे त्याचे नामकरण केले आहे. याद्वारे शेतातील कामांचा अनुभव मुलांना देण्यात येतो. कुडावळे गावातील जुन्या मोऱ्या बंद करून तेथे लहान बंधारे बांधण्याच्या यशस्वी प्रयोगातही महाजन यांनी हातभार लावला आहे. कृषी विभागाच्या आत्माअंतर्गत १५ शेतकऱ्यांचा गट तयार झाला आहे. महाजन या गटाचे सक्रिय सदस्य आहेत. गटातर्फे २१ हजार झेंडूच्या रोपांची लागवड केली जाणार आहे. 

    प्रतिक्रिया शीतपेयांच्या व्यवसायात बाटल्यांसाठी खूप खर्च येतो. प्लॅस्टिक किंवा काचेच्या बाटल्यांमधील सोडा पिल्यानंतर बाटल्या फेकून दिल्या जातात. त्यामुळे पर्यावरणाची हानी होती. ती टाळण्यासाठी आम्ही बाटल्या पुन्हा घेण्याची संकल्पना मांडली आहे. रिटेलर आणि ग्राहक यांनी बाटल्या परत दिल्यास त्यांना त्या बदल्यात दोन रुपये देतो.  -वरुण महाजन- ९१५८१४९९६६ 

    संपर्क- विनय महाजन- ८१४९२८२४०५     

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Onion Subsidy : २०२३ च्या कांदा अनुदानासाठी २८ कोटी रुपये मंजूर; शासन निर्णय प्रसिद्ध

    Hydrogen Fuel cooking: आता हायड्रोजन इंधनावर स्वयंपाक शक्य

    Heavy Rain: दमदार पावसाने ४६ हजार हेक्टरवरील पिकांना संजीवनी

    Agriculture Success: तांत्रिक व्यवस्थापनातून फळबाग शेतीत समृद्धी

    Dairy Business: दुग्ध व्यवसायाने पालटेल विदर्भाचे चित्र

    SCROLL FOR NEXT