प्रकाश जाधव व महापुरापूर्वीचा ढोबळी मिरचीचा प्लॉट. 
यशोगाथा

खचून काय करणार? शिवार पुन्हा करू हिरवेगार

कोल्हापूर जिल्हा नुकत्याच येऊन गेलेल्या महापुराच्या तडाख्यातून अद्याप सावरलेला नाही. शेतीचे कोट्यवधीचे नुकसान झाले. अनेकांचे मनोधैर्य खचले. तरीही यातून सावरतशेतकरी पुन्हा एकदा शेतीत उतरले आहेत.

Raj Chougule

कोल्हापूर जिल्हा नुकत्याच येऊन गेलेल्या महापुराच्या तडाख्यातून अद्याप सावरलेला नाही. शेतीचे कोट्यवधीचे नुकसान झाले. अनेकांचे मनोधैर्य खचले. तरीही यातून सावरत शेतकरी पुन्हा एकदा शेतीत उतरले आहेत. नवी उमेद, नवी जिद्द उराशी बाळगून जिद्दीने नव्या लागवडीत गुंतले आहेत. भाजीपाला असो की भातपीक असो, महापुराने उध्वस्त केलेले शिवार पुन्हा एकदा हिरवेगार करण्यात ते गुंतले आहेत.   कोल्हापूर जिल्ह्याला नुकताच महापुराचा तडाखा बसला. कोट्यवधींचे नुकसान झाले. अनेकांचे मनोधैर्य खचले पण शेतकरी हरले नाहीत. त्यांनी पुन्हा भरारी घेण्याचे प्रयत्न सुरू ठेवले. सर्वाधिक फटका बसला तो शिरोळ तालुक्याला. सन २०१९ नंतर गेल्या वर्षाचा अपवाद वगळता यंदाही महापुराने तालुक्याला आपल्या विळख्यात घेतले. त्यामुळे भाजीपाला व अन्य पिकांची सर्वाधिक हानी झाली. त्यामुळे शेतकरी पुरता कोलमडला. पाण्याचा महापूर ओसरला तरी अडचणींचा महापूर नव्याने समोर आला. अशा परिस्थितीत काही शेतकरी नव्या उमेदीने पुन्हा भरारी घेण्याचा प्रयत्न करीत आहे. दुःख बाजूला सारून शिवारात आशेची पेरणी वेग घेत आहे. संकटांमधून शिकतोय शिरोळ तालुक्यातील औरवाड परिसर हा कृष्णा नदीच्या पाण्याने नेहमी वेढलेला भाग. याच गावातील प्रकाश विलास जाधव हे प्रगतशील शेतकरी. ऊस उत्पादनात भरारी घेणाऱ्या या शेतकऱ्याचा लाखो रुपयांचा भाजीपाला बघता बघता पाण्यात गेला. पण ते हटले नाहीत. चेहऱ्यावर चिंता असली तरी शेतीत पुन्हा उभारण्याचा ठाम निर्धार आहे. जाधव सांगतात की १४ एकर क्षेत्रापैकी ढोबळी मिरची ३८ गुंठ्यावर होती. एक एकरावरील कोबी काढणीसाठी तयार होती. सात टनांपर्यंत ढोबळी मिरचीची काढणी झाली होती. तीस रुपये प्रति किलोपर्यंत दर असल्याने यंदा प्लॉटमधून दोन ते तीन लाख रुपये मिळतील अशी अपेक्षा होती. पण महापुराचे पाणी आले आणि सगळ्या स्वप्नांवर पाणी फिरले. शेतात तब्बल सात फूट पाणी साचले. यातून मिरची वाचणे शक्यच नव्हते. वाफसा आल्यानंतर खराब झालेले अवशेष काढून नवी लागवड सुरू आहे. येत्या आठ दिवसांमध्ये कारली किंवा दोडका या पैकी एक पीक जाधव घेणार आहेत. शांत बसून राहिलो तर या हंगामात अन्य कोणते पीक येणार नाही. कोणत्याही परिस्थितीत भाजीपाला हाच आमच्यासाठी पर्याय आहे. आता ३८ गुंठ्यांतील साफसफाई जवळपास पूर्ण होत आली आहे. आता खरी अडचण आहे ती भांडवलाची. कारण भाजीपाला पिकांसाठी एकूण दोन एकर क्षेत्र होते. संकटे येतच असतात. त्यातून शिकायला मिळते. शक्य ते प्रयत्न करीत आहोत. शेतीत निसर्गाचा अडथळा डोक्यात ठेवूनच नियोजन करावे लागेल. तरच पुढील काळात काहीतरी उत्पादन मिळू शकेल असा आशावाद मी ठेवल्याचे जाधव म्हणाले. संपर्क- प्रकाश जाधव-९४२२७७३३२१ पुन्हा डाव मांडला भडगाव (ता.. गडहिंग्लज) येथील साईप्रसाद मारुती कोरी हे जिद्दी शेतकरी. त्यांची २० गुंठे जमीन हिरण्यकेशी नदी काठावर आहे. जूनमध्ये त्यांनी भाताची लावण केली. जूनमधील पुरातही हे पीक पाण्याखाली गेले होते. परंतु त्यातून तावून सुलाखून उठलेले भात दीड फूट उंचीचे झाले होते. परंतु जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पाच-सहा दिवसांच्या महापुराने मात्र हा भात आपल्या विळख्यात घेतला. पाणी ओसरल्यानंतर या शेतकऱ्याची धडपड सुरु झाली ती पुन्हा एकदा उभारण्याची. खरे तर रोप लावणीचा हंगामही संपल्याने रोपे मिळवताना नाकीनऊ आले. कशीबशी तीन जातींची रोपे उपलब्ध केली. कुजलेले भात उपसून काढत त्याच क्षेत्रात नव्या उमेदीने रोपांची लागवड केली. गडहिंग्लज-चंदगड राज्य मार्गावर भडगाव पुलाजवळच्या क्षेत्राचे प्रत्येक महापुरात नुकसान ठरलेले. सन २०१९ मधील महापुरानंतर तर दरवर्षी या क्षेत्रातून हाती काही लागेनासे झाल्याचे चित्र आहे. नदी काठावरील प्रत्येक शेतकरी कोरी यांच्यासारखाच जिद्दीने पेटलेला आहे. दरवर्षीच्या महापुराचे रडगाणे रडत बसण्यापेक्षा कितीही नुकसान होवू दे, पुन्हा नव्या उमेदीने पाय रोवून उभे राहण्याची तडफ त्यांच्यात पाहण्यास मिळत आहे. अजूनही पावसाळा शिल्लक आहे. महापुराची भीती संपलेली नाही. उशिरा लावण केलेले भात येते की नाही याची खात्री नाही. पण प्रयत्न सोडायचे नाहीत. पिकाच्या जीवन-मरणाचा निर्णय आता निसर्गाच्या ‘कोर्टा’त असल्याचे कोरी सांगतात. संपर्क- साईप्रसाद कोरी ९९६०४२७२५३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Jackfruit Farming : कोकणात प्रक्रियेतून फणसाला मिळतेय नवी झळाळी

AI In Sugar cane: ऊस लागवडीत ‘एआय’ तंत्र वापरणार

Local Self Government : स्थानिक स्वराज्य संस्थांचे बळकटीकरण

Warehouse Receipt: पूर्व युरोप, मध्य आशिया खंडातील गोदाम पावती वित्तपुरवठा

Agriculture Development: दिशा कोरडवाहू शेती विकासाची!

SCROLL FOR NEXT