कंपनीचे प्रतवारी व पॅकिंग केंद्र व कंपनीचा लोगो.  
यशोगाथा

ब्रॅंडेड अंजीर, सीताफळाला मिळ लागली देशांतर्गत बाजारपेठ

अंजीर व सीताफळ या पुरंदर तालुक्यातील (जि. पुणे) दोन मुख्य फळांना देशभर व परदेशात बाजारपेठ उपलब्ध व्हावी या हेतूने ‘पुरंदर हायलॅंडस शेतकरी उत्पादक कंपनी’ सज्ज झाली आहे. तालुक्यातील फळबाग उत्पादकांचे संघटन करून त्यांच्या मालाला पॅकिंग, ब्रॅंडिग व लोगोद्वारे चांगला दर व उठाव मिळवण्याच्या दृष्टीने कंपनीने विविध बाजारपेठा शोधून विक्री सुरूही केली आहे.

गणेश कोरे

अंजीर व सीताफळ या पुरंदर तालुक्यातील (जि. पुणे) दोन मुख्य फळांना देशभर व परदेशात बाजारपेठ उपलब्ध व्हावी या हेतूने ‘पुरंदर हायलॅंडस शेतकरी उत्पादक कंपनी’ सज्ज झाली आहे. तालुक्यातील फळबाग उत्पादकांचे संघटन करून त्यांच्या मालाला पॅकिंग, ब्रॅंडिग व लोगोद्वारे चांगला दर व उठाव मिळवण्याच्या दृष्टीने कंपनीने विविध बाजारपेठा शोधून विक्री सुरूही केली आहे.   पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुका अंजीर व सीताफळ या दोन फळांसाठी प्रसिद्ध आहे. यात १ ते ५ एकर क्षेत्रावर अंजीर बाग असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. पारंपारिक शेती करत असताना अंजिराची पुणे, मुंबई, नगर, सांगली सातारा या जिल्ह्यांपर्यंतच बाजारपेठ सीमित होती. अंजिराचा टिकवण कालावधी एक ते दोन दिवसच आहे. त्यामुळे लांब पल्ल्यांच्या बाजारपेठेपर्यंत फळ पोचवणे कठीण असायचे. बाजारपेठेच्या विस्तारासाठी वाणापासून ते बागेचे व्यवस्थापन, विक्रीपर्यंत आमूलाग्र बदल करणे गरजेचे होते. त्या दृष्टीने २०१९ मध्ये तालुक्यातील शेतकऱ्यांनी गटाची स्थापना केली. यात वाघापूर, गुरोळी, राजेवाडी, वनपुरी, सोनोरी या गावांतील शेतकरी एकत्र आले. गटाचे काम विस्तारल्यानंतर पुढील टप्पा म्हणून २०२१ मध्ये पुरंदर हायलॅड्‌स कृषी उत्पादक कंपनीची स्थापना व तशी नोंदणी झाली. बागेच्या सुधारित व्यवस्थापनासाठी बदलत्या हवामानामुळे अंजीर व सीताफळाचे व्यवस्थापन करणे आव्हानाचे झाले आहे. किडी-रोगांचा प्रादुर्भावही मोठ्या प्रमाणावर होत आहे. शेतकरी सातत्याने अडचणीत येत आहे. अचानक होणाऱ्या हवामान बदलांमुळे अवकाळी पाऊस, थंडी, तापमान यात चढ-उतार जाणवत आहे. अशावेळी योग्य व्यवस्थापन व सल्ल्यासाठी बायर क्रॉपसायन्सेस कंपनी सोबत करार करण्यात आला. त्या अंतर्गत प्रशिक्षण कार्यशाळा सुरु झाल्या. त्यातून सुधारित तंत्रज्ञान शेतकऱ्यांना दिले जात आहे. बाजारपेठ दोन वर्षांत प्रत्यक्ष उत्पादनावर भर दिल्यानंतर वाघापूर- सिंगापूर येथे संकलन आणि खरेदी केंद्र सुरू केले. त्याआधी पुणे शहरांमधील व्यापारी, विविध कंपन्यांसोबत चर्चा करून त्यांच्या मागणीनुसार पॅकिंग करून देण्याचे ठरविण्यात आले. सर्वप्रथम नाशिक येथील सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष विलास शिंदे यांच्याकडून सीताफळासाठी ऑर्डर मिळाली. त्यांना पुरवठा सुरू झाला. आता अंजिरे देखील पुरवली जाणार आहेत. याशिवाय देशातील काही प्रसिद्ध सुपर मार्केट कंपन्या, बंगळूरचे शिवाजी एक्झॉटिक यांच्यासह दिल्ली, अहमदाबाद, सुरत, भरूच, भोपाळ, बंगलोर, हैदराबाद, केरळ, चेन्नई आदी बाजारपेठांत संबंधित फळे पाठवली जाच आहेत. सुरुवातीला शेतकऱ्यांकडून प्रति दिन २५ किलोपासून सुरू केलेली खरेदी आता दीड हजार किलोपर्यंत पोहोचली आहे. खरेदी प्रक्रिया खरेदीदारांच्या मागणीनुसार आणि किती लांबच्या बाजारपेठेत माल पाठवायचा आहे या अंदाजानुसार काढणीचे नियोजन केले जाते. अंजिराचे चार ते आठ फळांचे पनेट पॅकिंग होते. या बाबींमुळे त्याची टिकवणक्षमता तीन ते चार दिवसांपर्यंत वाढली आहे. विविध दर्जाच्या अंजिराला सात दिवसांपर्यंत एकच दर ठरवून दिला जातो. तो सर्व शेतकऱ्यांना व्हॉटसॲपद्वारे पाठविला जातो. संकलन केंद्रावर देखील दर्शनी भागात लावला जातो. केंद्रावर आलेला शेतीमालाचे संबंधित शेतकऱ्यांसमोर वर्गीकरण, प्रतवारी आणि वजन होते. बिल तयार होऊन शेतकऱ्यांना जागेवर पैसे दिले जातात अंजीर किलोला ४० ते ६५ रुपयांपर्यंत तर सीताफळ (तीनशे ग्रॅम वजनापुढे) ९० ते १०० रुपये दराने खरेदी केले जाते. सुधारित तंत्राबाबत प्रयत्न ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या मार्गदर्शनातून बिकानेर येथील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ एरिड हॉर्टिकल्चर व इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चर रिसर्च या संस्थांशी समन्वय साधून तेथील वाण, प्रक्रिया व एकूणच तांत्रिक मार्गदर्शनासाठी सहकार्य घेतले जाणार आहे. कृषी विभागाचे गुणवत्ता संचालक दिलीप झेंडे, मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी सुनील बोरकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. अंजीर निर्यातीसाठी पणन संचालक आणि महाराष्ट्र राज्य पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या मान्यतेने योजना आखली आहे. त्यासाठी पॅकिंगच्या चाचण्या सुरू आहेत. भौगोलिक निर्देशांक प्राप्त पिकांना (जीआय) उत्तेजन देण्यासाठी राज्य अंजीर उत्पादक संघाद्वारे दोन प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आले आहेत. या माध्यमातून अंजिराच्या सात बागांची ‘जीआय’ नोंदणी करण्यात आली आहे. कंपनीचा विस्तार सुमारे एक ते दीड वर्षांच्या कालावधीत कंपनीने दोन्ही फळांत मिळून ९० लाख रुपयांपर्यंतची उलाढाल केली आहे. कंपनीचे पूर्णवेळ १३ संचालक आहेत. सिंगापूर, वाघापूर परिसरांतील पाच गावांतील पाच नोंदणीकृत शेतकरी गट जोडले आहेत. या गावांमध्ये दोनशेहून अधिक शेतकऱ्यांसोबत सुमारे २०० एकर बागांवर काम सुरू आहे. यात दोन्ही फळांखाली प्रत्येकी १०० एकरापर्यंत क्षेत्र आहे. पुढील दोन वर्षांत देशांतर्गत तसेच आशियायी आणि युरोपीय देशांमध्ये निर्यातीसाठी कंपनी प्रयत्नशील आहे. त्यासाठी विविध देशांच्या मागणीनुसार रासायनिक अंशविरहित उत्पादन नियमावली, पॅकिंग आदींचा अभ्यास सुरू आहेत. दोन्ही फळांच्या प्रक्रियेवर आधारित विविध पदार्थांच्या निर्मितीवरही भर आहे. येत्या काळात अन्य फळांचे पल्प, जॅम, स्प्रेडर्स आदीही उत्पादने सादर करण्याचे प्रयत्न आहेत. प्रतिक्रिया माझी अंजिराची सुमारे १०० झाडे आहेत. ‘पुरंदर हायलॅड कंपनी’ला अंजिरे पुरवतो.कंपनीद्वारे पीक व्यवस्थापनाचे मार्गदर्शन मिळत असल्याने उत्पादन चांगले मिळण्यास वाव आहे. गावातच संकलन होत असल्याने पॅकिंग, वाहतुकीचा खर्च किलोमागे ५ ते १० रुपयांनी वाचला आहे. -संतोष लवांडे, ८८०५६२८७२७ सिंगापूर संपर्क- -रोहन उरसळ ः ९८८१००१११९ संचालक, ‘पुरंदर हायलॅंड्‌स’ -अतुल कडलग - ९१३०७४१७०७ संचालक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gharkul Yojana : ग्रामीण भागातील घरकुलांना शहरीप्रमाणे निधी द्या

Women Entrepreneur : महिला उद्योजकांनी विक्री व्यवस्था उभारणे आवश्यक ः आवटे

Soybean Procurement : सोयाबीन खरेदीला धाराशिवमध्ये वेग

Mahayuti Press Conference : महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक विजय असून लाडक्या बहिणींनी अंडरकरंट दिला; महायुतीच्या पत्रकार परिषदेतून शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची मविआवर टीका

Onion Cultivation : एक लाख हेक्टरपर्यंत पोहोचले कांदा लागवड क्षेत्र

SCROLL FOR NEXT