Vigorously grown sugarcane. 
यशोगाथा

सुरू उसाचे एकरी १२२ टन उत्पादन

विकास जाधव

अभ्यासपूर्ण, शास्त्रीय व्यवस्थापन व तंत्रज्ञान या जोरावर धामणेर (जि. सातारा) येथील सौरभ कोकीळ यांनी उसाची एकरी उत्पादकता १०० टनांपुढे सातत्याने जपली आहे. सुरू उसाचे एकरी १२२.४६ टन उत्पादन घेणाऱ्या सौरभ यांना वसंतराव नाईक ऊसभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. सातारा जिल्ह्यात कृष्णा काठी वसलेल्या धामणेर गावाची राज्यात स्वच्छ, सुंदर आदर्श गाव म्हणून ओळख आहे. येथील सौरभ विनयकुमार कोकीळ तरुण पदवीधर शेतकरी आहेत. नोकरीच्या मागे न लागता त्यांनी शेतीतच प्रगती करण्यास सुरुवात केली. घरची आर्थिक परिस्थिती कमजोर होती. वडिलांचे आजारपण होते. डोक्यावर कर्जाचा बोजा होता. ऊस शेती व दुग्ध व्यवसायाशिवाय आर्थिक स्रोत नव्हता. अशावेळी धामणेर विकास सेवा सोसायटीकडून कर्ज घेऊन पाच गायी घेतल्या. तेथून खरी प्रगती सुरू झाली. कृषी विभागाच्या योजना, प्रगतिशील दुग्धोत्पादकांच्या भेटी यातून भरारी घेताना गायींची संख्या १५ पर्यंत नेली. सुधारित गोठा पद्धती, वैरण नियोजन केले. थोडे कर्ज व बचत यातून कृष्णा नदीवरून पाइपलाइन करून ‘लिफ्ट इरिगेशन’ केले.   ऊस शेतीतील ‘होमवर्क’  ऊसशेतीतील बारकावे, शास्त्रीय दृष्टिकोन व तंत्रज्ञान व अथक प्रयत्न यांचा मिलाफ घडवत व्यवस्थापन सुधारण्याला भर दिला. विविध प्रयोग सुरू केले. तज्ज्ञांचे मार्गदर्शन, चर्चासत्रे, कृषी विज्ञान केंद्र, ऊस संशोधन केंद्रांना भेटी दिल्या. त्यातून तंत्र व ज्ञान वाढवले. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय, पुणे-मांजरी) येथेही ऊसशेती ज्ञान प्रशिक्षण घेतले. येथील डॉ. राजेंद्र भोईटे तसेच पाडेगाव ऊस संशोधन केंद्रातील तज्ज्ञ डॉ. भारत रासकर, डॉ. धमेंद्रकुमार फाळके यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन लाभू लागले. तज्ज्ञांनी एकरी १३० टन उत्पादनाचे उद्दिष्ट दिले. सुरुवातीस ते अशक्य वाटू लागले. पण चिकाटीने व हिमतीने ते पेलले. चार एकरांवर ठिबक सिंचन केले. जमिनीची चांगल्या प्रकारे मशागत, उभी आडवी खोल नांगरट, पारंपरिक तीन फूट सरीऐवजी ४.५ ते ५ फूट रुंद सरी पद्धतीचा अवलंब केला. पायाभूत बियाण्यापासून तयार केलेल्या बेणेमळ्यातील शुद्ध बियाण्याचा वापर सुरू केला. अशा व्यवस्थापनातून ऊसशेतीत बदल घडू लागला. मातीची सुपीकता व एकरी उत्पादकता वाढण्यास मदत झाली.    असे असते ऊस व्यवस्थापन 

  • एकूण शेती ३० एकर. १५ एकर भाडेतत्त्वावर. बहुतांश ऊसक्षेत्र. 
  • को ८६०३२ वाणाचा वापर 
  • माती परीक्षण महत्त्वाचा मुद्दा आहे. ते साधारण दरवर्षी करण्याचा प्रयत्न असतो. त्यातून जमिनीत कोणती अन्नद्रव्ये कमी किंवा जास्त आहेत हे समजते. त्यातून आर्थिक बचत होण्याबरोबर जमिनीचे आरोग्यही चांगले राहते.
  • रासायनिक खतांचा भरमसाट वापर न करता जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढवितात. त्याचे प्रमाण १.२ टक्क्यापर्यंत म्हणजे चांगल्या प्रमाणात आहे. 
  • हरभऱ्याचा बेवड घेतला जातो. फेरपालट होते.
  • सहा ते सात ट्रेलर एकरी याप्रमाणे शेणखताचा वापर दर तीन वर्षांनी केला जातो. 
  • उसात पॉवर टिलरच्या साह्याने बाळभरणी केल्यानंतर ताग, धैंच्या यांसारख्या हिरवळीच्या खतांची लावण होते. मोठ्या बांधणीवेळेस ही पिके गाडून दिली जातात. 
  • दर्जेदार व नऊ ते दहा महिन्याच्या दर्जेदार बेण्याचा वापर होतो. 
  • बेणे मळा स्वतःच करतात. शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे मिळावे यासाठी ‘व्हीएसआय’ येथून मूलभूत बेणे घेतले जाते. त्यानंतर प्रमाणित बेण्याची शेतकऱ्यांना विक्री केली जाते. कार्बेन्डाझिम व क्लोरपायरिफॉसची बेणेप्रक्रिया केली जाते.
  • लागवडीनंतर ३- दिवसांनी विद्राव्य खतांचा वापर सुरू केला जातो. तो दर पंधरा दिवसांच्या अंतराने दहा महिने सुरू राहतो. यात पोटॅश, १२-६१-० आदींचा वापर होतो.  लागवडीनंतर २५ दिवसांपर्यंत ‘गॅप फिलिंग’ केली जाते. 
  • लागवड साडेचार ते पाच फूट सरी पद्धतीने तसेच एक डोळा पद्धतीने होते. एकरी साडेचार ते पाच हजार कांड्यांची लावण होते. दोन कांडीतील अंतर दोन फूट ठेवले जाते. 
  • आडसाली हंगामातील लागवड सुमारे १० एकरांत असते. काही लागवड सुरू हंगामात (१५ नोव्हेंबरनंतर) होते. 
  • बेसल डोसमध्ये डीएपी, पोटॅश, निंबोळी पेंड, गंधक व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर होतो. 
  • प्रत्येक उसाला आठ ते नऊ कोंब ठेवले जातात. 
  • उत्पादन  आडसाली उसाचे एकरी १०० टनांपर्यंत, त्याच्या खोडव्याचे ७५ ते ८० टन, तर सुरू उसाचे एकरी ९० टनांपर्यंत व खोडव्याचे ६५ टनांपर्यंत उत्पादन घेतले जाते. एकरी उत्पादनखर्च किमान ७० ते ७५ हजार रुपये असतो. प्रतिटन तीन हजार रुपये दर मिळतो.   उल्लेखनीय उत्पादनात सातत्य  सन २०१३-१४ पासून एकरी १०० ते १०५ टन उत्पादनात सातत्य टिकवत असल्याचे सौरभ सांगतात. भागातील विक्रमी उत्पादन घेतलेल्या पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांच्या क्षेत्राला भेटी देत त्यातून अनेक गोष्टी ते शिकले. सन २०१७-१८ मध्ये सुरू हंगामातील उसाचे १२२. ४६ टन उत्पादन घेत त्यांनी ‘व्हीएसआय’ संस्थेचा राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. बियाणे प्लॅाट असलेल्या खोडव्याचे एकरी ९७  टनांपर्यंत उत्पादन घेतल्याचेही ते सांगतात.  शेतकऱ्यांना मार्गदर्शन  स्वतःची शेती किफायतशीर होत असताना आपल्यासोबत अन्य  शेतकऱ्यांकडील ऊस उत्पादन वाढावे यासाठी सौरभ यांनी बळीराजा शेतकरी गटाची स्थापना केली आहे. गटाच्या माध्यमातून मेळावे आयोजन करून तंत्रज्ञान प्रसार केला जातो. नुकतीच हैदराबाद येथील एका कंपनीच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची संधी त्यांना मिळाली.  संपर्क ः सौरभ कोकीळ, ७०५७८७५५००

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Pm Aasha Scheme : 'पीएम आशा'तून शेतकऱ्यांपेक्षा ग्राहकांचं कल्याण ?

    Rain Maharashtra : राज्यात पावसाला पोषक हवामान; शुक्रवारी मराठवाड्याला 'येलो अलर्ट'  

    Marathwada Mukti Sangram : मराठवाडा मुक्ती संग्रामाची गौरवशाली शौर्यगाथा

    Soybean Yellow Mosaic : मळेगावातील सोयाबीनवर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव

    Poultry Business : भांडवलाअभावी पोल्ट्री व्यवसाय धोक्यात, सांगली जिल्ह्यात परिस्थिती

    SCROLL FOR NEXT