Shubhangi dalavi while showing various seedlings in the nursery
Shubhangi dalavi while showing various seedlings in the nursery 
यशोगाथा

रोपवाटिका व्यवसायातून साधली प्रगती

sandeep navale

कामशेत (ता. मावळ, जि. पुणे) येथील शुभांगी दळवी यांनी रोपवाटिका व्यवसायामध्ये स्वतंत्र ओळख तयार केली आहे. विविध फुलझाडांच्या दर्जेदार रोपनिर्मितीमुळे राज्य आणि परराज्यात रोपांना चांगली मागणी आहे. रोपनिर्मितीमधील आधुनिक तंत्रज्ञान आणि बाजारपेठ जाणून घेण्यासाठी त्यांनी तैवान, हाँगकाँगमध्ये प्रशिक्षण घेतले आहे. राज्यातील प्रयोगशील महिला शेतकऱ्यांनी शेती विकासाच्या बरोबरीने प्रक्रिया उद्योग, पशुपालन, कुक्कुटपालन, बचत गट आणि रोपवाटिका उद्योगामध्ये स्वतःची वेगळी ओळख तयार केली आहे. अशाच उपक्रमशील महिलांपैकी एक आहेत कामशेत (ता. मावळ, जि. पुणे) येथील शुभांगी दळवी. फूल उत्पादक शेतकरी तसेच पुणे, मुंबई शहरातील ग्राहकांची गरज लक्षात घेऊन दळवी यांनी शोभिवंत फुले झाडांची रोपवाटिका सुरू केली. या व्यवसायाच्या माध्यमातून त्या स्वावलंबी झाल्या, त्याचबरोबरीने परिसरातील महिलांना वर्षभर रोजगारही उपलब्ध करून दिला आहे. शुभांगी पांडुरंग दळवी या उच्चशिक्षित महिला शेतकरी. माहेरची शेती असल्याने शुभांगीताईंना वडिलांकडून व्यावसायिक शेतीचे बाळकडू मिळाले. त्यांच्या माहेरच्या शेतीमध्ये २० गुंठे हरितगृहात गुलाबाची लागवड आहे. त्याचबरोबरीने कांदा, बटाटा, टोमॅटो, फरस बी, सोयाबीन, ऊस इत्यादी पिकांच्या लागवडीची माहिती शुभांगीताईंना वडिलांकडून लहानपणापासून मिळत गेली. १९९५ पासून पॉलिहाउसमध्ये निर्यातक्षम गुलाबाचे उत्पादन, फुलांची प्रतवारी यामध्येही त्या पारंगत झाल्या. लग्न झाल्यावर सासरकडील कुटुंबदेखील उच्च तंत्रज्ञान वापरून शेती करणारे मिळाले. शुभांगीताईंनी सासरच्या शेतीमध्ये २० गुंठे हरितगृहातील जरबेरा पिकाचे चांगले व्यवस्थापन केले. हळूहळू परिसरातील शेतकरी आणि शहरी ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन त्यांनी रोपवाटिका व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला रोपवाटिका व्यवस्थापनाची जबाबदारी शुभांगीताईंचे पती पाडुंरग दळवी हे पाहत होते. मात्र, कालांतराने पांडुरंग दळवी यांनी पॉलिहाउस उभारणीच्या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. त्यामुळे रोपवाटिकेची संपूर्ण जबाबदारी शुभांगीताईंकडेच आली आहे. परदेशात रोपवाटिकेचे प्रशिक्षण : २००८ मध्ये तळेगाव फ्लोरिकल्चर पार्कची सुरुवात झाली. तेथील पॉलिहाउससाठी गुलाब कलमांची मागणी असल्याचे लक्षात आल्यानंतर शुभांगीताईंनी शेतामध्ये गुलाबाची रोपे तयार करून विक्री करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला ग्राहकांकडून रोपांना कमी मागणी होती. मात्र टप्प्याटप्प्याने काही प्रमाणात वाढ होऊ लागली. परंतु यामध्ये मोठी स्पर्धा असल्याने त्यातून फारसा नफा राहत नसल्याचे लक्षात आहे. पहिल्या टप्यात शुभांगीताईंनी गुलाबाच्या विविध जातींची रोपे तयार करून मावळ परिसरात विक्री सुरू केली. बाजारपेठेतील मागणी लक्षात घेऊन शोभिवंत झाडांची रोपनिर्मिती आणि विक्रीमध्ये त्यांनी लक्ष दिले. विविध कृषी प्रदर्शनांमध्ये भेटी देऊन व्यवसाय वाढीसाठी माहिती गोळा करण्यास सुरवात केली. एका कृषी प्रदर्शनामध्ये त्यांची तैवान येथील रोपवाटिका कंपनीतील तज्ज्ञांशी ओळख झाली. या चर्चेतून त्यांना उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून ऑर्किड फुलांचे उत्पादन तसेच शोभिवंत फुलझाडांच्या निर्यातीबाबतही सखोल माहिती मिळाली. रोपवाटिकेतील आधुनिक तंत्रज्ञान आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची माहिती घेण्यासाठी २०१७ मध्ये त्यांनी तैवान, हाँगकाँगमध्ये १५ दिवसांचे प्रशिक्षण घेतले. या देशातील आधुनिक रोपवाटिकांना भेटी दिल्या. तेथील तंत्रज्ञान शिकून घेतले. या तंत्रज्ञानाचा वापर स्वतःच्या रोपवाटिकेत करण्याचा निर्णय घेतला. आधुनिक तंत्राने उभारले हरितगृह : परदेशामध्ये रोपनिर्मितीचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर शुभांगीताईंनी स्वतःच्या दोन एकर क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत हरितगृहाची उभारणी केली. रोपनिर्मितीसाठी सरकत्या टेबल तंत्रज्ञानाचा वापर केला. रोपांची आयात, निर्यात करण्यासाठी केंद्र सरकारचा परवाना मिळविला. रोपांच्या योग्य व्यवस्थापनासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्यास सुरुवात केली. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार रोपनिर्मितीची तयारी पूर्ण केली. शहरी बाजारपेठेची गरज लक्षात घेऊन शुभांगीताईंनी तैवानमधून ऑर्किडची रोपे आयात केली. त्यांचे संगोपन अतिशय चांगल्या पद्धतीने केले. सुंदर व उच्च प्रतीच्या फुलांचे उत्पादन घेतले. या फुलांना बाजारपेठेत चांगला दरही मिळू लागला. त्यामुळे रोपवाटिकेतील पुढील टप्पा गाठण्यास सुरुवात केली. बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन शुभांगीताई सध्या अरेका पाम, गोल्डन फर्न, आर्किड, बोगनवेलिया, विविध सक्युलंट्स, मनी प्लॉट, ब्लॅक झामिया, फिलेडेंड्रॉन, क्रोटॉन पेट्रा, एग्लोनेमा, बेल बॉटम पाम तसेच फळझाडांमध्ये आंबा, चिंच, फणस, पेरू, जांभूळ, चिकू कलमांची निर्मिती आणि विक्रीस सुरुवात केली. रोपवाटिकेचे व्यवस्थापन  शुभांगीताई स्वतः रोपवाटिकेचे व्यवस्थापन करतात. रोपांच्या व्यवस्थापनासाठी सरकत्या टेबल तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे चांगली वाढ होते. मर होत नाही, रोपांमध्ये गवत उगवत नाही. उंचावर रोपे ठेवल्यामुळे रोपांची मशागत सोपी जाते. सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत रोपवाटिकेत विविध रोपांची निर्मिती केली जाते. रोपवाटिकेत शोभिवंत फुलझाडांचे मातृवृक्ष उपलब्ध आहेत. तसेच दर महिन्याला परदेशातून विविध रोपे मागवून त्यापासून पॉलिहाउसमध्ये नवीन रोपे तयार केली जातात. कटिंग, रनर आणि बियांपासून रोपनिर्मिती केली जाते. सर्व रोपे कोकोपीटमध्ये तयार केली जातात. त्यामुळे मर होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. दळवी यांच्या गावाजवळ ठक्करवाडी आहे. येथील २५ आदिवासी महिला आणि युवकांना रोपवाटिकेच्या माध्यमातून वर्षभर रोजगार उपलब्ध करून दिला आहे. राज्य, परराज्यांत विक्री  जुना मुंबई-पुणे महामार्गालगत शुभांगताईंनी रोप विक्री केंद्र सुरू केले आहे. तेथे दोन व्यवस्थापक विक्रीचे काम पाहतात. साधारणपणे दर महिन्याला खर्च वजा जाता तीन लाखांची उलाढाल होते. पुणे, मुंबई, नाशिक, ठाणे, बंगळूर, दिल्ली, कोइमतूर, बहारीन येथे विविध रोपांची विक्री केली जाते. शुभांगीताईंच्या रोपवाटिकेस देश तसेच विदेशातील लोक सातत्याने भेट देत असतात. शेतीकडेही दिले लक्ष  रोपवाटिकेत उच्च तंत्रज्ञान वापरत असताना पारंपरिक शेतीदेखील शुभांगीताईंनी चांगल्या पद्धतीने केली. वीस एकर शेतीमध्ये विविध हंगामी पिकांची लागवड असते. त्यांनी ऊस पाचट कुट्टी करणारे यंत्र आणले आहे. त्याचा परिसरातील शेतकऱ्यांना देखील फायदा होतो. त्यामुळे परिसरातील शेतकरी पाचट न जाळता त्याची शेतात कुट्टीकरून सेंद्रिय खत तयार करतात. त्याचा जमीन सुपीकता आणि ऊस उत्पादनाला फायदा झाला आहे. याचबरोबरीने दळवी यांनी व्हर्टिकल फार्मिंगचा वापर करून हळद उत्पादन सुरू केले आहे. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून टाक्यांमध्ये मत्स्यपालनास सुरुवात केली आहे. संपर्क ः शुभांगी दळवी, ९५९५२१२२३२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT