Biscuit Production Agrowon
यशोगाथा

Biscuit Success Story : शेतकरी गटाचा ‘अग्रणी फ्रेश’ ब्रॅण्ड

Biscuit Making Business : चार वर्षांपूर्वी अग्रण धुळगाव (ता. कवठेमहांकाळ, जि.सांगली) गावातील वीस शेतकऱ्यांनी एकत्र येऊन अग्रणी शेतकरी उत्पादक गटाची स्थापना केली. या गटाने बाजारपेठेचा अभ्यास करून धान्य विक्रीच्या बरोबरीने ज्वारी, बाजरी, नाचणी, राजगिरा, वरी, कोडू बिस्किटे ‘अग्रणी फ्रेश’ या ब्रॅण्डने विक्रीस प्रारंभ केला.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Agrani Fresh Brand Bakery Business : सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यामध्ये द्राक्ष, डाळिंब पिकांसह खरीप, रब्बी हंगामातील पिकांची लागवड असते. याच तालुक्यातील अग्रण धुळगाव या गावालाही दुष्काळाचा सामना करावा लागला. म्हैसाळ योजनेचे पाणी तालुक्यातील शिवारात फिरले अन् दुष्काळी असलेला भाग बागायती झाला. याच गावातील रमेश संभाजी खंडागळे हे युवा शेतकरी. शिक्षण घेतच शेती करू लागले. प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी एमबीएचे शिक्षण पूर्ण केले. पुणे येथे एका खासगी कंपनीत नोकरी सुरु केली. नोकरी करत त्यांचे गावाकडील शेतीकडे लक्ष होते.२०२० च्या दरम्यान कोरोना काळात रमेश खंडागळे नोकरी सोडून गावाकडे आले. पुन्हा नव्या जोमाने शेती करू लागले.

सध्या स्वतःची तीन एकर आणि कराराने आठ एकर शेती त्यांनी घेतली आहे. पारंपारिक शेती करण्यापेक्षा वेगळं काही करता येते का याची चाचपणी केली. या दरम्यान त्यांनी वीस शेतकऱ्यांना एकत्र आणले. अग्रणी शेतकरी उत्पादक गट स्थापन केला. गावात ज्वारी, बाजरी, गहू, मका लागवड असते. त्यामुळे गटाच्या माध्यमातून या शेतीमालाची विक्री करणे सोपे हाईल, असा त्यांना अभ्यासातून लक्षात आले. गटातील सदस्यांनी धान्य विक्री व्यवस्था उभारली. पै-पाहुणे, मित्रमंडळींना विक्री सुरू केली. लोकसंपर्कातून धान्यविक्रीची प्रसिद्धी झाली. ग्राहकांच्या मागणीनुसार २५ किलो, १० किलो असे पॅकिंग करून विक्री सुरू झाली. तसेच धान्य एकत्र करून थेट बांधावर व्यापाऱ्यांना विक्री सुरू झाली.

बिस्कीट निर्मितीच्या दिशेने...

अग्रणी शेतकरी उत्पादक गटातील सदस्यांनी दरम्यानच्या काळात तत्कालीन उपविभागीय कृषी अधिकारी मनोजकुमार वेताळ आणि कृषी सहाय्यक गजानन अजेटराव यांची भेट घेतली. त्यांनी धान्य विक्रीच्या बरोबरीने प्रक्रिया उद्योगातून मूल्यवर्धनाचा सल्ला दिला. तसेच बिस्कीट निर्मितीबाबत माहिती दिली. त्यासाठी लागणारे यंत्रणा, बाजारपेठेचीदेखील माहिती दिली. जानेवारी २०२० मध्ये आत्मा विभागाला अग्रणी शेतकरी उत्पादक गट जोडला गेला. पुढे गटातील सदस्यांनी एरंडोली, बुधगाव, जत या भागात बिस्किटे निर्मिती करणाऱ्या लघू उद्योगांना भेटी दिल्या.

गटाने उपलब्ध माहितीच्या आधारावर स्वतःच्या घरी ज्वारी, बाजरीपासून बिस्किटे तयार करण्यास सुरुवात केली. ही बिस्किटे त्यांनी गटातील सदस्य, मित्र मंडळींना दिली. त्यांच्याकडून चव, दर्जा या गोष्टी जाणून घेतल्या. त्यात बदल करायला हवा असे सल्लेही गटाला मिळाले. त्यामुळे प्रक्रिया उद्योगाचा अभ्यास, तंत्रज्ञान आणि बिस्कीट तयार करण्यासाठीचे प्रमाण या गोष्टींची गटाने पुन्हा नव्याने माहिती घेतली.

प्रक्रिया उद्योगाला सुरुवात

प्रक्रिया उद्योगाबाबत माहिती देताना गटाचे अध्यक्ष सुरेश भोसले म्हणाले, की प्रक्रिया उद्योग सुरू करताना तांत्रिक अभ्यास आणि शास्त्रशुद्ध प्रशिक्षण महत्त्वाचे ठरले. आत्मा विभागाच्या माध्यमातून गटातील दहा जणांनी हैदराबाद येथे पाच दिवसांचे बिस्किटे निर्मितीबाबत शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले. याठिकाणी ज्वारीचे पीठ कसे हवे, त्याचे प्रमाण किती असावे, भाजणी, यासह गुणवत्ता आणि दर्जा या गोष्टी बारकाईने आत्मसात केल्या.

प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर गटाने प्रकल्प उभारणीचा निर्णय घेतला. परंतु भांडवल अपुरे असल्याने परिसरातील प्रक्रिया उद्योजकांकडून बिस्किटे तयार करून घेण्याचा निर्णय घेतला. सध्या शंभर किलो बिस्किटांची मागणी असेल तर एरंडोली (ता. मिरज) येथे गटातील एक सदस्य बिस्किटांची रेसिपी घेऊन जातो. तेथील प्रक्रियादाराच्या सहकार्याने बिस्किटे तयार केली जातात. एक किलो बिस्किटे तयार करण्यासाठी प्रति किलो ६० रुपये मजुरी दिली जाते. जर दहा किलोपर्यंत मागणी असेल, तर घरगुती स्तरावर बिस्किटांची निर्मिती केली जाते.

एक गाव, एक वाण

गटाने टप्प्याटप्प्याने बाजारपेठेत बिस्किटांची विक्री सुरू केली, पण प्रत्येक वेळी ज्वारीच्या बिस्किटांची चव बदलत असल्याचे लक्षात आले. त्यावर तज्ज्ञांशी चर्चा करून मार्ग काढण्यात आला. याबाबत गटाचे उपाध्यक्ष रमेश खंडागळे म्हणाले, की गटातील सदस्यांनी गावातील शेतकऱ्यांना एकत्र करून कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार ज्वारीच्या एकाच वाणाच्या लागवडीवर भर दिला. कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी जिरायतीसाठी फुले सुचित्रा, बागायतीसाठी फुले रेवती हे वाण प्रक्रिया उद्योगासाठी योग्य असल्याचे सांगितले. त्यानुसार गावशिवारातील ४०० हेक्टर क्षेत्रावर या दोन जातींच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात आले. गटाने सेंद्रिय पद्धतीने ज्वारी उत्पादनासाठी प्रयत्न सुरू केले. पीक व्यवस्थापनात दशपर्णी अर्क, जिवामृताच्या वापरावर भर देण्यात आला. प्रक्रियेसाठी ज्वारीचे योग्य वाण तसेच पीक व्यवस्थापनावर भर दिल्याने उत्पादनातही वाढ झाली. बिस्किटांचा दर्जा आणि चवही सुधारण्यास मदत झाली. त्यामुळे ग्राहकांच्या मागणीनुसार बिस्किटांच्या उत्पादनास सुरवात झाली. बिस्कीट निर्मितीसाठी ज्वारी, बाजरीची खरेदी गावातील शेतकऱ्यांकडून केली जाते. या शेतकऱ्यांना बाजारपेठेपेक्षा जास्त दर दिला जातो. नाचणी, राजगिरा, वरी हे धान्य कमी पडले तर बाजारातून खरेदी होते. परंतु गावातील शेतकऱ्यांनी नाचणी, राजगिरा, कोदू लागवडीस सुरुवात केली आहे.

बिस्किटांच्या विक्रीचे नियोजन

गटातर्फे सध्या ज्वारी, बाजरी, नाचणी, राजगिरा, वरी, कोडू या धान्यांपासून बिस्किटांची निर्मिती केली जाते. गटाने ‘अग्रणी फ्रेश’ हा ब्रॅण्ड तयार केला आहे. सुरुवातीला कृषी विभागातील अधिकारी, कृषी विभागामार्फत आयोजित शेतीशाळा, कार्यशाळेमध्ये बिस्किटांची विक्री गटाने सुरू केली. गटाने सांगली जिल्ह्यातील कृषी प्रदर्शने तसेच गेल्यावर्षी आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त मुंबई येथे मंत्रालयात भरलेल्या प्रदर्शनात सहभाग नोंदवत बिस्किटांच्या विक्रीला गती दिली.

यातून विविध गावांतील ग्राहक आणि दुकानदारांशी संपर्क वाढल्याने विक्रीची साखळी तयार झाली. सध्या पुणे, नगर, सातारा, कोल्हापूर, मुंबई, धारवाड बाजारपेठेत कुरिअर, खासगी बसच्या माध्यमातून ग्राहक आणि दुकानदारांना मागणीनुसार बिस्किटे पाठवली जातात. सध्या ज्वारी, बाजरी, नाचणी बिस्कीट ३०० रुपये आणि वरी, राजगिरा, कोडू बिस्किटांची ३९५ रुपये प्रति किलो या दराने विक्री केली जाते.

गटातील सदस्यांना मिळाला रोजगार

बिस्किट निर्मितीबरोबर काही प्रमाणात शेतकरी आणि गटातील सदस्यांकडील धान्याची प्रतवारी आणि पॅकिंग करून विक्री केली जाते. गटातील सदस्य धान्य प्रतवारी, पॅकिंग आणि विक्रीची कामे करतात. यामुळे गटातील सदस्यांना रोजगार उपलब्ध झाला आहे. गेल्यावर्षी गटाची उलाढाल ३ लाख ८४ हजार रुपये झाली. त्यातून ६४ हजार रुपये नफा मिळाला. यातून मिळणारा पैसा हा गटातील सदस्याला दिला जातो. तसेच बिस्किटांच्या विक्रीतून मिळणाऱ्या नफ्यातील २० टक्के रक्कम गटाच्या खात्यामध्ये वर्ग केली जाते. ही रक्कम पाच वर्षे तशीच ठेवली जाणार आहे. पाच वर्षांनी जमा झालेली रक्कम गटातील सदस्यांना समान पद्धतीने वाटप करण्यात येणार आहे.

...असे चालते गटाचे कामकाज

सध्या गटातील १८ सदस्यांची दरमहा एक हजार रुपयांची बचत.गटामार्फत सदस्यांना कर्जाची सोय.

तीन वर्षांपासून बिस्कीट निर्मितीला प्रारंभ, नैसर्गिक चवीला प्राधान्य.

विक्रीसाठी ‘अग्रणी फ्रेश’ ब्रॅण्ड. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचा परवाना.

बिस्किटांची तीन महिने टिकवण क्षमता.

दरवर्षी पाच प्रकारच्या तृणधान्यापासून सुमारे चार हजार किलो बिस्किटांचे उत्पादन.

ग्राहकांच्या मागणीनुसार १०० ग्रॅम, २०० ग्रॅम, ४०० ग्रॅम वजनाचे पॅकिंग.

- रमेश खंडागळे, ९०९६२६१२९५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Cultivation : सांगली जिल्ह्यात उसाची ३१ हजार हेक्टरवर लागवड

Cashew Subsidy : काजू अनुदान अर्ज भरण्यासाठी राहिले केवळ चार दिवस

NCP Sharad Pawar Candidate 3rd List : कृषिमंत्र्यांच्या विरोधात शरद पवारांनी शिलेदार मैदानात उतरवला; परळीतून राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी

Water Storage : नंदुरबार जिल्ह्यातील अनेक बंधारे भरले; भूजल पातळी वाढण्याची शक्यता

Agriculture Theft : शिवारातून कापसासह केळी, शेती यंत्रणांची चोरी

SCROLL FOR NEXT