Bakery Business : ज्वारीसह नाचणी, राजगिरा, केळी बिस्किटांची निर्मिती

Ragi Processing : चिनावल (ता.रावेर, जि.जळगाव) येथील दीपक श्रावण सरोदे यांनी मैद्याचा वापर न करता विविध धान्यांपासून पौष्टिक बिस्किटांची निर्मिती केली आहे.
Bakery Business
Bakery BusinessAgrowon

चंद्रकांत जाधव

Jalgaon News : चिनावल (ता.रावेर, जि.जळगाव) येथील दीपक श्रावण सरोदे यांनी मैद्याचा वापर न करता विविध धान्यांपासून पौष्टिक बिस्किटांची निर्मिती केली आहे. कच्च्या केळीचे पीठ, राजगिरा, नाचणी, ज्वारी, ओटस आदींपासून बनवलेल्या विविध फ्लेवर्सच्या या बिस्किटांनी स्थानिक बाजारपेठेत चांगले नाव तयार केले आहे.

जळगाव जिल्ह्यात चिनावल (ता. रावेर) येथील दीपक व दामिनी हे सरोदे दांपत्य राहते.
दीपक यांचे वडील श्रावण हे न्हावी (ता.यावल) येथील मधुकर सहकारी साखर कारखान्यातून सेवानिवृत्त झाले आहेत. कुटुंबाची एक एकर काळी कसदार शेती आहे. मात्र तेवढ्या शेतीत संपूर्ण कुटुंबाचा चरितार्थ चालवणे अशक्य झाले होते. त्यामुळे दुग्ध व्यवसाय सुरू करण्याचे दीपक यांच्या कुटुंबाने ठरविले. सुमारे १४ संकरित गायी आणल्या. पाणी व अन्य सोयी केल्या. दररोज प्रति दिन १०० लिटर दूध उत्पादन व्हायचे. पण कमाल चारा खरेदी करावा लागे. तो परवडत नव्हता. दूध दरही हवे तसे नव्हते. तोटा येऊ लागला. व्यवसायाला घरघर लागली. दरम्यान केळी हे प्रमुख पीक रावेर व परिसरात आहे. त्यापासून काही उपपदार्थ तयार करता येतील का याचा शोध दीपक घेऊ लागले.

Bakery Business
Agriculture Business : महिला शेतकऱ्यांनी गांडूळ खत निर्मिती उद्योग सुरू करावा

चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी दीपक यांना वडिलांनी बेकरी व्यवसायाबाबत सुचविले. घरातील अन्य मंडळींनीही त्यास दुजोरा दिला. विचार पक्का झाल्यानंतर दीपक यांनी मध्य प्रदेशातील इंदूर येथे बेकरी व्‍यवसायातील तीन दिवसांचे प्रशिक्षण घेतले. तेथे मैद्यापासून पाव, बिस्किटे तयार करण्याची माहिती, ज्ञान घेतले.

प्रक्रिया उद्योगाची वाटचाल

सन २०१६ च्या दरम्यान प्रक्रिया उद्योगाला सुरवात झाली. ग्राहकांमध्ये आरोग्याविषयी वाढलेली जागृती अभ्यासून मैद्याचा जराही वापर न करता केवळ धान्यांपासून पौष्टिक बिस्किटे तयार करण्याचे ठरवले. चिनावल येथील आपल्याच १५०० चौरस फूट आकाराच्या घरात बिस्किटे तयार होऊ लागली. सुरवातीला घरगुती ओव्हनवर उत्पादने तयार होत होती. दरम्यान घरच्या
९०० केळी झाडांच्या बागेतून पावणेदोन लाख रुपये आले. त्यातून मोठा ‘ओव्हन’ व पीठ करणारी
चक्की खरेदी करता आली. सुरवातीला सरोदे दांपत्य मजुरी तत्त्वावर बिस्किटे तयार करून द्यायचे. यात सर्व साहित्य बिस्किटे तयार करून घेणाऱ्यांचे असायचे. प्रति किलो बिस्कीट निर्मितीसाठी ७० रुपये मजुरी असायची. पुढे व्यवसाय वाढला. मागणी येवू लागली. मग व्यवसायाचा विस्तार करण्यास सुरवात झाली.

कर्जातून उभारले भांडवल

विस्तारासाठी भक्कम भांडवलाची गरज होती. त्यासाठी सुमारे आठ लाखांचे वैयक्तीक कर्ज घेतले.
त्याचा १७ ते १८ टक्के एवढा महागडा व्याजदर होता. पुढे तो २१ टक्क्यांवर पोचला. परंतु उपाय नव्हता. त्याच भांडवलावर यंत्रसामग्री उभी केली. आजही त्या कर्जाची परतफेड करणे सुरू आहे.
मात्र ते अंतिम टप्प्यात आहे. पुढे दीपक कृषी विभागाच्या संपर्कात आले. तत्कालीन कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांनी सूक्ष्म, लघु उद्योग, त्यावरील सवलती, अर्थसाह्य याबाबत मार्गदर्शन केले.
त्यातून निधी उपलब्ध झाला. त्यामुळे ब्रेड, बिस्कीट कटर, मोठा ओव्हन, कणीक मळण्याचे यंत्र
आदी एकूण आठ प्रकारची यंत्रणा खरेदी केली. त्यामुळे कामात गतिमानता व अधिक गुणवत्ता आली.


प्रदर्शनांतून विपणनास बळ

फैजपुरात (ता.यावल) आमदार शिरीष चौधरी, पाल (ता.रावेर) येथील कृषी विज्ञान केंद्रांच्या सहकार्यातून प्रदर्शनाद्वारे स्टॉल उभारण्याची संधी मिळाली. तेथे ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. याच माध्यमातून मुंबई- बांद्रा येथे महाविद्यालयीन संस्थेच्या खाद्यपदार्थ व प्रक्रिया उद्योग प्रदर्शनातही सहभाग घेता आला. त्यातून मुंबईचे ग्राहक जोडले गेले. त्याद्वारे व्यवसाय भरभराटीस येऊ लागला. आजही जळगाव व अन्य शहरांमधील प्रदर्शने, महोत्सवांत दीपक आवर्जून सहभागी होतात. त्यातून विपणनास अधिक बळ मिळाले.

उत्पादनांची गुणवत्ता

गुणवत्तेसाठी आवश्यक कच्चा माल गुणवत्तापूर्ण मिळेल याकडे कटाक्ष असतो. कच्च्या केळीच्या पीठावर आधारित तसेच ज्वारी, नाचणी, राजगिरा, बाजरी, गहू, ओट्स व ‘मल्टीग्रेन’ असे प्रकार,
‘पायनापल’, ‘ऑरेंज’, ‘चॉकलेट’ आदी फ्लेवर्स व २५० ग्रॅम, ५०० ग्रॅम वजन अशा प्रकारात
बिस्किटे तयार होतात. त्यात देशी तूप, साधे तूप, गूळ, साखर आदींचा वापर होतो. समर्थ बेकर्स, चिनावल हा ब्रॅण्डने उत्पादनांची विक्री होते. ओट्स, नाचणी, ‘मल्टीग्रेन’, ज्वारी, बाजरी बिस्किटे २०० रुपये तर केळी, राजगिरा बिस्किटांचे दर ३०० रुपये प्रति किलो आहेत.

उलाढाल, अर्थकारण

जळगाव, भुसावळ शहरांसह यावल, रावेर व अन्य भागांत महिला व्यावसायिकांना पुरवठा होतो. नजीकच्या न्हावी, भालोद, अट्रावल आदी गावांत दीपक स्वतः बिस्किटे पोच करतात. महिन्याला सुमारे चार- साडेचार लाख रुपयांची उलाढाल करण्यापर्यंत मजल मारली आहे. स्वतः सरोदे दांपत्य उद्योगात राबतेच. पण गावातील महिला व युवक अशा चार जणांनाही बारमाही रोजगारही दिला आहे.
कच्चा माल, वीज, मजुरी यावरील खर्च अधिक आहे. बारमाही काम सुरू राहत असल्याने मजुरी सतत द्यावी लागते. या व्यवसायातून सुमारे ३० ते ३५ टक्के नफा हाती राहतो.
पाल कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख महेश महाजन, डॉ.धीरज नेहेते, तत्कालीन कृषी उपसंचालक अनिल भोकरे, गणेश जाधव, विकास कुंभार आदींचे मार्गदर्शन मिळते. प्रक्रिया उद्योगांबाबत विविध दौऱ्यांमधूनही दीपक यांनी ज्ञानवृध्दी केली आहे.

मैद्याचा वापर न करता केवळ धान्यांपासून विविध स्वादाची पौष्टिक बिस्किटांची निर्मिती हे आमचे वैशिष्ट्य आहे. बाजारपेठेत मागणी भरपूर आहे. मात्र पुरवठा तेवढा होऊ शकत नाही अशी आजची स्थिती आहे. येत्या काळात स्वतंत्र जागा घेऊन व्यवसायाची वृद्धी करण्याचे प्रयत्न सुरू
आहेत.
दीपक सरोदे- ७९७२७४६९६३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com