हनमंत तर्फेवाड Agrowon
यशोगाथा

Seed Production : भाजीपाला बीजोत्पादनातून अल्पभूधारक कुटुंबाची प्रगती

Success Story of Farmer : नांदेड जिल्ह्यात मांजरमवाडी येथील हनमंत तर्फेवाड यांच्या अल्पभूधारक शेतकरी कुटुंबाने सातत्यपूर्ण अनुभवातून भाजीपाला बीजोत्पादनात मास्टरी मिळवली आहे.

कृष्णा जोमेगावकर

कृष्णा जोमेगावकर

Vegetable Seed Production : नांदेड शहरापासून साठ किलोमीटर अंतरावर असलेले मांजरम वाडी (ता. नायगाव) हे प्रयोगशील शेतकऱ्यांचे गाव म्हणून ओळखले जाते. येथील शेतकरी खरिपातील पिकांसह रब्बी पिकांचेही उल्लेखनीय उत्पादन घेतात.

सोबतच मागील काही वर्षापासून पूरक, प्रक्रिया व्यवसायाकडे ते वळलेआहेत. दुग्धव्यवसाय, रेशीम शेती, भाजीपाला बीजोत्पादन आदींच्या माध्यमातून काही शेतकऱ्यांनी आपल्या शेती पद्धतीत बदल केला आहे.

संघर्षातून विकसित केली शेती

गावातील तरुण शेतकरी हनमंत किशनराव तर्फेवाड यांनी आज संकरित भाजीपाला बीजोत्पादनातहातखंडा मिळवण्यासह पंचक्रोशीत ओळख तयार केली आहे. मात्र त्यासाठी त्यांना अविरत कष्ट व संघर्ष करावा लागला आहे. त्यांचे वडील किशनराव यांची वडिलोपार्जित केवळ २४ गुंठे शेती होती.

त्यात ते १९९० पासून कपाशीचे बीजोत्पादन घ्यायचे. मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत नांदेड येथील कापूस संशोधन केंद्राने विकसित केलेल्या नांदेड-४४, एनएचएच-४६८ आदी वाणांचे ‘सीड प्लॉट’ त्यांच्याकडे असत.

जून ते डिसेंबर या कालावधीत बीजोत्पादन घेऊन जानेवारी ते जून या कालावधीत अन्य शेतकऱ्यांकडे विहीरी खोदण्यासाठी मजुरीचे काम ते करीत असत. हे काम त्यांनी २००४ पर्यंत अविरत सुरु ठेवले. असा कष्टमय संघर्ष करताना शिल्लक रकमेतून त्यांनी दोन मुले व एका मुलीचे लग्न केले. शिवाय १९९८-९९ या काळात एक एकर शेती विकत घेतली. त्यातही बीजोत्पादन सुरु ठेवले.

भाजीपाला बीजोत्पादनात पाऊल

तर्फेवाड कुटुंबाची घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम होती. त्यातच वडील वयोमानानुसार थकत चालले होते. त्यामुळे वडिलांना मदत करण्याच्या उद्देशाने २००३-०४ च्या दरम्यान हनमंत बारावी झाल्यानंतर शेतीत उतरले.

त्यांनी वेगळे प्रयोग करून अर्थकारण वाढवण्याच्या उद्देशाने ३० गुंठ्यात बटाटा लावला.जिद्दीने हे पीक यशस्वी देखील केले. पण दर अत्यंत कमी मिळाल्याने मोठे नुकसान झाले. पण हनमंत निराश झाले नाहीत.

त्यांनी पर्याय शोधण्यास सुरवात केली. त्यावेळी कापूस बीजोत्पादन ज्या कंपनीसाठी केले जायचे तेथील अधिकाऱ्यांनी हनमंत यांना आपल्याच कंपनीसाठी संकरित भाजीपाला बीजोत्पादन सुरू करण्याचे सुचविले.

बीजोत्पादनाचा विस्तार

बीजोत्पादनाचे बाळकडू घरातूनच मिळालेले हनमंत यांनी व्यावसायिक पद्धतीने पीक पध्दतीचे नियोजन केले. खुल्या शेतात बियाणे कंपनीसाठी कारले, भेंडी, कोहळा, वांगी या भाजीपाला पिकांचे बीजोत्पादन घेण्यास सुरवात केली. त्यात चांगले उत्पादन होऊ लागले.

आत्मविश्‍वास वाढल्यानंतर व नफ्याचे गणित जमू लागल्यावर नियंत्रित वातावरणात बियाणांचे उत्पादन घेण्याचे ठरविले. त्यासाठी संबंधितकंपनीचे सहकार्य लाभले. सन २०१७ मध्ये १० गुंठ्यावर शेडनेटची उभारणी केली. त्यात पहिल्यावषीमिरची व टोमॅटोचे बीजोत्पादन घेतले.

कष्ट, मिळालेले मार्गदर्शन, लक्ष देऊन अभ्यासपूर्वक व काळजीपूर्वक काम करण्याची वृत्ती यामुळे हा प्रयोग यशस्वी झाला. काही लाख रुपयांचे उत्पन्न हाती आले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने बीजोत्पादन क्षेत्राचा विस्तार करीत आज सुमारे सात वर्षांच्या अनुभवातून व सातत्यातून तर्फेवाड कुटुंबाने या शेतीत ‘मास्टरी’ तयार केली आहे.

असे आहे बीजोत्पादन व्यवस्थापन

संशोधित संकरित भाजीपाला बियाणे उत्पादन हे कौशल्याचे काम आहे. यासाठी वेळ आणि

कामांतील अचूकता महत्त्वाची असल्याचे हनमंत सांगतात.

सध्या २० गुंठे शेडनेटमध्ये मिरची तर एक एकरांतील प्रत्येकी १० ते २० गुंठ्यात टोमॅटो बीजोत्पादन.

मिरचीची खरिपात तर टोमॅटोची रब्बीत लागवड.

मिरची

चार फूट अंतराचे बेड करून त्यास मल्चिंग. चार बाय चार फूट अंतरावर लागवड.

त्यानंतर ७० दिवसांनी मजुरांकरवी परागीभवन. एक महिना ही प्रक्रिया चालते.

नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये प्लॉट संपतो. प्रति १० गुंठ्यात ६० ते ७० व कमाल ७५ किलोपर्यंत उत्पादन मिळते.

किलोला ६,७५० रुपयांपर्यंत दर मिळतो.

टोमॅटो

चार बाय सव्वा फूट अंतरावर लागवड.

लागवडीनंतर एका महिन्याने परागीभवन. एक महिनाभर ही प्रक्रिया चालते.

जानेवारी अखेरीपर्यंत प्लॉट संपतो. १० गुंट्यात १५ किलोपासून २२ किलोपर्यंत उत्पादन मिळते.

वाणनिहाय प्रति किलो १२ हजार, २० हजारांपासून ते कमाल २५ हजार व काहीवेळा ५० हजार रुपयांपर्यंत दर मिळतो.

बियाणे तयार झाल्यानंतर यंत्राच्या सह्याने बी बाजूला काढून वाळविले जाते. यात बियाणांची शुद्धता ९७.५ टक्के तर उगवण ८० टक्के आल्यानंतर ते ‘पास’ केले जाते.

वांगी, कारले बीजोत्पादन

खुल्या शेतात या दोन्ही पिकांचे बीजोत्पादन प्रत्येकी १० गुंठ्यात घेण्यात येते.

वांगे रब्बीत असते. यात वीस दिवसांनी परागीभवन प्रक्रिया सुरू केली जाते. प्रति १० गुंठ्यात

दीड ते दोन क्विंटल उत्पादन मिळते. किलोला ७५० रुपयांपर्यंत दर मिळतो.

कारले खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामात घेता येते. त्याचे ७० किलो उत्पादन येते. त्यास किलोला १७०० रुपये दर मिळतो.

अनुदानाशिवाय शेडनेट उभारणी

आज एकूण शेतीपैकी ६० टक्के क्षेत्र तर्फेवाड यांनी बीजोत्पादनासाठीच दिले आहे. एकूण ६० गुंठ्यात शेडनेट असून त्याच्या उभारणीसाठी आजपर्यंत कोणत्याही योजनेचे अनुदान घेतलेले नाही.

क्षेत्र वाढवायचे असल्यास संबंधित बियाणे कंपनीकडून शेडनेटसाठी ६५ हजार रुपये व ४० ते ५०हजार मजूरीखर्च म्हणून आगाऊ रक्कम दिली जाते. मात्र पुढे बियाणे पेमेंट करताना ती वजा करून घेतली जाते. संरक्षित पाण्यासाठी विहीर देखील स्वखर्चाने बांधली आहे.

कुटुंबाच्या एकोप्यातून प्रगती

सध्याच्या काळात मजूरटंचाईची समस्या गंभीर झाली आहे. अशावेळी संपूर्ण तर्फेवाड कुटुंब शेतात राबते. त्यातून मजुरीवरील ४० ते ५० टक्के खर्च कमी केल्याचे हनमंत सांगतात. त्यांना वडील किशनराव, आई शांताबाई यांचे मार्गदर्शन होते. पत्नी अर्चना, भाऊ गोविंद व भावजय जनाबाई अशा सर्वांची मोठी मदत शेतीत होते.

आवश्‍यक तेथेच मजुरांची मदत घेतली जाते. कुटुंबाचा एकोपा जपल्यानेच आज शेतीत प्रगती करता आली आहे. याच शेतीच्या बळावरहनमंत यांना दोन एकर शेती घेता आली. घराचे बांधकाम करता आली. एकेकाळी २४ गुंठे असलेली शेती आज साडेतीन ते चार एकरांवर पोचली आहे. नवी विहीर, कूपनलिका आदी कामे यात शेतीतून करणे शक्य झाले. हनमंत ॲग्रोवनचे वाचक आहेत. त्यातील विविध माहिती वाचून शेतीतील प्रयोगांसाठी प्रेरणा मिळते असे ते सांगतात.

- हनमंत तर्फेवाड ९७६५४५८४६०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : सातारा जिल्ह्यात खरीप पेरणी अंतिम टप्प्यात

Farmer Felicitation : ‘सीसीआरआय’च्या वर्धापन दिनी प्रयोगशील शेतकऱ्यांचा गौरव

Melghat Water Scarcity : मेळघाटच्या पाणीटंचाईला ब्रेक

Nanded Water Stock : नांदेडमधील पाणीसाठा ३१ दलघमीने वाढला

Automated Weather Station : सांगलीत स्वयंचलित हवामान केंद्रासाठी ६९६ गावांत चाचपणी

SCROLL FOR NEXT