Lokhande Family  Agrowon
यशोगाथा

Dairy Business : दांपत्याने एकहाती पेललेला यशस्वी दुग्ध व्यवसाय

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

अभिजित डाके

Dairy Business Management : सांगली जिल्ह्यातील जत हा कायम दुष्काळी तालुका आहे. तालुक्यातील बेवणूर हे शेवटचे गाव. गावापासून अवघ्या पाच किलोमीटवर सोलापूर जिल्ह्याची हद्द सुरू होते. बेवणूर हे देखील दुष्काळाच्या कवेतून न सुटलंलं गाव. जिकडं पाहावं तिकडं माळरान. शेतीला मर्यादा आल्याने गावातील शेतकऱ्यांचा पशुपालन हा मुख्य व्यवसाय आहे. गावात दररोज १५ हजार लिटरहून अधिक दूधसंकलन होते.

लोखंडे यांचा दुष्काळाशी लढा

गावातील दगडू मच्छिंद्र लोखंडे यांची वडिलोपार्जित पाच एकर शेती. ती पावसावर अवलंबून. अशा परिस्थितीत दुष्काळासोबतची लढाई त्यांनी थांबवली नाही. वडील शेतात राबायचे. दगडू दुसऱ्यांच्या मेंढ्या निम्म्या वाटणीवर सांभाळण्यासाठी घ्यायचे.

त्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह व्हायचा. सुमारे दहा वर्षे मेंढीपालन केले. त्यातून पै पै साठवला. दगडू यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून बिकट स्थितीत बीए पदवी प्राप्त केली. सन २००३ मध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी म्हणजे सांगली शहरात ठिबकच्या दुकानात, दवाखाना, ‘मेडिकल’ व्यवसायातील ‘मार्केटिंग’ असा चार वर्षे नोकरीचा खडतर अनुभव घेतला.

दुग्ध व्यवसाची मिळाली दिशा

नोकरीतून काहीच साधत नव्हते. विचार करता करता दुग्ध व्यवसायातून पुढे जाण्याची संधी आहे असे वाटून गेले. मनाचा हिय्या केला. सांगोला (जि. सोलापूर) येथील जनावरांच्या बाजारातून २००३-०४ च्या दरम्यान एचएफ संकरित दोन गायी खरेदी केल्या. सांगोला, सांगली, कोल्हापूर या भागांतील गोठ्यांना भेटी देत व्यवसायातील बारकावे, तंत्र जाणून घेतले. पहाटेपासून रात्रीपर्यंत

अव्याहत कष्ट, कुशल व्यवस्थापन, उत्तम आर्थिक नियोजन, व्यवसायवृद्धीचे स्वप्न व तसे नियोजन या बळावर हळूहळू लोखंडे प्रगतीच्या वाटेवरून आत्मविश्‍वासपूर्वक चालू लागले. सुमारे वीस वर्षांच्या काळात गोठ्यातच जनावरांची पैदास केली. त्यामुळेच एकेकाळच्या दोन गायींवरून आजमितीला तब्बल ४५ गायींचा गोठा उभारण्यापर्यंत धवल प्रगती करणे शक्य झाले.

गोठा- दुग्ध व्यवसाय- आदर्श बाबी

चारा व्यवस्था

तीन एकरांवर चारा पिके. यंदा पाण्याची टंचाई असल्याने लागवड नाही.

अशी परिस्थिती वारंवार उदभवू शकते हे लक्षात घेऊन दोन वर्षांपूर्वी

मुरघास निर्मितीचे यंत्र घेतले. परिसरात मका नाही. पण दूरवरून मका घेऊन मुरघास तयार होऊ लागला. चाऱ्याचा प्रश्‍न सुटला. गावातील अन्य पशुपालकांचीही हीच समस्या ओळखून मुरघास विक्रीही सुरू केली. दररोज १५ टन मुरघास तयार होतो. ७ रुपये ते १० रुपये प्रति किलो दराने विक्री करून अतिरिक्त उत्पन्न मिळू लागले आहे.

गायींची संख्या मर्यादित

दरडू म्हणतात, की गायींची संख्या जेवढी जास्त तेवढे गोठा व आर्थिक व्यवस्थापन करणे कठीण.

त्यामुळेच घरच्या दोन व्यक्ती ‘मॅनेज’ करू शकतील या पद्धतीने गायींची संख्या मर्यादित ठेवली. त्यामुळे प्रत्येक जनावराकडे पुरेसे लक्ष देता येते. ११० बाय १०० फूट मुक्तसंचार गोठा आहे.

गायींच्या वयांनुसार व दुधाळ स्थितीनुसार गायींसाठी स्वतंत्र चार कप्पे.

प्रत्येक गायीच्या कानाला टॅगिंग. जन्माला आल्यापासून सर्व नोंदी ठेवण्यात येतात.

यांत्रिक पद्धतीने दूध काढणी.

प्रत्येक महिन्याला संपूर्ण गोठ्याचे निर्जंतुकीकरण.

उन्हाळ्यात गोठ्याच्या छतावर उसाचे पाचट अंथरले जाते. त्यामुळे आतील उष्णता कमी होण्यास मदत.

दूध संकलन- प्रति दिन ४०० लिटरपर्यंत. महिन्याचे सुमारे बारा ते तेरा हजार लि.

मिळणारा दर (फॅट ३.५, एसएनएफ ८.५) -२८ रुपये प्रति लिटर

नफा- ३० ते ४० टक्के. (सध्या कमी दर असल्याने निव्वळ नफा घटला आहे.)

शेणखताची प्रति ट्रेलर ५ हजार रुपये दराने विक्री होते. त्यातून अतिरिक्त उत्पन्न मिळते.

दोघांनीच पेललाय संपूर्ण व्यवसाय

दगडू व कविता या लोखंडे दांपत्याने एकही मजूर न ठेवता केवळ दोघांच्या बळावरच व्यवसाय पेलला आहे. मुलगी प्रतीक्षा नववीत शिकते. अभ्यास सांभाळून ती व्यवसायात मदत करते. मुलगा प्रतीक सांगोला तालुक्यात शालेय शिक्षण घेतो. याच व्यवसायाच्या जोरावर नवी मुंबई- नेरळ येथे फ्लॅट घेता आला.

सांगली येथे घर घेतले. काही लाख रुपये खर्च करून एक एकरभर शेततळे घेतले. शेतात बंगला बांधला. चार ट्रॅक्टर्स असून दोन कारखान्याच्या सेवेत तर एक मुरघास वाहतूक करतो. शेती, घरच्या जबाबदाऱ्या सांभाळून ट्रॅक्टर चालवण्यात देखील कविता यांनी कुशलता मिळवली आहे.

दगडू लोखंडे, ७४९९६८६६६२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT