Weekly Weather Update : महाराष्ट्रावर उत्तरेत १०१४ हेप्टापास्कल आणि दक्षिणेस १०१२ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब आठवडाभर राहील. त्याच वेळी हिंदी महासागरावरील हवेचा दाब १०१० हेप्टापास्कल इतका कमी राहील. त्यामुळे तेथे हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र कायम राहील. त्यामुळे तेथे चक्राकार वारे वाहतील.
मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक व धुळे जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा अग्नेयेकडून राहील. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वारे तिकडे बाष्प वाहून नेतील. त्यामुळे हवामान ढगाळ राहील. मात्र विदर्भ आणि उत्तर महराष्ट्रातील नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहिल्यामुळे थंडीची तीव्रता तेथे कायम राहील. दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात वाऱ्याचा ताशी वेग वाढेल.
अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, हिंदी महासागर व प्रशांत महासागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान समान म्हणजे ३० अंश सेल्सिअस राहील. त्याशिवाय प्रशांत महासागराचे बऱ्याचशा विषववृत्तीय भागात तापमानात घसरण होत आहे. त्यामुळे ‘एल निनो’चा प्रभाव नाही, तसेच ‘सुपर एल निनो’ची शक्यता नाही. हवामान थंड व कोरडे राहील. हिंदी महासागरावरील वारे अरबी समुद्राच्या वरून वायव्य दिशेने वाहत असल्याने मोठ्या प्रमाणावर बाष्प वाहून नेत असल्याने हवामान ढगाळ राहणे शक्य आहे.
ढगाळ हवामान रब्बी ज्वारी पिकास पोषक आहे. मात्र भाजीपाला, फळपिके व इतर पिकांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढेल. रात्री व पहाटे थंडीचे प्रमाण अधिक राहील. तसेच दिवसाही थंडी जाणवेल. सूर्यप्रकाशाचा कालावधी कमी मिळाल्याने रब्बी पिकांच्या वाढीवर आणि उत्पादनावर परिणाम होईल.
कोकण
सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील. रत्नागिरी जिल्ह्यातील तापमानात अल्पशी वाढ होणे शक्य आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी व पालघर जिल्ह्यांत किमान तापमान २२ अंश सेल्सिअस राहील; तर ठाणे व रायगड जिल्ह्यात ते २३ अंश सेल्सिअस राहील. रत्नागिरी, रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत हवामान अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५५ टक्के राहील.
रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत ४२ ते ४८ टक्के राहील. ठाणे व पालघर जिल्ह्यांत ती ३५ टक्के राहील. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता ३० ते ३२ टक्के राहील; तर रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत ती २२ ते २६ टक्के राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग १० किमी राहील; तर रत्नागिरी, रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत ताशी ७ किमी राहील. कोकणातील सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा ईशान्य व नैर्ऋत्येकडून राहील.
उत्तर महाराष्ट्र
नाशिक व धुळे जिल्ह्यांत कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील; तर नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. नाशिक जिल्ह्यात किमान तापमान १९ अंश सेल्सिअस; तर धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत २० अंश सेल्सिअस राहील. मात्र त्यात घट होईल. नाशिक, धुळे व जळगाव जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील.
नाशिक जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ४० टक्के, तर धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यात ३३ टक्के राहील. दुपारचे सापेक्ष आर्द्रतेत घट होईल व दुपारची सापेक्ष आर्द्रता १९ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग १० ते ११ किमी व दिशा अग्नेय व ईशान्येकडून राहील.
मराठवाडा
धाराशिव, नांदेड व परभणी जिल्ह्यांत कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील; तर लातूर, बीड, हिंगोली, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील. जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत किमान तापमान १८ अंश सेल्सिअस राहील; तर धाराशिव, लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांत १९ अंश सेल्सिअस राहील. मात्र त्यात घट होत
जाईल. बहुतांशी मराठवाड्यातील जिल्ह्यात आकाश ढगाळ राहील. धाराशिव, बीड, परभणी व हिंगोली या जिल्ह्यांत आकाश पूर्णता ढगाळ राहणे शक्य आहे. धाराशिव व लातूर या जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ६२ ते ६७ टक्के राहील; तर नांदेड, बीड व परभणी जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ५० टक्के राहील. हिंगोली, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ४० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत घटेल, ती २४ ते २९ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान दुपारी कोरडे राहील. सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग १० ते १४ किमी राहील. धाराशिव, लातूर, बीड व जालना जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा अग्नेयेकडून राहील; तर नांदेड, हिंगोली जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील.
पश्चिम विदर्भ
वाशीम व अमरावती जिल्ह्यांत कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील; तर वाशीम व अमरावती जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान अमरावती जिल्ह्यात १८ अंश सेल्सिअस राहील; तर वाशीम, अकोला व बुलडाणा जिल्ह्यांत ते १९ अंश सेल्सिअस राहील. वाशीम व अमरावती जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील.
सकाळची सापेक्ष आर्द्रता बुलडाणा, अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत ३३ ते ३५ टक्के राहील; तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १८ ते २० टक्के इतकी राहील. वाऱ्याचा ताशी वेग ९ किमी सर्वच जिल्ह्यांत समान राहील. वाऱ्याची दिशा बुलडाणा व अकोला जिल्ह्यांत अग्नेयेकडून, तर वाशीम व अमरावती जिल्ह्यात ईशान्येकडून राहील.
मध्य विदर्भ
यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यांत कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील व किमान तापमान यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांत १८ अंश सेल्सिअस व नागपूर जिल्ह्यांत १७ अंश सेल्सिअस राहील. आकाश सर्वच जिल्ह्यांत अंशतः ढगाळ राहील.
सकाळची सापेक्ष आर्द्रता नागपूर जिल्ह्यात ४६ टक्के राहील; तर यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांत ३५ ते ३९ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता २१ ते २४ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ९ किमी राहील; तर वाऱ्याची दशा ईशान्येकडून राहील.
पूर्व विदर्भ
चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांत कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील; तर गडचिरोली जिल्ह्यात ते ३२ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत किमान तापमान १६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.
सकाळची सापेक्ष आर्द्रता गडचिरोली जिल्ह्यात ४१ ते ४३ राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता १८ ते २३ टक्के इतकी कमी सर्वच जिल्ह्यांत राहील. त्यामुळे दुपारी हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ७ किमी राहील. वाऱ्याची दिशा सर्वच जिल्ह्यांत ईशान्येकडून राहील. त्यामुळे थंडी वाढत जाईल. दिवसा, रात्री व पहाटे थंडी जाणवेल.
दक्षिण पश्चिम महाराष्ट्र
सांगली व सोलापूर जिल्ह्यांत कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. सातारा, पुणे आणि नगर जिल्ह्यांत ते २९ अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर जिल्ह्यात ते २८ अंश सेल्सिअस राहील. सोलापूर व पुणे जिल्ह्यांत किमान तापमान २० अंश सेल्सिअस राहील; तर कोल्हापूर, सांगली, सातारा व नगर जिल्ह्यांत ते १९ अंश सेल्सिअस राहील. सातारा, सोलापूर, पुणे आणि नगर जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील.
कोल्हापूर, सोलापूर व सांगली जिल्ह्यांत सकाळी सापेक्ष आर्द्रता ६६ टक्के राहील; तर सातारा जिल्ह्यात ५७ टक्के आणि पुणे व नगर जिल्ह्यांत ४५ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता नगर व सोलापूर जिल्ह्यात २६ ते २९ टक्के राहील; तर कोल्हापूर, सांगली, सातारा व पुणे जिल्ह्यांत ३० ते ३४ टक्के वाऱ्याचा ताशी वेग १२ ते १४ किमी राहील. सांगली, सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा अग्नेय राहील; तर कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांत पूर्वेकडून वाऱ्याची दिशा राहील.
कृषी सल्ला
थंडीपासून पिके, जनावरे आणि कोंबड्यांचे संरक्षण करणे गरजेचे आहे. पिकांना पाणी देताना संध्याकाळी द्यावे.
गोठा आणि पोल्ट्री शेड किलतानाने झाकावी. त्यामुळे थंड वारे शेडमध्ये जाण्यास प्रतिबंध होतो.
गहू, रब्बी ज्वारी, सूर्यफूल व हरभरा पिकांना वाढीच्या अवस्थेनुसार पाणी द्यावे.
पिकांवरील कीड, रोगांचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन नियंत्रणाच्या योग्य उपाययोजना कराव्यात.
(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य, ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी फोरम फॉर साउथ आशिया)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.