डॉ. रामचंद्र साबळे
Weather Update : महाराष्ट्रावर रविवार (ता. २३) ते बुधवार (ता. २६) या कालावधीत उत्तरेस १००६ व दक्षिणेस १००८ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. गुरुवार (ता. २७)पासून हवेचा दाब कमी होऊन तो १००६ हेप्टापास्कल इतका राहील.
ज्या वेळी कमाल व किमान तापमानात वाढ होते, त्या वेळी हवेचे दाब कमी होतात. याचाच अर्थ या आठवड्यात कमाल व किमान तापमानात प्रचंड वाढ होऊ शकते. असे तापमान मानव, पिके, पशुपक्षी यांना घातक ठरेल.
विशेषतः शरीरातील पाणीपातळी अत्यंत कमी होऊन उष्माघाताने मृत्यू ओढवू शकतो. हा आठवडा अतिशय उष्ण राहील, सर्वांनी काळजी घ्यावी. तसाही एप्रिल महिन्याचा शेवटचा आठवडा अति उष्ण असतो.
प्रती दिन १७ ते १८ मिलिमीटर इतका बाष्पीभवनाचा वेग राहतो. सूर्यप्रकाशाचा कालावधी १२ तासांपेक्षा अधिक असतो. विदर्भ मराठवाड्यातील कमाल तापमान ४१ ते ४२ अंश सेल्सिअस राहील. काही भागात विशेषत: चंद्रपूर जिल्ह्यात ते आणखी वाढणे शक्य आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथे कमाल ४४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याशी शक्यता आहे.
अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, हिंदी महासागर व प्रशांत महासागराच्या पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान ३० अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. बंगालच्या उपसागराचे, अरबी समुद्राचे व हिंदी महासागराच्या पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान गेल्या १०० वर्षांत हळूवारपणे वाढत आहे.
बंगालच्या उपसागरावर तयार होणाऱ्या चक्रीवादळांचे प्रमाण कमी होत आहे. भूपृष्ठापर्यंत तापमान वाढ आणि समुद्राच्या पाण्याचे तापमान वाढ यामुळे हवामान बदल जाणवत आहेत. गारपिटीच्या प्रमाणात वाढ होत आहे. याचा सर्वांत मोठा फटका कृषी क्षेत्राला बसून शेतीचे नुकसान होत आहे. त्यामुळे भविष्यात अन्नसुरक्षा धोक्यात येऊ शकते.
१) कोकण :
कोकणातील तापमान सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांमध्ये कमाल ४० अंश सेल्सिअस राहील. रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात किमान २३ अंश आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस राहील, तर ठाणे व पालघर जिल्ह्यांत २६ अंश सेल्सिअस राहील.
सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत कमाल सापेक्ष आर्द्रता ८५ टक्के, तर ठाणे व पालघर जिल्ह्यांत ७० टक्के राहील. किमान सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यात २४ ते ३१ टक्के राहील.
वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ९ कि.मी. व दिशा नैर्ऋत्येकडून राहील. कोकणातून या पुढेही तापमानात वाढीची शक्यता असून, ठाणे जिल्ह्यात ते ४० अंश सेल्सिअसपर्यंत वाढणे शक्य आहे. उष्णतेची लाट या आठवड्यात जाणवेल.
२) उत्तर महाराष्ट्र :
तापमान नाशिक, धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत कमाल ४० ते ४१ अंश सेल्सिअस राहील. नाशिक व धुळे जिल्ह्यांत आकाश अंशत: ढगाळ राहील. नाशिक, नंदुरबार व धुळे जिल्ह्यांत कमाल सापेक्ष आर्द्रता ४० ते ५० टक्के राहील, तर जळगाव जिल्ह्यात कमाल सापेक्ष आर्द्रता ३० टक्के इतकी कमी राहील.
नाशिक जिल्ह्यात किमान सापेक्ष आर्द्रता १७ टक्के, तर धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत किमान सापेक्ष आर्द्रता ८ ते ९ टक्के राहील. नाशिक व नंदुरबार जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग ९ ते १० किमी व दिशा नैर्ऋत्येकडून राहील. तर धुळे व जळगाव जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग १२ कि. मी. राहील.
३) मराठवाडा :
तापमान परभणी व हिंगोली जिल्ह्यांत कमाल ४२ अंश, तर धाराशिव, लातूर, नांदेड, बीड, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कमाल ४१ अंश सेल्सिअस राहील. त्यात पुढेही वाढ होण्याची शक्यता आहे.
किमान तापमान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २४ अंश, धाराशिव, नांदेड जिल्ह्यात २६ अंश, लातूर, हिंगोली व जालना जिल्ह्यांत २७ अंश आणि बीड व परभणी जिल्ह्यांत २८ अंश सेल्सिअस राहील. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील.
कमाल सापेक्ष आर्द्रता लातूर व नांदेड जिल्ह्यांत ४० ते ४६ टक्के, धाराशीव जिल्ह्यात ३३ टक्के, आणि बीड, परभणी, हिंगोली, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत २५ ते २९ टक्के राहील. किमान सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत १० ते १४ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग वाढून तो १० ते २० किमी ताशी राहील. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने आग्नेयेकडून राहील.
४) पश्चिम विदर्भ
कमाल तापमान बुलडाणा, अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत ४२ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. किमान तापमान अमरावती जिल्ह्यात २७ अंश; तर बुलडाणा, अकोला व वाशीम जिल्ह्यात २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.
कमाल सापेक्ष आर्द्रता वाशीम जिल्ह्यात ३१ टक्के, बुलडाणा जिल्ह्यात २२ टक्के, तर अकोला व अमरावती जिल्ह्यांत १३ ते १८ टक्के राहील. किमान सापेक्ष आर्द्रता ८ ते १४ टक्के राहील.
वाऱ्याचा ताशी वेग ६ ते १२ किमी व दिशा अकोला व वाशीम जिल्ह्यांत नैर्ऋत्येकडून, बुलडाणा जिल्ह्यात वायव्येकडून आणि अमरावती जिल्ह्यात आग्नेयेकडून राहील.
५) मध्य विदर्भ
कमाल तापमान यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यांत ४२ अंश, वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ४१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यात २६ ते २७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.
कमाल सापेक्ष आर्द्रता वाशीम जिल्ह्यात ३१ टक्के, तर उर्वरित जिल्ह्यात १३ ते २२ टक्के राहील. किमान सापेक्ष आर्द्रता ८ ते १४ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते १२ किमी आणि वाऱ्याची दिशा अकोला व वाशीम जिल्ह्यांत नैर्ऋत्येकडून आणि अमरावती व बुलडाणा जिल्ह्यांत आग्नेयेकडून राहील.
६) पूर्व विदर्भ
कमाल तापमान चंद्रपूर जिल्ह्यात ४२ अंश, गडचिरोली व भंडारा जिल्ह्यांत ४१ अंश, गोंदिया जिल्ह्यात ४० अंश, सेल्सिअस राहील. किमान तापमान चंद्रपूर जिल्ह्यात २५ अंश, गडचिरोली व भंडारा जिल्ह्यांत २४ अंश, तर गोंदिया जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस राहील.
आकाश अंशतः ढगाळ राहील. कमाल सापेक्ष आर्द्रता गडचिरोली जिल्ह्यात ५५ टक्के, चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यांत ४६ ते ४७ टक्के आणि भंडारा जिल्ह्यात ३५ टक्के राहील.
किमान सापेक्ष आर्द्रता १२ ते १९ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ८ कि.मी. आणि दिशा आग्नेयेकडून राहील. हवामानात बदल जाणवतील. रविवारी गडचिरोली जिल्ह्यात १० मि.मी. व सोमवारी चंद्रपूर जिल्ह्यात १८ मि.मी. व गडचिरोली जिल्ह्यात ३७ मि.मी. पावसाची शक्यता आहे.
७) दक्षिण-पश्चिम महाराष्ट्र
कमाल तापमान सोलापूर जिल्ह्यात ४१ अंश, तर सांगली, पुणे व नगर जिल्ह्यांत ३९ अंश आणि कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांत ३७ ते ३८ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सोलापूर जिल्ह्यात २६ अंश, तर कोल्हापूर, सांगली व नगर जिल्ह्यात २४ अंश, आणि सातारा व पुणे जिल्ह्यांत २२ ते २३ अंश सेल्सिअस राहील.
आकाश अंशतः ढगाळ राहील. कमाल सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर जिल्ह्यात ६९ टक्के, सातारा व पुणे जिल्ह्यांत ५४ टक्के, सांगली व नगर जिल्ह्यांत ४२ ते ४९ टक्के, तर सोलापूर जिल्ह्यात ती ३५ टक्के राहील. किमान सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत १२ ते १४ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ८ ते १२ कि.मी. व दिशा वायव्येकडून राहील.
कृषी सल्ला
१) कडाक्याची उन्हे पडत आहेत, शेतातील कामे शक्यतो सकाळी व सायंकाळी करा.
२) नवीन लागवड केलेल्या फळबाग रोपांना दररोज ठिबक सिंचनाने पाणी द्यावे. पाटाने पाणी द्यावयाचे असल्यास दर चार दिवसांनी द्यावे.
३) उन्हाळी बाजरी, तीळ, भुईमूग या पिकांना दर ५ दिवसांनी हलके पाणी द्यावी.
४) फळबागेत झाडांचे बुंध्यापासून ४ ते ५ फूट भागांत गवताचे आच्छादन करावे.
५) फळबागांवर ८ टक्के केओलीनची फवारणी केल्यास पानांद्वारे होणाऱ्या बाष्पीभवनाचे प्रमाण कमी राखता येईल.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.