Water Quality and pH Testing Agrowon
टेक्नोवन

Agriculture Spraying : फवारणीसाठी पाण्याची गुणवत्ता, सामू तपासणी महत्त्वाची

Water Quality and pH Testing : फवारणीसाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याची गुणवत्ता आणि सामू या दोन बाबी आपल्या हातात आहेत. कीडनाशकांचा प्रभावी परिणाम मिळविण्यासाठी पाण्याची गुणवत्ता आणि सामूची तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे.

डॉ. प्रमोद मगर, डॉ. सुरेश नेमाडे

Crop Protection and Effective Spraying : विविध किडी, रोग, तणे यामुळे पिकांचे मोठे नुकसान होते. यावर प्रभावी नियंत्रण मिळविण्याकरिता विविध कीडनाशके किंवा रसायनांचा वापर केला जातो. जेणेकरून संभाव्य नुकसान टाळले जाईल. परंतु कोणत्याही कृषी रसायनाची किंवा कीडनाशकाची प्रभावक्षमता ही विविध घटकांवर अवलंबून असते. त्यामध्ये मुख्यत्वे कालबाह्य कृषी रसायनांचा वापर, प्रकाश अपघटन (फोटोलिसिस), जलिय अपघटन (हायड्रोलिसिस), पाण्याची गुणवत्ता व सामू (pH), रसायनाचे असमान रासायनिक वितरण, कीडनाशकाची पाण्यात विरघळण्याची किंवा मिसळण्याची क्षमता तसेच कीडनाशके वापरण्याची वेळ आणि पद्धत आदी महत्त्वाच्या घटकांचा समावेश होतो. या सर्व घटकांपैकी एक अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे फवारणीसाठी वापरले जाणारे पाणी.

फवारणीसाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याची गुणवत्ता आणि सामू या दोन बाबी आपल्या हातात आहेत. कीडनाशकांचा प्रभावी परिणाम मिळविण्यासाठी पाण्याची गुणवत्ता आणि सामूची तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे.

सामू (पीएच) म्हणजे काय?

पाण्याचा पीएच हा १ ते १४ या अंकापर्यंत मोजला जातो. पाण्याचा पीएच तपासण्यासाठी लिटमस पेपर किंवा डिजिटल पीएच मीटरचा वापर करता येतो. यांच्या मदतीने पाण्याचा नेमका पीएच समजण्यास मदत होते. पाण्याचा पीएच त्यातील धन भाराचे हायड्रोजन (H+) आयन आणि ऋण भाराचे हायड्रोक्झिल (OH-) आयन यांच्या प्रमाणावरून ठरतो. ज्या पाण्यामध्ये धन भारीत हायड्रोजन आयनांचे प्रमाण अधिक असते, ते पाणी आम्लधर्मीय असते. म्हणजेच १ ते ७ दरम्यानचा पीएच हा आम्लधर्मीय असतो. ज्या पाण्यात ऋण भारीत हायड्रोक्झील आयनांचे प्रमाण अधिक असते, ते पाणी अल्कधर्मीय असते. म्हणजेच ७ पासून पुढे १४ पर्यंतचा पीएच हा अल्कधर्मीय समजला जातो. ७ अंक दर्शविणारा पीएच हा उदासीन समजला जातो.

फवारणीसाठीच्या पाण्याचा सामू

फवारणी द्रावणाचा सामू बदलल्यामुळे कीडनाशकाची स्थिरता आणि अर्धे आयुष्य यामध्ये आमूलाग्र बदल घडून येतात. त्याचा परिणाम कीडनाशकांच्या प्रभाव आणि कार्यक्षमतेवर होतो. क्षारांचे जलिय अपघटनाचा दर हा कीडनाशकाची रासायनिक गुणधर्म, कीडनाशकाचे द्रावण करण्यासाठी वापरलेल्या पाण्याचा सामू आणि कीडनाशकांचा पाण्याशी आलेला संपर्क कालावधी या घटकांवर अवलंबून असतो. मध्यम ते किंचित आम्लीय श्रेणीतील सामू (४ ते ७) असलेल्या पाण्याची कीटकनाशक फवारणीचे द्रावण तयार करण्यासाठी शिफारस केली जाते. शास्त्रीय दृष्टिकोनातून ५.५ ते ६.५ सामू (pH) असलेले पाणी फवारणीसाठी वापरल्यास प्रभावी परिणाम मिळतात. या दरम्यान सामू असलेले पाणी फवारणीवेळी वापरल्यामुळे बहुतांशी कीडनाशकांना स्थिरता प्रदान मिळून त्यांची प्रभावक्षमता उत्तम राहते.

उदाहरणे

कीडनाशक

ऑरगॅनोफॉस्फेट्‍स गटातील कीटकनाशक क्लोरपायरिफॉस हे पाण्याचा सामू ५ असल्यास जास्त स्थिर आणि प्रभावी ठरते. त्या वेळी त्याचे अर्धे आयुष्य (Half Life Period) ६३ दिवसांचे राहते. परंतु त्याच पाण्याचा सामू ८ असल्यास, त्याचे अर्धे आयुष्य १.५ दिवसांचे राहते. अर्धे आयुष्य म्हणजेच अर्ध-आयुष्य म्हणजे एखाद्या प्रमाणाला त्याच्या प्रारंभिक मूल्याच्या निम्म्यापर्यंत कमी करण्यासाठी लागणारा वेळ होय.

तणनाशक

बहुतेक तणनाशके ही विम्लधर्मीय/अल्कधर्मीय (अल्कलाइन) असतात. जसे की ग्लायफोसेट तणनाशकाच्या बाबतीत फवारणीसाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याचा सामू ५.५ ते ६.५ या दरम्यान असल्यास प्रभावी तण व्यवस्थापन होते. परंतु जर पाण्याचा सामू हा विम्लधर्मीय (अल्कलाइन) ८ ते ९ दरम्यान असेल तर तणनाशकाचे लवकर जलविघटन होते. आणि अपेक्षित तण व्यवस्थापन होत नाही. त्यामुळे स्थिरता आणि प्रभाव क्षमता अबाधित ठेवण्यासाठी फवारणीसाठी वापरत असलेल्या पाण्याचा सामू हा ५.५ ते ६.५ किंवा ढोबळमानाने किमान ६ ते ७ दरम्यान असावा.

पाण्याचा सामू मोजण्याच्या पद्धती

पाण्याचा पीएच तपासण्यासाठी लिटमस पेपर किंवा डिजिटल पीएच मीटरचा वापर करता येतो. यापैकी पीएच मीटर किंवा सामूमापक या इलेक्ट्रोमेट्रिक पद्धतीने एकदम अचूक पीएच समजतो. या दोन्ही पद्धतींनी शेतकऱ्यांना बांधावर फवारणीच्या पाण्याचा पीएच बाबत माहिती मिळते. त्यापैकी शेतकऱ्यांसाठी लिटमस पेपर चाचणी हा पर्याय अतिशय सोयीचा आहे.

डॉ. प्रमोद मगर, ७७५७० ८१८८५

(कीटकशास्त्र विभाग, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT