Drone Spraying : फवारणीसाठी ड्रोनचा वापर

Agriculture Spraying : पीक संरक्षण रसायनांच्या वापराची कार्यक्षमता वाढविण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञान महत्त्वाचे ठरणार आहेत.
Drone Spraying
Drone SprayingAgrowon
Published on
Updated on

Agriculture Technology : पिकाच्या नियोजनामध्ये जेवढे महत्त्व बियाणे, खते, पाणी यांना आहे तेवढेच पिकावर पडणाऱ्या विविध रोगांचे व्यवस्थापन पण महत्त्वाचे आहे. पिकांवर मोठ्या प्रमाणात पडणाऱ्या किडी आणि रोगापासून संरक्षण करण्यासाठी कीडनाशकांची फवारणीची विविध तंत्रे आपण गेल्या काही भागागमध्ये पाहिली. पारंपरिक यंत्राद्वारे मोठे थेंब फवारले जात असल्याने पाणी व कीडनाशके जास्त प्रमाणात वापरावी लागतात. कीडनाशकांच्या विषारीपणा व किमतीमध्येही वेगाने वाढ होत आहे. त्यांचा अचूकपणे व योग्य तितका वापर करणे हे आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे ठरते. तसेच ते पर्यावरणासाठीही फायदेशीर ठरू शकते. पीक संरक्षण रसायनांच्या वापराची कार्यक्षमता वाढविण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञान महत्त्वाचे ठरणार आहेत.

ड्रोन हे एक दूरस्थपणे नियंत्रित होणारे हवाई यंत्र आहे. थोडक्यात छोटे व रिमोट कंट्रोलद्वारे नियंत्रित होणारे मानवरहित विमान म्हणू. या ड्रोनमध्ये क फ्रेम, पाती (प्रोपेलर), मोटार, कंट्रोलर, स्पीड कंट्रोलर, रिमोट कंट्रोल, जीपीएस इ. महत्त्वाचे भाग असतात. त्याचे फिक्स्ड-विंग आणि मल्टी रोटर हे असे दोन मुख्य प्रकार पडतात. त्यातही मल्टी रोटर ड्रोन वापरण्यास सर्वांत सोपे आणि किफायतशीर ठरतात. ड्रोनद्वारे अचूक फवारणी करणे शक्य होते.

ड्रोनमध्ये असलेल्या एरिअल मॅपिंग वैशिष्ट्यामुळे त्यांचा वापर पिकांच्या निरीक्षणासाठी करता येते. उदा. शेतीतील मातीची स्थिती, पिकावरील पाण्याचा ताण, रोग व किडींचा प्रादुर्भाव इ. यांचे निरीक्षण करता येते. त्यामुळे संभाव्य नुकसान लवकर लक्षात येते.

ड्रोनद्वारे फवारणीचा वेगही पारंपरिक फवारणी यंत्रणेच्या तुलनेत ४४ पट अधिक राहतो. कमी वेळात अधिक क्षेत्राची फवारणीशक्य होतो.

फवारणीच्या थेंबांचा (ड्रॉपलेट) आकार अतिसूक्ष्म असल्यामुळे फवारणी एकसारखी होतेच. सोबत पानांद्वारे शोषण चांगल्या प्रकारे होत असल्याने कीडनाशकांची परिणामकारक अधिक राहते.

एका एकरवरील फवारणीसाठी दहा ते २० लिटर द्रावण पुरेसे होते. मात्र कीडनाशकांची एकरी मात्रा निश्चिक करून योग्य प्रमाणात द्रावण तयार करण्याची आवश्यकता असते. या तंत्रामुळे पाण्याची ९० टक्के, तर कीडनाशकाच्या प्रमाणात ३० ते ४० टक्के बचत होऊ शकते.

Drone Spraying
Drone Didi : महाराष्ट्रासह दोन राज्यात ऑक्टोबरपासून ड्रोनचं वाटप; महिलांना मिळणार ड्रोन

ड्रोन चालविणे हे मोठे कौशल्याचे काम असून, डीजीसीएच्या धोरणानुसार ड्रोनचा वापर करण्यासाठी ड्रोन पायलट परवाना हा सक्तीचा आहे. त्यासाठी विद्यापीठामध्ये प्रशिक्षण उपलब्ध असून, त्याद्वारे कुशल मनुष्यबळ तयार केले जात आहे. या प्रशिक्षणामध्ये पायलटला ड्रोन वापरासंबंधी सर्व नियमावली व आपत्कालीन प्रसंगी ड्रोन हाताळणीचे पुरेपूर प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणाशिवाय ड्रोन चालवणे हे धोकादायक असून, त्यातून मोठा अपघात होण्याची शक्यता असते. प्रत्येक ड्रोनची डीजीसीएच्या डिजिटल स्काय प्लॅटफॉर्मवर नोंद करणे (UIN) आवश्यक आहे.

प्रत्येक कामाच्या वेळी आपण फवारणी करणार असलेले क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्रामध्ये येत नसल्याची खात्री करून घ्यावी लागते.

आपण हात हाताळत असलेला ड्रोन हवाई उड्डाणासाठी परिपूर्ण असल्याची दरवेळी शहानिशा करणे आवश्यक असते.

ड्रोनचे सर्व नियंत्रक, दिशादर्शक व स्थान निश्चित करणारी प्रणाली (जीपीएस) सुस्थितीत असल्याची खात्री करावी लागते.

पायलटला ड्रोन संचालनाबरोबरच कीडनाशके किंवा रसायनाच्या सुरक्षित वापरासंबंधिचे प्रशिक्षण अत्यावश्यक असते.

कामापूर्वी आठ तास आधीपर्यंत कोणत्याही मादक द्रव्याचे सेवन केलेले नसावे.

ड्रोन उड्डाणापूर्वी त्याच्या सर्व यंत्रणा आणि फवारणी यंत्रणा योग्य प्रकारे समायोजित (कॅलिब्रेट) केल्याची आणि यंत्रणेतून गळती होत नसल्याची खात्री करणे आवश्यक.

ड्रोन चालविण्यापूर्वी परिसरातील संबंधित सार्वजनिक संस्था उदा. ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि कृषी अधिकारी यांना २४ तास अगोदर लेखी सूचना देणे आवश्यक.

फवारणी क्षेत्रांमध्ये माणसे व पाळीव जनावरे ठरावीक काळापर्यंत येणार नाहीत, याची खात्री करण्याची जबाबदारी क्षेत्रीय अधिकाऱ्याची असेल.

ड्रोनचे संचलन युएएस २०२१ नियमावली (ता.२५/८/२०२१) अंतर्गत सर्व नियमांचे पालन करण्याची जबाबदारी ड्रोन पायलटची असते.

Drone Spraying
Nano Urea and Agricultural Drones : कृषीत नॅनो युरिया आणि कृषी ड्रोनच्या वापरामुळे क्रांती होतेय : केंद्रीय मंत्री जोशी

ड्रोन फवारणीचे अर्थकारण

फवारणी ड्रोन (पाच लिटर) रु. तीन लाख

फवारणी ड्रोन (दहा लिटर) रु. पाच लाख

फवारणी नोझलची संख्या २ आणि ४

फवारणीची रुंदी ३ मीटर

फवारणीची उंची १ ते २ मीटर पिकाच्या उंचीपासून

फवारणीचा वेग ३-६ मीटर/सेकंद

प्रक्षेत्र फवारणीची क्षमता ३.६ हेक्टर प्रति तास (५ मीटर/सेकंद दराने)

फवारणीचा खर्च ३० टक्के

प्रति एकर नफा (रु.) १०१४ प्रति हेक्टर (रु. ४०७ प्रति एकर)

फवारणी करताना घ्यावयाची काळजी :

रसायनाच्या लेबलवरील सर्व सुरक्षा सूचना वाचलेल्या असाव्यात.

सुरक्षा कपडे आणि मास्क वापरावे.

फवारणी करताना व्यसन टाळावे. तसेच खाद्यपदार्थ खाणे वर्ज्य करावे.

हवामानाची माहिती उदा. वाऱ्याचा वेग, तापमान, आर्द्रता यांची तपासणी करणे.

फवारणीची उंची, पाण्याचे प्रमाण आणि फवारणीचा वेग सुनिश्चित असावा.

फवारणीनंतरची कामे :

फवारणी यंत्रणा पूर्ण रिकामी करून साफ करणे आवश्यक आहे.

रसायनांच्या रिकाम्या बाटल्या, डबे आणि वापरलेल्या वस्तूंची योग्य विल्हेवाट ही कीटकनाशक नियम- १९७१ नुसार लावणे आवश्यक आहे.

फवारणी उड्डाणाबाबतच्या नोंदी ठेवणे आणि आवश्यकतेनुसार डीजीसीएला पुरविण्याची जबाबदारी पायलटची आहे.

ड्रोन उत्पादकांच्या सुचनांनुसार नियमित देखभाल व दुरुस्ती करावी

या व्यतिरिक्त कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांच्याकडून ‘प्रसारित आणि प्रमाणित कार्यप्रणाली २०२२’ प्रमाणे संपूर्ण कार्यवाही करावी.

पारंपरिक पद्धतीने फवारणीचा दर

अ.क्र. तपशील अंदाजे रक्कम

रु. प्रति एकर

१ माणसाद्वारे फवारणी ४००-५००

२ एचटीपी स्प्रेअर ४५०

३ बूम स्प्रेअर ३५०-४००

४ ब्लोअर ४५०-५००

५ ड्रोन ४०७.७६

ड्रोनद्वारे फवारणी करण्याच्या खर्चाचा साधारण अंदाज

तपशील अंदाजे रक्कम

ड्रोनची किंमत (रु.) बॅटरीच्या ५ संचांसह (१० लिटर) ९.५ लाख

ड्रोनची एकूण किंमत (C) ९.५ लाख

बचाव मूल्य @ १ टक्का (S) ९५००

ड्रोनचे अपेक्षित आयुष्य, वर्ष (L) ५

प्रति वर्ष कामाच्या तासांची संख्या (H) २५०

सरासरी खरेदी किंमत,(A) रु. ((C+S)/२) ४,७९,७५०

व्याज दर (i), टक्के १०

ऑपरेटरची आवश्यक संख्या २

मजुरी रु. प्रति ऑपरेटर प्रति दिवस ५००

प्रक्षेत्र क्षमता (हे/तास) ३.६

घसारा (D) = ((C-S)/(L*H)), (रु./तास) ७५२.४

व्याज (I) = (A*i)/(१००*L), (रु./तास) १९१.९

कर आणि विमा @५ टक्के (T), (रु./तास) १९०

निश्चित खर्च (रु./तास) (D+I+T) ११३४.३

दुरुस्ती आणि देखभाल खर्च @५ टक्के ® (रु./तास) १९०

ऑपरेटर शुल्क, (रु./तास) १६६.६६

बॅटरी बदलण्याची किंमत (रु./तास) १३२०

बॅटरी चार्जिंग खर्च (रु./तास) १२

परिवर्तनीय खर्च, (रु./तास) १६८८.६६

ड्रोन चालविण्यासाठी येणारा एकूण खर्च, (रु./तास) २८२२.९६

एक हेक्टर पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ (तास) ०.२७

प्रति हेक्टरी फवारणीचा खर्च (रु.) ७८४.१५

प्रति एकर फवारणीचा खर्च (रु.) ३१३.६६

फवारणीचा खर्च ३० टक्के प्रति एकर नफा (रु.) ४०७.७६

डॉ. सचिन नलावडे, ९४२२३८२०४९,

(प्रमुख, कृषी यंत्रे आणि शक्ती विभाग, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com