Sugarcane Modern Machinery Agrowon
टेक्नोवन

Agriculture Technology : ऊस रोपे पुनर्लागवडीसाठी आधुनिक यंत्राचा वापर

Sugarcane Sapling Replanting : ऊस रोप पुनर्लागवडीचा फायदे म्हणजे वेळेची बचत होते. ऊस टिपऱ्या जमिनीत पेरल्यानंतर त्या उगवून येण्यास तसेच त्यांची उंची साधारणत: १ फूट होण्यास जो कालावधी लागतो, तो रोपवाटिकेमध्ये पूर्वीच तयार असलेली रोपे लावण्यामुळे वाचतो.

Team Agrowon

डॉ. निशान पाटील

Sugarcane Farming : ऊस रोप पुनर्लागवडीचा फायदे म्हणजे वेळेची बचत होते. ऊस टिपऱ्या जमिनीत पेरल्यानंतर त्या उगवून येण्यास तसेच त्यांची उंची साधारणत: १ फूट होण्यास जो कालावधी लागतो, तो रोपवाटिकेमध्ये पूर्वीच तयार असलेली रोपे लावण्यामुळे वाचतो. यामुळे पीक कालावधी दीड महिन्यापर्यंत कमी करता येतो.

बेणे जमिनीत पेरल्यानंतर त्यातील १०० टक्के बेणे उगवून येत नाहीत. परिणामी ज्या ठिकाणचे बेणे उगवले नाही त्याठिकाणी जागा रिक्त राहते. त्याठिकाणी नंतर तयार रोपे आणून लावली जातात परंतु त्यासाठी श्रम, वेळ व खर्च लागतो. परंतु, ऊस रोपांची पुनर्लागवड केल्याने उगवण क्षमता समस्येचे निराकरण करता येते. त्याचबरोबर वाढ चांगली होते, फुटवे जोमदार येऊन उत्पन्न वाढायला मदत होते.

ट्रॅक्टरचलित ऊस रोप पुनर्लागवड यंत्र

शेतमजुरांची अनुपलब्धता विचारात घेता, ट्रॅक्टर चलित ऊस रोपे पुनर्लागवड यंत्राच्या साहाय्याने ऊस लागवड केल्यास मजूर समस्या सोडविण्यास मदत होते. तसेच वेळ आणि आर्थिक बचत होते. ऊस रोपे लागवडीसाठी सध्या विविध प्रकारची यंत्रे बाजारात उपलब्ध झाली आहेत. यामध्ये प्रामुख्याने फिंगर पद्धतीचे यंत्र आणि प्लग पद्धतीचे यंत्र उपलब्ध आहे.

फिंगर पद्धतीच्या यंत्रात उभ्या प्रतलात फिरणाऱ्या एका चेन वर चिमटे बसवलेले असतात. यंत्रावर ऊस रोपांचे ट्रे ठेवण्यासाठी जागा असते तसेच मजुरांना बसण्यासाठी खुर्च्या देखील असतात. रिकामा उघडलेला चिमटा जसा खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीच्या समोर येतो, तो व्यक्ती ऊस रोपाचा खोडापासूनचा शेंड्याकडील भाग या चिमट्यात ठेवतो. रोपाला इजा होऊ नये यासाठी या चिमट्यांच्या आतील भागावर रबरचे आवरण असते. खोडाच्या खालील उसाचा डोळा व मुळ्या हा भाग चिमट्याच्या बाहेर राहू दिला जातो. यानंतर हा चिमटा बंद होतो.

यंत्राच्या तळाशी सरी तयार करण्यासाठी रिजर दिलेला असतो. खाली गेल्यानंतर ज्या क्षणी हा चिमटा जमिनीच्या जवळ जातो तेव्हा तो उघडतो. त्यातील रोप हे तयार झालेल्या सरीमध्ये ठेवले जाते. त्याच्या मागोमाग येणाऱ्या दोन तिरप्या चाकांच्या साहाय्याने रोप जमिनीत दाबले जाते. फिंगर पद्धतीच्या यंत्रात एका ओळीचे तसेच दोन व त्याहून जास्त ओळींची यंत्रे उपलब्ध आहेत. जितक्या जास्त ओळींचे यंत्र असेल तितकेच कमी वेळात जास्त क्षेत्रावर ऊस लागवड करता येते. अर्थात, ओळी वाढत जातील त्याप्रमाणात वाढीव अश्वशक्तीचा ट्रॅक्टर वापरणे क्रमप्राप्त ठरते.

प्लग प्रकारच्या यंत्रात आडव्या प्रतलात फिरणाऱ्या थाळ्या बसवलेल्या असतात. या थाळ्यांच्या बाहेरील बाजूस छिद्रे असतात. या छिद्रांच्या खाली प्लग्स बसवलेले असतात. या सर्वांच्या खाली प्लॅस्टिक पाइप्स बसवलेल्या असतात, ज्या जमिनीपर्यंत जातात. फिरत्या थाळ्यांसमोर मजुरांना बसण्यासाठी खुर्च्या असतात.

तसेच बाजूला रोप ट्रे ठेवण्यासाठी जागा असते. खुर्चीवर बसलेली व्यक्ती फिरत्या थाळ्यांवर असणाऱ्या छिद्रामध्ये रोपे टाकतात. पाइपचे छिद्र आले की प्लग उघडला जाऊन रोप हे पाइपमध्ये पडते आणि जमिनीपर्यंत जाते. मागोमाग येणाऱ्या दोन तिरप्या चाकांच्या साहाय्याने रोप जमिनीत दाबले जाते. या प्लग पद्धतीच्या यंत्रात देखील एका ओळ तसेच दोन व त्याहून जास्त ओळींची यंत्रे उपलब्ध आहेत.

यंत्र लागवडीचे फायदे

फिंगर आणि प्लग पद्धतीच्या यंत्रांमध्ये दोन ओळीतील अंतर आवश्यकतेनुसार बदलता येते. अंतर २ फुटांपासून ते ५ फुटांपर्यंत ठेवता येते. त्याचप्रमाणे दोन रोपांमधील अंतर देखील आवश्यकतेनुसार बदलता येते. १ फुटापासून ते ३ फुटांपर्यंत ठेवता येते. तसेच २ इंचापर्यंत खोल रोप लागवड करता येते. सपाट जमीन, पट्टा पद्धत तसेच गादीवाफा या तिन्ही पद्धतीने या यंत्रांच्या साहाय्याने रोप लागवड करणे शक्य आहे. त्याचबरोबर समोरासमोर व नागमोडी अशा दोन्ही पद्धतीने ऊस लागवड करणेही शक्य आहे.

फिंगर पद्धतीच्या यंत्राच्या साहाय्याने प्लग पद्धतीच्या यंत्राच्या तुलनेत अधिक सरस रोप लागवड होते असे निदर्शनास आले आहे. यामध्ये रोपे अधिक प्रमाणात सरळ रेषेत उभी राहतात. पारंपारिक पद्धतीने १० मजूर एका दिवसात एक एकर क्षेत्रावर लागवड करू शकतात परंतु,दोन ओळीच्या यंत्राच्या साहाय्याने तीन मजूर एका दिवसात तीन एकर क्षेत्रावर रोप लागवड करू शकतात.

डॉ. निशान पाटील, ९०९६३३९५९५

(विभाग प्रमुख, कृषी अभियांत्रिकी विभाग, उद्यानविद्या महाविद्यालय, कडेगाव, जि. सांगली)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT