Sugarcane Farming : ऊस शेतीमध्ये सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन

Organic Carb Management : सेंद्रिय कर्ब हे जमिनीच्या बहुतेक सर्व गुणधर्मांशी निगडित असून ते जमिनीचे गुणधर्म संतुलित आणि नियंत्रित ठेवण्याचे काम करते. शाश्वत ऊस उत्पादनासाठी सेंद्रिय कर्बाचे योग्य व्यवस्थापन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
Sugarcane Farming
Sugarcane FarmingAgrowon
Published on
Updated on

डॉ. समाधान सुरवसे, डॉ. प्रीती देशमुख, डॉ. अशोक कडलग

Sugarcane Farming Management : ऊस शेतीमध्ये सेंद्रिय कर्बाचे योग्य व्यवस्थापन केल्यास ऊस पिकाची अतिरिक्त पाण्याची गरज कमी करता येऊ शकते. तसेच रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर होण्यास मदत होते. योग्य प्रमाणात सेंद्रिय कर्ब असलेल्या जमिनीत रासायनिक खतावर होणाऱ्या खर्चामध्ये बचत करता येते. सेंद्रिय कर्ब हे जमिनीच्या बहुतेक सर्व गुणधर्मांशी निगडित असून ते जमिनीचे गुणधर्म संतुलित आणि नियंत्रित ठेवण्याचे काम करते. शाश्वत ऊस उत्पादनासाठी सेंद्रिय कर्बाचे योग्य व्यवस्थापन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

अनादी काळापासून सेंद्रिय कर्बाचे चक्र नैसर्गिकरित्या चालू आहे. उदा. परंपरागत शेती करत असताना शेतात पीक आल्यावर धान्य काढल्यानंतर उरलेले पीक चाऱ्याच्या रूपात जनावरांना दिले जाते. त्यानंतर जनावरांकडून मिळणारे शेण पुन्हा शेतात वापरल जाते. त्यातून सेंद्रिय कर्ब पुन्हा तयार होतो. अशाप्रकारे सेंद्रिय कर्बाचे चक्र पूर्ण व्हायचे. त्यासोबत झाडाची पाने, शेतातील पीक अवशेष कुजून पुन्हा सेंद्रिय कर्ब तयार होतो. मात्र शेतामध्ये कीड नियंत्रणासाठी कीटकनाशकांचा वापर सुरू झाल्यापासून सेंद्रिय कर्बाचे चक्र पूर्ण होण्यात अडथळा येऊ लागला.

Sugarcane Farming
Sugarcane Farming : अभ्यासूवृत्तीने वाढवली उसाची उत्पादकता

सेंद्रिय कर्बाचे प्रकार

उडनशील कर्ब (उष्णतेने वाफ होणे)

मुख्य पिकामध्ये आंतरपीक घेतले असता, पीक फुलोऱ्यात येण्याआधी जमिनीत गाडल्यास त्याचे कर्बामध्ये रूपांतर होईल. परंतु ते उष्णतेने वाफ स्वरूपात लवकरच उडून जाईल.

अस्थिर कर्ब

मुख्य पिकात आंतरपीक घेऊन फुलोऱ्यानंतर कापणी करून जमिनीत गाडल्यास कर्बामध्ये त्याचे रूपांतर होऊन थोडाच काळ टिकवून राहील. परंतु त्याचे ह्युमसमध्ये रूपांतर होणार नाही. म्हणजेच हा कर्ब अस्थिर असतो.

स्थिर कर्ब

ज्या सेंद्रिय घटकांना कुजायला वेळ लागतो अथवा ते जड असतात, त्यापासून मिळणारे कर्ब हे १ टक्क्यापर्यंत आणि दीर्घ कालापर्यंत कर्ब पुरवठा करते. उदा. उसाचे पाचट जमिनीत कुजून राहिल्यास सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात तयार होतो. आणि दीर्घ काळापर्यंत टिकून राहतो.

कर्ब हा वायू वातावरणामध्ये अत्यंत कमी (०.०३ टक्के) असला तरी वनस्पती वाढीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असतो. मातीमधील कर्ब हा मुख्यत्वे सेंद्रिय स्वरूपात जमिनीत साठवून ठेवलेला असतो. हवेतील कर्ब प्रकाश संश्लेषणादरम्यान वनस्पतीद्वारे शोषला जाऊन विविध स्वरूपात साठवला जातो. हा कर्ब वनस्पती तसेच प्राण्यांचे अवशेष, मुळांद्वारे स्रवणारे पदार्थ, जिवंत व मृत सूक्ष्मजीवांच्या विघटनाद्वारे जमिनीत मिसळला जातो. हा सेंद्रिय कर्ब मातीतील सूक्ष्म जीवाणूंसाठी महत्त्वाचा ऊर्जा स्त्रोत असतो.

Sugarcane Farming
Organic Sugarcane Farming : ऊस शेतीमध्ये सेंद्रिय कर्बाचे महत्त्व

सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन

सेंद्रिय खतांचा वापर करणे.

उसाचे पाचट न जाळता जमिनीत कुजवणे.

हिरवळीची पिकांची लागवड.

पीक अवशेषांचा आच्छादन म्हणून वापर करणे.

ठिबक सिंचनाद्वारे खतांचे नियोजन करणे

चोपन जमिनीत सेंद्रिय व रासायनिक भू-सुधारकांचा वापर करणे

पीक फेरपालटीमध्ये कडधान्य पिकांची लागवड करणे.

सेंद्रिय खतांचे प्रकार

भरखते

या खतांमध्ये पोषण अन्नद्रव्यांचे प्रमाण रासायनिक खतांपेक्षा कमी असते. म्हणून याची मात्रा फारच अधिक वापरावी लागते. ही खते पिकांना सावकाश लागू पडतात आणि जमिनीच्या भौतिक गुणधर्मावर अनुकूल परिणाम होऊन जमिनीचा पोत सुधारतो. तसेच जलधारणाशक्ती वाढते. जमिनीच्या भौतिक गुणधर्मात सुधारणा होते. जमिनीचे आरोग्य सुधारते उदा. शेणखत, कंपोस्ट, लेंडी खत, गांडूळ खत इत्यादी भरखते आहेत.

जोरखते

या खतांमध्ये पोषण अन्नद्रव्यांचे प्रमाण भरखतांपेक्षा जास्त असते. त्यामुळे जोर खते कमी प्रमाणात द्यावे लागतात. उदा. सर्व प्रकारच्या पेंडी, मासळी खत, हाडांचा चुरा इत्यादी.

हिरवळीची खते

यात मुख्यतः पिकांचा पाला, फांद्या, वनस्पतींचे पीक अवशेष जमिनीमध्ये गाडले जातात. ताग, धैंचा, उडीद, मूग, चवळी, गवार इत्यादी द्विदल पिके शेतात वाढवून फुलोऱ्याच्या वेळी नांगरणी करून जमिनीत गाडली जातात. याशिवाय गिरीपुष्प, सुबाभूळ इत्यादीच्या कोवळ्या फांद्या, पाने जमिनीत गाडून कुजवली जातात. त्याचा पिकांना फायदा होतो.

हिरवळीच्या खतांचे फायदे

जमिनीची जलधारणा शक्ती वाढते.

जमिनीची सुपीकता वाढते.

जमिनीतील सूक्ष्मजीवाणूंच्या कार्यास उत्तेजन मिळते.

जमिनीतील सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण वाढते.

जमिनीतील उपलब्ध होणारी अन्नघटक उपलब्ध होण्यास मदत होते.

जमिनीचे भौतिक गुणधर्म सुधारतात.

जमिनीचे आरोग्य सुधारण्यामध्ये सेंद्रिय कर्बाचे कार्य

जमिनीचे आरोग्य किंवा एकंदर जमिनीची सुपीकता टिकवण्याच्या दृष्टीने सेंद्रिय कर्ब तीन प्रकारे मदत करतो

१) भौतिक गुणधर्म सुधारणे ः अतिसूक्ष्म माती कणांसोबत संयोग होऊन ह्युमसयुक्त संयुक्त पदार्थ तयार होतो. जमिनीची घनता कमी होऊन मातीच्या कणांतील पोकळी वाढते. हवा खेळती राहते. परिणामी मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. जमिनीची घडण सुधारते.

२) रासायनिक गुणधर्म सुधारणा ः सेंद्रिय कर्बामुळे जमिनीतील कर्बःनत्र गुणोत्तर योग्य राखण्यास मदत होते. रासायनिक द्रव्यांची उपलब्धता वाढते. नत्र व स्फुरद वनस्पतीमार्फत शोषून घेण्यास मोठ्या प्रमाणावर मदत होते. रासायनिक नत्राचे होणारे नुकसान टाळता येते. फुलविक आम्ल आणि ह्युमिक पदार्थामुळे मोठ्या प्रमाणात सूक्ष्म अन्नद्रव्य पाण्यात विरघळून पिकांना उपलब्ध होतात. जमिनीच्या सामूमध्ये होणारा बदल रोखून सामू उदासीन राखण्यास मदत होते.

३) जैविक गुणधर्म सुधारणा ः जमिनीत असणाऱ्या सेंद्रिय कर्बामुळे उपयुक्त सूक्ष्मजिवाणूंच्या संख्येत वाढ होते. विविध प्रकारच्या जिवाणूंना पुरेशा प्रमाणात ऊर्जा उपलब्ध झाल्यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढते. त्यामुळे जमिनीत अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते.

डॉ. समाधान सुरवसे, ९८६०८७७०४९,

(मृद्‌शास्त्र विभाग, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी बु. ता. हवेली, जि. पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com