Onion Cultivation : गादीवाफ्यावर कांदा रोप लागवड फायदेशीर

Onion Farming : कांदा लागवडीसाठी गादीवाफे १२० सेंमी रुंद, १५ सेंमी उंच आणि सोईनुसार लांब बनवावेत.
Onion Farming
Onion FarmingAgrowon
Published on
Updated on

डॉ. संकेत मोरे, धनंजय शिरसाट

Kharif Onion Farming Management : खरीप कांद्याच्या दर्जेदार उत्पादनासाठी भीमा राज, भीमा सुपर, भीमा रेड व भीमा डार्क रेड, भीमा शुभ्रा, भीमा श्‍वेता या जातींची निवड करावी. जमिनीची मशागत करताना मध्यम भारी जमिनीमध्ये खोल नांगरणी करावी. त्यानंतर २ ते ३ कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. पेरणीपूर्वी माती परिक्षण शिफारशीनुसार चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळावे.

त्यानंतर उंच गादीवाफे तयार करावेत. जेणेकरून वाफ्यांमध्ये पावसाचे पाणी जास्त वेळ साठून राहणार नाही. शक्यतो सपाट वाफ्यात लागवड टाळावी. गादीवाफे १२० सेंमी रुंद, १५ सेंमी उंच आणि सोईनुसार लांब बनवावेत. या गादीवाफ्यांवर दोन्ही बाजूंनी एक फुटाचे अंतर सोडून ठिबक सिंचनाच्या दोन किंवा तीन नळ्या टाकाव्यात, जेणेकरून वाफ्यावर सर्व भागांमध्ये समान सिंचन होईल.

रोपांची पुनर्लागवड करण्यापूर्वी ठिबक किंवा तुषार सिंचन संच चालू करून सरासरी ४ ते ५ सेंमी खोलीपर्यंत ओल राहील इतके पाणी द्यावे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रोपांची लागवड करावी. कार्बोसल्फान २ मिलि आणि कार्बेन्डाझिम १ ग्रॅम एक लिटर पाण्यात मिसळून या द्रावणामध्ये लागवडीपूर्वी रोपाची मुळे दोन तास बुडून ठेवावीत.

यामुळे कीड व बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो. गादीवाफ्यावर कांदा रोपांची लागवड ही १५ सेंमी बाय १० सेंमीवर वर करावी. त्यात दोन ओळींतील अंतर १५ सेंमी आणि दोन रोपांतील अंतर १० सेंमी ठेवावे. पेरणीनंतर २० दिवसांनी खुरपणी करावी.

Onion Farming
Onion Import : अफगाणिस्तानमधून कांदा आयातीच्या पोकळ चर्चा

पाणी व्यवस्थापन

पाण्याचे प्रमाण व दोन पाळ्यांतील अंतर हे पीक वाढीची अवस्था, जमीन, हंगाम इत्यादींवर अवलंबून असते. कांदा पिकास नियमित पाणी देणे आवश्यक असते, कारण कांद्याची मुळे उथळ भागातच पसरलेली असतात.

सुरुवातीच्या काळात कांदा पिकाला बेताने पाणी लागते. कोरड्यात पेरणी केल्यास पाठोपाठ पाणी द्यावे किंवा लागवडीनंतर दोन दिवसांनी पाणी द्यावे.

खरीप कांद्यात क्वचितच पाणी देण्याची गरज पडते. परंतु दोन पावसाच्या पाळ्यांमध्ये अंतर पडल्यास ठिबक किंवा तुषार सिंचनाद्वारे १ ते २ वेळा पाणी द्यावे.काढणीपूर्वी दोन आठवडे अगोदर पाणी बंद करावे. त्यामुळे कांदा चांगला पोसतो, सड कमी होते, माना जाड होत नाहीत. वरचा पापुद्रा चांगला सुकतो, जेणेकरून काढणीच्या वेळी कांद्याला इजा होत नाही.

Onion Farming
Kharif Onion Management : खरीप, रांगडा हंगामासाठी कांदा रोपवाटिका व्यवस्थापन

खत व्यवस्थापन

माती परीक्षणानुसार खतांची मात्रा ठरवावी. खरीप कांदा पिकाला प्रति हेक्टरी १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ५० किलो पालाश आणि ५० किलो गंधक लागवडीच्या वेळी द्यावे. यातील १/३ नत्र आणि संपूर्ण स्फुरद, पालाश, गंधक लागवडीच्या वेळी द्यावे. उरलेले नत्र लागवडीनंतर ३० दिवसांनी आणि ४० ते ४५ दिवसांनी समान विभागून सिंचनापूर्वी द्यावे.

शिफारशीपेक्षा जास्त नत्र खत दिल्यास किंवा लागवडीनंतर ६० दिवसांनी दिल्यास कांद्याची पात जास्त वाढते. माना जाड होतात. कांदा आकाराने लहान होतो. डेंगळ्यांचे प्रमाण वाढते. कांद्याची साठवण क्षमतादेखील कमी होते.

खतमात्रा नियोजन

कालावधी नत्र स्फुरद पालाश

लागवडीच्या वेळी २० किलो ५० किलो ५० किलो

१५ दिवसांनी २६.७ किलो -- --

३० दिवसांनी २६.७ किलो -- --

४५ दिवसांनी २६.७ किलो -- --

एकूण १०० किलो ५० किलो ५० किलो

कांद्यामध्ये गंधकाचे प्रमाणही जास्त असते, म्हणून कांद्यासाठी गंधकयुक्त खतांची गरज भासते. पिकास सिंगल सुपर फॉस्फेट आणि म्युरेट ऑफ पोटॅश आणि अमोनिअम सल्फेट खत दिले तर गंधक वेगळे देण्याची गरज नसते. या व्यतिरिक्त पिकाच्या गरजेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या गरजेनुसार फवारणी करावी.

शिफारशीनुसार ठिबक सिंचनातून खते देता येतात. यामुळे खतांची कार्यक्षमता वाढते. पाण्याची ३० ते ४० टक्के बचत होते. उत्पादनामध्ये २० ते ३० टवक्यांनी वाढ होते. विक्रीलायक कांद्याचे प्रमाण जास्त मिळते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com