Soybean BBF Techniques : वाशीम जिल्ह्यातील करडा येथील कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके) कार्यरत आहे. सोयाबीन हे या भागातील मुख्य पीक आहे. या पिकात सुधारित तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याचे काम केव्हीके करीत आहे. या पिकात रुंद सरी वरंबा पद्धतीने (बीबीएफ) लागवडीच्या चाचण्या घेण्यासाठी केव्हीकेने पुढाकार घेतला.
प्रति गावात २० हेक्टरवर प्रयोग घेऊन त्याचे निष्कर्ष यशस्वी आले. त्यानंतर मागील वर्षी कृषी विभागाच्या सहकार्याने मालेगाव तालुक्यातील मौजे शिरसाळा येथे १०० एकरांत त्याची आद्यरेखा प्रात्यक्षिके घेण्यात आली. यात सुमारे ८० ते ८२ शेतकरी सहभागी झाले. इंदूर येथील भारतीय सोयाबीन संशोधन संचालनालयाच्या तंत्रज्ञानाचाही यात वापर झाला. या प्रयोगाचे अनेक फायदे शेतकऱ्यांना मिळाले.
राबविलेले तंत्रज्ञान, व्यवस्थापन
बीबीएफ यंत्राद्वारे रुंद सरी वरंबे तयार केले. पीडीकेव्ही अंबा, केडीएस ७२६ या वाणांची निवड.
सुमारे ७५ ते १०० मिलिमीटर पाऊस पडल्यानंतर लावणी झाल्या.
या तंत्रामुळे बियाण्याचे प्रमाण ५० टक्क्यांनी कमी झाले. त्यावरील अतिरिक्त खर्च वाचला. झाडांची एकरी संख्या योग्य प्रमाणात राखली.
गादीवाफा सव्वा ते दोन फूट उंचीचे. दोन ओळींतील अंतर १८ इंच. त्यामुळे वरंब्यामुळे हवा खेळती राहिली. पिकांची चांगली वाढ झाली.
पेरणीपूर्वी रायझोबियम, पीएसबी आदी जिवाणू खतांचा २०० ते २५० ग्रॅम प्रति १० ते १५ किलो बियाणे असा वापर.
पेरणीपूर्वी चांगले कुजलेले गांडूळ खत व शेणखत यांचा वापर.
पीक ४० ते ४५ दिवसांचे झाल्यानंतर १९- १९- १९ व ०- ५२- ३४ या खतांचा वापर फवारणीद्वारे.
अळ्यांना वेळीच रोखण्यासाठी हेक्टरी ८ ते १० प्रमाणात कामगंध सापळे. बहुतांश ठिकाणी पक्षिथांबे. पहिल्या फवारणीत कडुनिंबावर आधारित कीटकनाशकाचा किंवा निंबोळी अर्काचा वापर.
मागील चार- पाच वर्षांपासून काढणीच्या वेळेस पाऊस राहिला. मात्र गादीवाफा तंत्रामुळे पाण्याचा निचरा होऊन पिकाचे नुकसान कमी झाले.
उत्पादन व अर्थशास्त्र
पारंपरिक पद्धतीत शेतकऱ्यांना एकरी २० हजार ८५० रुपये उत्पादन खर्च, तर सरासरी ७. ६८ क्विंटल उत्पादन मिळाले. तर सुधारित पध्दतीच्या प्रयोगात २६, ७७९ रुपये खर्च, तर एकरी उत्पादन १०. ४५ क्विंटल (हेक्टरी २६.१३ क्विं.) मिळाले. प्रति क्विंटल पाच हजार रुपये दर गृहीत धरून एकरी फायदा ८, १७१ रुपये झाला.
रुंद वरंबा सरी प्रयोगाचे फायदे
यंत्राच्या मदतीने रुंद वरंबे व सऱ्या पाडणे, पेरणी आणि खते देणे अशी तिन्ही कामे एकाच वेळी करता येतात. त्यामुळे वेळेची व पैशांची बचत होते. अतिरिक्त पाण्याचा निचरा होतो. मध्यम ते भारी जमिनीसाठी उपयुक्त. ट्रॅक्टर किंवा बैलचलित यंत्राद्वारेही काम करता येते.
दरवर्षी ट्रॅक्टरने पेरणी करायचो तेव्हा एकरी ३० किलो बियाणे वापरायचो. पूर्वी एकरी ९ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळायचे. बीबीएफ तंत्राच्या वापरातून एकरी चार क्विंटल वाढ होऊन १३ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाले आहे.नितीन पुंडलिक इंगोले ९५४५०५८३८४
मागील वर्षी तीन एकरांत सुधारित तंत्राने केव्हीकेच्या मार्गदर्शनातून व्यवस्थापन केले. एकरी कमाल १६ ते १८ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाले आहे.किशोर पंढरी इंगोले ९८३४४०२८२०
गेल्या वर्षी साडेचार एकरात सुधारित तंत्राने सोयाबीन पेरले. ही पद्धत चिबड जमिनीसाठीही फायदेशीर आहे. या वर्षी १२ एकरांत नियोजन आहे. गादीवाफे तयार केले आहेत. यापूर्वी एकरी ८ ते १० क्विंटल उत्पादन मिळायचे. मागील वर्षी त्यात एकरी तीन क्विंटलची वाढ झाली आहे. गावातील ८० टक्के शेतकऱ्यांनी या पद्धतीचा अंगीकार करण्याचे ठरविले आहे.दत्तराव इंगोले ९९२३८५१३१२
जास्त पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. किंवा पीकवाढीच्या महत्त्वाच्या अवस्थेत मोठा ताण पडतो. मागील वर्षी वाशीम जिल्ह्यात अति पाऊस झाला. पिके पिवळे पडली. परंतु शिरसाळा येथे ‘बीबीएफ’ तंत्रज्ञानाचा वापर करून बेडवर उगवलेल्या सोयाबीन पिकाच्या मुळांभोवती हवा खेळती होती. तेथील सूक्ष्मजीवांना पोषक वातावरण मिळाले. पिकाची वाढ चांगली होऊन उत्पादनामध्ये वाढ झाली. पावसाच्या लहरीपणावर मात करायची असेल तर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात बीबीएफ तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे.डॉ. आर. एल. काळे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख, केव्हीके, करडा, जि. वाशीम ७३५०२०५७४६
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.