
Kharif Crop Sowing : हवामान बदलामुळे पावसाच आगमन, वितरण तसेच निर्गमन यामध्ये बराच बदल झाला आहे. याचा परिणाम कोरडवाहू शेतीवर (Rainfed Agriculture) मागील काही वर्षात दिसून येत आहे.
यंदा मान्सूनवर एल नीनोच सावट आहे. त्यामुळे यंदा पावसाच प्रमाण सरासरी राहील असा अंदाज काही संस्थांनी व्यक्त केलाय. अशावेळी पडणाऱ्या पावसाचे प्रमाण, तिव्रता आणि जमिनीचा प्रकार लक्षात घेऊन विविध पिकांची लागवड रुंद वरंबा सरी पद्धतीने म्हणजेच बीबीएफ पद्धतीने केल्यास फायदेशीर ठरते.
त्याकरिता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने हैद्राबाद येथील केंद्रिय कृषी कोरडवाहू संशोधन केंद्राच्या चार फणी रुंद सरी वरंबा म्हणजेच बीबीएफ यंत्रामध्ये (BBF Machine) सुधारणा करुन पाच फणी रुंद सरी वरंबा बी, खत पेरणीसह फवारणी व रासणी यंत्र विकसीत केले आहे.
ट्रॅक्टरने थ्री पॉईंट लींकेजला पेरणी यंत्र लावून पेरणी करताना पीटीओ रिकामा असतो. त्याचा वापर करुन फावरणी संच पेरणीसह सुलभतेने वापरता येतो.
ट्रॅक्टरचलित पाच फणी पेरणी यंत्राद्वारे थोडा बदल करीत व कमी रुंदीचे टायर लावून तीन टप्प्यात सोयाबीन व इतर पीकामध्ये पेरणी ते फवारणी पर्यंतची संपुर्ण कामे या यंत्राने करता येतात.
पारंपारीक पद्धतीमध्ये शेतकरी बी, खत ,पेरणी, तणनाशक फवारणी व रासणी तसेच कीटकनाशक फवारणीची कामे ट्रॅक्टर अथवा बैलचलित यंत्राच्या सहाय्याने करतात.
त्यासाठी शेतकऱ्यांना हेक्टरी ३० ते ३२ तास लागतात व मजूरीवरील व यंत्राचा खर्च जास्त होतो. त्या दृष्टीने ट्रॅक्टरचलित एकाच फ्रेमवर पाच ओळीचे बीबीएफ रुंद वरंबा व सरी पेरणी , रासणी व फवारणी यंत्र विकसीत करण्यात आले आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांना रुंद वरंब्यावर पेरणी करणे, खत देणे, रासणी करणे व तणनाशक फवारणी करणे ही चारही कामे एकाचवेळी करता येतात. त्यामुळे होणारा खर्च कमी होतो व वेळेची बचत होते, तसेच शेतात ट्रॅक्टर एकाच वेळी गेल्याने मातीवर दाब कमी पडतो.
यामध्ये असलेल्या सरी यंत्रामुळे म्हणजेच रिजर्समुळे योग्य प्रकारे वाफे तयार होऊन त्यावर शास्त्रीय पद्धतीने पेरणी होऊन तणनाशक फवारणीमुळे तणाचा पादुर्भाव अत्यंत कमी होतो तसेच वाफ्याची निर्मिती होते.
त्यामुळे पाऊस जास्त झाला तर वाफ्यातून जास्तीच पाणी वाहून जाते. व कमी पाऊस पडला तर असलेला ओलावा टिकुन ठेवण्यास मदत होते व पाणी सऱ्यामध्ये मुरते, त्यामुळे मुलस्थानी जलसंवर्धन होऊन त्याचा उभ्या पिकास तसेच पुढील हंगामातील पिकांस फायदा होतो.
विशेषतः पावसाच्या दीर्घकालीन खंड काळात या यंत्राचा जास्त फायदा होतो व त्याची तीव्रता कमी होते. गादी वाफे किंवा वरंब्यामध्ये हवा खेळती राहून पाणी व हवा यांचे योग्य प्रमाण राखले जाते.
त्यामुळे बियाण्याची उगवण चांगली होते आणि पिकाची पुढील वाढ जोमदारपणे होते. या यंत्राचे चार कामे एकाच वेळेस होत असल्याने ट्रॅक्टर सतत शेतामध्ये जाण्यामुळे होणारे माती दबण्याचे प्रमाण कमीत कमी होईल तसेच शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.