Agriculture Spraying : मोठ्या क्षेत्रावरील किंवा अधिक उंची आणि कॅनॉपीच्या पिकामध्ये फवारणीसाठी ट्रॅक्टरचलित बूम स्प्रेअर उपयोगी ठरतात. एक किंवा दोन बूमवर एकाच वेळी अनेक नोझल वापरण्यात येतात. त्यामुळे वैशिष्ट्यपूर्ण अशा स्प्रे नोझल्ससह बूम असेंब्ली, फवारणीचे द्रावण ठेवण्यासाठी मोठी टाकी, पंप, पाइप व त्यातील प्रवाह दर आणि दाब नियंत्रित करण्यासाठी व्हॉल्व्ह यांच्यासह एकत्रित संरचना तयार केलेली असते. त्यामुळे कमीत कमी फेऱ्यांमध्ये अधिक क्षेत्रावरील फवारणी शक्य होते.
ट्रॅक्टरचलित बूम स्प्रेअरचे विविध घटक
बूम असेंब्ली : स्प्रेअरची बूम असेंब्ली. त्यात स्प्रेअरपासून आडवे पसरलेले एक किंवा अनेक पोकळ पाइप असतात. हे अधिक दाबावर कार्य करण्यासाठी सामान्यतः धातूचे पाइप वापरलेले असतात. अर्थात, अलीकडे तितक्या क्षमतेचे प्लॅस्टिक पाइप उपलब्ध होत आहेत. ते वापरूनही काम चालू शकते.
स्प्रे नोझल : बूम असेंब्लीला स्प्रे नोझल दर ठरावीक अंतरावर जोडलेले असतात. ते विशिष्ट पॅटर्नमध्ये द्रव वितरित करतात.
टाकी : नोझलची वितरणाची क्षमता, ट्रॅक्टरची वहनाची क्षमता लक्षात घेऊन योग्य आकाराची टाकी बसवलेली असते. ट्रॅक्टरच्या ताकदीनुसार २०० ते ४०० लिटरची टाकी वापरली जाते.
पंप : पंपाच्या साह्याने बूम पाइपमध्ये योग्य तितका दाब निर्माण केला जातो. त्या दाबामुळे टाकीमधून फवारणीचे द्रावण स्प्रे नोझलद्वारे योग्य त्या दाबाने पुढे ढकलले जाते. सामान्यतः पंपासाठी वेगळे इंजिन वापरले जाते किंवा ट्रॅक्टरच्या पॉवर टेक-ऑफ (PTO) मधून त्यास शक्ती दिली जाते.
प्लंबिंग सिस्टिम (नळ्यांची जोडणी) : टाकी, पंप आणि स्प्रे नोझल यांची जोडणी करण्यासाठी योग्य त्या जोड घटकांचा वापर केलेला असतो.
नियंत्रण प्रणाली : ही चालकाला फवारणीवर आवश्यक ते नियंत्रण मिळवून देते. त्याद्वारे चालक ट्रॅक्टर चालवतानाच नियंत्रण प्रणालीद्वारे स्प्रेअरचा प्रवाह दर, दाब आणि स्प्रे पॅटर्नमध्ये आवश्यक त्या सुधारणा किंवा नियंत्रित करता येते.
बूम उंची समायोजन : पिकांच्या उंचीनुसार बूम खाली-वर घेण्यासाठी उंची समायोजन यंत्रणा बसवलेली असते.
बूम रुंदी समायोजन : चालक शेताच्या आकाराप्रमाणे बूमची रुंदी समायोजित करू शकतो. त्याद्वारे संपूर्ण क्षेत्रावर एकसमान फवारणीची सुनिश्चित करता येते.
फिल्टर आणि स्ट्रेनर्स (गाळण्या) : बूम आणि स्प्रे नोझलमध्ये घाण आणि अन्य कण येऊन अडकू नयेत, यासाठी प्लंबिंग
सिस्टिममध्ये फिल्टर आणि स्ट्रेनर्स बसवलेले असतात.
ट्रॅक्टर बूम स्प्रेअर्सचे फायदे
अचूक फवारणी : ट्रॅक्टरचलित बूम स्प्रेअर हे अचूकतेने फवारणी करण्यासाठी तयार केले जातात. बूमवर जोडलेले अनेक नोझल हे एकत्रितपणे फवारणी पॅटर्न तयार करतात. त्यामुळे रसायने पिकाच्या झाडाच्या किंवा शेताच्या पृष्ठभागावर समान रीतीने पसरतील याची खात्री मिळते. हे पॅटर्न तयार करतेवेळी फवारणीवेळी द्रावण वाया जाणार नाही, याची काळजी घेतली जाते.
कव्हरेज आणि कार्यक्षमता : ट्रॅक्टर बूम स्प्रेअर्समध्ये विस्तृत क्षेत्रीय क्षमता असून, मोठ्या क्षेत्रावर जलद आणि प्रभावीपणे फवारणी शक्य होते. आडव्या बूम असेंब्लीमुळे एका फेरीमध्ये अधिक क्षेत्र व्यापले जाते. उभ्या बूम असेंब्लीमुळे अधिक उंचीची फळझाडांवरही फवारणी करणे शक्य होते. परिणामी, कमी श्रम आणि कमी वेळेमध्ये अधिक फवारणी होत असल्याने फवारणीची कार्यक्षमता वाढते.
एकसमान वितरण : बूम असेंब्लीमध्ये प्रत्येक स्प्रे नोझल हे द्रावणाच्या समान वितरण करतील, याची खात्री केली जाते. परिणामी, कीड रोगांचे नियंत्रण चांगल्या प्रकारे मिळण्यास मदत होते.
समायोजन निकष (अॅडजस्टमेंट पॅरामीटर्स) : ट्रॅक्टर बूम स्प्रेअरमध्ये प्रवाह दर, दाब आणि स्प्रे पॅटर्नसह विविध प्रकारचे समायोजक घटक निश्चित करता येते. त्यामुळे पिकाचा प्रकार, त्याचे वाढीचे विविध टप्पे आणि पर्यावरणातील घटकांनुरूप फवारणीमध्ये योग्य ते बदल करता येतात.
वेळेची आणि मजुरांची बचत : ट्रॅक्टर बूम स्प्रेअरमुळे मोठ्या क्षेत्रावर फवारणी होते. त्यामुळे अन्य स्प्रेअरच्या तुलनेमध्ये वेळेमध्ये व मजुरीमध्ये बचत होते. श्रम कमी होतात. फेऱ्यांची संख्या कमी होत असल्यामुळे इंधनामध्ये बचत होते.
उत्पादकता वाढ : वेळेवर फवारणी करणे शक्य झाल्याने पीक संरक्षणाच्या खर्चात बचत होते. वेळीच नियंत्रण शक्य झाल्याने एकरी उत्पादकतेमध्ये वाढ शक्य होते.
काटेकोर शेती तंत्र (प्रिसिजन फार्मिंग) : काटेकोर शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या तंत्रांशी ट्रॅक्टर बूम स्प्रेअर सुसंगत आहेत. त्यामध्ये अलीकडे जीपीएस तंत्रज्ञान, मॅपिंग तंत्रज्ञान आणि बदलत्या दराने फवारणी (व्हेरिएबल रेट ॲप्लिकेशन सिस्टिम) यांचा समावेश नव्या बूम फवारणी यंत्रामध्ये केला जाऊ लागला आहे. त्यामुळे प्रत्येक नोझलने आवश्यकता असेल, तिथे (स्थानपरत्वे) आणि तितक्याच प्रमाणात (प्रमाणपरत्वे) फवारणी करणे शक्य होऊ लागली आहे.
या यंत्रणेमध्येच अत्याधुनिक वैशिष्ट्ये अंतर्भूत केली जात आहेत. त्यात पिकाची गरज, किंवा मातीची परिस्थिती, किंवा तणाचा प्रादुर्भाव व घनता यांची माहिती विविध प्रकारच्या सेन्सर्सद्वारे प्रत्यक्ष वेळेवर गोळा केली जाते. त्यानुसार फवारणीचा दर निश्चित केला जातो. या अचूकतेमुळे रासायनिक घटकांची वापर कमी होतो. पर्यावरणावरील विपरीत परिणाम किमान पातळीवर ठेवणे शक्य होते.
कमी झालेले ऑपरेटर एक्स्पोजर : ट्रॅक्टर बूम स्प्रेअरद्वारे फवारणी ही चालकापासून दूरवर किंवा मागील बाजूला होते. परिणामी, रसायनांच्या विपरीत परिणामांपासून चालकांचे संरक्षण होण्यास मदत होते. त्यातही ट्रॅक्टरची केबिन ही बंदिस्त प्रकारची असल्यास अधिक संरक्षण शक्य होते. विषबाधेची शक्यता कमी होते.
डॉ. सचिन नलावडे ९४२२३८२०४९,
(प्रमुख, कृषी यंत्रे आणि शक्ती विभाग, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.