Agriculture Insights: उसाला तुरा येणे ही एक नैसर्गिक क्रिया आहे. ती निसर्ग नियमाप्रमाणे चालू देणे यातच ऊस शेती आणि साखर उद्योगाचे हित आहे, असे मला वाटते. ऊस लागवडीचे १) आडसाली २) पूर्वहंगमी ३) सुरू हे तीन हंगाम आहेत. यापैकी कोणत्याही हंगामात उसाची लावण केली तरी तोडणीच्या अगोदर १५ ऑगस्ट दरम्यान उसाच्या वाढणाऱ्या कोंबात नवीन पान तयार होण्याऐवजी तुरा तयार होतो. त्यावेळी तुऱ्याच्यावर असणारी सर्व बाल पाने उमलत जाऊन तुरा बाहेर पडण्यास साधारण १५ नोव्हेंबर उजाडतो.
लवकर किंवा उशीरा पक्व होणाऱ्या जातीनुसार हा कालावधी थोडा मागेपुढे होतो. निसर्गाने नेमके असा बदल का केला आहे यासंबंधी थोडा अभ्यास करुयात. आपल्याकडे पावसाळा संपल्यानंतर नोव्हेंबरच्या सुरवातीपासून साखर कारखाने सुरू होतात. ऊस शेतीचा मुख्य उद्देश गूळ आणि साखर तयार करणे हा आहे. या काळात उसात साखरेची योग्य टक्केवारी आली तर कारखाने कार्यक्षमपणे चालू शकतील. अशी साखर तयार व्हावी यासाठीच निसर्गाने तुऱ्याची निर्मितीचा काळ निश्चित केला आहे.
उसात साखर तयार होण्याची प्रक्रिया
आपण उसाचा वनस्पतीशास्त्रीय अभ्यास करणे गरजेचे आहे. ऊस पानात सूर्यप्रकाशात प्रकाश विश्लेषणातून साखर तयार होत असते. ऊस १५ ऑगस्टपूर्वी खाल्ला तर अजिबात गोड लागत नाही, मग तो नोव्हेंबरमध्ये गोड कसा होतो, यामागील विज्ञान समजून घेणे गरजेचे आहे. ऊसवाढीच्या उगवण, फूट, वाढ, पक्वतावस्था या चार अवस्था असतात.या वेगवेगळ्या अवस्थेतील पानांच्या रचनेचा अभ्यास करणे गरजेचे आहे. उसाला १० ते १२ हिरवी पाने असतात. दर १२ दिवसांनी एक नवीन पान तयार होते.
उगवणीची अवस्था ऋतूमानानुसार १५ ते २५ दिवसांत पूर्ण होते. पहिले उमलेले पान अतिशय लहान असते. त्यापुढील प्रत्येक पान मागील पानापेक्षा मोठे तयार होते. सुरळीतील पहिली दोन पान बाल पाने असतात. वरून मोजले असता तीन क्रमांकाच्या पानापासून कार्यक्षम पाने म्हणजे साखर तयार करणार पाने तयार होतात. ३,४,५,६ ही सर्वात कार्यक्षम म्हणजे साखर तयार करणारी पाने. सातव्या पानाच्या पुढील १० ते १२ हिरव्या पानांच्या गुच्छातील पाने ही वृद्धात्वाकडे झुकत जाणारी पाने असतात. सुरुवातीची पाने लहान असतात.
उसाची तोड
पानात तयार होणाऱ्या साखरेपेक्षा वाढीसाठी जास्त जास्त साखरेची गरज वाढत जाते. तसे मागील पानापेक्षा पुढील पान मोठ्या आकाराचे तयार होते. एकदा १० ते १२ पानांचा गुच्छा तयार झाला की, पानात तयार होणारी सर्व साखर वाढीसाठी पुरेशी ठरते. यावेळी वाढीच्या अवस्थेला सुरवात होते. या काळात मागील पानाइतक्याच आकाराचे पुढील नवीन पान तयार होते. असे चक्र पक्वता अवस्था सुरू होईपर्यंत चालू राहाते. पक्वता काळ सुरू झाला, की नवीन पानाऐवजी तुरा तयार होतो, शाकीय वाढ थांबते.
अगोदर चर्चा केल्याप्रमाणे १५ ऑगस्टदरम्यान हा काळ सुरू होतो. यानंतर तयार होणाऱ्या पानाकडे लक्ष दिल्यास मागील पानापेक्षा पुढील पान लहान तयार होते. यामुळे पानात तयार होणाऱ्या साखरेपेक्षा वाढीसाठी कमी साखर वापरली जाते आणि शिल्लक साखर पेरात साठविली जाते. १५ ऑगस्टनंतर पुढील नोव्हेंबरपर्यंत या साठत जाणाऱ्या साखरेमुळे ऊस बऱ्यापैकी गोड होतो. पुढील काळात यामुळे साखर कारखाने सुरू होऊ शकतात. नोव्हेंबरमध्ये साखर कारखाने सुरू होण्यासाठी तत्पूर्वी केव्हाही आडसाली, पूर्व हंगामी, अगर सुरू ऊस लावण असली तरी पक्वता काळाची तारीख सर्वांसाठी १५ ऑगस्टच्या दरम्यान निसर्गाने ठेवली आहे.
आपणाला उसाचा दर टनावर मिळतो. म्हणून शेतकरी टनापाठीमागे धावत असतो. तो म्हणतो, की उसामध्ये तयार होणाऱ्या साखरेसंबंधी मला विचार करण्याचे कारण नाही. ते कारखाना बघून घेईल, ऊस जितका जास्त वाढेल तितके मला जास्त उत्पादन मिळणार. माझ्या उसाची वाढ तुटेपर्यंत चालूच राहिली पाहिजे. मग त्याला तुरा येणे योग्य नाही. शेतकऱ्यांची ही मानसिकता लक्षात घेऊन काही तज्ञ मंडळी तुरा येणे योग्य नाही. तसेच तुरा न येण्यासाठी शेतकऱ्यांनी काय करणे गरजेचे आहे, याबाबत मार्गदर्शन करतात. असे मार्गदर्शन ऊस शेती व साखर उद्योग दोघांच्याही तोट्याचे आहे. या उलट योग्य वेळी तुरा येऊन साखर उतारा कसा जास्तीत मिळेल याविषयी मार्गदर्शन होणे गरजेचे आहे.
उसाचे व्यवस्थापन
आपण ऊस संशोधन केंद्र तसेच कृषी खात्याने ऊस पिकासाठी खतांच्या हप्त्यांची केलेल्या शिफारशींचा बारकाव्याने अभ्यास केल्यास मोठी भरणी अगर खांदणीनंतर कोणत्याही हप्त्याची शिफारस केलेली नाही. यामागे योग्यवेळी पक्वता काळ सुरू होऊन योग्य साखर उतारा मिळावा हाच उद्देश आहे. आता आडसाली उसाची खांदणी जर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये झाली तर पुढे १० ते १२ महिने वाढीचा कालावधी राहतो. इतके दीर्घकाळ खत दिले नाही तर उसाची वाढ खुंटेल आणि उत्पादन कमी मिळेल म्हणून शेतकरी खांदणीनंतरही नत्राचे हप्ते देत राहतात. अनेक कारणामुळे असे हप्ते जून-जुलैपर्यंत देणारे भरपूर शेतकरी आहेत. आता तर एकरी १०० ते २०० टनांचे उद्दिष्ट ठेवणारे शेतकरी आहेत. ते ऊस तुटेपर्यंत नत्राचे हप्ते चालूच ठेवले पाहिजेत असा सल्ला देतात.
१५ ऑगस्टदरम्यान पानाऐवजी तुरा येण्यासाठी रसात योग्य प्रमाणात नत्र आणि स्फूरदाचे प्रमाण असणे गरजेचे आहे. तसे आले तरच हे परिवर्तन होऊ शकते. शास्त्र सांगते की, हे योग्य प्रमाण येण्यासाठी नत्राचा हप्ता किमान त्यापूर्वी पाच महिने तरी बंद केला पाहीजे तरच हे गुणोत्तर योग्य प्रमाणात येऊन पक्वता अवस्था सुरू होते. याचा अर्थ १५ फेब्रुवारीला तरी किमान हप्ते बंद झाले पाहिजेत. आपल्याकडे मृगी हप्ता म्हणजे जूनमध्ये मोठा नत्राचा हप्ता देणे सर्वात लोकप्रिय आहे. त्याप्रमाणे फेब्रुवारी-मार्च-एप्रिल महिना आला तरी ऊस लावणी सुरूच असतात. अशा उसाची खांदणी जून-जुलैमध्ये होते. ऊस काढून परत ऊस लावण्याची प्रथा मोठ्या प्रमाणावर आहे. यातून शेतकरी आणि साखर उद्योगाचे नुकसान कसे होते ते पाहूयात.
उशिरा लागण झालेल्या ऊस पक्वता काळही १५ ऑगस्टच्या आसपासच सुरू होतो. तुरा आपल्याला डोळ्यांना दिसण्यास नोव्हेंबरचा दुसरा-तिसरा आठवडा उजाडतो. या काळात थंडीला सुरवात होते आणि त्यानंतरची वाढ ही उत्पादक म्हणजे तुम्हाला टनेज मिळवून देणारी नसते. या काळात तयार झालेली पाने मागील पानापेक्षा पुढील पान लहान लहान तयार होते. यामुळे या काळात तयार झालेले ऊस पेरे मागीलपेक्षा पुढील लहान अशाच पद्धतीने वाढतात.
शेतकरी मात्र म्हणतात की, फेब्रुवारी-मार्चमध्ये लागण केली आणि ऊस मार्च-एप्रिलमध्ये तुटला तर माझ्या उसाला १२ महिने वाढीसाठी मिळाले. ही एक अत्यंत चुकीची समजूत आहे. त्याला वाढीचा कालावधी १५ नोव्हेंबरपर्यंतच असतो. त्यानंतरचा काळ ऊस फक्त तुटेपर्यंत जिवंत राहतो. पुढील काळ टन जास्त मिळण्याच्या दृष्टीने उत्पादक काळ नाही. म्हणून आडसाली उसाला जास्त उत्पादक काळ मिळतो, उत्पादन जास्त मिळते. तर सुरू उसाला सर्वांत कमी वाढीचा कालावधी मिळतो, त्याचे उत्पादन सर्वात कमी असते. यासाठीच फेब्रुवारीनंतर लावण करू नका किंवा खोडवी राखू नका अशी शिफारस आहे.
प्रताप चिपळूणकर, ८२७५४५००८८
(लेखक कोल्हापूर जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी आहेत)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.