जिओपॅथिक स्ट्रेस झोन ः भाग ६
रस्त्यावर वाहने चालवताना जिओपॅथिक स्ट्रेस झोन असलेल्या पट्ट्यांमध्ये अपघातांचे प्रमाण अधिक असल्याचे संशोधकांना आढळत होते. त्यामागील कारणांचा शोध घेताना डाॅ. खरात यांनी रस्त्यावरून पळणाऱ्या गाडीचे चालकांवरील परिणाम आणि त्याचा अपघाताशी संबंध शोधण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी जुना पुणे - मुंबई महामार्ग आणि पुणे - नगर रस्त्याची निवड केली.
तेथील वारंवार अपघात होणाऱ्या स्थळांच्या नोंदी मिळवून काही निरीक्षणे नोंदवली. त्यात बहुतांश ठिकाणी जिओपॅथिक स्ट्रेस झोन असल्याचे समोर आले. या ठिकाणी अपघात झालेल्या अनेक चालकांचे संपर्क क्रमांक मिळवून शक्य तितक्या लोकांनी संवाद साधला. तेव्हा या विशिष्ठ भागात अपघात होण्यामागे अचानक गोंधळल्याप्रमाणे मानसिक स्थिती होणे, सजग असतानाही ब्रेक दाबला न गेल्याचे त्यांनी सांगितले. अनेकांना काय घडले तेच कळले नाही.
या घटनांमागील कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न खरात सरांनी केला. त्यांनी काढलेले अनुमान असे आहे, सामान्य परिस्थितीत चालक (किंवा कोणताही माणूस) सजग असताना रस्त्यावर येणाऱ्या अडथळा (खड्डा किंवा व्यक्तीमध्ये येणे) डोळ्यासमोर येताच त्वरित कृती (ब्रेक दाबणे) करणे अपेक्षित असते. याला ‘प्रतिक्षिप्त क्रिया’ (रिफ्लेक्स ॲक्शन) म्हणतात. सामान्य परिस्थितीत ती काही मिलिसेकंदामध्ये घडून येते. मात्र स्ट्रेस झोनमधून जातेवेळी मज्जासंस्थेवरील परिणामांमुळे या प्रतिक्षिप्त क्रियेला अधिक वेळ लागतो.
सामान्य स्थितीपेक्षा २५ ते ५० पट उशिरा ही प्रतिक्षिप्त क्रिया होते. मात्र आधीच वेगाने असलेल्या वाहनाचा तोपर्यंत अपघात झालेला असतो. त्यातच चालकाची झोप झालेली नसेल किंवा त्याच्या अन्यही काही तणाव असतील, त्याच्या शरीरातून वाहणारी विद्युतभार अधिक असल्याने या स्ट्रेस झोनच्या प्रभावामुळे अपघाताची शक्यता अधिक राहते.
डॉ. खरात यांच्या संशोधनानंतर त्यांच्याच मार्गदर्शनाखाली डॉ. सुनील पिंपरीकर यांनी पुढील संशोधन केले. त्यांनी पुणे -मुंबई एक्स्प्रेस वे वरील झालेल्या अपघातांची तीन वर्षांची आकडेवारी मागवली. तीन वर्षांत एकाच जागेवर पाचपेक्षा अधिक अपघात झालेली ३० ठिकाणे शोधली. या ठिकाणी ‘ब्लॅक स्पॉट’ असे संबोधले जाते.
झालेल्या अपघाताचीही गंभीर आणि हलका या प्रकारे विभागणी केली. दोन्ही प्रकारातील अपघातांच्या स्थळांचे चुंबकीय विद्युत क्षेत्राचे शास्त्रशुद्ध मोजमाप केले. त्या ठिकाणी काँक्रीटच्या रस्त्यावर झालेले विविध परिणाम तपासून मोजमापे घेतली. ‘एक्स्प्रेस वे’ वरील या ‘ब्लॅक स्पाॅट’ मध्ये ६० टक्क्यांपेक्षा अधिक अपघात हे जिओपॅथिक स्ट्रेसमुळे झाल्याचे सिद्ध झाले.
डॉ. सुनील पिंपळीकर यांनी शोधलेल्या या ३० स्ट्रेस झोनचा अधिक अभ्यास डॉ. रविराज रमेश सोरटे यांनी डॉ. अविनाश खरात यांच्या मार्गदर्शनाखाली केला. उर्से टोलनाक्यापासून मुंबईकडे आणि मुंबईकडून पुण्याकडे असा १३ कि.मी. अंतराचा म्हणजेच एकूण २६ कि.मी. अंतराचे सर्वेक्षण करून उपाययोजना सुचविल्या. राज्य व केंद्रसरकारच्या तज्ज्ञांनी त्या मान्य करून अंमलबजावणीही केली. त्यामुळे या भागातील अपघातांची संख्या व तीव्रता कमी झाल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले. याच संदर्भात रस्त्याच्या काॅंक्रीट व खालील मातीवरही जिओपॅथिक स्ट्रेसचा परिणाम होत असल्याचे प्रा. डाॅ. रविराज सोरटे व प्रा. चाफेकर यांनी सप्रमाण दाखवून दिले.
जमिनीखालील पाणी शोधण्याची साधने
जमिनीखालील पाण्याचे प्रवाह हे जिओपॅथिक स्ट्रेसला कारणीभूत ठरतात. जिओपॅथिक स्ट्रेसचा शोध घेण्यासाठी विविध प्रकारे आधुनिक तंत्रज्ञान वापरले जाते. या तंत्रज्ञानाचा वापर करून शेती सिंचनासाठी पाणी स्रोत शोधणेही शक्य आहे.
रेझिस्टिव्हिटी मीटर
विद्युत अवरोध मोजणाऱ्या या यंत्राला ‘मेगर’ असेही म्हणतात. कोणत्याही विद्युत मंडलामध्ये (सर्किट) वाहणाऱ्या विजेच्या प्रवाहाला होणारा रोध मोजण्यासाठी हे यंत्र वापरतात. त्यात वायरने जोडलेले दोन इलेक्ट्रोड जमिनीला टेकवल्यानंतर त्यात विजेचा प्रवाह सोडला जातो. हा प्रवाह जमिनीत खोलपर्यंत जाताना त्याला जमिनीतील वेगळ्या प्रकार व प्रतिच्या खडकांचा अवरोध (resistance) होतो. तो खडकांच्या प्रकारानुसार वेगवेगळा असतो. त्यात पाणी असल्यास त्याचा अवरोध आणखी वेगळा असतो. त्यावरून जमिनीतील खडकांचे विविध प्रकार व त्यात पाणी असण्याची शक्यता सूचित होते.
सिसॅमिक रिफ्रॅक्शन पद्धत
या तंत्रज्ञानात ध्वनी व विद्युत ऊर्जेचा वापर केला जातो. जमिनीवर मोठा हातोडा व सौम्य स्फोटकाचा आवाज करून, त्यातून निघालेल्या ध्वनिलहरींची तीव्रता आणि जमिनीतून वाहताना कमी अधिक होणारा वेग मोजला जातो. त्यावरून जमिनीतील पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज मिळू शकतो.
प्रोटॉन प्रिसेशन मॅग्नेटोमीटर
जमिनी खालून वाहणाऱ्या पाण्याचे खडकाशी होणाऱ्या घर्षणातून तयार होणारे विद्युत चुंबकीय क्षेत्र किंवा चुंबकीय ऊर्जा प्रोटॉन प्रिसेशन मॅग्नेटोमीटरने मोजली जाते. चुंबकाच्या सजातीय ध्रुव व विजातीय ध्रुव यांच्या जवळ येण्याने तयार होणारी चुंबकीय ऊर्जा ही या मशिनद्वारे मोजली जाते. त्यावरून जमिनीतील पाण्याच्या अस्तित्त्वाचा अंदाज मिळू शकतो.
पेंडूलम वा लोलकाने पाण्याचा मागोवा
ही पारंपरिक व जुनी पद्धती असली तरी अधिक प्रभावी आणि बऱ्याच अचूकतेने पाण्याचे अस्तित्व सांगते. यात गवंड्याकडे असलेल्या ओळंब्याप्रमाणे लोलकाचा वापर केला जातो. ओळंबा किंवा तत्सम आकाराचा धातू किंवा स्फटिकाचा लोलक दोऱ्याला बांधून चालत गेल्यास जमिनीत पाण्याचे अस्तित्व असलेल्या ठिकाणी मिळालेल्या अतिरिक्त ऊर्जेमुळे तो भोवऱ्यासारखा गरगर फिरतो. यावर नेदरलँडमधील डेल्फ विद्यापीठात संशोधन झाले आहे. त्यावर आधारीत पुणे येथील डॉ. विश्वास हरी कुलकर्णी यांनी डाऊझिंग या नावाचे पुस्तकही लिहिले असून, त्यात त्याचे शास्त्र आणि अनुभवही सविस्तर नोंदवले आहेत.
नाव मीटर ( NAAV)
हे प्रा. डॉ. अविनाश खरात व प्रा. डॉ. नंदकुमार धर्माधिकारी यांनी विकसित केलेले व पेटंट घेतलेले यंत्र आहे. सेमीकण्डक्टर व लेसर किरणांवर आधारित या यंत्राद्वारे जमिनीतील पाणी प्रवाह किती रुंदीचा आहे, ते किती खोलीवर आहे, याची माहिती मिळते. प्रवाह कमी वा जास्त झाल्यामुळे झालेले बदलही नोंदवता येतात. उपलब्ध अन्य कोणत्याही तंत्रज्ञानापेक्षा नाव मीटर अधिक अचूक असल्याचा पेटंटकर्त्यांचा दावा आहे. आज या यंत्राचा वापर पाणी शोधण्यापेक्षाही जिओपॅथिक स्ट्रेस झोन विषयक मोजमापांसाठी केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
- सतीश खाडे, ९८२३०३०२१८
(लेखक पाणी अभ्यासक असून, पाणी तंत्रज्ञावर लिहिलेल्या ‘अभिनव जलनायक’
या पुस्तकाचे लेखक आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.