Nashik News: पश्चिम आशियाई देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा थेट फटका भारतीय कृषी निर्यातीला बसला आहे. मुंबई येथील जवाहरलाल नेहरू बंदर (जेएनपीटी) येथे निर्यातीसाठी आलेले ३०० हून अधिक कंटेनर अडकून पडले असून बंदर परिसरात लांबच लांब रांगा लागल्या आहेत. यामध्ये कांदा, द्राक्षे आणि केळी यांसारख्या नाशवंत शेतीमालाचा मोठा समावेश असल्याने निर्यातदारांसह उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. कोट्यवधी रुपयांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे..यंदाचे वर्ष शेतकऱ्यांसाठी आधीच अडचणीचे ठरले आहे. नैसर्गिक आपत्तीचा सामना करत प्रतिकूल परिस्थितीत उत्पादन घेतले असतानाच निर्यातीमुळे खर्च भरून निघण्याची आशा होती. मात्र अमेरिका, इस्राईल आणि इराण यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे सागरी वाहतुकीवर परिणाम झाला आहे. काही शिपिंग कंपन्यांनी आखाती देशांकडे माल नेण्यास नकार दिल्याने जेएनपीटीवरील कंटेनर खोळंबले आहेत. पश्चिम आशियातील तणाव निवळेपर्यंत ही कोंडी सुटण्याची शक्यता कमी असल्याचे निर्यात क्षेत्रातून सांगितले जात आहे..Rice Exports: इस्रायल- इराण युद्धामुळे बासमती तांदूळ निर्यातीला फटका, भारतीय निर्यातदार चिंतेत.कंटेनर अडकले; लागल्या लांब रांगाजेबेल अली (दुबई) हे मध्य पूर्वेतील सर्वांत मोठ्या बंदरांपैकी एक असून, जगातील व्यस्त कंटेनर टर्मिनलमध्ये त्याचा समावेश होतो. येथून शेतीमालाची आयात आणि आखाती देशांमध्ये पुढील पुरवठा केला जातो. मात्र शनिवारी (ता. २८) दुपारी ४ नंतर बंदर परिसरातील कामकाज थांबविण्यात आल्याने सुमारे २०० हून अधिक कंटेनर उतरविण्यात आलेले नाहीत..दरम्यान, जेएनपीटीवर दुबईकडे जाणारे सुमारे ८० कंटेनर लोड न होता अडकून पडले आहेत. तसेच नाशिकहून निर्यातीसाठी मुंबईकडे रवाना झालेले २०० हून अधिक कंटेनर बाहेरच थांबविण्यात आल्याने मोठी कोंडी निर्माण झाली आहे, अशी माहिती हॉर्टिकल्चर प्रोड्यूस एक्सपोर्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष विकास सिंह यांनी दिली..Raisin Export: बेदाणा निर्यात ८१ टक्क्यांनी घटली, द्राक्ष उत्पादक संकटात; सरकारची कबुली .आखाती देशांकडे होणारी शेतीमाल निर्यात पूर्णपणे खोळंबली आहे. जेएनपीटीवर कंटेनर अडकून पडले आहेत, तर पॅकहाऊसमध्ये पॅक केलेला द्राक्षमाल साठून आहे. संपूर्ण निर्यात साखळी अडचणीत आली आहे. शिपिंग लाईनचे कामकाज सुरू झाल्यानंतरच परिस्थिती स्पष्ट होईल. मात्र प्रत्येक कंटेनरमागे लाखो रुपयांचा फटका बसत आहे. मधुकर क्षीरसागर, संचालक, भारतीय द्राक्ष निर्यातदार संघटना.आधीच बाजारभाव घसरलेले, उत्पादन खर्च वाढलेला आणि निर्यात धोरणातील अनिश्चितता असताना युद्धामुळे निर्यात ठप्प होणे ही गंभीर बाब आहे. ही केवळ व्यापाऱ्यांची अडचण नसून थेट शेतकऱ्यांच्या कष्टाची होळी आहे. त्यामुळे प्रति क्विंटल किमान १,५०० रुपये तत्काळ अनुदान जाहीर करावे. अडकलेल्या कंटेनरवरील बंदर शुल्क आणि डेमरेज माफ करावे. निर्यात सुरू होईपर्यंत केंद्र सरकारने तात्पुरती खरेदी योजना जाहीर करून निर्यातदारांना संरक्षण द्यावे.भारत दिघोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.