
जिओपॅथिक स्ट्रेस झोन : भाग ५
जिओपॅथिक स्ट्रेस असलेल्या परिसरात काही काळ राहिल्यास शरीरावर नेमके कोणते परिणाम होतात, याचे मापन करण्याचा प्रयत्न डॉ. अविनाश खरात, डॉ. नंदकुमार धर्माधिकारी आणि डाॅ. सुनील पिंपळीकर यांनी केला आहे. त्यातून हृदयाचे ठोके, रक्तदाब आणि शरीरातील विविध अवयवांच्या तापमान वाढ होत असल्याचे निष्कर्ष हाती आले.
जि ओपॅथिक स्ट्रेसचे वैज्ञानिक विश्लेषण करतानाच त्याच्या माणसावरील परिणामाची संभाव्यता या विषयावरही प्रा. डाॅ. अविनाश खरात यांनी मोठे काम केले आहे. त्यासंबंधी विद्यापीठ पातळीवरील अनेक तज्ज्ञांच्या शंकांचे समाधान व खुलासे शास्त्रीय पायावरच करण्याचा त्यांचा कायम प्रयत्न राहिला आहे. त्यामुळेच जागतिक पातळीवरील संशोधनपत्रिकेच्या स्वतः साक्षेपी शास्त्रज्ञ असलेल्या संपादक व प्रकाशक मंडळींनी बराच खल केल्यानंतरच त्यांचा शोधनिबंध प्रकाशित केले आहेत.
खरात सरांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. नंदकुमार धर्माधिकारी व प्रा. सुनील पिंपळीकर यांनी या विषयातील पुढील संशोधन केले. प्रा. धर्माधिकारी हे पुण्यातील नामवंत महाविद्यालयात भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत, तर डाॅ. सुनील पिंपळीकर हे कोथरूडमधील एका प्रतिष्ठित अभियांत्रिकी महाविद्यालयात विभागप्रमुख आहेत. त्यांनी जिओपॅथिक स्ट्रेसचे मानवी शरीरावर काय परिणाम होतात, हे तपासले. त्यासाठी या ताणाचे माणसाच्या हृदयाचे ठोके, रक्तदाब, शरीराचे तापमान व त्वचेचा प्रतिसाद मोजण्यात आले. सामान्य स्थितीत आणि जिओपॅथिक ताणाच्या स्थितीत दिसणाऱ्या बदलांचा अभ्यास केला.
शरीरातील विद्युतभारावरील परिणाम
आपल्या शरीराचे चैतन्य म्हणजे काय? तर आपल्या शरीरात असलेली स्थायी विद्युत ऊर्जा. ‘जिओपॅथिक स्ट्रेस’ म्हणजे एक प्रकारे विद्युत चुंबकीय ऊर्जाच असते. या ऊर्जा क्षेत्राचा परिणाम शरीराच्या विद्युतभारावर होत असला पाहिजे, या गृहीतकावर त्यांनी संशोधनाची मांडणी केली. प्रथम शरीरातील विद्युतभारावर असा परिणाम होतो का? होत असल्यास नेमका काय व किती? शरीरातील कोणकोणत्या अवयवांवर परिणाम होतो, हे तपासण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्या संबंधी निरीक्षणे नोंदवली आहेत.
आपण उल्हसित झाल्यावर किंवा घाबरल्यावर, दुःखाचा झटका बसल्यावर, अस्वस्थ झाल्यावर शरीरातल्या विद्युत भारात बदल होत असल्याचे नोंदी अनेकांनी केलेल्या आहेत. यामुळे शरीरात भौतिक व रासायनिक बदलही घडतात. भौतिक बदलामध्ये शरीराचा थरकाप उडणे, घाम येणे, आवंढा गिळणे (म्हणजेच घशाचे स्नायू आखडणे), धडधड होणे इ. बदलांचा समावेश होतो. या वरील सर्व घटनांचे परिणाम त्वचेवरही होत असतात. ते आपल्याला विविध पद्धतीने नोंदवता येतात. जिओपॅथिक स्ट्रेसचे त्वचेवर काय परिणाम होतात, याबाबत धर्माधिकारी यांनी संशोधन केले आहे.
या संशोधनासाठी परिसर निवडला तो पुणे -मुंबई एक्स्प्रेस वे वरील. त्यामागे जिओपॅथिक स्ट्रेस वगळता अन्य कोणताही प्रभाव नसावा, हेच कारण होते. आजूबाजूला असलेल्या विजेचे हाय टेन्शन लाइन्स, विजेचे सबस्टेशन, मोबाइल टॉवर्स यासारख्या घटकांचे विद्युत चुंबकीय परिणामही शरीरावर होत असतात. हे टाळण्यासाठी मोकळ्या महामार्गाचा परिसर निरीक्षण व संशोधनासाठी निवडला.
‘एक्स्प्रेस वे’च्या परिसरात डाउझिंगचा वापर करून जिओपॅथिक स्ट्रेस असलेली पाच ठिकाणे निवडली. त्या जागेवर रेझिस्टिव्हिटी मीटरचा वापर करून खाली पाणीप्रवाह असल्याची खात्री केली. जिओपॅथिक स्ट्रेस असलेल्या आणि नसलेल्या अशा दोन्ही ठिकाणी किमान वय १९ आणि कमाल ५३ वर्षे असलेल्या २५ पुरुषांच्या शरीरातील विद्युतभारात होणाऱ्या बदलांचे निरीक्षण केले. निरीक्षणे घेण्यासाठी अशा दोन्ही स्थानी २० - २० मिनिटे बसवून त्यांच्या शरीराचा विद्युतभार होल्ट मीटरने मोजला.
स्ट्रेस असलेल्या ठिकाणी विद्युतभार वाढलेला आढळला. वयानुसार सर्वांत कमी वय असलेल्या व्यक्तीमध्ये ही विद्यूतभारातील वाढ कमी होती, तर सर्वाधिक वय असलेल्या व्यक्तींमध्ये ती अधिक आढळली. याच प्रयोगादरम्यान याच लोकांच्या त्वचेचा प्रतिकारशक्ती कमी झाल्याचे नोंदवले गेले.
त्याच वेळी काही प्रश्न विचारून या व्यक्तींचा मानसिक स्थितीविषयी माहिती मिळविण्याचाही प्रयत्न केला गेला. तो आणखीच अनपेक्षित होता. उदा. स्ट्रेस असलेल्या ठिकाणी व्यक्तींनी प्रयोगादरम्यान व प्रयोगानंतरही बराच वेळ खूप निराश आणि दुःखी वाटल्याची भावना जाणवत असल्याचे सांगितले.
हृदयाचे ठोके, रक्तदाबावरील परिणाम
डाॅ. धर्माधिकारी यांनी जिओ पॅथिक स्ट्रेस झोनचा माणसाच्या हृदयावर काय परिणाम होतो, यावर अभ्यास सुरू केला. या निरीक्षणासाठी डाॅ. सुनील पिंपळीकर व इतर सहकाऱ्यांची मदत घेतली. हृदयावर होणारा परिणाम समजून घेण्यासाठी हृदयांच्या ठोक्यात होणारा बदल आणि शरीरातील रक्तदाबात होणारा बदल मोजण्यात आला.
१८ ते २४ वर्षे वयोगटातील ५०० पेक्षा अधिक पुरुषांचा रक्तदाब, हृदयाचे ठोके मोजले. त्यासाठी जिओपॅथिक ताण असलेल्या व नसलेल्या अशा दोन्ही ठिकाणी २०-२० मिनिटे झोपवून वैद्यकीय शास्त्रातील सर्वात आधुनिक तंत्रज्ञान व साधनाने निरीक्षणे घेतली. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे या प्रयोगात जवळपास सर्व व्यक्तींच्या हृदयाच्या ठोक्यात व रक्तदाबामध्ये दखल घेण्याइतपत बदल होत असल्याचे दिसून आले. या प्रयोगामध्ये लोकांच्या मानसिक स्थिती, येणाऱ्या विचारांची नोंद घेण्यात आली.
जिओपॅथिक ताण असलेल्या ठिकाणी लोकांना काही काळ नैराश्य जाणवले, तर काहींना डोकेदुखीचा त्रास झाला. काहीजनांनी हाता पायाला मुंग्या येण्यासारख्या त्रासाचे वर्णन केले. ही बाब केवळ २० मिनिटांमध्ये नोंदवली गेली होती. वीस मिनिटांऐवजी सहा ते आठ तास या झोनमध्ये ठेवून पुन्हा नोंदी घेतल्यास अधिक सखोल माहिती उपलब्ध होईल, असा विश्वास डॉ. धर्माधिकारी यांना वाटतो.
शारीरिक तापमानात होणारा बदल
प्रा. डाॅ. सुनील पिंपळेकर यांनी प्रा. कोळेकर या सहकाऱ्यांसोबत जिओपॅथिक स्ट्रेसच्या प्रभावक्षेत्रात माणसांच्या शरीराच्या तापमानात होणाऱ्या बदलांच्या नोंदी घेतल्या. या प्रभावक्षेत्रात व्यक्तीला तीन तास बसविल्यानंतर त्याच्या शरीरातील विविध अवयवांचे तापमान मोजण्यात आले. त्यासाठी ३० व्यक्तींच्या शरीराच्या व विविध अवयवांच्या ‘थर्मल इमेजेस’ काढून त्यांचे निरीक्षण केले गेले. यात त्यांना ८३ टक्के लोकांच्या शरीराच्या तापमानात फरक पडला. प्रभावक्षेत्रातून बाजूला गेल्यावर काही काळातच शरीराचे तापमान परत मूळ तापमानावर आले.
या जिओपॅथिक स्ट्रेसचा परिणाम मेंदू व मज्जासंस्थेवरही होत असल्याचे समोर आले आहे. त्यातून प्रतीक्षिप्त क्रियेचा (रिफ्लेक्स ॲक्शन चा) वेळ वाढतो. त्यामुळे रस्त्यावरील अचानक आलेल्या स्थितीला सामोरे जाण्याची ड्रायव्हर लोकांची क्षमता कमी होते. या बाबींचा महामार्गावरील अपघातांशी घनिष्ठ संबंध असू शकतो.
अशाच प्रकारचा ताण वीज वाहून नेणाऱ्या हायटेन्शन तारांच्या आसपासही तयार होत असतो. त्या परिसरातील राहणाऱ्या व्यक्ती व प्राण्यांच्या शरीरावरही त्याचे विपरीत परिणाम होत असतात. उदा. अशा व्यक्तींना डोकेदुखी, ॲलर्जी, भीती किंवा निराशेची मनःस्थिती राहते. कर्करोगासारख्या व्याधींचे प्रमाणही अधिक आढळते.
शेतकऱ्याने सांगितलेला अनुभव
‘जिओपॅथिक स्ट्रेस’ संदर्भातील दोन लेख वाचून झाल्यानंतर सांगली जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकरी राजाजी शिंदे यांचा फोन आला. त्यांनी सांगितलेला अनुभवही विचार करण्यायोग्य होता. ते म्हणाले, ‘‘मी माझ्या शेतात पाणी शोधण्यासाठी डाउझिंग तंत्राचा वापर केला होता. त्या वेळी निश्चित केलेल्या काही जागांपैकी दोन ठिकाणी बोअरवेल घेतले. त्याला बऱ्यापैकी पाणीही लागले.
त्यामुळे अन्य पाण्याचे प्रवाह असलेल्या पॉईंटवर बोअरवेल घेण्याची गरजही भासली. त्याकडे थोडे दुर्लक्ष झाले. पण आता लेख वाचल्यानंतर या डाउझिंगने माहिती झालेल्या जागांवरील डाळिंबाच्या झाडांच्या काही विशेष बाबी लक्षात आल्या. उदा. सर्व बागेत एक सारखेच व्यवस्थापन असतानाही या जागेवरील डाळिंब झाडांची फळ कायम लहान, अनियमित आकाराची आणि वेगवेगळ्या रंग, चवीची येत असल्याचे स्पष्ट झाले. लेख वाचेपर्यंत मला त्यामागील कारणच समजत नव्हते. आता जाणवते की हा जिओपॅथिक स्ट्रेसचाच प्रभाव असावा.
पशुधनावरील प्रभाव
टाँबोर्की विझ (Tamborki Wicz) या संशोधकाने जि. स्ट्रे. झोनमुळे गाईच्या दुधातील खनिजांचे प्रमाण घटते हे नोंदवले आहे.
युनिव्हर्सिटी ऑफ झुरीच (स्वित्झर्लंड) येथे या झोनचा गाईंवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करताना दूध व मूत्राचे नमुने तपासणी झाली. त्यातून गाईंवरही नकारात्मक परिणाम होत असल्याचे नोंदवले होते.
या सर्व पार्श्वभूमीवर मांजर, कीटक, अनेक प्रकारच्या बुरशी, परजीवी वनस्पती व बऱ्याच औषधी वनस्पती मात्र जिओपॅथिक स्ट्रेसला सकारात्मक व चांगला प्रतिसाद देतात हेही संशोधकांनी नोंदवले आहे.
- सतीश खाडे, ९८२३०३०२१८,
(लेखक पाणी अभ्यासक असून, पाणी तंत्रज्ञावर लिहिलेल्या ‘अभिनव जलनायक’ या पुस्तकाचे लेखक आहेत.)
Image
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.