Agriculture Tools Agrowon
टेक्नोवन

Agriculture Technology : पाटील यांची वैशिष्ट्यपूर्ण, नावीन्यपूर्ण अवजारांची निर्मिती

Manufacture of Agriculture Tools : ऐनपूर (ता. रावेर, जि.जळगाव) येथील वसंत व जितेंद्र या पाटील पितापुत्रांनी शेती अवजारे- यंत्रनिर्मितीत नाव मिळवले आहे. शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन आपले कौशल्य पणाला लावून तयार केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण व नावीन्यपूर्ण अवजारांना शेतकऱ्यांनी पसंती व मागणी मिळवली आहे.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Creation of Innovative Tools : जळगाव जिल्ह्यात ऐनपूर (ता.रावेर) गावाला तापी नदी व हतनूर धरणाच्या ‘बॅकवॉटर’ चा लाभ होतो. धरणामुळे परिसरात समृद्धी आली असून येथील काळ्या कसदार जमिनीत केळी, अन्य फळपिके व कापूस अशी पिके शिवारात मोठ्या प्रमाणात दिसतात. गावातील वसंत पाटील हे प्रगतिशीलशेतकरी असून ऐनपूर शिवारात त्यांची सहा एकर शेती आहे. काही शेती ते भाडेतत्त्वावरही करतात.

अवजारे निर्मितीत हातखंडा

वसंतरावांचा चरितार्थ शेतीवरच चालायचा. अल्पशिक्षित असले त्यांच्यात अंगभूत तांत्रिक कौशल्य होते. नवे काही करण्याची आवड होती. अवजार निर्मितीची कला तारूण्यापासून होती. त्यामुळे गावातच शेती अवजारे व गृहोपयोगी साहित्य निर्मिती व्यवसाय सुरू करावा असे त्यांना वाटे. त्यातूनच १९८३ मध्ये त्यांनी मध्य प्रदेशातील इंदूर येथून ‘वेल्डिंग’ चे यंत्र आणले.

गावातच लहानशी कार्यशाळा थाटली. परिसरातील पीक विविधता, ओलिताखालील अधिकाधिक क्षेत्र यामुळे यांत्रिकीकरणाला मोठा वाव होता. त्यातूनच शेतकऱ्यांची मागणी ओळखून वसंतराव विविध अवजारे विकसित करू लागले. दर्जेदार व नावीन्यता या मुळे प्रतिसादही मिळू लागला. जे शेतकरी कार्यशाळेत काम घेऊन यायचे, त्यांचे समाधान व्हायचे.

त्यातून यश मिळत गेले, भरभराट होत गेली. चिरंजीव पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेऊन याच व्यवसायात दाखल झाले. वसंतरावांनी त्यांना व्यवसायातील प्रशिक्षण दिले. सध्या पाटील पितापुत्र कार्यशाळेचे कामकाज सांभाळतात. तर वसंतरावांचे थोरले पुत्र अतुल शेती व्यवस्थापन सांभाळतात.

विकसित केलेली यंत्रे

पाटील यांनी विविध प्रकारची यंत्रे विकसित केली आहेत. तिफणीप्रमाणे दिसणाऱ्या यंत्रांना त्यांनी तिवनी असे नाव दिले आहे. ती मजबूत, बहुउद्देशीय व बैलजोडीचलित आहे. तिचा आकार दोन फूट ते नऊ इंच एवढा करता येतो. पिकाच्या उंचीनुसार ती उंचीला कमी जास्त करता येते. त्यास दोन, तीन दात लावता येतात.

पास लावून आंतरमशागत करता येते. गहू, मका, बाजरी, उडीद, मूग व अन्य पिकांची पेरणी करता येते. केळी, हळद, कापूस व अन्य पिकांना मातीची भर लावता येते. बैलांना अधिकचे वजन पेलण्याचे कष्ट करावे लागू नयेत यासाठी त्याचे वजन २५, २७ ते ३० किलोपर्यंत ठेवले आहे. लहान किंवा मोठी बैलजोडीकरवी याद्वारे शेतीचे काम उरकता येईल, अशी रचना आहे.

मजबूत फ्यूजपेटी व फिरती रिंग

फ्यूजपेट्यांमधील यंत्रणा, केबल आदींची अनेकवेळा चोरी होते. काही खोडसाळ मंडळी नासधूस करतात. यावर उपाय म्हणून मजबूत आतील बाजूला कुलूप असलेली फ्यूजपेटी तयार केली आहे. त्याचे तोडणे शक्य होत नाही. या कुलपाची चावीही कार्यशाळेत बनवली जाते. त्याचा आकार व वजनही अधिक असून नक्कल करून ती बनवून घेणे सहज शक्य नाही. या पेटीत हवा खेळती

राहण्यासाठी डाव्या व उजव्या बाजूस बारीक छिद्रांच्या खिडक्याही आहेत. या पेटीत शेतीपयोगी वजनदार साहित्य सुरक्षित ठेवता येते. पत्रा दर्जेदार असल्याने अनेक वर्षे तो खराब होत नाही. विविध आकार व वजनात या पेट्या तयार केल्या जातात. जलवाहिनीच्या जोडणीसाठी बाजारात न उपलब्ध होणाऱ्या फिरत्या रिंग अर्थात ‘फ्लॅंज’ तयार केल्या आहेत.

दोन पाइप्स बाजारातील फ्लॅन्जद्वारे जोडतेवेळी त्यांच्या छिद्रांचे माप, स्थिती चुकल्यास ‘नटबोल्ट’ लावून बसविणे शक्य होत नाही. अशावेळी फिरती फ्लॅंज उपयोगी ठरणारी आहे. त्यास लोखंडी पाइपचे तुकडे जोडलेले असतात. त्याभोवती ही फ्लॅंज हवी तशी फिरविता येते. त्यास चारपेक्षा अधिक छिद्रे असल्याने ‘नटबोल्ट’ लावून बसविणे सहज शक्य आहे. उपसा योजना, जलवाहिन्यांना लावल्या जाणाऱ्या ‘नॉन रिटर्न व्हॉल्व्ह’ची दुरुस्तीही पाटील करून देतात.

हळद बॉयलरमध्ये सुधारणा

हळद शिजविण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी चौकोनी बॉयलर आणले होते. त्यास चार जॉइंट होते. त्यामुळे बॉयलर फुटण्याचे प्रकार वाढले होते. यावर उपाय म्हणून एकाच मजबूत पत्र्यापासून गोलाकार स्वरुपातील बॉयलर जितेंद्र यांनी तयार केले.

त्यास फक्त खालच्या व वरच्या बाजूला प्लेट्स किंवा मजबूत तबकड्या आहेत. कुठल्याही तापमानात हा बॉयलर चांगल्या प्रकारे काम करतो असे आढळले आहे. त्यांच्याकडून अनेक हळद उत्पादकांनी असे बॉयलर तयार करून घेतले आहेत.

मेहनतीने समृद्धीही आली

व्यवसायाला सुरवात केली त्यावेळी पाटील यांना मोठा संघर्ष करावा लागला. अहोरात्र कष्ट केले. परंतु कष्टाला यश आले. त्याच जोरावर सहा एकर शेती खरेदी केली. गावात जागा घेतली. ऐनपूर खिर्डी रस्त्यावर त्यांचा प्रशस्त, सुरेख बंगला आहे. तीन ते चार एकरांतील केळी, कापूस, हळदीचेही चांगले उत्पादन पाटील मिळवतात.

गुणवत्ता राखल्यानेच यश

गुणात्मकता, दर्जा व नावीन्यता यामुळे रावेर, मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर तसेच अन्य भागांतून पाटील यांच्याकडील अवजारांना मागणी राहते. कृषीतज्ज्ञ, प्रयोगशील शेतकऱ्यांनी त्यांच्या कार्यशाळेस भेट दिली आहे. काही संस्थांनी तिवनीची खरेदी केली आहे. स्वतः शेतकरी असल्याने शेतीतील अडचणी त्यांना पटकन लक्षात येतात.

त्यानुसार यंत्रांमध्ये सुधारणा करतात. शेतकऱ्यांना अधिकाधिक सेवा देण्यासाठी ते तत्पर असतात. दोन बैलचलित तिवनी पाच हजार रुपये तर एक बैलचलित तिवनीचा दर सहा हजार रुपये आहे. फ्यूज, स्वीचपेटी किंवा स्टार्टर पेटीची किंमत सहा हजार रुपये आहे. आकारानुसार दर बदलतात. फिरती फ्लॅंज पाइपच्या आकारानुसार तयार करून दिली जाते. तिची किंमत ४०० ते ६०० रुपये असते.

जितेंद्र पाटील, ९४२०९४३३५४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Vidhansabha 2024 Live Result : राज्यातील पहिला निकाल जाहीर; वडाळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कोळंबकर विजयी

Satara Assembly Election 2024 : साताऱ्यातील जनतेचा महायुतीकडे कल, सर्वच मतदारसंघात भाजप महायुतीची आघाडी

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 : आदिती तटकरेंचा विजय निश्चित; कोकणातील पहिला निकाल स्पष्ट

Eknath Shinde On Maharashtra Assembly Election 2024 : लाडकी बहीण, लाडके भाऊ, लाडके शेतकरी यांच्यामुळे आमचा विजय, एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

Poultry Processing Product : अबब! कडकनाथच्या अंड्यांपासून एवढी उत्पादने?

SCROLL FOR NEXT