Agriculture Technology : काळाप्रमाणे शेती क्षेत्रातही बदल होत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये होऊ लागला आहे. शेतीमध्ये मजूरटंचाईची समस्या निर्माण झाल्याने लहान- मोठ्या शेतकऱ्यांना आता यांत्रिकीकरणाशिवाय पर्याय नाही. परंतु आपली जमीन आणि पीक पद्धतीनुसार कोणते यंत्र निवडायचे, यंत्राचा योग्य पद्धतीने वापर कसा करायचा, त्याचे व्यवस्थापन कसे करायचे याबाबत अनेकांना शंका असतात.
हे लक्षात घेऊन महात्मा फुले कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वित कृषी-अवजारे आणि यंत्रे संशोधन प्रकल्पातील प्राध्यापक आणि प्रमुख संशोधक डॉ. तुळशीदास बास्टेवाड यांनी दैनिक ‘ॲग्रोवन’मध्ये विविध पिके, फळबागा, महिलांसाठी उपयुक्त अवजारे तसेच जमीन मशागतीसाठी अवजारे, पेरणी यंत्रे, पुनर्लागवडीसाठी आधुनिक अवजारे याबाबत लेखमाला लिहिली. यास वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यातून आधुनिक कृषी अवजारे व यंत्रे हे पुस्तक सकाळ प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहे.
पुस्तकामध्ये प्रामुख्याने यांत्रिकीकरणाचे काय फायदे आहेत तसेच यांत्रिकीकरणातून ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी कशा प्रकारे उपलब्ध झाल्या आहेत, याची माहिती मिळते. पुस्तकामध्ये वीस विभाग आहेत. यामध्ये प्रामुख्याने जमीन मशागतीसाठीच्या अवजारांमध्ये ट्रॅक्टरचलित फुले ऑटोमॅटिक पलटी नांगर, ट्रॅक्टरचलित हायड्रोलिक पलटी नांगर, स्पेड नांगर, रोटरी टिलर, पॉवर हॅरो, रिजर अशा विविध अवजारांची तांत्रिक माहिती तसेच वैशिष्ट्ये दिली आहेत.
त्यामुळे आपल्या गरजेनुसार आणि आर्थिक क्षमतेनुसार कोणते अवजार आपल्याला उपयुक्त आहे, हे लक्षात येते. पेरणी, लावणी आणि पुनर्लागवडीसाठी उपयुक्त अशा वीस प्रकारच्या अवजारांची माहिती या पुस्तकात पाहायला मिळते. त्यामुळे आपल्या पीक पद्धतीनुसार कोणते अवजार निवडले पाहिजे, हे सहज लक्षात येते.
यामध्ये बैलचलित ज्योती बहुपीक टोकण यंत्र, ट्रॅक्टरचलित फुले सरी वरंबा बहुपीक टोकण यंत्र, मनुष्यचलित भात बी पेरणी यंत्र, तसेच कांदा बी पेरणी यंत्र, बटाटा लागवड यंत्र, हळद लागवड यंत्र, ऊस रोपे पुनर्लागवड यंत्र, चक्रीय टोकण यंत्र, मल्चिंग यंत्रासारख्या विविध अवजारांची माहिती दिलेली आहे.
शेतीमध्ये तण नियंत्रण ही मोठी समस्या आहे. हे लक्षात घेऊन आंतरमशागतीसाठी उपयुक्त आधुनिक कृषी अवजारांचा समावेश या पुस्तकामध्ये आहे. कीडनाशकांची फवारणी, धुरळणीसाठी विविध फवारणी यंत्रे, स्वयंचलित फवारणी यंत्राची माहिती उपलब्ध आहे.
मजूरटंचाईमुळे पीक कापणी आणि मळणीमध्ये अडचणी येतात. त्यामुळे हे काम जलद गतीने आणि वेळेवर होण्यासाठी महत्त्वाची कापणी आणि मळणी यंत्राबाबत मार्गदर्शन या पुस्तकातून मिळते. पीक अवशेषाच्या व्यवस्थापनासाठी उपयुक्त अवजारांबाबत स्वतंत्र विभाग या पुस्तकात आहे.
पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे पीक निहाय उपयुक्त अवजारे कोणती आहेत, याची सविस्तर माहिती आहे. विशेषतः फळबाग व्यवस्थापन, कापूस, ऊस, सोयाबीन, खरीप पिके, रब्बी पिकांसाठी कोणती अवजारे उपलब्ध आहेत, त्यांचा वापर कसा करावा, याचबरोबरीने महिलांचे श्रम कमी करण्यासाठी कृषी विद्यापीठांनी विकसित केलेल्या अवजारांची स्वतंत्रपणे माहिती पुस्तकामध्ये दिली आहे.
शेवटच्या काही विभागात ट्रॅक्टरची निवड, इंधन बचत, कार्यक्षमता, कृषी अवजारांची देखभाल आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या अवजारांची सविस्तर माहिती मिळते. अवजारांची सहज सोप्या भाषेत माहिती त्यासोबत प्रत्येक अवजारांचे छायाचित्र या पुस्तकात दिले आहे. प्रत्येक शेतकऱ्याकडे हे मार्गदर्शक पुस्तक असणे ही काळाची गरज आहे.
आधुनिक कृषी अवजारे व यंत्रे
लेखक ः डॉ. तुळशीदास बास्टेवाड
प्रकाशक ः सकाळ मीडिया प्रा.लि., ५९५, बुधवार पेठ, पुणे
किंमत ः २४० रुपये
९८८१५९८८१५
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.