Agriculture Technology
Agriculture Technology Agrowon
टेक्नोवन

BBF Technique : लेसर लेव्हलिंग, सरी वरंबा पद्धतींमुळे मिळाली बाजरी उत्पादनात चांगली वाढ

टीम ॲग्रोवन

बाजरीसारख्या पोषक भरडधान्य पिकांच्या (Millet Crop) उत्पादकतेमध्ये वाढ करण्याच्या उद्देशाने मध्य प्रदेशातील चंबळ खोऱ्यांमध्ये लेसर लेव्हलिंग (Laser Leveling), सरी वरंबा पद्धती (Broad Bed Furrow Method) यातून तणनियंत्रण (weed Control) आणि जलसंवर्धनाचा (Water Conservation) प्रयोग करण्यात आला. त्यामुळे बाजरी उत्पादनामध्ये (Millet Production) १८ टक्क्यांनी वाढ झाली. शेतकऱ्यांना हेक्टरी १३०९५ रुपये इतका अधिक फायदा मिळाला.

भारत हा भरडधान्य उत्पादनातील सर्वांत मोठा देश आहे. देशांच्या एकूण भरडधान्यांपैकी बाजरी (शा. नाव ः Pennisetum glaucum L.) हे पीक दोन तृतीयांश क्षेत्रावर घेतले आहे. बाजरी हे पावसाच्या पाण्यावर घेता येण्याजोगे धान्य आणि चारा असे दुहेरी कोरडवाहू पीक आहे. पोषकता आणि आरोग्यासाठी फायदेशीर असलेल्या या पिकांकडे आता लोकांचा ओढा वाढला आहे. पूर्वी गरिबांचे मानले जाणारे हे अन्नधान्य आता शहरी भागामध्ये उच्चभ्रू लोकांच्या ताटामध्ये सजू लागले आहे.

पिकातील सध्याच्या समस्या व त्यावरील उपाययोजना ः

१) कोरडवाहू स्थितीमध्ये बाजरी या पिकाचे उत्पादन तुलनेने कमी येते. त्यामुळे उत्पन्न आणि नफाही कमी असल्याने शेतकरी या पिकांपासून दूर होत चालले होते.

२) हे पावसाळी हंगामातील पीक असून, त्यात उतारावरील जमिनीत कमीत कमी मशागतीसह घेतले जाते. त्यात अतिरीक्त पावसामुळे जमिनीचा ऱ्हासही अधिक होऊ शकतो. हा ऱ्हास टाळण्यासाठी जमिनी समतल करणे गरजेचे असतात. त्यासाठी लेसर लेव्हलिंग तंत्राचा उपयोग होऊ शकतो.

३) अलीकडे अनेक पिकांमध्ये तणनियंत्रणासाठी तणनाशकांचा वापर वाढला आहे. मात्र, त्याच्या वापरामुळे पिकांमध्ये, मातीमध्ये तणनाशकांचे अवशेष राहू शकतात. पर्यावरणाचेही नुकसान होऊ शकते. त्यातच बाजरी या पिकाचा कडबा हा चारा म्हणून वापरला जात असल्यामुळे पाळीव जनावरांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. हे लक्षात घेऊन मध्य प्रदेशातील चंबळ खोऱ्यामध्ये फार्मर फर्स्ट प्रोग्रॅम हा बाजरी शेतीमध्ये मूलस्थानी जलसंधारण, तण व्यवस्थापनाचा प्रयोग राबवला. त्यासाठी लेसर लेव्हलिंग आणि सरी वरंबा पद्धतीचा अवलंब करण्याचे नियोजन केले. या पद्धतीमुळे बाजरी शेतीमध्ये तणनियंत्रणाचे अवघड आव्हान पेलतानाच पावसांचे पाण्याचे संवर्धनही करता आले. त्याचा दुहेरी फायदा शेतकऱ्यांना झाला.

- ही पद्धत २०१७ पासून गावातील २० शेतकऱ्यांच्या शेतामध्ये राबवण्यात आली.

-या प्रयोगामध्ये पिकाची उत्पादकता वाढवण्यासाठी लेसर आधारीत लेव्हलिग तंत्र आणि त्यासोबत ट्रॅक्टरचलित सरी वरंबा पद्धतीचा अवलंब केला.

-पहिल्या मॉन्सूनच्या पावसानंतर साधारणपणे जुलै महिन्यांच्या दुसऱ्या आठवड्यांमध्ये संकरित बाजरी जातीची पेरणी करण्यात आली. प्रति हेक्टर ४ ते ५ किलो असा बियाणे दर ठेवला.

-दोन ओळींमध्ये ४० सेंमी अंतर ठेवल्यामुळे लागवडीनंतर २५ दिवसांनी उभ्या पिकामध्ये तणनियंत्रण करणे सोपे झाले. आंतरमशागत करता आली. किंवा २० दिवसांनी किंवा पीक १० ते ३० सेंमी उंचीचे असताना रासायनिक तणनियंत्रण करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना तेही शक्य झाले.

- या प्रयोगामध्ये ग्वाल्हेर येथील राजमाता विजयाराजे सिंधिया कृषी विद्यापीठाकडून बाजरी पिकासाठी शिफारस केलेल्या पद्धतींचा अवलंब केला.

- पिकांच्या संवेदनशील अवस्थांमध्ये वेळीच ओलावा उपलब्ध झाल्यामुळे पिकांची चांगली वाढ झाली.

-पीकवाढीच्या विविध अवस्थेमध्ये असताना त्यांचे विविध निकषांवर परीक्षण केले. उदा. पक्वता अवस्था, दाणे भरण्याची अवस्था, धान्यांचे उत्पादन आणि कडबा उत्पादन मोजण्यात आले. पक्वतेच्या स्थितीला प्रत्येक क्षेत्रातील तणांची घनता आणि बायोमास मोजण्यात आले.

...असे झाले फायदे

-या नावीन्यपूर्ण दुहेरी तंत्रज्ञानामुळे एकाच वेळी तणांचे नियंत्रण आणि पावसाच्या पाण्याचे संवर्धन शक्य झाले.

-पावसाळी हंगामामध्ये सरी वरंबा पद्धतीमुळे मध्ये मोकळी जागा मिळाल्यामुळे तणांचे नियंत्रण चांगल्या प्रकारे करता आले. त्याची तुलना रासायनिक तण नियंत्रणाशी करण्यात आली.

-मोकळ्या जागेमध्ये पिकांची वाढ चांगली होऊन उत्पादनामध्ये १८ टक्क्यांनी वाढ झाली. हेक्टरी १३०९५ रुपये इतका अधिक फायदा शेतकऱ्यांना मिळाला.

जलसंवर्धनामुळे एकूण पाणी वापरामध्ये सुमारे ३७ मिमी प्रति हेक्टर इतकी बचत झाली. पारंपरिक पद्धतीच्या तुलनेमध्ये पाणी वापर कार्यक्षमता ३३.१ टक्के वाढली.

- या प्रयोगातील यश लक्षात येताच चंबळ पट्ट्यातील सर्व बाजरी उत्पादक भागांमध्ये या तंत्रज्ञानाचा प्रसार वेगाने झाला.

- पाणी वापर कार्यक्षमता वाढली. तणांचे नियंत्रण तुलनेने सोपे झाले. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नांमध्ये वाढ झाली.

---------------------------

(स्रोत ः आयसीएआर- एफएफपी प्रोजेक्ट, विस्तार शिक्षण संचलनालय, राजमाता विजयाराजे सिंधिया कृषी विद्यापीठ, ग्वाल्हेर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT