फळे व भाजीपाल्यांचा ताजेपणा (Freshness Of Fruit And Vegetable) टिकून ठेवण्यासाठी गुवाहाटीतील भारतीय औद्योगिक संस्थेतील (Indian Institute Of Technology) (आयआयटी) संशोधकांनी खाद्य आवरणाची (Edible Coating) (इडिबल कोटिंग) निर्मिती केली आहे. त्यामुळे फळे आणि भाजीपाल्यांची टिकाऊ क्षमता (Sustainability of fruits and vegetables) वाढेल. काही फळे-भाजीपाला टिकून ठेवण्यासाठी आत्ताही कृत्रिम-रासायनिक कोटिंगचा वापर होताना दिसतो. परंतु असे कोटिंग हे बी-व्हॅक्स, पॅराफीन व्हॅक्सचे नाहीतर बायो-पॉलिमरचे असते. बायो-पॉलिमरमध्ये व्हॅक्सबरोबर रसायनेही मिसळली जातात, जी आरोग्यास घातक आहेत. शिवाय व्हॅक्सची अनेकांना ॲलर्जी असल्यामुळे ते अशी फळे-भाजीपाला वापरू शकत नाहीत. त्यामुळे अशा प्रकारचे कोटिंग फारसे प्रचलित होऊ शकले नाहीत.
आता संशोधित खाद्य आवरण हे सूक्ष्म शेवाळ अर्क आणि पॉलिसेकेराइडपासून तयार केलेले असून, ते एक प्रकारचे कर्बोदक खाद्य आहे. हे खाद्य आवरणआरोग्यपूरक आहे. या आवरणामुळे फळे-भाजीपाल्याचा साठवण कालावधी दोन महिन्यांपर्यंत वाढविणे शक्य होणार आहे. त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांनी नाशिवंत फळे-भाजीपाल्यासाठी याचा वापर केल्यास विक्रीसाठी तेवढा कालावधी त्यांना मिळेल. आता हंगामात नाशिवंत फळे-भाजीपाला निघाला, की तो तत्काळ विकण्यावाचून पर्याय नाही. याचा फायदा व्यापारी घेऊन द्राक्ष-डाळिंबापासून ते कांदा-टोमॅटोपर्यंत दर पाडतात.
या खाद्य आवरणामुळे फळे-भाजीपाला तत्काळ विक्रीची शेतकऱ्यांची जोखीम कमी होणार आहे. प्रक्रियादारांना सुद्धा फळे-भाजीपाल्याची हंगामात खरेदी केल्यानंतर साठवणुकीची समस्या आहे. महागडी शीत-साठवणूक त्यांना करावी लागते. खाद्य आवरणामुळे व्यापारी-प्रक्रियादार स्वस्तात फळे-भाजीपाला साठवून ठेवू शकतात. शेवाळापासून बनविलेले खाद्य आवरण नैसर्गिक असल्याने ग्राहकांनाही असा फळे-भाजीपाला खरेदी करताना ॲलर्जी-आरोग्याबाबत चिंता करण्याची गरज नाही.
बदलत्या नैसर्गिक हवामानात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शेतकरी फळे-भाजीपाल्याचे उत्पादन घेत आहेत. फळे-भाजीपाल्याचे उत्पादन घेताना प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब केला जातोय. त्यामुळे त्यांचा उत्पादन खर्च सुद्धा अधिक आहे. असा खर्च अन् मेहनतीने पिकविलेला फळे-भाजीपाला आपल्याकडे काढणीपश्चात सेवासुविधा नसल्यामुळे ३० ते ३५ टक्के वाया जातो. अशावेळी खाद्य आवरणाने फळे-भाजीपाल्याची टिकाऊ क्षमता वाढवून काढणीपश्चात नुकसान आपण कमी करू शकलो तर ही कृषी क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी ठरले. परंतु यासाठी आयआयटीच्या प्रयोगशाळेतील या संशोधनाचा विस्तार शेतकरी, व्यापारी, प्रक्रियादार, निर्यातदार यांच्यापर्यंत झाला पाहिजेत.
अशा सर्व घटकांपर्यंत हे संशोधन पोहोचविण्याचे काम देशातील कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे, अन्नतंत्र महाविद्यालये, विभाग यांना करावे लागेल. व्यापारी तत्त्वावर असे खाद्य आवरण निर्माण करून ते सर्व घटकांपर्यंत पोहोचविता येईल. असे झाले नाही तर हे संशोधन प्रयोगशाळा आणि नियतकालिकामध्ये लेख-पेपर प्रकाशित करण्यापुरते मर्यादित राहील. अशा प्रकारच्या खाद्य आवरणाचा वापर वाढू लागला म्हणजे त्याचा पुरवठाही सुरळीत ठेवावा लागेल. बऱ्याच वेळा नवीन संशोधनात वापरावयाच्या घटकांसाठीचा वापर वाढला तर कच्चा मालाचा तुटवडा जाणवतो. त्यातून निर्मिती कमी होते आणि संशोधनाला खीळ बसते. परंतु आयआयटी संशोधित खाद्य आवरण सागरी सूक्ष्म शेवाळापासून बनत असल्याने त्याचा मुबलक पुरवठा असेल, शिवाय नैसर्गिकरीत्या हे शेवाळ उपलब्ध होण्यास अडचणी निर्माण झाल्यास ते कृत्रिमरीत्या पण वाढविता येते का, हेही पाहावे लागेल. असे झाले तर या खाद्य आवरणाचा वापर वाढला तरी शाश्वत पुरवठा आपण करू शकू.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.