डॉ. सचिन नलावडे
खानदेशातील गव्हाचे शेत असो, की कोकणातील भाताचे किंवा विदर्भातील कापसाचे सर्व पिकांच्या लागवडीतील एक समान बाब म्हणजे मशागत. पिकाच्या वाढीसाठी योग्य प्रकारे जमीन तयार करण्याला शेतकऱ्यांचे प्राधान्य असते. चांगल्या प्रकारे केलेली मशागत ही तणे कमी करण्याचे काम करते, बिया किंवा रोपांच्या वाढीसाठी सुपीक आणि भुसभुशीत माती देते.
मशागतीमुळे जमिनीचा मगदूर वाढतो. जमिनीचा वरचा थर जो नांगरून तयार केला जातो, त्याला प्राथमिक मशागत असे म्हणतात. यामुळे माती खुली होते, हवा खेळती राहते, जमिनीत लपलेल्या कीड- रोगाचे सुप्त अवस्था नष्ट होतात. सूक्ष्मजीवांच्या वाढीस चालना मिळते. दुसरी पायरी म्हणजे कुळवणी, डवरणी. याला दुय्यम मशागत देखील म्हणतात.
यामध्ये ढेकळे फोडून मातीच्या लहान, सूक्ष्म कणांमध्ये परिवर्तित होऊन मातीची रचना आणि पोत सुधारतो. खतांचे समान वितरण होते. अधिक पाणी शोषण्यासाठी माती तयार होते. परिणामी, पिकांची जोमदार वाढ होऊन चांगल्या उत्पादनाची हमी मिळते.
नांगराचे प्रकार
नांगराचा वापर प्राथमिक मशागतीसाठी केला जातो. नांगराचे लाकडी नांगर, फाळाचा किंवा पलटी नांगर, तव्याचा नांगर आणि विशेष नांगर असे वेगवेगळे प्रकार असतात.
लाकडी नांगर किंवा देशी नांगर
देशी किंवा लाकडी नांगरामध्ये लोखंडी फाळ वापरून उर्वरित भाग लाकडापासून बनवले जातात. कोरडवाहू क्षेत्रात मुख्यत्वे बैलांच्या साह्याने ओढला जाणारा हा नांगर ‘व्ही’ आकाराची सरी करतो. यात माती उघडते, परंतु तिची जास्त उलथापालथ होत नाही. नांगरणीची क्रिया देखील परिपूर्ण नाही, कारण काही न नांगरलेली पट्टी दोन चरांमध्ये सोडली जाते.
हे उभ्या- आडव्या नांगरणीने कमी केले जाते. तरीही लहान चौरस मशागतीविना राहतातच. म्हणूनच या प्रकारे जमीन नांगरणीविना राहू नये, म्हणून फाळाचे नांगर वापरले जातात. ढेकळे एका बाजूने उलटी-पलटी केली जातात, परिणामी मातीचा पोत सुधारतो.
महत्त्वाचे...
मागील लेखात आपण ट्रॅक्टर घेताना काय तांत्रिक बाबी पाहाव्यात, याची माहिती घेतली. थोडासा तांत्रिक आणि गणिताचा समावेश असलेल्या या लेखासाठी थोडे कमी फोन आले. पण आपल्याला आपली शेती टिकवायची असेल, ती फायद्याची करायची असेल, तर गणितांना घाबरून चालणार नाही.
आयुष्यात एकदा किंवा दोनदा घ्यावयाच्या निर्णयासाठी एकदा गणित करायला काय हरकत आहे. ही काही परीक्षा नाही, चक्क कॅलक्युलेटर वापरून आपण पाहिजे ती आकडेमोड करू शकतो. अगदीच जमत नसेल, तर घरातील थोडे शिकलेल्या मुलामुलींची मदत घेता येईल.
हे तर अधिकच चांगले कारण त्यामुळे आपली पुढील पिढीला शेती फायद्याच्या करण्यासाठी विचार करू लागेल. तुम्ही मुलांना सांगत जा, ते तुमच्या शेतीचा जमाखर्चही लिहून ठेवतील. ट्रॅक्टरच्या डिझेल व देखभालीचा खर्च नियमित लिहिला जाईल, हे पाहा. त्यातून शेतीसह विविध गोष्टींवर कुठे किती खर्च झाला, त्यातील आवश्यक - अनावश्यक किती हे समजले तर पुढील हंगामात तो पैसा वाचवता येईल.
मोल्डबोर्ड नांगर
मोल्डबोर्ड नांगराचे भाग मुख्य धड, मोल्डबोर्ड, विंग, शेअर, लँडसाइड, कनेक्टिंग, रॉड, ब्रॅकेट आणि हँडल आहेत. बैलांच्या साह्याने वापरायचा मोल्डबोर्ड नांगर आकाराने लहान असून, १५ सेंमी खोलीपर्यंत नांगरतो.
ट्रॅक्टरला जोडलेले दोन फाळाचे नांगर आकाराने मोठे असून, ते २५ ते ३० सेंमी खोलीवर नांगरतात. जिथे माती उलटण्याची आवश्यकता आहे, तिथे मोल्डबोर्ड नांगरांचा वापर केला जातो.
डिस्क (तव्याचा) नांगर
डिस्क नांगर आणि सामान्य मोल्डबोर्ड नांगरामध्ये थोडेसे साम्य असते. एक मोठी, फिरणारी, तव्यासारखी स्टील डिस्क शेअर आणि मोल्डबोर्डची जागा घेते. डिस्क तिरकी फिरत असल्यामुळे माती उचलून एका बाजूला फेकते. यालाच इंग्रजीमध्ये ‘फरो स्लाइस स्कूपिंग’ असे म्हणतात. डिस्कचा नेहमीचा आकार ६० सेंमी व्यासाचा असतो आणि यामुळे ३५ ते ३० सेंमी फरो स्लाइस बनते.
ज्या जमिनीमध्ये तणांची जास्त तंतुमय वाढ होते, अशा जमिनीसाठी डिस्क नांगर अधिक योग्य आहे. कारण डिस्क तण कापले जाऊन एकत्र करते. चकती नांगर दगडविरहित जमिनीत चांगले काम करते. मोल्डबोर्डच्या नांगराप्रमाणे उखडलेल्या मातीची ढेकळे तोडण्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत.
पलटी किंवा एकतर्फी नांगर
या नांगराचा फाळ शाफ्टला अशा प्रकारे जोडलेला असतो की मोल्डबोर्ड आणि शेअर शाफ्टच्या डावीकडे किंवा उजव्या बाजूला उलट- पलट करता येतात. हे समायोजन शेताभोवती नांगर फिरविण्याचा त्रास वाचवते आणि सलग नांगरणी करता येते. परंतु तरीही माती फक्त एका बाजूला उलटणे सुलभ करते. यामुळे घळ्या व वरंबे राहात नाहीत आणि इंधनखर्चात बचत होते.
सबसॉइलर नांगर
जमिनीच्या पृष्ठभागावर न आणता कठीण थर किंवा चिबड जमीन फोडण्यासाठी या नांगराची रचना केली जाते. सबसॉइलर नांगराचा मुख्य भाग पाचरीच्या आकाराचा आणि अरुंद असतो, तर फाळ रुंद असल्यामुळे कठीण थराचाही चक्काचूर होतो.
वरच्या थरांवर फक्त एक स्लॉट बनतो. या पैकी फाळाचा नांगर मजबूत आणि एकसंध असल्यामुळे त्यात तुटफूट फारशी होत नाही. या कारणामुळे फाळाचा नांगर सर्रास वापरला जातो. या नांगराचा कार्यक्षम वापर करण्यासाठी शेतकऱ्यांनी काही समायोजन शिकणे आवश्यक आहे.
डॉ. सचिन नलावडे, ९४२२३८२०४९,
(प्रमुख, कृषी यंत्रे आणि शक्ती विभाग, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.