F Technique Agrowon
टेक्नोवन

BBF Technique : ‘बीबीएफ’ तंत्राद्वारे वाढविली सोयाबीन, हरभरा उत्पादकता

परभणी येथील संगणक अभियंता महेश रामराव शेळके यांनी अभ्यासपूर्ण व प्रयोगशील वृत्तीतून सोयाबीन आणि हरभरा पिकांमध्ये ‘बीबीएफ’ तंत्राचा वापर सुरू केला. अतिपाऊस तसेच पावसाचा दीर्घ खंड अशा स्थितीत पिकाचे नुकसान कमी करणे, बियाणे बचत व एकूण उत्पादन खर्चात बचतीसह एकरी उत्पादकता दीड ते दुपटीने वाढवण्यामध्ये त्यांनी यश मिळवले आहे.

माणिक रासवे

अलीकडील वर्षांत शेतकरी रुंद वरंबा सरी (Broad Bed Furrow) (बीबीएफ) तंत्रज्ञानाचा (BBF Technology) अंगीकार खरीप व रब्बी हंगामात (Rabi Season) करू लागले आहेत. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत (VNMKV) कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयातील यंत्रशक्ती विभागाचे या तंत्रज्ञान प्रसारात मोलाचे योगदान आहे. याच प्रसाराचा फायदा परभणी येथील महेश रामराव शेळके यांनीही चांगल्या प्रकारे करून आपल्या शेतीची उत्पादकता वाढवली आहे.

अभ्यासपूर्ण शेती

महेश बी.ई. (संगणक) आहेत. परभणी पाथरी राष्ट्रीय महामार्गावर परभणीपासून सहा किलोमीटरवर हसनापूर आणि पेडगाव शिवारात त्यांची वडिलोपार्जित सुमारे ४० एकर शेती आहे. दोन विहिरी, दोन बोअर्स, ट्रॅक्टर, नांगर, पेरणी यंत्र, रोटाव्हेटर, फवारणी यंत्र आदी साधने आहेत. अभ्यासपूर्ण व तंत्रज्ञानाने युक्त प्रयोगशील शेती करण्यात महेश यांनी हातखंडा तयार केला आहे.

त्यांना हा वारसा दिवंगत वडील रामराव यांच्याकडूनच मिळाला. तेही बीई. (इलेक्ट्रिकल) होते. नवनवीन तंत्रज्ञानाचा अंगीकार ते करीत. शास्त्रज्ञ तसेच प्रगतिशील शेतकऱ्यांना राबता त्यांच्या शेतावर असे. महेश यांनी पदवी घेतल्यानंतर काही काळ संगणक क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनीत नोकरी केली. त्यानंतर २०१२ पासून ते पूर्णवेळ शेतीत उतरले. त्यांच्या वडिलांची शैक्षणिक संस्था आहे. तेथे ते २०१६ पासून सचिवपदी कार्यरत आहेत. सकाळच्या सत्रात हे कामकाज सांभाळून दुपारनंतर रात्रीपर्यंत शेताची संपूर्ण जबाबदारी ते सांभाळतात.

‘बीबीएफ’ तंत्राद्वारे शेती

विद्यापीठाच्या यंत्रशक्ती योजनेअंतर्गत संशोधक अभियंता डॉ. स्मिता सोलंकी यांच्या मार्गदर्शनातून महेश यांनी २०१९ मध्ये दोन एकरांत ‘बीबीएफ’ तंत्राद्वारे सोयाबीन पेरणी केली. दोन वर्षांपासून २५ ते २८ एकर सोयाबीनमध्ये त्याचा वापर ते करताहेत. कीडनाशके व जिवाणू संर्वधकाची बीजप्रक्रिया करून पेरणी होते. दोन ओळींत १८ इंच अंतर ठेवून प्रत्येक पाच ओळींनंतर सरी ठेवली जाते.

‘बीबीएफ’ तंत्राचे झालेले फायदे

-कृषी विद्यापीठाने बीबीएफ यंत्रात पेरणीसोबत उगवणीपूर्व तणनाशक फवारणीची सोयही केली आहे. त्यामुळे तणांचे वेळेवर नियंत्रण करणे व शेत तणविरहित ठेवणे शक्य झाले.

-पारंपरिक पद्धतीत एकरी ३० किलो बियाणे लागायचे. बीबीएफ पद्धतीत ते १८ ते २० किलोपर्यंत लागते. बियाणे बचतीसह त्यावरील खर्चही वाचला आहे.

-दोन ओळी तसेच दोन रोपांतील अंतर कमी-अधिक करता येते.

-गेल्या वर्षी अतिशय जास्त पाऊस झाला. सऱ्या असल्याने अतिरिक्त पाणी त्यातून वाहून गेले.

यंदा ऑगस्टमध्ये पावसाचा दीर्घ खंड पडला. त्या काळात मूलस्थानी जलसंधारणाचा फायदा मिळाला. (सऱ्यांमध्ये मुरलेल्या पाण्यामुळे जमिनीतील ओलावा टिकून राहतो.) पुढे अतिपावसात सऱ्यांवाटे पाण्याचा निचरा झाला.

-तंत्राला अभ्यासपूर्ण व्यवस्थापनाची जोड मिळाली. पूर्वी सोयाबीनचे एकरी सहा ते सात क्विंटल उत्पादन मिळायचे. आता ते १० ते १३ क्विंटलपर्यंत मिळू लागले आहे. यंदा २२ एकरांत ‘बीबीएफ’ तंत्राद्वारे सोयाबीनची पेरणी केली आहे. यंदा प्रतिकूल स्थिती असूनही एकरी ८ ते ९ क्विंटल उत्पादनाची अपेक्षा आहे.

-जमिनीची धूप थांबणे शक्य झाले. सेंद्रिय घटकांचा वेळोवेळी वापर केल्याने जमिनीची प्रत चांगली तयार केली आहे. त्यामुळे तंत्राचा पुरेपूर फायदा होतो.

-संरक्षित पाणी देण्यासाठी सऱ्यांचा उपयोग होतो.

-हरभऱ्यासारखे पीक असल्यास सऱ्यांमध्ये तुषार सिंचन संचाचे पाइप ठेवून पाणी देता येते.

-पीक लहान असताना सऱ्यांमधून ट्रॅक्टर चलित पंपाद्वारे कीडनाशकाची फवारणी वा ट्रॅक्टरद्वारे कोळपणी शक्य होते.

तंत्रज्ञानाने हरभराही यशस्वी

मागील वर्षी ट्रॅक्टरचलित खासगी कंपनीच्या ‘प्लॅन्टर’द्वारे हरभरा पिकात ‘बीबीएफ’ तंत्राचा वापर केला. दोन ओळींत १८ इंच, तर दोन झाडांत तीन इंच अंतर ठेवले. वरंब्यावर प्रत्येकी पाच ओळींनंतर सरी हीच पद्धत ठेवली. घाटे अळीच्या नियंत्रणासाठी कामगंध सापळ्यांचा वापर होतो. त्यामुळे किडीची आर्थिक नुकसान पातळी ओळखून वेळेवर उपाययोजना करता येतात.

एकूण व्यवस्थापनातून हरभऱ्यास घाटे लागलेल्या फांद्यांची संख्या जास्त मिळाली. पूर्वी एकरी ३० ते ३५ किलो बियाणे लागायचे. उत्पादकता एकरी ५ ते ६ क्विंटल होती. आता चोख व्यवस्थापनातून एकरी २० ते २२ किलो बियाणे लागते. एकरी १० ते ११ क्विंटल उत्पादन मिळते. यंदा २५ एकरांवर बीबीएफ तंत्राने हरभरा घेण्याचे नियोजन आहे. गेल्या वर्षी याच तंत्राद्वारे बियाणे बचत होऊन रब्बी ज्वारीचे उत्पादन एकरी ८ ते ९ क्विंटल मिळाले.

फळबाग व अन्य व्यवस्थापन तंत्र

-तत्कालीन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे यांच्या मार्गदर्शनाखाली फळ लागवड तंत्र विकसित. ‘पोकरा’अंतर्गत २०२१ मध्ये ‘मिडो ऑर्चर्ड’ पद्धतीने पेरूच्या लखनौ- ४९, जंबो, तैवान, ललित, जी विलास आदी जातींच्या एकूण दोन हजार झाडांची लागवड.

-नागपूर संत्रा जातीची २० बाय १० फूट अंतरावर १७०० झाडे. मोसंबीच्या न्यूसेलर आणि काटोल गोल्ड जातींच्या एकूण तेराशे झाडांची लागवड.

-मागील वर्षी सोयाबीनमध्ये सऱ्यांमध्ये फळबाग लागवड.

-दहा एकरांत ग्रॅंडनैन केळीची लागवड.

-हलक्या व मध्यम जमिनीच्या प्रकारानुसार लवकर व उशिरा येणाऱ्या हंगामी पिकांच्या वाणांची निवड. वाणांच्या वैशिष्ट्यांनुसार बीबीएक यंत्राच्या प्लेटसची निवड.

-कृषी विद्यापीठ आयोजित बीबीएफ जोडणी यंत्र प्रशिक्षणात महेश यांच्याकडील ट्रॅक्टरचालक दरवर्षी सहभागी होतात.

-तीन सालगडी. येत्या काळात पॉलिहाउस व शेडनेटची उभारणी करून कृषी पर्यटन सुरू करण्याचे नियोजन.

सौर आणि जैविक कुंपण

रानडुक्कर, हरिण आदी वन्य प्राण्यांकडून होणारे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी केळीभोवती सौर कुंपण लावले आहे. बांधावर करवंद, ॲपल बेर, चिंच, साग आदी मिळून तब्बल साडेतीन हजार झाडे लावली आहेत. त्याद्वारे जैविक कुंपण तयार झाले आहे.

सिंचन स्रोतांचे बळकटीकरण

सततच्या दुष्काळी स्थितीमुळे पाण्याची शाश्‍वत सोय करताना शेततळ्याचे रूपांतर १३० बाय १०० बाय ८० फूट क्षेत्रफळाच्या व वीस गुंठे क्षेत्रातील विहिरीत केले आहे. शेतातून वाहून जाणारे पाणी या विहिरीत सोडण्यात येते. काही कोटी लिटर पाणीसाठा आता तयार झाला आहे.

‘ॲग्रोवन’ची प्रेरणा

महेश ‘ॲग्रोवन’चे नियमित वाचक आहेत. त्यातील यशोगाथा, लेख यांच्या वाचनातूनच नवे प्रयोग, नवे तंत्रज्ञान यांची माहिती होऊन शेती प्रगत करण्याची स्फूर्ती मिळते असे ते सांगतात.

महेश शेळके, ९८९०६९१२१९

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT