भाजीपाला, फळांचे काप वाळविण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर फायदेशीर ठरतो. यासाठी सोलर टनेल ड्रायर,मिनी टनेल ड्रायर आणि सोलर कॅबिनेट ड्रायरची निर्मिती करण्यात आली आहे. लघू उद्योगासाठी हे तंत्रज्ञान फायदेशीर आहे.
बदलत्या काळानुसार जास्तीत जास्त प्रमाणात सौर ऊर्जेचा वापर करणे आवश्यक आहे. शेतीमाल वाळविण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर केल्यास स्वच्छ, धूळ विरहित सुकलेला व उच्च प्रतीचा शेतीमाल आपणास मिळू शकतो. याबाबत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे संशोधन झाले आहे. सोलर टनेल ड्रायर (सौर शुष्कक)
शेतातील भाजीपाला तसेच औषधी वनस्पती व्यवस्थित वाळविता याव्यात यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे सौर शुष्कक विकसित करण्यात आला आहे.सोलर टनेल ड्रायरमध्ये सफेद मुसळी, पान पिंपरी, हळद, मिरची, आवळा कॅण्डी, बटाटा चिप्स, हिरवा भाजीपाला हा धूळ, कचरा विरहित वाळविता येतो. यंत्राची वाळवण्याची क्षमता १०० किलो आहे. ड्रायरची आवश्यकतेनुसार विविध आकारांची संरचना करता येते. सोलर टनेल ड्रायर पूर्व-पश्चिम दिशेस बांधावा. हा सोलर टनेल ड्रायर स्थानिक पातळीवर उपलब्ध साहित्यातून तयार करता येतो. सोलर टनेल ड्रायर अर्ध दंडगोलाकार ३ x ६ मीटर आकाराचा व दोन मीटर उंचीचा आहे. २५ मि.मी. आकाराचे लोखंडी पाइप अर्ध गोलाकार आकारात वाकवून सोलर टनेल ड्रायर तयार करता येतो.सोलर टनेल ड्रायरचा जमिनीलगतचा पृष्ठभाग सिमेंट कॉंक्रीटचा बनवावा. त्यावर काळा रंग द्यावा. काळा रंग सूर्यकिरणातील जास्त उष्णता शोषून घेतो, तसेच उत्तर दिशेला आतून नॉर्थ वॉल बसविलेली आहे.ड्रायरच्या अर्धगोलाकार पाइपवर अल्ट्रा व्हायोलेट पॉलिथिलीन फिल्म (२०० मायक्रॉन जाड) झाकावी.सोलर टनेल ड्रायरमध्ये दिवसा ‘ग्रीन हाऊस इफेक्ट' मुळे आतील तापमानात बरीच वाढ होते. आतील तापमान वातावरणातील तापमानापेक्षा १५ ते २० अंश सेल्सिअस अधिक राहते. भर दुपारी ते ६० ते ६५ अंश सेल्सिअसपर्यंत पोचते.वाढलेल्या तापमानाचा उपयोग धान्य/ भाजीपाला/ फळे वाळविण्याकरिता करण्यात येतो. ड्रायरमधील गरम हवा व सूर्याची किरणे या दोन्हीद्वारा पदार्थाची आर्द्रता लवकरात लवकर कमी होते, पदार्थ सुकण्यास मदत होते.ड्रायरमध्ये अतिनील किरणे आत शिरत नसल्यामुळे पदार्थाची चव, रंग व गुणवत्ता टिकून राहते. बाहेरपेक्षा कमी कालावधीत पदार्थ सुकल्यामुळे उच्च गुणवत्तेचे पदार्थ प्राप्त होतात. मिनी टनेल ड्रायर (लहान सौर शुष्कक)
शेतीमाल सुकविण्यासाठी मिनी सोलर टनेल ड्रायर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे विकसित करण्यात आला आहे.मिनी सोलर टनेल ड्रायरचा आकार १.६ × १.० × ०.९ मी. असून हाताळण्यास सोयीचा आहे. या शुष्ककाचा वापर घरगुती स्तरावर किंवा बचत गटाच्या स्तरावर पदार्थाची गुणवत्ता राखून विविध कृषी उत्पादन वळविण्यासाठी करू शकतो. ड्रायरची पदार्थ वाळविण्याची क्षमता १० किलो आहे. यामध्ये आवळा, डाळिंबाच्या बिया तसेच लाल मिरच्या इत्यादी सुकविता येते.ड्रायरमध्ये अधिकतम तापमान ५८.२५ अंश सेल्सिअस पर्यंत जाते.पदार्थ कमी कालावधीमध्ये वळविण्यासाठी हे वाढलेले तापमान अगदी प्रभावीपणे काम करते. याची पदार्थ वळविण्याची कार्यक्षमता १८ ते २३ टक्के आहे. विविध रचनेचे सोलर ड्रायर सध्या बाजारात उपलब्ध आहेत परंतु या ड्रायरचा वापर सकाळी ९ ते संध्याकाळी ५ म्हणजेच सूर्यप्रकाश असेल तेव्हाच पदार्थ वळविण्यासाठी करण्यात येतो. सूर्य मावळल्यानंतर पदार्थ वळविण्याचे काम थांबते. दिवसातील एकूण ८ तास सूर्याची उष्णता पदार्थ वाळविण्यासाठी उपयोगात आणता येते. सूर्यापासून मिळणाऱ्या उष्णतेचा सायंकाळी ५ वाजल्यानंतर सुद्धा वापर करण्यात यावा म्हणजेच शेतीमाल वाळविण्यासाठी अतिरिक्त अवधी निर्माण करता यावा यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे सोलर कॅबिनेट ड्रायर विकसित करण्यात आले. सोलर कॅबिनेट ड्रायर यामध्ये उष्णता संग्रहक यंत्रणेचा समावेश केला आहे, या यंत्रणेमुळे सूर्याच्या किरणांनी सोलर एअर हिटर मधील थंड हवा गरम केली जाते. त्याच वेळी गरम झालेले अॅल्युमिनिअम शीट आणि खाली भरलेली गिट्टी व लोखंडी चुरा गरम होतो. गिट्टी आणि लोखंडी चुऱ्यामध्ये उष्णता साठून राहते. सूर्यांची तीव्रता कमी झाल्यावर म्हणजेच सायंकाळी ५ वाजता नंतर यामधील गरम हवा ड्रायरच्या कॅबिनेट मध्ये सोडली जाते.अशा प्रकारे ड्रायरमध्ये पाच वाजल्यानंतरही अतिरिक्त दोन तास गरम हवा पदार्थ वळविण्यासाठी उपलब्ध होते.या ड्रायरमध्ये पदार्थ वळविल्यास वेळेची बचत होते सोबतच शेतीमालाची गुणवत्ता, चव, रंग, इत्यादी पारंपारिक पद्धतीच्या तुलनेत चांगल्या प्रतीचे मिळते. - डॉ. सुकेश्नी वाणे,९४२३४७३६२९ (विषय विशेषज्ञ (कृषी अभियांत्रिकी), कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)