Agriculture Mechanization
Agriculture Mechanization Agrowon
टेक्नोवन

Agriculture Mechanization : कृषी यांत्रिकीकरण ही काळाची गरज

डॉ. तुळशीदास बास्टेवाड

भारतातील एकूण लागवडीखालील जमिनीपैकी ५१% कोरडवाहू, तर ४९% बागायती आहे. उत्पन्नामध्येही बागायती क्षेत्राचा वाटा ६०% असून, कोरडवाहू जमिनीतून फक्त ४०% उत्पन्न हाती येते. वाढत्या लोकसंख्येचा विचार केल्यास २०३० मध्ये ३५५ दशलक्ष टन एवढा अन्नधान्याची गरज असून, त्याच्या पूर्ततेसाठी ४० किलोवॉट प्रति हेक्टर इतक्या कृषिशक्तीचा वापर करावा लागेल. त्यासाठी विविध यंत्राचा वापर वाढवण्याची गरज आहे. (Agriculture Technology)

कृषी यांत्रिकीकरण म्हणजे काय?

शेतीतील कामे वेळेवर, कमी कष्टात व बियाणे, खते, रसायने इ. निविष्ठांचा योग्य व कार्यक्षम वापर करण्याच्या उद्देशाने अवजारे व यंत्राचा वापर म्हणजेच कृषी यांत्रिकीकरण होय. यामुळे उत्पादन खर्चात ३० ते ४० टक्के बचत होते. तर वेळच्या वेळी कामे झाल्यामुळे उत्पादनात १५ ते २० टक्के वाढ होते.

फायदे

१) कृषी औजारामुळे शेतीतील कामे वेळेवर व योग्यरीत्या पार पडतात.

२) जमीन, पाणी, बियाणे व खते, रसायने, मनुष्यबळ यांचा कार्यक्षम वापर होतो. उदा. सुधारित पेरणी यंत्राने पेरणी केल्यास बियाणाचे

प्रमाण योग्य ठेवतानाच दोन रोपांतील अंतर योग्य राहते. त्याचा फायदा वाढीमध्ये होतो.

३) उत्पादनात १५ ते ४०% एवढी वाढ होऊन खर्चात बचत होते. परिणामी निव्वळ नफ्यामध्ये वाढ होते.

४) मनुष्यबळ कमी लागते.

५) कष्ट कमी होतात. उदा. ट्रॅक्टरचलित नांगरामुळे नांगरणीतील कष्ट कमी झाले आहेत.. पारंपरिक नांगरणीमध्ये बैलापाठोपाठ शेतकऱ्याला एक हेक्टरसाठी ३० सेंमी नांगरामागे ६६ किमी एवढे चालावे लागते.

६) प्रत्यक्ष शेती व कष्टाच्या कामातून सवलत मिळत असल्यामुळे चालक, कृषी औजारांची दुरुस्ती व चालवणे यात कुशल कामगारांना रोजगाराची उपलब्धता वाढते.

इतके फायदे असतानाही भारतीय शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचे प्रमाण कमी असण्याची काही कारणे -

१) अल्पभूधारक शेतकऱ्यांचे अधिक प्रमाण. योग्य आकाराच्या यंत्राचा अभाव.

२) शेतकऱ्याची कमी क्रयशक्ती.

३) तांत्रिक माहितीचा अभाव.

४) निगा व दुरुस्तीच्या सोयीचा अभाव.

गेल्या काही पंचवार्षिक योजनांपासून शासकीय स्तर, कृषी विभाग, कृषी विद्यापीठ, स्वयंसेवी संस्था यांच्या प्रयत्नांमुळे आजमितीस मशागतीमध्ये ४५%, पेरणीमध्ये ३५%, मळणी ५५% तर पीक संरक्षणात ३५% इतके यांत्रिकीकरण झाले आहे.

शेतीतील विविध कामासाठी सुधारित कृषी यंत्रे व औजारे उपलब्ध आहेत

१) मशागतीसाठी औजारे ः ट्रॅक्टर चलित नांगर, कल्टिव्हेटर, पलटी नांगर, तव्याचा नांगर, सब सॉयलर, रिजर, पॉवर हॅरो, डिस्क हॅरो , रोटाव्हेटर, पोस्ट होल डिगर इ

२) पेरणीसाठी व लागवडीसाठी ः बी व खत पेरणीयंत्र, टोकण यंत्र, बी बी एफ यंत्र,न्युमॅटिक पेरणी यंत्र, रोपे पुनर्लागवड यंत्र इ.

३) आंतरमशागतीसाठी औजारे ः खुरपी, चाकाचे कोळपे, खत कोळपे, खत पसरणी यंत्र, पॉवर विडर इ.

४) कापणी व मळणीसाठी औजारे ः विळे, रिपर, मळणी यंत्र, कम्बाईन हार्वेस्टर, मिनी हार्वेस्टर इ.

५) पीक संरक्षणासाठी औजारे ः फवारणी यंत्रे, धुरळणी यंत्र, ट्रॅक्टर चलित फवारणी यंत्रे, हाय ग्राउंड क्लिअरन्स फवारणी यंत्रे इ.

६) पीक अवशेषांच्या व्यवस्थापनासाठी औजारे ः मल्चर, श्रेडर, हे रेक, बेलर इ.

भारतात कृषी यांत्रिकीकरणाचा स्तर वाढविण्याचा असेल तर सुधारित कृषी औजारे व यंत्रे यांच्या वापराशिवाय पर्याय नाही

तक्ता १

अ. क्र.) महाराष्ट्रातील शेतकरी प्रकार --- जमीन धारणा --- टक्केवारी

१) अल्प भूधारक --- १-२ हेक्टर --- २४ ७%

२) छोटे शेतकरी --- २-४ हेक्टर --- २४ ७%

३) मध्यम शेतकरी --- ४-१० हेक्टर --- २२ ८०%

४) मोठे शेतकरी --- १० हेक्टर --- ११ ३०%

तक्ता २

शेतीकामनिहाय यांत्रिकीकरण टक्केवारी

मशागत ः ६८%

पेरणी ः २६%

मळणी ः ९०%

काढणी ः १५ २०%

फवारणी ः ९२%

तक्ता ३

महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रातील शक्ती पुरवठा स्रोत

शेत कामगार ः २७%

प्राणी शक्ती ः १०%

ट्रॅक्टर + पॉवर टिलर ः ४२%

विद्युत मोटार + डिझेल इंजिन ः २१%

शक्ती ः ० ८०%

आज भारतीय शेतीमध्ये सरासरी २.७४ किलोवॉट/हेक्टर एवढी शक्ती उपलब्ध आहे. पंजाब, हरियाना व उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये सरासरी उपलब्ध ऊर्जेपेक्षा अधिक ऊर्जा उपलब्ध आहे. महाराष्ट्राच्या शेतीमध्ये उपलब्ध ऊर्जा ही राष्ट्रीय उपलब्ध सरासरी ऊर्जेपेक्षा ही खुपच कमी (म्हणजे १.१८ किलोवॉट प्रति हेक्टर) इतकीच आहे.

पीक उत्पादकता व उपलब्ध ऊर्जा यांचा समन्वय

जितकी शेतीमध्ये ऊर्जेचा वापर जास्त, त्या प्रमाणात उत्पादनात वाढ होते. पंजाब, हरियाना व उत्तर प्रदेश या राज्याची हेक्टरी उत्पादकता जास्त असण्याचे हे एक कारण मानले जाते. (तक्ता ४

तक्ता ४ ः

उपलब्ध ऊर्जा (किलोवॉट/हेक्टर) --- उत्पादन (टन/हेक्टर)

०.१० --- ०.८

०.१२ --- १.०

०.१८ --- १.५

०.२८ --- २.०

०.४० --- २.५

०.६५ --- ३.०

१.०३ --- ४.०

१.३१ --- ५.०

१.५४ --- ६.०

कृषी क्षेत्रात ऊर्जेची उपलब्धता वाढवण्यासाठी शेतीमध्ये ट्रॅक्टर, स्वयंचलित कृषी औजारे, पॉवर टिलर, इलेक्ट्रिकल मोटार, डिझेल इंजिन यांचा वापर वाढवण्याची गरज आहे. त्यामुळे कामे वेळच्या वेळी होऊन उत्पादनामध्ये वाढीच्या शक्यता वाढतात.

कृषी यांत्रिकीकरण व रोजगार

शेतीच्या विविध कामांचे यांत्रिकीकरण हा तसा वादाचा मुद्दा राहिलेला आहे. सुरुवातीला यांत्रिकीकरणामुळे शेतीतील मजुरांची गरज कमी होईल. त्यांच्यामध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढून त्यांचे विस्थापन होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र शेती कामातील मजुरांचे कष्ट वाचण्यासाठीही यांत्रिकीकरण महत्त्वाचे ठरत आहे.

शेतीचे यांत्रिकीकरण हे केवळ ट्रॅक्टरच्या वापराची जोडले जाते. मात्र या संज्ञेची व्याप्ती त्यापेक्षाही मोठी आहे. शेतीतील विविध कामांच्या उपलब्धतेसाठी मनुष्यचलित, पशुधनचलित आणि ट्रॅक्टरचलित अवजारांसोबतच स्वयंचलित अशा अनेक श्रेणी उपलब्ध होत आहेत. कृषी यांत्रिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये अशा सर्व यांत्रिकी साधनांचा विकास, वापर आणि व्यवस्थापन यांचा समावेश होतो. त्यामध्ये वापरकर्त्याच्या गरजेवर आधारित यंत्राची निर्मितीला प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे.

भारत पर्यायाने महाराष्ट्रातील कृषी यांत्रिकीकरणाची वाटचालीमध्ये सुधारित औजारांचा वापर आणि अधिक कृषिशक्तीचा पुरवठा या दुहेरी नितीवर भर दिला जातो. त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळ, पशुबल आणि यांत्रिक शक्ती यांचे व्यावहारिक मिश्रण याला प्राधान्य दिले जाते. या उलट पाश्चात्त्य देशांमध्ये कृषी यांत्रिकीकरणाचा मूळ हेतू हा शेतीतून मनुष्यबळ कमी करून औद्योगिक क्षेत्रात गुंतविणे हा होता. योग्य दिशेने सुरू असलेल्या यांत्रिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे कृषी उत्पादन वाढीबरोबरच उत्पादन खर्च कमी करणे, पिकांचे नुकसान कमी होणे या गोष्टी शक्य झाल्या. तसेच कृषी यांत्रिकीकरणामुळे बेरोजगारी वाढण्याची शक्यता पंजाब, हरियाना अशा राज्याच्या उदाहरणावरून व्यर्थ ठरल्याचे स्पष्ट होत आहे. उलट यांत्रिकीकरणामुळे शेतकऱ्यांची मिळकत आणि ग्रामीण रोजगारात वाढ दिसून आली.

काही ठळक मुद्दे ः

१ शेतीतील उत्पन्नवाढीची शक्यता निर्माण होते

अ) यंत्राचा पुढील कामात वापर केल्याने उत्पन्नात होणारी वाढ

पूर्वमशागत ः ५ ते १० टक्के

पेरणी ः १० ते १५ टक्के

आंतरमशागत ः १५ ते २० टक्के

पीकसंरक्षण ः १५ ते २० टक्के

कापणी ः ५ टक्के

मळणी ः ५ टक्के

ब) पीक उत्पादनाचा खर्च कमी होतो यांत्रिकीकरणाच्या वापरामुळे निविष्ठाची बचत होते व यामुळे पीक उत्पादनाचा खर्च कमी होतो.

क) पिकाचे नुकसान कमी करून होणारी बचत

योग्यवेळी कापणी ः ५ ते १० टक्के

हाताळणी व वाहतूक ः १० टक्के

साठवण ः ५ ते ७ टक्के

ड) रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होण्याची शक्यता -भारतामध्ये प्रतिवर्षी शेतीच्या यांत्रिकीकरणामध्ये वृद्धी होत असून त्यामुळे लोकांना अतिरिक्त रोजगार उपलब्ध होत आहे.

-पिकाची सघनता आणि उत्पन्नात वाढ.

-भाडेपट्टीवर औजारे / ट्रॅक्टर देणे.

-विक्री, देखभाल व दुरुस्ती ट्रॅक्टर पंप/मशिनरी.

-ट्रॅक्टर/औजारांची निर्मिती

-डिझेल पंपसेट

-मळणीयंत्र

डॉ. तुळशीदास बास्टेवाड

(अखिल भारतीय समन्वित कृषी अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्प, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Delhi Farmers' protest : भाजपच्या उमेदवारांविरोधात पंजाबमध्ये शेतकऱ्यांचा रोष वाढला; एसकेएमचा विरोध कायम

Lok Sabha Constituency : कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ लाख ५० हजार मतदारांचा कौल कोणाला? मतदान केंद्रे सज्ज

Fire in Nainital : उत्तराखंडच्या जंगलातील आग पोहचली शेताच्या बांधावर, एका महिलेचा होरपळून मृत्यू

Animal Ear Tagging : ...अन्यथा भरपाई अन् अनुदान नाही

Sunburn Crop : कोवळी रोपे वाचविण्यासाठी शेतकरी सरसावला

SCROLL FOR NEXT