Farm Pond Subsidy : शेततळ्याचे अनुदान वाटप पारदर्शक होण्यासाठी काढली जाणारी संगणकीय सोडत (लॉटरी) पद्धत उत्तम आहे. सोडतीत नाव निघाले की शेतकऱ्याला त्याच्या भ्रमणध्वनीवर लघुसंदेशाद्वारे (एसएमएस) निवड झाल्याचे कळविले जाते.
मात्र अर्ज करूनही सोडतीत नाव आले नसल्यास अशा शेतकऱ्याला प्रतीक्षायादीवर ठेवले जाते. ही यादी पुढील वर्षीच्या सोडतीकरिता वापरली जाते. त्यामुळे एकदा अर्ज केल्यानंतर पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नसते.
यंदाच्या वर्षात १५ हजार शेततळ्यांना अनुदान
राज्यात यंदाच्या वर्षात १५ हजार नव्या शेततळ्यांना अनुदान देण्याची तयारी कृषी खात्याने केली आहे. अनुदानासाठी आठ वेगवेगळ्या आकारमानाची शेततळी ठरविण्यात आली आहेत. नेमके कोणत्या आकाराचे तळे निवडावे याविषयी आधी शेतकऱ्यांमध्ये संभ्रम होत असे.
मात्र आता तळ्याची निवड करण्यासाठी कृषी कर्मचारी मार्गदर्शन करणार आहेत. प्रत्येक तळ्याला आकारमानानुसार किमान १८ हजारांपासून ते कमाल ७५ हजारांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे. आधी ऑनलाइन अर्ज भरतानाही क्लिष्टपणा होता. त्यामुळे गोंधळ उडत असे. ही अर्जप्रक्रिया सुटसुटीत करण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत.
त्यासाठी कृषी आयुक्तालयाच्या मृद्संधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन विभागाचे संचालक रवींद्र भोसले, सहसंचालक पांडुरंग शेळके, कृषी उपसंचालक प्रवीण कांबळे, कृषी अधिकारी संगीता बोकाडे, कृषी पर्यवेक्षक पुरुषोत्तम कुगावकर या अधिकाऱ्यांचा गट परिश्रम घेतो आहे. त्यामुळे लवकरच ऑनलाइन व्यवस्था आणखी सोपी होणार आहे.
‘ते’ ५० हजार अर्ज ग्राह्य धरणार
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, राष्ट्रीय कृषी विकास योजना, एकात्मिक फलोत्पादन अभियान अशा विविध योजनांमधून याआधी शेततळ्यांना अनुदान मिळण्याचे पर्याय देण्यात आले होते. परंतु अर्ज भरताना यातील कोणता उपघटक निवडावा हे शेतकऱ्यांच्या लक्षात येत नव्हते.
आता सर्व उपघटक मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेच्या कक्षेत आणले गेले आहेत. यापूर्वी वेगळा उपघटक निवडला जात होता. त्यामुळे मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेकडे पुरेसे अर्ज येत नव्हते.
यापूर्वी असे चुकून दुसऱ्या उपघटकांकडे गेलेले किमान ५० हजार अर्ज आता पुन्हा या योजनेसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. असे प्रलंबित अर्ज नव्या सोडतीकरिता ग्राह्य करण्याकरिता महाआयटीची यंत्रणा तांत्रिक सुधारणा करीत आहे.
इनलेट, आउटलेटसह शेततळे म्हणजे नेमके काय?
१) शेततळ्याच्या जवळील नदी, नाले, ओहोळ यातून वाहणारे पावसाचे पाणी शेततळ्याच्या आत घेऊन (इनलेट) जादा झालेले पाणी बाहेर सोडण्याची (आउटलेट) सुविधा असलेल्या शेततळ्याला इनलेट, आउटलेटसह शेततळे असे म्हणतात.
२) दुसरे शेततळे साध्या प्रकारचे असते. त्याला इनलेट व आउटलेट नसते. त्यात पावसाच्या पाण्याऐवजी विहीर किंवा कूपनलिका अशा
स्रोतातून उपसून पाणी आणले जाते. अशा तळ्यांना इनलेट-आउटलेट विरहित शेततळे असे म्हणतात.
३) या दोन्ही प्रकारच्या शेततळ्यांसाठी भौगोलिक स्थितीनुसार खर्चात फरक पडतो. त्यामुळे अनुदानदेखील वेगवेगळे मिळते. (आकारमानानुसार मिळणारे अनुदानाबाबत सोबतचे दोन तक्ते काळजीपूर्वक पाहावेत.) त्यामुळे शेतकऱ्यांनी बारकाईने भौगोलिक स्थितीचा विचार करून आवश्यक आकारमानाचे शेततळे घेण्याची गरज आहे. त्यासाठी कृषी कर्मचाऱ्याचे मार्गदर्शन घ्यावे.
अर्ज करण्यासाठी आधार क्रमांक महत्त्वाचा
१) शेतकऱ्याने प्रथम महाडीबीटी संकेतस्थळ https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login उघडावे. त्यानंतर आपले सरकार महाडीबीटी असे पान उघडते.
२) शेतकऱ्याने सर्व प्रथम आधार कार्ड हाताशी घ्यावे. शेतकरी प्रथमच नोंदणी करीत असेल, तर आधार क्रमांकाचा वापर करून वरील संकेतस्थळावर नवीन अर्जदार नोंदणी येथे क्लिक करावे. त्यानंतर शेतकऱ्याने आपले नाव भरावे. तसेच वापरकर्ता आयडी व पासवर्ड दिलेल्या सूचनेनुसार तयार करावा. त्यानंतर स्वतःचा भ्रमणध्वनी क्रमांक नमुद करून तो सत्यापित (व्हेरिफाय) करावा. ई-मेल असल्यास तोदेखील सत्यापित करून घ्यावा.
३) पूर्वी नोंदणी केलेली असल्यास अर्जदार सरळपणे अर्जदार लॉगइन या चौकटीद्वारे महाडीबीटी संकेतस्थळावर लॉगइन करू शकतात. अशा प्रकारे नोंदणी पूर्ण झाल्यानंतर संकेतस्थळावर अर्जदार लॉगइन या हिरव्या चौकटीवर क्लिक करावे. तेथे ‘वापरकर्ता आयडी’ व ‘आधार क्रमांक’ असे दोन पर्याय दिलेले आहेत.
कोणताही एक पर्याय निवडून लॉगइन करावे. समजा आधार क्रमांक हा पर्याय निवडल्यास आधारक्रमांक समाविष्ट केल्यानंतर त्यास संलग्न असलेल्या भ्रमणध्वनीवर आलेला ओटीपी भरावा व त्यानंतर पुढील बटणावर क्लिक करावे. त्यानंतर व्हेरिफिकेशन सुरू होते व लॉगिन प्रक्रिया पूर्ण होते.
ती झाल्यानंतर पुढील पान प्रोफाइल स्थिती असे उघडते. ही प्रोफाइलची चौकट क्लिक करून तेथे माहिती बिनचूक व परिपूर्ण भरावी. त्यानंतर कृषी विभागासमोरील अर्ज करा या शब्दावर क्लिक करावे.
४) तेथे ‘एक शेतकरी एक अर्ज’ अशी सूचना येते. सर्वप्रथम या मुखपृष्ठावर डाव्या बाजूला वापरकर्ता पुस्तिका लिंक दिलेली आहे. ती उघडून सर्व पुस्तिका काळजीपूर्वक वाचावी. पुस्तिकेत दिलेल्या सूचनेनुसार शेतकरी त्याच्या पसंतीच्या बाबी निवडून कृषी विभागाच्या योजनांमधील विविध घटकांना अर्ज करू शकतो.
५) मुखपृष्ठावर मध्यभागी चार चौकटी दिसतील. कृषी यांत्रिकीकरण, सिंचन साधने व सुविधा, बियाणे, कीडनाशक व खते तसेच फलोत्पादन या अंतर्गत योजनांमधील घटकांसाठी शेतकऱ्याला एकाच वेळी अर्ज करता येतो.
६) संकेतस्थळावर अर्जदाराने लॉगइन केल्यानंतर मुख्यपृष्ठावर शेततळ्याचा लाभ घेण्यासाठी सिंचन साधने व सुविधा अशी चौकट दिसते. त्यासमोरील बाबी निवडा यावर क्लिक करावे. त्यानंतर सिंचन साधने व सुविधा असे नवे पान उघडते. त्यामध्ये शेतकऱ्याने तालुका, गाव नमूद करावे.
त्यानंतर मुख्य घटक या चौकटीवर क्लिक करावे व पुन्हा सिंचन साधने व सुविधा निवड करावी. त्यानंतर बाब ही चौकट क्लिक करावी. त्यात वैयक्तिक शेततळे ही बाब निवडावी. त्यानंतरच्या चौकटीत शेततळे जेथे खोदावयाचे आहे त्या शेतजमिनीचा सर्वे क्रमांक/गट क्रमांक काळजीपूर्वक नमुद करावा. त्यानंतर उपघटक क्लिक करावे. उपघटकात इनलेट आउटलेटसहित व इनलेट आउटलेट विरहित असे दोन पर्याय येतील.
त्यातील ठरवलेला एक पर्याय निवडावा. (हा पर्याय निवडण्यापूर्वी शेतकऱ्याने आपल्या गावातील कृषी सहायकाचे मार्गदर्शन घेणे उत्तम ठरेल.) त्या पुढील चौकटीमध्ये निश्चित केल्यानुसार शेततळ्याचे आकारमान निवडावे. (आकारमानदेखील कृषी सहायकाच्या सल्लाने नमूद केल्यास उत्तम ठरू शकते.)
७) सर्व माहिती भरून झाल्यानंतर संमतीच्या ओळीसमोरील चौकोनात क्लिक करावे. सर्वांत खाली असलेल्या हिरव्या रंगाच्या जतन करा या चौकटीवर क्लिक करावे. क्लिक करताच ‘घटकाचा यशस्वीपणे अर्जात समावेश केला आहे. आपणास आणखी घटक निवडायचे आहेत का?’ अशी चौकट येते.
निवडायचे असल्यास येस वर क्लिक करावे आणि आधीच्या पद्धतीनुसार पुन्हा व्यवस्थित माहिती भरावी. समजा निवडायचे नसल्यास नो वर क्लिक करावे आणि मेनूवर जा या हिरव्या चौकटीवर क्लिक करावे. त्यानंतर पुन्हा मुख्य पान उघडते. तेथे अर्ज सादर करा या निळ्या रंगातील चौकटीवर क्लिक करावे. त्यानंतर आपण निवडलेल्या बाबी हे पान उघडेल. त्यात ‘आपण आपल्या पसंतीच्या सर्व बाबी निवडल्याची खातरजमा करा.
८) अर्जात आणखी काही बाबींचा समावेश करायचा असल्यास मेनूवर जा या बटनावर क्लिक करा, अन्यथा अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करून अर्ज सादर करा, अशा आशयाची चौकट येईल. अजून काही बाबींचा समावेश करायचा नसल्यास ओके क्लिक करावे. त्यानंतर आपण निवडलेल्या बाबी हे पान उघडेल.
तेथे पहा या निळ्या चौकटीवर क्लिक करावे. क्लिक केल्यानंतर आपण निवडलेल्या सर्व बाबी दिसतील. त्या पानात शेवटच्या कॉलममध्ये बाबनिहाय प्राधान्यक्रम द्यायचा आहे. त्यानंतर अटी शर्ती मान्य असल्याच्या चौकटीवर क्लिक करावे.
त्यानंतर हिरव्या रंगातील अर्ज सादर करा या चौकटीवर क्लिक करावे. क्लिक करताच आपला अर्ज शेततळ्यासह ज्या ज्या घटकांसाठी मागणी केली आहे, त्या घटकाच्या सोडतीसाठी सादर करण्याची प्रक्रिया अर्जदाराच्या वतीने पूर्ण होते.
नाममात्र शुल्कामध्ये करता येतो अर्ज
१) शेतकऱ्याने अर्जाची सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर २३.६० रुपये शुल्क भरावे लागते. अर्थात, या व्यतिरिक्त जीएसटी व बॅंक शुल्क वेगळे आकारले जाते. त्यानंतर अर्जाची माहिती व स्थिती आपल्या लॉगइनला दिसते. अर्जाची प्रलंबित फी, छाननी अंतर्गत अर्ज, मंजूर अर्ज, नाकारलेले अर्ज अशा बाबी या पानावर दिसतात. तसेच काही बाबी रद्द केल्यास त्याची माहिती मी रद्द केलेल्या बाबी या चौकटीत क्लिक केल्यावर दिसते.
२) ऑनलाइन शुल्क भरल्यानंतर शेवटच्या मुदतीपर्यंत म्हणजे सोडतीच्या दिनांकापर्यंत शेतकऱ्यांना त्यांच्या अर्जात विनाशुल्क बदल करता येतात. मात्र मुदत संपल्यानंतर कोणताही बदल करता येत नाही.
शेततळ्यासाठी ‘ही’ कागदपत्रे अपलोड करणे महत्त्वाचे
१) शेततळ्यासाठी अर्ज केल्यानंतर कृषी विभागाकडून सोडत काढली जाते. ही सोडत ऑनलाइन असून, त्यात कोणतीही वशिलेबाजी किंवा मानवी हस्तक्षेप होत नाही. वेळोवेळी आवश्यकतेनुसार संगणकीय सोडत काढली जाते.
२) सोडतीत शेतकऱ्याचा अर्ज निवडला गेल्यास त्याच्या नोंदणीकृत भ्रमणध्वनीवर लघुसंदेश पाठवला जातो. संदेश मिळताच शेतकऱ्याने जमिनीचा सातबारा उतारा, आठ-अ उतारा, आधार कार्डाची झेरॉक्स प्रत, बॅंक पासबुक झेरॉक्स प्रत, हमीपत्र,जातीचा दाखला ही महत्त्वाची कागदपत्रे संकेतस्थळावर स्कॅन करून पीडीएफमध्ये तातडीने अपलोड करायची आहेत. कागदपत्रे अपलोड न केल्यास निवड रद्द होते.
३) शेतकऱ्याला पाठवलेल्या भ्रमणध्वनी संदेशात सांगितलेल्या कागदपत्रांच्या व्यतिरिक्त कोणताही कागद शेतकऱ्याला मागू नये, अशा स्पष्ट सूचना राज्य शासनाने दिलेल्या आहेत.
काही तक्रार असल्यास....
१) शेततळ्यासाठी अर्ज केल्यानंतर प्रत्येक टप्प्यावर नेमके काय करायचे याच्या सूचना शेतकऱ्याला भ्रमणध्वनी संदेशात मिळत जातील. मात्र तरीही अर्ज भरताना काही अडचणी असल्यास महाडीबीटी संकेतस्थळावर ‘तक्रारी/सूचना’ अशी चौकट दिसते. तेथे क्लिक करावे. आपली तक्रार, सूचना नोंदवावी. या तक्रारी सोडविण्याची जबाबदारी महाआयटीच्या यंत्रणेला दिलेली आहे.
शेततळ्यासाठी अर्ज दाखल झाल्यावर पुढील कार्यवाही
१) शेतकऱ्याने अपलोड केलेल्या कागदपत्रांची कृषी सहायकाकडून ऑनलाइन छाननी होते. त्यानंतर कृषी सहायक शेतकऱ्याशी संपर्क साधतो. सहायक स्वतः तुमच्या शेतात येतो. तेथे तो जागेची पाहणी करतो. शेततळे नेमके कसे खोदायचे, किती खर्च येईल याचे अंदाजपत्रक तो तयार करतो. सध्या अंदाजपत्रक ऑफलाइन तयार होते व ही कागदपत्रे ऑफलाइन पद्धतीने सहायकाकडून मंडळ कृषी अधिकाऱ्याकडे नेली जातात.
२) त्यानंतर हा प्रस्ताव ऑफलाइन तपासून मंडळ कृषी अधिकारी त्याला तांत्रिक मान्यता देतात. त्यानंतर मंडळ कृषी अधिकाऱ्यामार्फत हा प्रस्ताव तालुका कृषी अधिकाऱ्याकडे जातो. तालुका कृषी अधिकारी त्याला प्रशासकीय मान्यता देतात. (ही प्रक्रिया ऑनलाइन करण्याच्या हालचाली सध्या कृषी आयुक्तालयात सुरू आहेत.)
३) एकदा प्रशासकीय मान्यता दिली की शेतकऱ्याला शेततळ्याचे काम सुरू करण्याचे आदेश (पूर्वसंमतिपत्र/ कार्यारंभ आदेश) तालुका कृषी अधिकारी ऑनलाइन देतात. तसा लघुसंदेश शेतकऱ्याला पाठवला जातो.
कृषी सहायक करतात जागेची आखणी
१) शेतकऱ्याला शेततळ्याचे काम सुरू करण्याचे पूर्वसंमतिपत्र तालुका कृषी अधिकाऱ्याने दिल्यानंतर लगेचच शेतकऱ्याला आपल्याला हवे तसे शेततळे खोदता येत नाही. त्यात तांत्रिक चूक होऊ शकते. त्यामुळे मंजूर आकारमानाप्रमाणे शेततळ्याची आखणी करून देण्याची जबाबदारी कृषी सहायकांवर देण्यात आलेली आहे.
२) आखणी करून दिल्यानंतर प्रत्यक्ष तळे कसे खोदावे याचे पूर्ण मार्गदर्शन करण्याची जबाबदारी शासनाने अधिकृतपणे कृषी पर्यवेक्षक व मंडळ कृषी अधिकाऱ्यावर सोपविली आहे.
तीन महिन्यांत खोदावे लागते शेततळे
१) पूर्वसंमतीनंतर प्रत्यक्ष तळे कसे खोदावे याचे मार्गदर्शन पर्यवेक्षक व मंडळ कृषी अधिकाऱ्याकडून मिळाल्यानंतर तीन महिन्यांत शेतकऱ्याला शेततळे खोदावे लागते. खोदकाम पूर्ण होताच शेतकऱ्याला संकेतस्थळावर आपल्या लॉगइनमधून काम पूर्णत्वाचा दाखला (असा दाखला कृषी विभागाच्या नमुन्यात शेतकऱ्याने स्वतःच्या हस्ताक्षरात तयार केला तरी चालतो) अपलोड करायचा आहे. त्यातच अनुदान मागणी करायची आहे.
२) काम पूर्णत्वाचा दाखला व अनुदान मागणी अर्ज ऑनलाइन प्राप्त होताच कृषी पर्यवेक्षक पुन्हा शेतावर येतात. तळ्याची मोका तपासणी करतात. याच तपासणीत भौगोलिक स्थान निश्चिती (जिओ टॅगिंग) केली जाते. त्यानंतर पर्यवेक्षक मोका तपासणी अहवाल, अनुदान निश्चितीसह मापनपुस्तिका व जिओ टॅगिंग छायाचित्रे ऑनलाइन अपलोड करतात. हा प्रस्ताव पुढे मंडळ कृषी अधिकाऱ्याकडे येतो.
३) पर्यवेक्षकाने अपलोड केलेले मोका तपासणी अहवाल, अनुदान निश्चितीसह मापनपुस्तिका याची छाननी करून अनुदानाची शिफारस करण्याचे काम मंडळ अधिकारी करतो.
४) तालुका कृषी अधिकाऱ्याकडे हा प्रस्ताव ऑनलाइन येतो. तेथे पुन्हा छाननी केली जाते. तालुका अधिकारी अनुदानासाठी अंतिम शिफारस पुढे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्याकडे (एसएओ) करतो. एसएओला हा प्रस्ताव योग्य वाटल्यास शेतकऱ्याच्या आधार संलग्न बॅंक खात्यात शेततळ्याच्या अनुदानाची रक्कम जमा केली जाते. या योजनेला गती देण्यासाठी काही टप्पे अधिक सुटसुटीत करण्याची प्रक्रिया सध्या कृषी आयुक्तालयामार्फत सुरू आहे.
मर्यादेपेक्षा जास्त खोदाई झाल्यास खर्च शेतकऱ्याचा
१) कमाल अनुदान रक्कम ७५ हजार रुपयांपर्यंत मिळत असून, त्यापुढील खर्च शेतकऱ्याला स्वतः करावा लागतो. कारण शेततळ्याची खोदाई ही शासनाने ठरवून दिलेल्या आठ प्रकारच्या आकारमानानुसारच करावी लागते.
२) मात्र गरजेनुसार काही वेळा शेतकरी तळ्याची खोदाई जास्त करतात. त्यामुळे अशी जास्तीची खोदाई अनुदानाच्या कक्षेत येत नाही. कितीही खोदाई झाली तरी शेतकऱ्याला पूर्वसंमतिपत्रात नमूद केलेल्या आकारमानानुसार मिळेलच असे नाही. कारण प्रत्यक्षात झालेल्या कामाच्या मोजमापानुसार अनुदान मिळते.
यंत्राद्वारे इनलेट- आउटलेटसह शेततळ्याची खोदाई (रक्कम रुपये)
बाजू उतार (१ः१) - बाजू उतार (१ः१.५)
आकारमान (मीटरमध्ये) - - सर्वसाधारण क्षेत्र - आदिवासी उपयोजना व डोंगराळ क्षेत्र- सर्वसाधारण क्षेत्र - आदिवासी उपयोजना व डोंगराळ क्षेत्र-
१५×१५×३- २३,८८१- २६,०१० -१९,६९३- २१,४९२
२०×१५×३ - ३२,०३४- ३४,८२१ - २६,७९९- २९,१७४
२०×२०×३- ४३,६७८ -४७,३९८ -३७,३९५- ४०,६२१
२५×२०×३- ५५,३२१- ५९,९७४- ४७,९९१- ५२,०६८
२५×२५×३- ७०,४५५- ७५,०००- ६२,०७८- ६७,२८०
३०×२५×३- ७५,०००- ७५,०००- ७५,०००- ७५,०००
३०×३०×३- ७५,०००- ७५,०००- ७५,०००- ७५,०००
३४×३४×३- ७५,०००- ७५,०००- ७५,०००- ७५,०००
यंत्राद्वारे इनलेट- आउटलेट विरहित शेततळ्याची खोदाई (रक्कम रुपये)
बाजू उतार (१ः१) बाजू उतार (१ः१.५) (काळ्या मातीमध्ये)
आकारमान (मीटरमध्ये) - सर्वसाधारण क्षेत्र - आदिवासी उपयोजना व डोंगराळ क्षेत्र- सर्वसाधारण क्षेत्र - आदिवासी उपयोजना व डोंगराळ क्षेत्र-
१५×१५×३- १८,६२१- २०,२३५- १४,४३३- १५,७१७
२०×१५×३- २६,७७४- २९,०४६- २१,५३९- २३,३९९
२०×२०×३- ३८,४१७- ४१,६२३- ३२,१३५- ३४,८४६
२५×२०×३- ५०,०६१- ५४,१९९- ४२,७३१- ४६,२९३
२५×२५×३- ६५,१९४- ७०,५४०- ५६,८१८- ६१,५०५
३०×२५×३- ७५,०००- ७५,०००- ७०,९०४- ७५,०००
३०×३०×३- ७५,०००- ७५,०००- ७५,०००- ७५,०००
३४×३४×३- ७५,०००- ७५,०००- ७५,०००- ७५,०००
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.