Mumbai News : राज्यात पुढील तीन वर्षांसाठी पंतप्रधान पीक विमा योजना राबविण्यासाठी ११ विमा कंपन्या निश्चित करण्यात आल्या आहेत. यंदापासून एक रुपयात पीक विमा काढता येईल. तर काढणीपश्चात नुकसानीसाठी ३० टक्के तंत्रज्ञान आधारित भारांकन निश्चित केले जाईल.
केंद्र सरकारने यंदापासून पीक विमा योजना राबविण्यासाठी नवीन कार्यपद्धती निश्चित केली आहे. तसे निर्देश राज्य सरकारला देण्यात आले होते. मागील वर्षीपासून राज्यात ८०: ११० म्हणजेच नफा-तोटा हस्तांतरण मॉडेलनुसार पीक विमा योजना राबविण्यात येते.
ही योजना बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक असून भाडेपट्टीने शेती करणाऱ्यांसाठी भाडेकरार आवश्यक आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता खरीप हंगामासाठी दोन टक्के, रब्बीसाठी दीड तर खरीप आणि रब्बी असा एकत्र पाच टक्के राहील. यंदापासून सर्वसमावेशक पीक विमा योजनेंतर्गत केवळ एक रुपया भरून पीक विमा पोर्टलवर नोंदणी करावी लागेल.
या योजनेंतर्गत निश्चित करण्यात आलेला पीकनिहाय प्रतिहेक्टरी विमा हप्ता दर, तसेच उर्वरित फरक हा सर्वसाधरण विमा हप्ता अनुदान समजून राज्य सरकार भरणार आहे. या योजनेसाठी या आधी प्रत्येक वर्षी विमा कंपन्यांसाठी निविदा प्रक्रिया राबविली जात होती. या वर्षीपासून केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुढील तीन वर्षांसाठी ही योजना राबविण्यात येईल.
यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. यासाठी तीन वेळा मुदतवाढही देण्यात आली. त्यानंतर ११ कंपन्या निश्चित केल्या आहेत. खरीप हंगामासाठी ३१ जुलैपर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा पोर्टलवर अर्ज करावा लागेल. या योजनेंतर्गत अन्नधान्य पिके, गळीत धान्य पिके व नगदी पिकांना विमा संरक्षण देण्यात येईल.
पीक वर्गवारी-खरीप हंगाम
तृणधान्य व कडधान्य पिके : भात (धान), खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी (रागी), मूग, उडीद, तूर, मका
गळीत धान्य पिके : भुईमूग, कारळे, तीळ, सूर्यफूल, सोयाबीन
नगदी पिके : कापूस, खरीप कांदा.
रब्बी हंगाम
तृणधान्य व कडधान्य : गहू (बागायत), रब्बी ज्वारी (बागायत व जिराईत), हरभरा, उन्हाळी भात.
गळीत धान्य पिके : उन्हाळी भुईमूग
नगदी पिके : रब्बी कांदा
जिल्हानिहाय निश्चित केलेल्या कंपन्या
नगर, नाशिक, चंद्रपूर, सोलापूर, जळगाव, सातारा : ओरिएंटल इन्शुरन्स कं. लि.
परभणी, वर्धा, नागपूर : आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कं. लि.
जालना, गोंदिया, कोल्हापूर : युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कं. लि.
नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कं. लि.
औरंगाबाद, भंडारा, पालघर, रायगड : चोलामंडलम एम एस. जनरल इन्शुरन्स कं. लि.
वाशीम, बुलडाणा, सांगली, नंदुरबार : भारतीय कृषी विमा कंपनी
हिंगोली, अकोला, धुळे, पुणे : एचडीएफसी इर्गो जनरल इन्शुरन्स कं. लि
यवतमाळ, अमरावती, गडचिरोली : रिलायन्स जनरल इन्शुरन्स कं. लि.
उस्मानाबाद : एचडीएफसी ॲग्रो जनरल इन्शुरन्स कं. लि.
लातूर : एसबीआय जनरल इन्शुरन्स कं. लि.
बीड : भारतीय कृषी विमा कंपनी
योजनेचे वेळापत्रक
शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :
- खरीप २०२३ (३१ जुलै)
- खरीप २०२४ आणि २०२५ (१५ जुलै)
रब्बी हंगाम : ३० नोव्हेंबर ः ज्वारी, १५ डिसेंबर ः गहू, बाजरी, हरभरा, कांदा व इतर पिके,
३१ मार्च : उन्हाळी भात, उन्हाळी भुईमूग.
...यासाठी मिळणार विमा
- हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे होणारे नुकसान
- पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग
- स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान
- नैसर्गिक कारणांमुळे होणारे काढणीपश्चात नुकसान
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.