World Ozone Day Agrowon
संपादकीय

World Ozone Protection Day : जागतिक ओझोन संरक्षण दिन विशेष

वसुंधरेचे कवचकुंडले असलेल्या ओझोन थराचा क्षय थांबविणे, हेच १६ सप्टेंबर या दिवशी जागतिक पातळीवर ओझोन संरक्षण दिन साजरा करण्यामागचा हेतू आहे. जागतिक ओझोन संरक्षण दिनाचे या वर्षीचे ब्रीद, पृथ्वीवरील सजीव सृष्टी संरक्षणासाठी वैश्‍विक सहकार्य, असे आहे.

Team Agrowon

डॉ. माधवी गुल्हाने

ऑक्सिजनच्या दोन अणूपासून (Atom) तयार झालेला प्राणवायूचा (O२) रेणू मानवी जीवसृष्टीला (Human Life) जीवन प्रदान करतो, तर तीन अणूपासून तयार झालेला ओझोन (O३) वातावरणातील स्थितांबरमध्ये जीवसृष्टीचे अतिनील किरणांपासून संरक्षण (Protection From Ultraviolet Rays) करतो. ही प्रक्रिया नैसर्गिकरीत्या घडते. परंतु मानवनिर्मित क्लोरोफ्लोरोकार्बन सारख्या रासायनिक पदार्थामुळे ओझोनचे कवच (Ozone Shell) धोक्यात आले आहे. हे संरक्षण कवच आपण वाचविले नाही तर आपला विनाश अटळ आहे.

ओझोनच्या दोन बाजू

पृथ्वीच्या सभोवती वातावरणाचे आवरण आहे. सुमारे ३० ते ३५ किलोमीटर उंचीवर स्थितांबर आहे. याच स्ट्रटोस्पिअरमध्ये, अर्थात वरच्या थरात ओझोन तयार होण्याची प्रक्रिया सतत सुरू असते. ऑक्सिजनचे ओझोनमध्ये रूपांतर झाल्यानंतर हा ओझोन सूर्याकडून पृथ्वीकडे येणारे अदृश्य अतिनील किरणे अडवितो. या अतिनील किरणांची विध्वंसकता भयावह आहे. निलकिरणांमुळे भूपृष्ठावरील जीवसृष्टी एका तासभरात नाहीशी होऊ शकते. त्यामुळे स्थितांबरातील ओझोनचा जाड थर जीवसृष्टीचे संरक्षक कवच आहे. त्याचवेळी हाच ओझोन पर्यावरणात मिसळल्यास प्रदूषक म्हणून काम करतो आणि प्रदूषणाला हातभार लावतो. त्यामुळे ओझोन वरच्या थरात जीवसृष्टीला कवच प्रदान करतो. तर खालच्या थरात प्रदूषकाची भूमिका वठवत जीवसृष्टी अडचणीत आणतो.

ओझोन थराला विवर

ओझोन हा वायू अस्थिर आहे. बरेचदा आभाळात विजांचा कडकडाट झाला की तपांबरात उष्णतेने ऑक्सिजनचे रूपांतर ओझोनमध्ये होते व एक उग्रदर्प येतो. बरेचदा विद्युत रोहित्राजवळ या प्रकारचा वास येतो. वातावरणात प्रकाश रासायनिक क्रियेने ऑक्सिजनपासून ओझोनची निर्मिती होते. हा ओझोनचा थर अतिनील किरणांना पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश देत नसल्याने जीवसृष्टी अबाधित आहे. मात्र काहीसे विपरीत घडले आणि शास्त्रज्ञांना ओझोन वायूचा थर काही ठिकाणी पातळ झाल्याचे आढळून आले. १९८५ साठी ओझोन थराला पडलेले विवर उघडकीस आले. हे विवर दिवसेंदिवस वाढत असल्याने शास्त्रज्ञांसमोर मोठी चिंता निर्माण झाली आहे.

क्लोरोफ्लोरोकार्बनने केला घात

स्थितांबरातील ओझोन थराच्या वाढत्या विवरामुळे पर्यावरण शास्त्रज्ञांमध्ये खळबळ उडाली. विवरांच्या कारणांचा शोध घेतला असता मानवनिर्मित क्लोरोफ्लोरोकार्बन (सीएफसी) या रासायनिक संयुगामुळे ओझोनचा क्षय होत असल्याचे लक्षात आले. ओझोनसोबत क्लोरोफ्लोरोकार्बनची अभिक्रिया होते. क्लोरीन आणि ब्रोमिनची मानवनिर्मित संयुगे ओझोन क्षयासाठी कारणीभूत आहे. यालाच ओझोन नाशक (ओझोन डिप्लेटिंग सबस्टंसेस) म्हणतात. त्यात विशेषतः सीएफसी तसेच इतर रसायनांचा समावेश होतो. ही संयुगे अतिशय स्थिर रचनेची असतात. शिवाय ती ज्वलनशील व विषारीही नसतात. यामुळे अनेक उद्योगधंद्यामध्ये त्यांचा मोठा प्रमाणावर वापर होतो.

उदा. वातानुकूलित यंत्रे, फ्रिज, अग्निशमन यंत्रे. या वायूच्या स्थिर रचनेमुळे त्यांचे वातावरणातील आयुर्मानही जास्त असते. हे वायू स्थितांबरात हळूहळू घुसतात आणि अतिनील किरणांमुळे सीएफसीमधील रासायनिक बंध तुटतात व क्लोरीनमुक्त होतो. हा मुक्त क्लोरीनचा अणू ओझोनच्या रेणूवर हल्ला करतो. त्यामुळे ऑक्सिजनचा रेणू दुभंगतो व क्लोरीनशी संयोग पाहून क्लोरीन मोनॉक्साइड तयार होतो. आणि ओझोनचा रेणू अखेर ऑक्सिजनच्या रेणूत बदलतो. अशाप्रकारे क्लोरीनचा एक अणू ओझोनचे एक लाख रेणू नष्ट करू शकतो. याच अभिक्रियेतून ओझोन विवर तयार होते.

ओझोन क्षयाचे गंभीर परिणाम

ओझोन थराचा क्षय झाल्याने त्यातून अतिनील किरणे पृथ्वीवर येऊ लागल्याने जीवसृष्टी प्रभावित होत आहे. ओझोन विवराचे गंभीर परिणाम मानव जातीला भोगावे लागत आहे. यात प्रामुख्याने कातडीचे रोग, त्वचा काळी पडणे, त्वचेचा कर्करोग, सुरकुत्या पडणे आदी विविध विकार होत आहे. अतिनील किरणांमुळे शरीरातील रोगप्रतिबंधक शक्ती कमी होत आहे. त्यामुळे गोवर, कांजिण्या, त्वचेवर चट्टे उमटविणारे विषाणूजन्य रोग होतात. रक्ताभिसरणात बिघाड होते. पेशींची अनियंत्रित वाढ होते. तसेच अतिनील किरणांमुळे वनस्पतीची प्रकाश संश्लेषणक्रिया मंदावते. पोषक द्रव्याचे प्रमाण कमी होते. वनस्पतीची वाढ खुंटते आणि उत्पादनक्षमता घटते. या अतिनील किरणामुळे समुद्रातील सूक्ष्म वनस्पती व प्राणी कमकुवत बनतात. परिणामतः समुद्री प्राण्यांची संख्या घटते.

ओझोन सुरक्षा कवचाचे संरक्षण

१९८७ च्या मान्ट्रिअल करारामुळे ओझोन ऱ्हासाचे गांभीर्य रुजविण्याचे कार्य झाले. या करारामुळे ओझोन थरास हानिकारक ठरणाऱ्या पदार्थांच्या वापरात कमी करण्याचा उपाय सुचविण्यात आला. तसेच ओझोन थराबाबत सजगता निर्माण करण्यासाठी राष्ट्र संघटनेत १९९५ पासून १६ सप्टेंबर हा दिवस ‘आंतराष्ट्रीय ओझोन दिन’ साजरा करण्याचे ठरविण्यात आले. पर्यावरणावर होणारे विपरीत परिणाम जाणून घेतल्या जात आहे. ओझोनवर हल्ला चढवणाऱ्या सीएफसीला एचएफसीसारखी पर्यायी संयुगे शोधून काढण्यात आली. आता एसी, फ्रिज ही संयुगे सीएफसीमुक्त वापरण्याची गरज आहे. सीएफसी वायूचे प्रमाण कमी करावयाचे असल्यास वैयक्तिक वापरावरही नियंत्रण आणले पाहिजे.

ओझोन थराच्या घनतेत सुधारणा

जागतिक क्लोरोफ्लोरोकार्बन उत्सर्जन कमी होत असताना अशा प्रकारची वाढ का होत होती, त्याची कारणमीमांसा सुरू झाली. बहुतेक प्रगत राष्ट्रांनी प्रगतिशील देशांकडे बोट दाखवण्यास सुरुवात केली. कदाचित काही राष्ट्रे क्लोरोफ्लोरोकार्बन उत्सर्जन माहिती लपवत असल्याच्याही चर्चा त्या दरम्यान झाली. २००५ नंतर पुन्हा ओझोनच्या जागतिक आणि ध्रुवीय घनतेत सुधारणा व्हायला सुरुवात झाली ती आजपर्यंत होत आहे, ही शास्त्रज्ञांना दिलासा देणारी बाब आहे. ओझोन थराच्या घनता नोंदी घेण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार १९६० पासून स्ट्रटोस्पिअरमधील ओझोन वायूचा घनतेतील बदलांचा आलेख पाहिला, तर काही बाबी स्पष्ट होतात. त्यांपैकी एक म्हणजे १९९८ पर्यंत ओझोन वायूच्या घनतेत सुधारणा झाल्याचे दिसते. परंतु १९९८ पासून जागतिक आणि ध्रुवीय ओझोन वायूच्या घनतेत हळूहळू परत घसरण होताना दिसते. २००० ते २००५ च्या दरम्यान त्यात कमालीची घसरण झाल्याचे दिसून आले.

एकत्रित प्रयत्नांना यश

क्लोरोफ्लोरोकार्बन उत्सर्जनाने ओझोन थराचे नुकसान होत आहे. १९६० पासून हवेत क्लोरोफ्लोरोकार्बन उत्सर्जनाचे प्रमाण सतत वाढतच होते. १९८८ मध्ये सर्वाधिक एकूण १४.५ लाख टन इतका क्लोरोफ्लोरोकार्बन उत्सर्जित झाल्याची नोंद आहे. त्यानंतर मात्र क्लोरोफ्लोरोकार्बन उत्सर्जनात कमालीची घसरण दिसून आली आहे. २०१० मध्ये हवेत क्लोरोफ्लोरोकार्बन उत्सर्जन ३.८ लाख टन इतके कमी झाल्याचे दिसून आले. हे मुख्यत्वे आंतरराष्ट्रीय मॉन्ट्रियल नियामक कराराचा परिणाम आणि ओझोनचा क्षय घडून आणणाऱ्या पदार्थांचे उत्पादन व त्यांचा वापर टप्प्याटप्प्याने कमी करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांचा परिणाम मानल्या जाते. ओझोन थर ऱ्हास ही एक लढाई मानली तर जागतिक तापमानवाढ, नैसर्गिक स्रोतांचा झपाट्याने होत असलेला ऱ्हास अशा अनेक पर्यावरणीय समस्यांना सामोरे जावे लागेल. त्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. पर्यावरणीय समस्यांचे युद्ध आपल्या समोर आहे. त्याला शास्त्रशुद्ध विवेकाने सामोरे गेलेच पाहिजे.

(लेखिका पर्यावरण अभ्यासक आहे.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT