Mahua Flower
Mahua Flower Agrowon
संपादकीय

Mahua Flower : मोहफुलात मानवी पोषणमूल्ययुक्त कोणते आहेत घटक?

Team Agrowon

Mahua Flower Update : सकाळीच जंगलात जाऊन लगबगीने मोहफुले गोळा करणाऱ्या गोंदिया जिल्ह्यातील एका महिलेचे छायाचित्र तीन दिवसांपूर्वी (ता. ५) ‘ॲग्रोवन’मध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. फेब्रुवारी ते मे या काळात मोहाला फुले लागून ती गळून पडत असतात.

आदिवासी महिला-पुरुष तसेच त्या भागातील शेतकरी मोहफुले गोळा करून त्यांच्या अनेक प्रकारे वापरातून कुटुंब चालवितात.

मोहफुले वेचणारे आदिवासी बांधव दिसले म्हणजे सर्वसामान्यांना (खासकरून शहरी मानसिकता असलेल्यांना) मोहाची दारूच आठवते आणि ती पिऊन तराटलेली माणसेच दिसतात.

परंतु हे पूर्णसत्य नाही. मोहफुलात मानवी पोषणमूल्ययुक्त अनेक घटक सामावलेले आहेत. मोहाचे झाड हे आदिवासी बांधवांसाठी कल्पवृक्षच म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

मोहाची फुले, पाने, खोड, फळे, फळांतील बिया अशा सर्वांचा उपयोग आदिवासी बांधव आपल्या दैनंदिन जीवनात करीत असतात. मोहफुलांपासून आदिवासी बनवीत असलेले पारंपरिक पेय अनेक प्रकारच्या आजारांवर वापरले जाते.

मोहाची फुले आदिवासींसाठी अंतिम अन्नसुरक्षा आहे. पराकोटीची अन्नटंचाई असलेल्या दुष्काळात काहीही उपलब्ध नसताना केवळ मोहफुलांच्या भाकरी खाऊन आदिवासी समाज जगला. साखर-गूळ या समाजास सहज उपलब्ध नव्हता, तेव्हा मोहाची राब काकवीसारखी वापरून गोडाचे पदार्थ केले जात.

बाळंतपणात शरीराची झीज भरून निघण्यासाठी आईला मोहाची राब देतात. लहान मुलांनाही मोहाची फुले शक्तिवर्धक म्हणून दिली जातात. मोहफुलांमध्ये सर्वाधिक प्रोटिन्स असल्याचे कृषितज्ज्ञांचे मत आहे.

मोहफुलाच्या राबेपासून मुरमुऱ्याचे पौष्टिक लाडूही तयार करतात. मोहाच्या बियांमध्ये तेलाचे प्रमाण ५० टक्के इतके असते. या तेलात सॅपोनीनचे प्रमाण असल्यामुळे ते अखाद्य तेलाच्या यादीत येते.

आदिवासी समाज पारंपरिक ज्ञानाने काही विशिष्ट प्रक्रियेमार्फत हे विषारी घटक काढून या तेलाचा उपयोग खाद्यतेल म्हणूनही करतात. मोहाचे तेल त्वचेसाठी औषधी आहे. मोहाचे फूल हे जनावरांसाठी उच्च कॅलरी, उच्च प्रथिनयुक्त खुराक आहे. विशेषतः गाभण गायींना व नांगरट, पेरणीच्या काळात बैलांना मोहाची फुले खाद्य म्हणून दिली जातात.

मोहफुलांचे संकलन, साठवणूक, खरेदी-विक्री, वाहतूक यांवरील दारूबंदी कायद्यांतर्गतचे निर्बंध खरेतर दोन वर्षांपूर्वीच हटविण्यात आले आहेत. मोहफुलांवरील निर्बंध हटविल्यानंतर याच्या खरेदी-विक्रीची सुनियोजित व्यवस्था उभी राहील, प्रक्रियेला चालना मिळून मोहफुलांना योग्य दर मिळतील, असे वाटत होते.

परंतु तसे घडताना दिसत नाही. मोहफुलांच्या पौष्टिक लाडूबरोबरच जॅम, सरबत, चटणी, आइस्क्रीम, जेली यांसह अनेक उपपदार्थांची निर्मिती करता येते. राज्यात प्लॅस्टिकवर बंदी असल्याने मोहाच्या पानापासून तयार होणाऱ्या पत्रावळी आणि द्रोण यांना चांगली मागणी मिळू शकते.

त्यामुळे दुर्गम आदिवासी पट्ट्यात मोह प्रक्रिया उद्योग, गृहउद्योगाला चालना मिळायला हवी. राज्य सरकारने याबाबतची आवश्यक माहिती, तंत्रज्ञान तसेच सेवासुविधा शेतकरी, तसेच आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचवायला हव्यात.

मोह आणि काजू बोंडूपासून बनविण्यात येणाऱ्या मद्यार्काला देशी संबोधले जात होते. त्यामुळे या मद्यास प्रतिष्ठा लाभत नव्हती, ग्राहक संख्याही मर्यादित होती. सुमारे वर्षभरापूर्वी (जून २०२२) या मद्याला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याबरोबर मूल्यवर्धनात वृद्धीसाठी वाइनचा दर्जा राज्य शासनाकडून मिळाला आहे.

त्यामुळे मोह वाइन निर्मिती आणि विक्रीला देखील राज्यात चालना मिळायला हवी. एवढेच नव्हे तर मोहफुलांतील प्रथिने व उच्च उष्मांक यांचा उपयोग आदिवासी भागातील आश्रमशाळा, अंगणवाड्यांमध्ये मुलांना पोषक आहारासाठी केला जाऊ शकतो. असे झाल्यास दुर्गम भागातील मुलांचे कुपोषणही दूर होऊ शकते.

‘मोहफूल- आदिवासी उपजीविकेचे एक साधन’ अशा प्रकल्पास गडचिरोली जिल्ह्यात राज्य शासनाने मान्यता दिली आहे. असे प्रकल्प मराठवाडा, विदर्भातील मोहफुले अधिक प्रमाणात आढळणाऱ्या सर्व जिल्ह्यांत राबविल्यास तेथील आदिवासी बांधवांसह शेतकऱ्यांचे जीवनमान उंचाविण्यास हातभार लागेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT