Rural Story : विठ्ठलाच्या वारीत संसाराचा मोह गळून का पडतो?

आम्ही तिच्या पाया पडलो. तिने पिशवीतले राजगि-याचे लाडू आम्हाला दिले. वारकऱ्यांना वाटलेले लाडू स्वतः न खाता ती आमच्यासाठी घेऊन आली होती. पावसात तिला पांघरायला मिळालेली प्लास्टिकची कुची तिनं आम्हाला दिली.
Rural Story
Rural StoryAgrowon

आमची आजी (grandmother) ब-याचदा पंढरपूरच्या वारीला जायची. आम्ही लहान असताना फार काही कळत नव्हतं पण एकदा घरात काहीतरी कुरबुरी झाल्या होत्या आणि रागावैतागाने आजी वारीला (Ashadhi Vari) निघून गेली होती एवढं कळत होतं.

तेव्हा आम्ही पाचसहा नातवंडं आजी परत येण्याची खूप वाट बघत होतो. घरामागच्या लिंबाच्या झाडावर चढून आजी घराकडं येताना दिसतेय का म्हणून वाटंकडं बघायचो.

असंच वाट बघताना एक दिवस आजी येताना दिसली. आम्ही पळत जाऊन तिला आवळून धरलं. तिचे डोळे भरून आले. ती म्हणाली, पांडुरंग तुम्हाला भेटायला माझ्याबरोबर आलाय.

आता तो आपलं घरदार, रान, गुरं सगळं बघेल मग त्याला पटेल मी काय सांगत होते ते. तिने पांडुरंगाला काय सांगितले होते ते तिलाच माहीत. आम्हाला तिने बुक्का लावला.

आम्ही तिच्या पाया पडलो. तिने पिशवीतले राजगि-याचे लाडू आम्हाला दिले. वारकऱ्यांना वाटलेले लाडू स्वतः न खाता ती आमच्यासाठी घेऊन आली होती. पावसात तिला पांघरायला मिळालेली प्लास्टिकची कुची तिनं आम्हाला दिली.

तिच्या पिशवीत चुकून एका बाईचा स्टीलचा तांब्या आलेला बघून ती खूप हळहळली. म्हणाली, घरी गेल्यावर तिला सामानात तांब्या दिसणार नाही. म्हणेल, विठ्ठलाने माझा तांब्या ठेवून घेतला.

उगीच विठ्ठलावर आळ येईल म्हणून आजीला वाईट वाटत होतं. तांब्या तर आमच्या घरी होता. सुरेश आत्माराम कुचेकर असं नाव टाकलेला तो तांब्या अजून आमच्या घरात आहे. आजीची आणि त्या बाईची पुन्हा गाठभेट झालीच नाही.

आजीने कायम एकादशीचे उपवास केले. रोज झोपताना ‘हे राम उद्या अजून दे काम’ म्हणणारी आणि सतत काही ना काही काम करणारी मी पाहिलेली एकमेव व्यक्ती म्हणजे माझी आजी ! असंच एक दिवस नेहमीसारखी रात्री झोपलेली आजी सकाळी उठलीच नाही.

चालता बोलता ने रे बा विठ्ठला, हे तिचं म्हणणं ऐकणारा तिचा विठ्ठल उगवत्या एकादशीला तिला घेऊन गेला. आजी गेल्यावर आम्हा घरातल्यांना तर खूप वाईट वाटलंच पण अख्खं शिवार हळहळलं.

देहू, आळंदी, इंद्रायणी, पंढरपूर, गोपाळपूर, चंद्रभागेच्या खूप गोष्टी आजी सांगायची. एकमेकींच्या डोक्यावर चंद्रभागेतले चार तांबे पाणी घालून पुण्य मिळवणारी माणूसकी सांगायची.

आजीच्या नजरेतून पाहिलेली वारी कायमची माझ्या आठवणीत राहिली. आमच्या घरापासून तुकाराम महाराजांची पालखी जाते.

टाळ मृदुंगाच्या तालावर दिंडीत एकसारखे चालणारे वारकरी बघताना त्यांच्यात अचानक आजी दिसते आणि डोळे भरून येतात. ही झाली माझ्या आजीची गोष्ट.

वारीतल्या लाखो वारकऱ्यांच्या अशा लाखो गोष्टी असतील. वारीत येऊ न शकलेल्यांच्याही लाखो गोष्टी असतील. पण त्या लाखोंमधलं समान काय असेल तर विठ्ठल भक्तीची ओढ.

धर्मभेद, जातीभेद, लिंगभेद, गरीबश्रीमंत, लहानथोर या सगळ्याच्या पलीकडं पोचता येतं म्हणून माऊलींचा मेळा जमतो.

परिस्थितीनं वाकलेली, पिचलेली तसंच सुस्थितीतील लाखो माणसं पांडुरंग माऊलींच्या सोहळ्यात सहभागी होतात. विठ्ठल भक्तीची समानता पालखी सोहळ्यातून ओसंडून वाहत असते.

Rural Story
Groundnut Rate :आषाढी एकादशीच्या तोंडावर, शेंगदाणे, साबुदाणा स्वस्त

एकीकडं घरादाराची, संसाराची ओढ आणि दुसरीकडं भगवंत भक्तीची आस असलेल्या आयाबायांची वारी म्हणजे वेगळंच रसायन असतं. आता हेच बघा ना, आत्त्या म्हणजे माझ्या सासूबाई पालखीबरोबर पायी वारीला जायला निघाल्या होत्या.

वस्तीवरच्या त्यांच्या जोडीदारणींच्या नादानं आत्यांना वारीला जावंसं वाटलं होतं. तेव्हा जाण्याआधी त्यांचं घरात सारखं आम्हाला सूचना देणं चालू होतं.

जास्तीत जास्त सूचना तर आम्हा दोघी सुनांना होत्या, हे बघा, मी पायीवारीला चालले असले तरी तुम्ही सगळ्यांनी ध्यान देऊन नीटनीटकी कामं करा. सकाळच्या पहारी लवकर उठत जावा.

पारोसंआरोसं, चहापाणी, सैपाक करायला वेळ लागंल. डबा उरकला नाहीतर पोरांना कामाला उशीर होईल, म्हणून काळजीनं उठा. रोजच्या रोज भरपूर घास कापून आणा नाहीतर म्हशी दुधाला कमी पडतील.

कोंबड्या सोडल्यावर घरात येऊन बसू नका नाहीतर मुंगसं डाव साधत्यान. बोक्यावर लक्ष ठेवा, खरड्या कोंबडीची पिल्लं न्यायला जड नाहीत त्याला. ती लोणच्याची भरणी रोजच्या रोज हलवून नीट झाकून ठेवा नाहीतर एवढ्या मोठ्या लोणच्याची नासतूस होईल.

किती सामान घातलंय त्याच्यात सगळं वाया जाईल. कपड्याचं, अंगाचं साबण आणून ठेवलेत. परत आणायला सांगू नका. अजून एक, एकादशीच्या दिवशी लागंल तेवढाच शाबूदाणा भिजायला घाला.

एवढा महागामोलाचा आणून उगं कोंबड्या कुत्र्याची धन करू नका. अजून काय राहिलं, हां, रानात मिरच्यांना एक येढा घाला. लाल मिरच्यांचा एखादा तोडा होईल. तेवढ्या तोडून आणा.

पण वाळायला घातल्यावर पावसावर ध्यान ठेवा. भिजलेल्या मिरच्यांचा मसाला लालभडक होत नाही. झालंच तर मिरच्या निवडून ठेवा. मी परत आल्यावर मसाला भाजून, कुटून आणीन.

चुलीवर सैपाक करत जावा, सरपणाला उत आलाय, उगं गॅस संपवायच्या मागं लागू नका. एक काम दोनदा न् ताकात पाणी तीनदा असं करू नका. सगळं करून भैय्याला न् दिदीला नीट संभाळा.

त्यांला पाय फुटलेत तर नुसतं तरातरा पळायचं धरलंय. एक काम कमी होऊ दया, पण पोरांवर ध्यान ठेवा. त्यांना रस्त्यावर अजिबात जाऊन देऊ नका. जोरात गाड्या येतेत जातेत. उगं मोबाईलमधी डोकी घालून बसू नका.

काही सूचना सास-यांना पण होत्या

आणि तुम्ही वो घरी थांबत जावा. तुम्ही पोरांला सांभाळलं तर ह्या दोघीं कामं उरकत्याल. दिवसा कुत्रं रिकामं सोडू नका. एखाद्याला चावलं बिवलं तर उगं आपल्याला ताप होईल.

म्हशींची दावी, साखळ्या तुटायला झाल्यात का बघा, नाहीतर रातचं सुटून जातील कुठं. गोळ्याऔषधं वेळच्या वेळी घ्या, नाहीतर म्हणा ध्यानात नाही.

पुन्हा डाक्टरची भरती. रानात गेल्यावर तो भुईमुगाच्या पाल्यावर झाकलेला तळवट निटनिटका राहिलाय का बघा नाहीतर वा-यानं तळवट जाईल उडून.

एवढ्या सायासानं ठेवलेला पाला पावसानं भिजला तर शेण होईल त्याचं. कडवळाला खादगी लागती का बघा. पाण्यापूढं एक डोस द्या. युरयाची अर्धी गोणी गोठ्यातल्या कोपऱ्यात ठेवलीय.

उगंच दुकानदाराला पैसं घालवू नका. वरलाकडच्या पपयांला डोळं पडलेत का बघून घरी घेऊन या नाहीतर पाखरं फडशा पाडतील.

अशा हजार सुचना देवून आत्त्याबाई वारीला गेल्या. हे करा नाहीतर ते होईल. ते करा नाहीतर हे होईल. त्या अजून काय करायच्या तर, वारीला गेल्यावर हे सगळं पुन्हा फोनवरून सांगायच्या. मला तुकाराम महाराजांचा अभंग पुन्हा पुन्हा आठवत होता,

आवा चालली पंढरपुरा, वेशीपासून ये माघारा

त्या अभंगातली आवा म्हणजे सासू असंच खूप सगळं सुनंला सांगते. सून म्हणते तुम्ही पंढरपूरला बिनघोर जा मी सगळं बघते. तर सासूला वेगळाच संशय येतो आणि ती म्हणते, घरदार संसार, हेच माझे पंढरपूर ! आणि वेशीपासून माघारी येते. पण आमच्या आत्त्या आणि गोळ्यामेळ्यानं गेलेल्या आयाबाया काही वेशीपासून माघारी बिघारी आल्या नाहीत.

मस्तपैकी वारी पंढरीला पोचवून, बारस सोडून मगच माघारी फिरल्या. आमच्या आत्त्यांचं फक्त उदाहरण सांगितलं. थोड्याफार फरकाने घरोघरी अशा सूचना ऐकायला मिळत असतात.

Rural Story
Ekanath Shinde : आषाढी एकादशीनंतर मंत्रीमंडळ विस्तारावर चर्चा करू: शिंदे

शेजारच्या नानींचं म्हणणं काय होतं तर जाताना घरच्यांना काही सांगायचं नाही. आता कुणी बारीक नाही. ज्याचं त्याला कळतंय. आपुण बोललं की आपलं तोंड दिसतं.

चट करतील खातील, कुण्णी उपाशी रहात नाही. त्यांचा संसार त्यांनी बघायचा, करायचा. आपल्यावाचून कुणाचं अडत नाही.

हातात टाळ घेऊन विठ्ठोबा माऊली तुकाराम म्हणलं की आपोआप संसाराचा मोह गळून पडतो. संसारातली सुखदुःख विसरायला लावते वारी म्हणूनच दरवर्षी वारीला जायचं.

परवा वारीतील एक बाई सांगत होत्या, वारीचे दिवस म्हणजे बाईसाठी स्वातंत्र्याचे दिवस. संसारातनं जरा सवड काढावी आणि पंढरपूरची पायी वारी करावी.

बाईच्या जातीला माहेराच्या पलीकडं हे दुसरं माहेरच म्हणायचं. आपलं गाव सोडून बाकीची गावं, शहरं बघायला मिळतेत. पीकपाणी कळतंय.

कमीत कमी गरजांमधी कसं दिवस काढायचं ते समजतंय. आयुष्यभर तर वढवढ चालूचय. वारीला जाऊन तेवढाच जिवाला इसावा, विठोबा भेटावा.

तर दुसरी एकजण सांगत होती, घरचे यंदा पाठवत नव्हते. म्हणतेत दरवर्षी वारी काय निराळीय का ? एकदा गेलं बास झालं. दरवर्षी जावं म्हणून काही नेम नाही. पण त्या बाईंना वारीची भारी हौस.

कितीतरी अभंग तोंडपाठ. झिम्मा, फुगड्या, घोडा, असले खेळ खेळण्यात एकदम पटाईत. त्या हट्ट करून वारीला येतात. वीसबावीस दिवस वारी करून मग घरी गेलं की तरतरीत होऊन नव्यानं कामाला लागतात.

दिंडीत एका शिस्तीनं चालताना टाळ वाजवत, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम म्हणत सगळं विसरणा-या आयाबाया इसाव्याला बसल्यावर मात्र कुणी सासूसुनांचं गा-हाणं सांगतं तर कुणी शेजारची उखाळीपाखाळी करतं.

पाऊसपाण्याच्या गप्पा निघाल्या की घरदार, शिवार डोळ्यापुढं येतं. तुमच्या झाल्या बाई पेरण्या, आमच्याकडं अजून पावसाचा पत्ता नाय म्हणत सहजच काळजीच्या नजरा आभाळाकडं जातात.

घरी फोन केला की नातवंडं मला आजीशी बोलायचंय, मला आजीशी बोलायचंय म्हणून कालवा करतात. कधी येणार, कधी येणार म्हणून विचारतात. ते ऐकून इकडं आजीचा जीव मोठा मोठा होत जातो.

घरात मायेची सावली नसलेल्यांना वारीत माऊली म्हणलं की त्यांचा जीव आभाळाएवढा होतो. घराच्या कोपऱ्यात जागा असलेली, सतत हेटाळणी झालेली माणसं आनंदानं वारीत जातात.

दुष्काळानं होरपळलेली माणसं वारकरी होऊन गावाबाहेर पडतात. वारीच्या वाटंवर पावसाचा शितुडा आला, चार थेंब अंगावर पडले की विठ्ठलाला हात जोडतात.

भर गर्दीत विठोबाच्या पायरीवर डोकं टेकल्या टेकल्या पोतंभर लाह्यात सापडलेल्या चार दोन बत्ताशांइतकंच भारी वाटतं त्यांना. मुखदर्शनाच्या एका क्षणातही भडाभडा मनातलं बोलून मोकळं होतात. लांबून कळसाकडं बघताना हात जोडतात.

वाळलेल्या रखरखीत रानशिवाराच्या पलीकडं असलेली ही देहू आळंदीतली हिरवळ खुणावते त्यांना. असंख्य वारकऱ्यांच्या मुखातल्या अभंगातून ज्ञानोबा, तुकोबा बोलत असतात.

आपल्या दुःखाचा घडीभर विसर पडून ती अभंगात रमतात. भजन कीर्तनाचा गजर त्यांना आनंदाचा ठेवा देतो.

वारीत कुणी कशासाठी तर कुणी कशासाठी येतं. मनी नाही भाव देवा मला पाव अशीही मंडळी असतात. एक वारकरी घरी फोन करून सांगत होता, हे बघ माझी अज्जिबात काळजी करू नको. माझी सगळी म्हंजी सगळी सोय हाय वारीत.

Rural Story
Photography : मी अनुभवलेली माऊलीची वारी

तेव्हा मला प्रश्न पडला की, हा नेमका कोणत्या सोयींबद्दल बोलतोय ? हौसे, गवसे लोकही वारीत येतात. रिकामटेकड्या लोकांची वारी म्हणणारे, वारीला नाक मुरडणारेही आहेत.

शेवटी कोणत्याही गोष्टीकडे बघण्याचा ज्याचा त्याचा दृष्टीकोण वेगळा असतो, अनुभव वेगळा असतो.

काळ बदलला, आवा बदलली, शे पाचशे वारक-यांची संख्या लाखावर पोचली. भाकरी बांधून चालणा-या वारक-यांना गावोगावी जेवणं मिळायला लागली.

वर्गणीधा-या दिंड्या वाढल्या. पैशाच्या गुंतागुंतीच्या व्यवहाराबरोबर गैरव्यवहारही आले. घरोघरच्या आयाबाया चार दिवस संसारातनं मोकळं होऊन वारीला जाऊन येतात.

जगाच्या पाठीवरची आपली वारी ही एक सुंदर परंपरा आहे. तिची स्वच्छता, निर्मळता, पवित्रता जपण्याचा प्रयत्न वारकऱ्यांनी, भाविकांनी तसंच सर्वांनी करणं मात्र गरजेचं आहे.

वर्षानुवर्षे वारीत चालणाऱ्यांना फोटोची कधीच अपेक्षा नसते मात्र अलिशान गाडीतून उतरून पालखीबरोबर, वारकऱ्यांबरोबर फोटो घेऊन मिरवणारे काही कमी नाहीत.

वारी ही लाखो वारकऱ्यांचा मानसोपचार आहे. ही आनंदयात्रा आहे. वारी म्हणजे कोणत्याही टॉवर्स आणि सॅटेलाईटपेक्षा भक्तांच्या कळसांनी उभारलेलं भक्तीचं नेटवर्क आहे.

आषाढी कार्तिकीला पालखीचे झेंडे फडफडतात, माती आणि आभाळ जोडतात तेव्हा वारकऱ्यांच्या बुबुळांवर तकाकणारं अख्खं विश्व असते वारी. पंढरपूरची वारी करून परत आलेली आवा जेव्हा रानात काम करते तेव्हा ती म्हणते,

काळ्या आईच्या ओढीनं

येई धावत विठोबा

जिथं जिथं माझी पात

तिथं शेजारीच उभा

दगडाच्या देहामंधी

नाही लपत विठोबा

भर सुगीच्या दिसांत

पेंढ्या बांधते रखुमा

भलरीच्या तालावर

विठू काढतो कडबा

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com