Organic Weed Control: देशातील प्रमुख दहा पिकांतील तणांच्या प्रादुर्भावाचा तण संशोधन केंद्र, जबलपूरद्वारे नुकताच अभ्यास करण्यात आला. त्यात तणांमुळे संबंधित पिकांचे तब्बल ७० हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे पुढे आले आहे. यावरून देशभरातील सर्व पिकांत तणांमुळे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसानीचा अंदाज आपल्याला यायला हवा. शेती शास्त्रात तण ही नको असणारी, नको त्या ठिकाणी वाढणारी वनस्पती आहे.
तणे पिकांसोबत अन्नद्रव्ये, ओलावा, सूर्यप्रकाश, जागा, यांसाठी स्पर्धा करतात. त्यांची मुळे, पाने यांचे विशिष्ट प्रकार आणि गुणधर्मामुळे ते पिकांपेक्षा काटक ठरत असून, पिकांसोबतच्या स्पर्धेत आघाडी घेतात. प्रादुर्भावानुसार तणांमुळे पिकांचे १० ते ९० टक्क्यांपर्यंत उत्पादन घटल्याच्या नोंदी आहेत. शेतात तणांचा प्रादुर्भाव वाढला म्हणजे केवळ उत्पादनच घटत नाही तर तण नियंत्रणावरचा खर्च वाढतो.
तणांमुळे पिकांवर रोग-किडीही वाढतात, त्यांच्या नियंत्रणाचा खर्चही वाढतो. काही तणांमुळे मानव तसेच प्राण्यांना ॲलर्जी होते. शेतकऱ्यांसाठी तणे अशाप्रकारे सर्वांगानी नुकसानकारक ठरतात. मागील काही वर्षांच्या हवामान बदलाच्या काळात पिकांमध्ये प्रचलित तणांचा प्रादुर्भाव तर वाढलाच आहे, त्याचबरोबर नवनवीन तणेही शेतकऱ्यांसाठी खूपच डोकेदुखी ठरत आहेत.
कीड-रोगाप्रमाणेच तणांच्या नियंत्रणासाठी आता शेतकरी प्रामुख्याने रासायनिक नियंत्रणावरच भर देताना दिसत आहेत. केवळ तणनाशकांच्या वाढत्या वापराने जमिनीतील उपयुक्त जिवाणू, मित्र बुरशी यांवर परिणाम होत आहे. माती आणि पाणी प्रदूषणही वाढत आहे. सोयाबीनसारख्या पिकात एकदा तणनाशक वापरले, तरी तणांचा प्रादुर्भाव कमी होत होता. मागील एक-दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना सोयाबीनमध्ये दोन-तीन वेळा तणनाशकांचा वापर करावा लागत आहे. काही शेतकरी तणनाशकांची मात्राही वाढवत आहेत.
याद्वारे अनेक तणांमध्ये तणनाशकांविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण होऊन ‘सुपरवीड’ची संभावना वाढत आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या किफायतशीर, पर्यावरणासाठी सुरक्षित आणि प्रभावी तण व्यवस्थापनावर शेतकऱ्यांनी भर द्यायला हवा. यामध्ये तणांचे एकात्मिक पद्धतीने नियंत्रण हा सर्वांत चांगला पर्याय आहे. एकात्मिक तण व्यवस्थापनात प्रतिबंधात्मक आणि निवारणात्मक असे दोन उपाय आहेत.
प्रतिबंधात्मक उपायांमध्ये तणाविरहित बियाण्यांची निवड, जमिनीची योग्य मशागत, कुजलेल्या शेणखताचाच वापर, तण फुलोऱ्यात येण्याआधीच त्याचे उच्चाटन, गाव-शेतात तण निर्मूलनाचे कार्यक्रम राबविणे यांचा समावेश असून, बहुतांश शेतकरी या उपायांकडे दुर्लक्ष करतात. निवारणात्मक उपायांमध्ये भौतिक, मशागतीय, यांत्रिक, जैविक आणि रासायनिक अशा पद्धतींचा क्रमवार आणि गरजेनुसार वापर व्हायला हवा.
मागील काही वर्षांपासून शेतीत नवनवे प्रयोग करणाऱ्या प्रतापराव चिपळूणकर यांचा तण निर्मूलनाऐवजी तण व्यवस्थापनावर भर आहे. शून्य मशागत तंत्राद्वारे तणनाशकांचा प्रमाणबद्ध आणि प्रभावी वापर करून यशस्वीरीत्या ते तण व्यवस्थापन करीत आहेत. याद्वारे खर्च कमी होतो, तणांचे प्रभावी व्यवस्थापन होते, शिवाय जमिनीची सुपीकताही वाढीस लागते. ‘तण खाई धन’कडून ‘तण देई धन’ असा त्यांच्या व्यवस्थापन पद्धतीचा प्रवास आहे.
तणकटाची वाढती कटकट कमी करण्यासाठी त्यांच्या या पद्धतीचा प्रसार प्रचार झपाट्याने व्हायला हवा. या बरोबरच विभागनिहाय घातक तण निर्मूलन मोहिमांचे आयोजन कृषी विभागाने करायला हवे. शिवाय नव्या तणांचा शेतपरिसरात शिरकाव होऊन ते वाढणार नाही, ही काळजी देखील शेतकऱ्यांसह कृषी विभागाने घ्यायला हवी.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.