समीर गायकवाडStudent World Record: या लेखात छापलेला फोटो २०२१ चा आहे. फोटोतल्या मुलाचे तेव्हाचे वय होते अकरा वर्षे. त्याचे नाव आहे लॉरेंट सिमॉन्स. त्याने वयाच्या सहाव्या वर्षी प्राथमिक शिक्षण पूर्ण केले, आठव्या वर्षी त्याचे शालेय शिक्षण संपले. अकराव्या वर्षी त्याने भौतिकशास्त्रात पदवी अभ्यासक्रम विशेष प्रावीण्यासह पहिल्या क्रमांकाने पूर्ण केला. जगभरातील माध्यमांनी त्याची दखल घेतली. हा फोटो तेव्हाचाच आहे..नुकतेच काही दिवसापूर्वी वयाच्या पंधराव्या वर्षी त्याने अँटवर्प विद्यापीठातून क्वांटम फिजिक्समध्ये पीएचडी प्राप्त केलीय. त्याला लोक कौतुकाने ‘बेल्जियमचा लिटल आइनस्टाइन’ म्हणतात, त्याचा आयक्यू १४५ आहे. Bose polarons in superfluids and supersolids हा त्याच्या प्रबंधाचा विषय होता. लॉरेंट सिमॉन्स हा डॉक्टरेट मिळविणाऱ्या सर्वांत तरुण व्यक्तींपैकी एक झाला आहे. क्वांटम फिजिक्समध्ये डॉक्टरेट करणारा तो सर्वांत तरुण आहे. आपल्या उपलब्धीचा त्याला गर्व नाही. आपले यश तो विनम्रतेने स्वीकारतो आणि त्याचे श्रेय शिक्षण प्रणालीसह, पालक- शिक्षकांना देतो..आपले ज्ञान भौतिकी वैद्यकीय संशोधनात वापरून मानवी आयुष्य वाढवायचे, अमरत्वावर संशोधन करायचे आणि मानवी आरोग्यात क्रांतिकारी बदल घडवून मानवतेस पूरक काम करायचे, असा त्याचा मानस आहे. जगभरातील वैज्ञानिक त्याचे तोंड भरून कौतुक करताना दिसत आहेत..Agriculture Education: कृषी विद्यार्थ्यांसाठी विदेशात उच्च शिक्षणाच्या अमर्याद संधी .आपल्या ज्ञानाने जगाला काही लाभ होत असतील तर ते ज्ञान कामी आले मानता येईल असे त्याचे विचार आहेत. त्याच्यापासून आपण काय शिकावे आणि काय नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न, आवड असू शकते. आपण काय डोक्यावर घ्यावं हा देखील ज्याच्या त्याच्या जडणघडणीचा विषय असू शकतो..आपल्या ज्ञानाचा जगाला लाभ झाला पाहिजे आणि त्यासाठी आपले ज्ञान कामी आले पाहिजे असं म्हणणारा हा लिटल आइनस्टाइन खूप भारी आणि परिपक्व वाटतो. तिथल्या शिक्षण प्रणालीने आणि समाजाने त्याला शुभेच्छा दिल्या आहेत..जग जेव्हा काही नवीन करत होतं तेव्हा आपण काय करत होतो याच्या काही तौलनिक नोंदी मांडाव्याशा वाटतात. पहिल्या औद्योगिक क्रांतीमध्ये १७८४ च्या सुमारास वाफेच्या इंजिनाचा शोध लागला आणि तंत्रज्ञानाच्या वापरातून उत्पादनाला वेग मिळाला. विजेचा शोध लागल्यावर खूप बदल झाले. वेगाने वस्तू निर्माण करण्यासाठी उत्पादन साखळ्या तयार झाल्या. तेव्हा आपल्याकडची सामाजिक स्थिती दयनीय होती, तेव्हा आपण अस्पृश्यता पाळत होतो..Indian Education: खरी ओळख करून देणारे मूल्यवर्धित शिक्षण.दुसरी औद्योगिक क्रांती १९२३ च्या आसपास घडली. मोठ्या क्षमतेचे यांत्रिक कारखाने उदयास आले. कालांतराने त्यात सातत्याने विकास आणि सुधारणा होत गेल्या. या काळात आपला देश स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर होता आणि आपल्या देशातला एक मोठा समाज पाणवठ्यावरच्या अधिकारासाठी झगडत होता..तिसऱ्या औद्योगिक क्रांतीची सुरुवात साधारणपणे १९६९ च्या आसपास झाली. यामध्ये संगणकाचा वापर सुरू झाला. याच वर्षी आपल्याकडे इस्रोची स्थापना झाली आणि चौदा प्रमुख खासगी व्यापारी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले. राजकीय विरोध असूनही १९८५ मध्ये आपल्याकडे सार्वजनिक जीवनात संगणकांचा चंचूप्रवेश झाला. म्हणजे जग धावू लागले होते आणि आपण रांगत होतो..तिसरी क्रांती अतिशय वेगाने डिजिटलायझेशन आणि रोबोटिक्सपर्यंत येऊन ठेपली. वेगवान इंटरनेटने चौथ्या औद्योगिक क्रांतीची सुरुवात २०१४ मध्ये झाली. याचाच पुढचा टप्पा म्हणजे, २०२० पासून पाश्चात्य जग कृत्रिम बुद्धिमत्तेने (एआय) पुढे काय काय होणार यांचे आडाखे बांधण्यात दंग आहे, त्यावर मुलभूत संशोधन वेगाने सुरू आहे, त्यासाठीची संसाधने त्यांनी वाढवली आहेत..या पार्श्वभूमीवर आजघडीला आपण काय करत आहोत, कशाला प्राधान्य देत आहोत आणि कुणाला डोक्यावर घेत आहोत या प्रश्नाचे उत्तर त्या त्या व्यक्तीच्या विचारसरणीनुसार, जडणघडणीनुसार येईल. सबब इथे त्यावर भाष्य करण्यात अर्थ नाही. कारण अनेकांना मध्ययुगीन काळात जगण्याची घाई झाली आहे, यावर ऊर्जा खर्च करण्यात अर्थ नाही. तूर्तास लॉरेंट सिमॉन्सचे कौतुक करतो. जगाच्या कामी येईल असे काही या मुलाच्या हातून घडले तर तो दिवस त्याच्यासाठी किती अभिमानाचा असेल नाही का!८३८०९७३९७७(लेखक समाजस्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे साहित्यिक आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.