One-sided Victory : सुरुवातीला अटीतटीच्या मानल्या गेलेल्या, पण प्रत्यक्ष मतमोजणीत एकतर्फी ठरलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या लक्षवेधी निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव करून सत्तेवर आलेल्या भाजपप्रणीत महायुतीचे हार्दिक अभिनंदन! देशभरातील कोणाही राजकीय पंडीतांनी, माध्यमांनी आणि अगदी जनतेनेही इतका एकतर्फी विजय अपेक्षिला नव्हता.
लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर ते विधानसभा निवडणूक प्रचाराच्या अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत ही निवडणूत अटीतटीची होईल, कदाचित निसटत्या बहुमताने महायुती सत्तेवर येईल, बहुमतासाठी त्यांना प्रसंगी छोट्या पक्षांच्या-अपक्षांच्या नाकदुऱ्या काढाव्या लागतील, असा अनेकांचा कयास होता.
काहींना महाविकास आघाडीच सत्तेत विराजमान होईल, असा विश्वास वाटत होता. विजयाची संधी दोहो बाजूंना आहे, याकडे सारी परिस्थिती अंगुलीनिर्देश करीत होती. प्रत्यक्षात हे सारे आडाखे फोल ठरले. विश्वासार्हता गमावलेल्या एक्झिट पोलच्या आकड्यांच्याही पुढे धाव घेत महायुती सत्तेवर विराजमान होते आहे.
विधानसभेच्या २८८ पैकी २२५ हून अधिक जागा महायुती जिंकत असताना विरोधी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांची प्रत्येकी वीस जागा मिळवतानाही दमछाक झाल्याचे लाजिरवाणे चित्र पुढे आले. धार्मिक राजकारणाच्या, ध्रुवीकरणाच्या विरोधात असलेल्या; धर्मनिरपेक्षतेची कास धरणाऱ्या अनेकांना हा निकाल पटणारा नसेल.
त्यामुळेच सकाळी मतमोजणीचे कल जाहीर व्हायला लागल्यापासून अनेकांचा टाळा वासला. ईव्हीएमच्या गैरवापरापासून ते निवडणूक आयोगाने नंतर जाहीर केलेल्या वाढीव टक्केवारीचा दाखला देत निकालांवर शंका घ्यायला सुरूवात झाली. ही विश्लेषणे, दावे-प्रतिदावे पुढची पाच वर्षे होत राहतील. लोकशाहीमध्ये ते होणेही अपेक्षित. त्याबाबत या घडीला काही भाष्य करणे उचित ठरणारे नाही. ‘जो जिता वही सिकंदर’ हे आत्ताचे वास्तव, त्याचे स्वागत!
महाराष्ट्राच्या मातीत उभे राहिलेले दोन पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, फोडले गेले किंवा फुटले तेव्हा शरद पवार, उद्धव ठाकरेंसह काँग्रेसच्या नेत्यांनीही महाराष्ट्र गद्दारांना कधीच माफ करणार नाही, असा दावा केला होता. विशेषतः एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या आमदारांना ठाकरे यांच्या पक्षाने सळो की पळो करून सोडले होते. लोकसभा निवडणुकीत त्याचे भयावह प्रत्यंतर महायुतीला आले.
विधानसभा निवडणुकीत मात्र लोकांनी गद्दारीच्या मुद्द्याला कवडीचीही किंमत दिली नसल्याचे निकालांवरून स्पष्टपणे जाणवते. हे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या बाबतीत खरे ठरले. ‘नव’नैतिकतेचा हा विजय मानावा लागेल. लोकसभेत सपाटून झालेल्या पराभवामुळे सावध झालेल्या महायुतीने, विशेषतः भाजपने अत्यंत सावधपणे, बारकाईने काम केले. गेमचेंजर ठरलेल्या ‘लाडकी बहीण’ सारख्या योजनांपासून ते प्रचारातील बारीक-सारीक मुद्द्यांपर्यंत नेटकी बांधणी करीत कोणताही मतदारसंघ हातातून निसटणार नाही याची काळजी घेतली गेली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिस्तबद्ध यंत्रणेने त्यामध्ये मोलाची कामगिरी बजावली. त्याची मधुर फळे महायुतीला झालेल्या भरभरून मतदानातून मिळाली. बाकी साऱ्या बाबींवर महायुतीचे नियंत्रण होते, मात्र प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात तीव्रतेने पुढे आलेल्या शेती प्रश्नांमुळे ते सुटल्यासारखे वाटत होते. गेली दोन वर्षे सोयाबीन आणि कापसाचे पडलेले भाव महायुतीला गोत्यात आणतील, असा अनेकांचा कयास होता.
हमीभावात वाढ, भावांतर योजना, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, अशा घोषणा करून भाजपने चपळाईने ही परिस्थिती नियंत्रणात आणली. हे प्रश्न सुटले नसले, नजीकच्या भविष्यात सुटणारे नसले तरी शेतकऱ्यांचा उद्रेक मतांत परिवर्तीत झाल्याचे दिसले नाही. त्या अर्थाने ही निवडणूक शेती प्रश्नांना बेदखल करणारी ठरली. शेतकरी वर्ग मतदार म्हणून कितीही मोठा असला तरी तो स्वतःच्या व्यवसायाच्या हितापेक्षा स्थानिक राजकारणासह अन्य मुद्द्यांना अधिक महत्व देतो, हेच वास्तव पुन्हा एकदा उघडपणे सामोरे आले. स्वाभाविकच नजीकच्या भविष्यात शेती प्रश्नांवरचा झाकोळ कायम राहील असे दिसते.
महायुतीच्या विजयाचे एक शिल्पकार देवेंद्र फडणवीस यांनी विजयानंतर केलेल्या पहिल्या ट्वीटमध्ये ‘मोदी है तो मुमकीन है’ याबरोबरच ‘एक है तो सेफ हैं’ असा नारा दिला आहे. निवडणुका संपल्यानंतरही धार्मिक ध्रुवीकरणाचे प्रयत्न जारी राहणार असल्याचाच हा संदेश मानावा लागेल. कोणतीही कटुता न बाळगता विरोधकांना सन्मान देऊन नवे सरकार काम करेल, ही अपेक्षा पाशवी बहुमतामुळे कदाचित फोल ठरेल.
एक मात्र खरे की या निवडणुकीने फडणवीस यांचे महाराष्ट्राच्या राजकारणातील आणि भाजपमधील स्थान आणखी पक्के झाले. त्याचबरोबर गेल्या अर्धशतकाहून अधिक काळ महाराष्ट्राच्या राजकारणावर मांड ठोकून असलेल्या शरद पवार यांच्या हातातून राज्याची सूत्रे निसटू लागली आहेत हेही वास्तव पुढे आले.
पवारांना महाराष्ट्राच्या आणि एकूणच देशाच्या राजकारणातून बेदखल करण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना मिळालेले हे मोठे यश मानावे लागेल. शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांचीही तीच गत झाली आहे. या दोन्ही नेत्यांकडे आता अर्ध्यातीलही अर्धे पक्ष उरले आहेत. त्याचबरोबर निवडणुकीनंतर बहुमताचा आकडा गाठण्यासाठी आपल्याला मोठी किंमत येईल, अगदी मुख्यमंत्रीपदही मागता येईल, असे मनातील मांडे खाणाऱ्या अपक्षांची किंमत महायुतीच्या दणदणीत बहुमताने संपवून टाकली.
दुसरीकडे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून चर्चेत असलेले बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांसारख्या अभ्यासू, संयमी नेत्यांचा पराभव एकूणच विचारी लोकांना, जाणत्यांना हळहळ वाटायला लावणारा ठरावा.
या निवडणुकीने गेल्या पाच वर्षांत हरवलेले राजकीय स्थैर्य महाराष्ट्राला बहाल केले आहे, ज्याचा विकासाला उपयोग होऊ शकतो. त्याचबरोबर येत्या काळात महायुती सरकारला काही समस्यांनाही तोंड द्यावे लागेल. लाडकी बहीणसह जाहीर केलेल्या वेगवेगळ्या लोकानुनायी योजनांमुळे आधीच तोळामासा झालेली आणि कर्जाच्या बोजाखाली दबलेली राज्याची तिजोरी कशी भरायची आणि ती नाही भरता आली तर निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांचे काय करायचे, याचा निर्णय करावा लागेल.
त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याच्या दिलेल्या आश्वासनाचे काय होणार, याही यक्षप्रश्नाचे उत्तर महायुतीला द्यावे लागेल. रेवडी वाटपाचा कार्यक्रम कायम ठेवण्याचे ओझे बाळगत आर्थिक शिस्त पाळून महाराष्ट्राला आघाडीचे राज्य बनवणे ही खायची गोष्ट नाही.
गेली दहा वर्षे कृषी खात्याचा पुरता बोजवारा उडाला आहे. दीर्घकाळ महाराष्ट्राला स्वच्छ आणि कार्यक्षम कृषीमंत्री मिळालेला नाही. तो यावेळी तरी मिळावा. बहुजनांची रोजी-रोटी आणि सगळ्यांचीच अन्नसुरक्षा अवलंबून असलेल्या शेती क्षेत्रापुढील आव्हानांच्या दशमुखी रावणाला पराभूत करायचे असेल किंबहुना त्यापासून शेतकऱ्यांचे संरक्षण करायचे असेल तर हे करावेच लागेल. या आव्हानांचा सामना करण्याचे सामर्थ्य सत्तारूढ होणाऱ्या महायुती सरकारला लाभावे यासाठी शुभेच्छा!
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.