
Solapur News: मोहोळ तालुक्यात पशुधनामध्ये लम्पी आजाराचा शिरकाव झाला आहे. त्यामध्ये दोन पशुधनाचा मृत्यू, तर तब्बल ४७ पशुधन बाधित असल्याची माहिती पंचायत समितीचे पशुधन अधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी दिली. अहिल्यानगर जिल्ह्यात आतापर्यंत ३४७ पशुधन लम्पी बाधित आढळून आले असून १७३ पशुधन उपचारातून बरे झाले आहे. सध्या १६० पशुधनावर उपचार सुरू असून आतापर्यंत १४ पशुधनाचा मृत्यू झाला आहे. पशुसंवर्धन विभागाने अहिल्यानगरमध्ये ८७ प्रतिबंधित केंद्रे जहीर केली आहेत.
मोहोळ तालुक्यात पुन्हा ‘लम्पी’ने शिरकाव केल्याने शेतकरी चिंतेत आहेत. ४७ बाधित पशुधनापैकी ३८ पशुधन लसीकरणामुळे व इतर उपचारामुळे बरे झाले आहे.लम्पीमुळे सोलापूरचे प्रभारी जिल्हाधिकारी कुलदीप जंगम यांनी जिल्हा नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे जनावरांचा आठवडा बाजार, बैलांच्या शर्यती व जनावरांची वाहतूक करावयाची असेल तर २ दिवसांपूर्वीचे ‘गोटपॉक्स’ लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून घेणे बंधनकारक आहे.
मोहोळ तालुक्यात बहुतांश जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे. जनावरांच्या गोठ्यात फवारणी करून गोचिड निर्मूलन करण्यासाठी दवाखान्यात औषधे उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांनी घाबरून न जाता नजीकच्या दवाखान्यात बाधित जनावरांना उपचार करून घ्यावेत, असे आवाहन पशुसंवर्धनने केले आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात गायवर्गीय पशुधनाची संख्या जवळपास १४ लाखांच्यावर आहे. काही दिवसांपासून लम्पीचा प्रादुर्भाव वाढू लागला असून आतापर्यंत जिल्ह्यात ३४७ पशुधन बाधित झाले. त्यात राहाता तालुक्यात ७६, कोपरगावला ४४, कर्जतला ५३, जामखेडला पाच, अकोल्याला ६, राहुरीला ५२, संगमनेरला २१, शेवगावला ७, श्रीगोंदा येथे ८, नेवाशात ४८ पशुधन बाधित असून श्रीरामपूर तालुक्यात मात्र एकही बाधित पशुधन नाही. आतापर्यंत १४ पशुधनाचा मृत्यू झाला असून सध्या १६० पशुधनावर उपचार सुरू आहेत. राहुरी, राहाता, शेवगाव वगळता अन्य तालुक्यात सर्व पशुधन बरे होत आहे. आतापर्यंत ८७ गावांत बाधित पशुधन आढळले. त्या गावांसह परिसरातील पाच किमी आंतरावर नियंत्रित क्षेत्र केले आहे.
राहात्यात १२ पशुधनाचा मृत्यू
अहिल्यानगर जिल्ह्यात आतापर्यंत लम्पीने बाधित झालेल्या पशुधनाची संख्या राहाता तालुक्यात अधिक आहे. ३४७ पैकी एकट्या राहाता तालुक्यात ७८ बाधित पशुधन असून १२ पशुधनाचा मृत्यू झाला आहे. शेवगाव आणि राहुरीत प्रत्येकी एका पशुधनाचा लम्पीने मृत्यू झाला आहे. राहात्यात ७६ हजार, शेवगावात ७० हजार तर राहुरीत १ लाख ३५ हजार जनावरांना पशुसंवर्धन विभागाने लम्पीचे लसीकरण केले असल्याचे सांगण्यात आले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.