Kharif Sowing Agrowon
संपादकीय

IMD Forecast : महाराष्ट्रावर दुष्काळाची छाया

ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पाऊस सर्वसाधारण राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज वरवर दिलासादायक वाटत असला, तरी त्याच्या तपशीलात गेल्यास मात्र दुष्काळाची दाहक चाहूल लागल्याचे स्पष्टपणे दिसते.

रमेश जाधव

Total Average Rainfall : मॉन्सूनच्या अखेरच्या टप्प्यात देशात सर्वसाधारण म्हणजे सरासरीच्या ९४ ते १०६ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. जून आणि जुलै या दोन महिन्यांतील एकूण पावसाने सरासरी गाठली आणि आता ऑगस्ट, सप्टेंबरमधील एकूण पाऊस सरासरीइतका राहण्याचा अंदाज आहे. म्हणजे यंदा एल-निनो सक्रिय झालेला असतानाही देशात पाऊसमान सर्वसाधारण राहील, असे चित्र वरवर दिसत असले तरी त्याच्या तपशीलात गेल्यास मात्र स्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचे स्पष्ट होते. कारण ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांची मिळून पावसाची गोळाबेरीज होईल; परंतु ऑगस्ट महिन्यात मात्र पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे. त्याचा खूप मोठा परिणाम पिकांच्या उत्पादनावर होईल. कारण यंदा मॉन्सून उशिरा आला आणि जूनमध्ये सरासरीच्या ५४ टक्केच पाऊस झाला.

जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यात चांगला पाऊस झाल्यामुळे दोन महिन्यांची सरासरी भरून निघाली. परंतु जूनमध्ये पावसाने ओढ दिल्यामुळे पेरण्या उशिरा झाल्या. त्यामुळे पिकांची शाखीय वाढ अजून पुरेशी नाही. ऑगस्टमध्ये पावसाने दडी मारली तर तो ताण सहन करण्याइतकी पिकांची वाढ झालेली नाही. त्यामुळे पिकांनी कशीबशी तग धरली तरी उत्पादनाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे हवामान विभागाने ऑगस्टमध्ये देशात ज्या ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याचा अंदाज दिला आहे; तो सगळा पट्टा भात, कापूस, कडधान्ये आणि ऊस या पिकांचा आहे. त्यामुळे पीक उत्पादनात मोठा खड्डा पडणार असल्याने अन्न सुरक्षेचा प्रश्‍न गंभीर होऊ शकतो.

महाराष्ट्रासाठी तर स्थिती विशेष काळजी करण्यासारखी आहे. ऑगस्टमध्ये पूर्व भारतातील काही ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याचा अंदाज आहे. पण महाराष्ट्रात मात्र विदर्भाचा काही भाग वगळता राज्याच्या बहुतांश भागात पाऊस ओढ देण्याची शक्यता आहे. उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, खानदेश आणि विदर्भातील बहुतांश भागांत ऑगस्टमध्ये पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे. ऑगस्टमध्ये या ठिकाणी मॉन्सून कमजोर राहील किंवा पावसात मोठे खंड पडतील, अशी चिन्हे आहेत. त्यामुळे बहुतांश ठिकाणी खरीप हंगाम पुरता हातचा जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या काही वर्षांमध्ये परतीच्या पावसाने आपला मुक्काम लांबवल्याचा अनुभव महाराष्ट्र घेत आहे. त्यामुळे अगदी ऑक्टोबरपर्यंत पाऊस पडतो. त्याचा फायदा रब्बी हंगामासाठी होतो. परंतु यंदा मात्र तशी स्थिती दिसत नाही. शिवाय जुलै महिन्याची एकूण सरासरी बघितली तर चांगला पाऊस झाल्याचे दिसते.

परंतु प्रत्यक्षात कमी दिवसांत जास्त पाऊस झाला. गेल्या पाच वर्षांतील सर्वाधिक अतिवृष्टीच्या नोंदी या महिन्यात झाल्या. भीजपाऊस झाला तर तो जमिनीत मुरतो आणि त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढते. परंतु कमी वेळेत जोरदार पाऊस झाल्यास पाणी वाहून जाते. त्यामुळे यंदा रबी हंगामही शेतकऱ्यांची कसोटी बघणाराच ठरेल, असे एकंदर चित्र आहे.

थोडक्यात, हवामान विभागाचा अंदाज नीट समजून घेतला तर दुष्काळाचे संकट महाराष्ट्राचे दार ठोठावत असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. त्यापासून बोध घेऊन केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर पडण्यासाठी पाठबळ देते की नाही, यावर सगळी गणिते अवलंबून आहेत. पीकविमा हा बुडत्याला काडीचा आधार म्हणून ठीक आहे; परंतु त्या पलीकडे जाऊन सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार का, हा खरा प्रश्‍न आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Diwali Festival : सांस्कृतिक सपाटीकरणात सापडलेली दिवाळी

Safflower Cultivation : करडईची सुधारित पद्धतीने लागवड

Spice Industry : चटणी, मसाला उद्योगातून समृद्धी

Agriculture Development : कृषी क्षेत्रामध्ये झांबियाची वाढतेय गुंतवणूक

Weekly Weather : ईशान्य मॉन्सून महाराष्ट्राबाहेर मार्गस्थ

SCROLL FOR NEXT