Indian Agriculture : देशात फळे-भाजीपाला उत्पादनाचा पहिला अंदाज केंद्रीय कृषी मंत्रालयाने नुकताच जाहीर केला आहे. त्यामध्ये यंदा देशात कांदा, टोमॅटोचे उत्पादन घटले आहे, तर बटाटा उत्पादनात चांगलीच वाढ झाली आहे. या उत्पादनवाढीसाठी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी शेतकरी, शास्त्रज्ञ आणि सरकारी धोरणांना श्रेय दिले असले तरी खरे श्रेय हे शेतकऱ्यांचेच आहे.
पाण्याची सोय असलेले शेतकरी नगदी पिके म्हणून फळे-भाजीपाल्याची लागवड करतात. अशा शेतीत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होतो. फळे-भाजीपाल्यासाठी संरक्षित शेतीचा पण वापर केला जातो. हे सर्व अत्यंत खर्चीक असून त्यासाठी शेतकरी मोठी गुंतवणूक करतात.
नैसर्गिक आपत्तीत सर्वाधिक नुकसान हे फळे-भाजीपाल्याचे होते. त्यावर मात करीत शेतकरी फळे-भाजीपाल्याची उत्पादन वाढवीत आहेत. असे असताना दर्जेदार रोपे-कलमांपासून ते फळे-भाजीपाला निर्यातीपर्यंत देशात व्यापक काम झाले पाहिजेत.
आजही कोणत्याही फळपिकांची लागवड करायची असेल, तर शेतकऱ्यांना दर्जेदार आणि खात्रीशीर रोपे-कलमे मिळत नाहीत. फळे-भाजीपाल्याच्या लागवडीमध्ये बहुतांश शेतकरी अजूनही पारंपरिक पद्धतीनेच लागवड आणि व्यवस्थापन करतात.
हवामान बदलाच्या काळात बहुतांश फळपिकांचे बहर नियोजन विस्कळीत झाले आहे. त्याचे व्यवस्थापन शेतकऱ्यांसाठी फारच जिकिरीचे ठरतेय. फळे तसेच भाजीपाल्यावरील काही घातक रोग-किडींचे अजूनही प्रभावी नियंत्रण होताना दिसत नाही. अशा एकंदर प्रतिकूल परिस्थितीमध्ये शेतकरी फळे भाजीपाल्याचे उत्पादन वाढवीत आहेत.
देशात या वर्षी कांदा-टोमॅटोचे उत्पादन घटले तरी या दोन्ही पिकाला योग्य दाम तर सोडा बाजारात कोणी विचारायलाच तयार नाही. कांदा चाळीतच शेतकऱ्यांचा कांदा सडत आहे, तर टोमॅटोचा लाल चिखल शेतशिवारात दिसतोय.
खरे तर कांदा, टोमॅटो उत्पादनात देशात राज्याचा वरचा क्रम लागतो. इतरही फळे-भाजीपाला उत्पादनात राज्याची आघाडी आहे. असे असताना फळे-भाजीपाल्यांचा क्लस्टरनिहाय मूल्यसाखळी विकास न झाल्यामुळे त्यांची माती होतेय. बटाटा हे नाशिवंत पीक नसल्याने विशिष्ट हंगामात दर उतरले तरी ते फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत नाही.
अनेक वेळा सरकारी धोरणांचा फटका पण कांदा-टोमॅटोसह एकंदरीतच शेतीमालास बसतो. कांद्याच्या बाबतीत तर साठा मर्यादा, निर्यात निर्बंध, अनावश्यक आयात अशी अस्त्रे वापरून दर नियंत्रणात ठेवण्याचे काम सरकार करते. एवढेच नव्हे तर काढणीपश्चात सोयीसुविधेच्या अभावी देशात ३० टक्के फळे-भाजीपाला फेकून द्यावा लागतो. असे असताना उत्पादनवाढीचे श्रेय सरकार घेत असेल तर ही बाब दुर्दैवीच म्हणावी लागेल.
कांदा, टोमॅटो असो की बटाटा तो उत्पादित होत असलेल्या भागातच त्यावर प्रक्रिया झाली पाहिजेत. हंगामात शेतीमाल हाती आला असताना दर पडल्यावर त्यांच्या दीड, दोन महिने शीत साठवणुकीच्या पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करायला हव्यात.
अतिरिक्त फळे-भाजीपाला तसेच प्रक्रियायुक्त पदार्थ जगभराच्या बाजारपेठांत पाठवायला हवेत. त्यासाठी नवनव्या बाजारपेठांचा शोध घेऊन तिथे शेतीमाल कसा पोहोचेल, हे पढायला हवे. फळे-भाजीपाल्याचे दर पडतील असे कोणतेही निर्णय शासनाने घेऊ नयेत.
टोमॅटो, कांदा, बटाटा या भाजीपाला पिकांचे साठवणूक, मूल्यवर्धन, विक्री, निर्यात यासाठी ऑपरेशन ग्रीन अंतर्गत ‘टॉप’ अभियान राबविले. परंतु त्याचाही काहीही फायदा झालेला दिसत नाही.
नैसर्गिक आपत्तीत तसेच बाजारात दर पडून शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास त्यांना तत्काळ अनुदानाच्या स्वरूपात मदत झाली पाहिजेत. असे झाले तरच उत्पादन घटले अथवा वाढले तरी त्याचा फटका उत्पादकांना बसणार नाही.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.