Climate Change
Climate Change Agrowon
संपादकीय

Climate Change : ऋतुचक्र बदलातील अनिश्चित शेती

डॉ. नागेश टेकाळे

वातावरण बदल (Climate Change) म्हणजे काय दादा? माझ्या मराठवाडा भेटीमध्ये एका साध्या भोळ्या शेतकऱ्‍याने मला विचारलेला प्रश्न. त्याला समजेल असे समर्पक उत्तर काय द्यावे, या विचारात मी असताना अचानक सुचले, बाबा! तुमचा हा दुष्काळी भाग आहे ना? एक तरी झाड दिसतंय कुठे, डोंगरावर गवताचे पाते तरी आहे का? पण पाऊस तर मुसळधार पडतोय, खरे आहे ना! यालाच वातावरण बदल (Global Warming) म्हणतात.

पूर्वी पावसाळ्यात आषाढ आणि श्रावण सरी तर असतच पण भाद्रपदामध्ये पडणारा पाऊस रब्बीला पोषक आणि ओलावा धरून ठेवणारा, तर दिवाळीची कडक थंडी रब्बी भरभरून पिकवणारी असायची. आज हे असे चित्र आहे काय? हे महिने आणि पावसाला जोडलेली नक्षत्रे आता कुठे गेली आहेत? भारतीय कृषीचा सहा दशकापूर्वीचा हा साक्षीदार आता लुप्त होण्याच्या मार्गावर आहे.

पूर्वी पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा या तीनही ऋतूंना आणि त्यांना जोडलेल्या नक्षत्रांना एक नियमितपणा होता, त्यांच्यामध्ये सुसूत्रता होती. सात जूनचे मृगाचे आगमन निश्चित होते, पण आता निसर्ग चित्रच पूर्ण बदलले आहे आणि याचा परिणाम शहरी भागापेक्षा ग्रामीण भागावर जास्त झाला आहे. तेथील शेतकरी, शेती आणि त्याचे हातावरचे पोट या वातावरण बदलामुळे संकटात सापडले आहे. मुसळधार ढगफुटीसारखा पाऊस, तो सुद्धा अनियमित, अनियंत्रित याला जोडून काही भौगोलिक भूभाग कोरडाच राहणे हे वातावरण बदलच आहे.

ऑक्टोबरची उष्णता हा कृषी चक्राचाच एक आवश्यक भाग. यामुळेच जमिनीमधील वाफसा ४०-४५ टक्के मर्यादित राहून दिवाळीपर्यंत रब्बी पेरण्या पूर्ण होत. त्यानंतर रुजणाऱ्‍या अंकुरांना दिवाळीमधील कुडकुडणारी थंडी तीन महिन्यांनी येणाऱ्या फुलोऱ्‍यास मदत करीत असे. आज परिस्थिती वेगळी आहे. दिवाळी आठ दिवसांवर आली तरी शेतातील पाणी हटत नाही. केव्हा खरीप पिके काढायची, केव्हा वाफसा येईल, केव्हा मशागत करायची आणि केव्हा पेरणी करायची?

पिकाला हवी असणारी थंडी न मिळाल्यामुळे उत्पादनात घट येणार, ते वाढावे म्हणून रासायनिक खतांचा मारा होणार. त्यामुळे शेतीचे वाळवंट होणार नाही तर काय? पुढील हंगामात पुन्हा असाच पाऊस झाला तर शेतात पाणी साचणार कारण पाणी मुरण्यासाठी आम्ही काळ्या मातीत सेंद्रिय तत्त्व आपण शिल्लकच ठेवलेले नाही. ऑक्टोबर महिना सुरू होऊन दोन आठवडे झाले. पाऊस अजुनही चालूच आहे, नद्यांना पूर येताहेत, धबधबे कोसळताहेत, पिकांचे नुकसान तर होतच आहे.

पण वाईट याचे वाटते की हे सर्व पाणी जमिनीत न मुरता वाया जात आहे. एकीकडे शेतकरी उध्वस्त होत आहे, तर दुसरीकडे शहरवासीय पाण्याची टंचाई दूर झाली म्हणून आनंदात आहेत. ऑक्टोबरमध्येही पडणारा पाऊस पाहून वाटते की मॉन्सूनला आता अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागरामधील कमी दाबाचे पट्टे, चक्रीवादळे हेच नियंत्रित करीत आहेत. समुद्राचा पृष्ठभाग वेगाने गरम होत आहे. त्यामुळेच ढग निर्मिती आणि त्यातील पाण्याचे वजन वाढत आहे. हेच ढग भूपृष्ठाकडे वळून नेहमीच्या पावसापेक्षा लहान मोठ्या ढगफुटी आणि विजांच्या कडकडातून कोसळत आहेत. समुद्र, वृक्ष आणि घनदाट जंगल यांचा आता संबंधच उरला नाही.

भारताचा या वर्षीचा मॉन्सून सरासरीपेक्षा ७ टक्के जास्त

झाला आहे. काही ठिकाणी त्याने सरासरी ओलांडली, कुठे सरासरी गाठली तर इतर अनेक ठिकाणी त्याला सरासरी सुद्धा गाठता आली नाही. यावर्षी पाऊस पडत गेला, बेफाम पडत गेला पण नेमका पिकांच्या फुलोऱ्‍यात असताना तो गायब होता. मागील एक आठवड्यापूर्वी केंद्र सरकारने खरिपाचे धान्य उत्पादन अंदाजे १४९.९ दशलक्ष टन होईल, असे म्हटले आहे. मागील वर्षी हेच उत्पादन १५६ दशलक्ष टन होते.

वातावरण बदल आणि अनियंत्रित, अनियमित पावसाचा परिणाम यापुढे खरीप पिकांवर जास्त जास्त होणार आहे, हे या दोन आकड्यांवरून आपल्या लक्षात येईल. या वर्षीचा पाऊस १०७ टक्क्याच्या पुढे गेला आहे आणि अजुनही तो कोसळतच आहे. मागील वर्षी तो ९९ टक्के बरसला होता. पावसाच्या लहरीपणाचे उदाहरण म्हणजे उत्तर पूर्वेकडील राज्ये. तेथे तो सरासरीपेक्षा १७ टक्के कमी आहे तर मध्य भारतात ते १९ टक्के जास्त आहे. दक्षिणेकडे सुद्धा तो सरासरीपेक्षा २४ टक्के जास्त कोसळला आहे.

खरिपामध्ये भात हे आपले मुख्य पीक आहे. देशाची भात उत्पादन क्षेत्रे, पश्चिम आणि पूर्व उत्तर प्रदेश, प. बंगाल, बिहार, झारखंड आणि केरळमध्ये मॉन्सूनचा पाऊस कमी झाला. त्यामुळे आता भाताचे उत्पादन आणि बाजारातील दर यावर निश्चितच परिणाम होणार. ज्यावेळी पेरणी सुरू असते तेव्हा वास्तविक पावसाची उघाड असते. यावर्षी अनेक राज्यात या पावसाने शेतकऱ्‍यांना हातात तिफण सुद्धा धरू दिलेली नाही.

भातासह इतरही अन्नधान्य पिके, कडधान्ये, तेलबिया यांचे उत्पादन घटून अन्नसुरक्षेची समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जातेय. थोडक्यात यावर्षीचे खरीप क्षेत्र अंदाजे १४ लाख हेक्टरने कमी झाले आहे आणि त्याचा सर्वांत जास्त परिणाम गरीब अल्पभूधारक शेतकऱ्‍यांवर होणार आहे. पावसाने खरिपाची दाणादाण उडवली असताना रब्बीबाबत मात्र केंद्र सरकार आशावादी आहे. त्यांच्या अहवालानुसार खरिपामधील भात उत्पादन अंदाजे सात दशलक्ष टनाने कमी होणार असले तरी गहू, उत्पादन वाढण्याची शक्यता आहे.

आनंदाची बातमी म्हणजे सर्व उपलब्ध जलस्रोत सध्या तुडुंब भरले आहेत. या पाण्याचा उपयोग रब्बी धान्य उत्पादनासाठी होणार आहे. भारताकडे आज राखीव अन्नधान्य साठा आहे. आपण गरीब राष्ट्रांना सुद्धा युनोच्या माध्यमातून अन्नधान्य पुरवठा करतो. मात्र, खरिपाच्या थोड्या अनिश्चित वातावरणामुळे आपल्या धान्य निर्यातीवर निश्चितच काही प्रमाणात बंधने येऊ शकतात. केंद्र शासनाने पुढील तीन महिने गरिबांना मोफत धान्य वाटपाची योजना वाढवली आहे. याचा परिणाम राखीव धान्य साठ्यावर होऊ शकतो. जगामधील अनेक गरीब तसेच इतर राष्ट्रांना सुद्धा भाताचा घास देणाऱ्‍या आपल्या देशाला यावर्षी तो आयात करावयास लागू नये एवढेच!

अन्नधान्य उत्पादन आणि अन्नसुरक्षा ही वातावरण बदल आणि गरिबांशी जोडलेली आहे. वातावरण बदलामुळे सर्व प्रथम गरीब अल्पभूधारक शेतकरी प्रभावित होणार आहेत. शासनाने कृषी उत्पादनाची खरीप-रब्बीची आकडेवारी जाहीर करताना या गरीब शेतकऱ्‍यांसाठी आपण काय करणार आहोत, हे सुद्धा सांगणे गरजेचे आहे. फक्त मोफत धान्य वाटप करून हा प्रश्न सुटणार नाही उलट गरिबांची जी थोडी फार शेती आहे तिला सुद्धा उत्पादित ठेवणे जास्त महत्त्वाचे आहे.

(लेखक शेती प्रश्नांचे अभ्यासक आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pandharpur News : २ जूनपासून भाविकांना घेता येणार श्री विठ्ठल-रखुमाईचं पदस्पर्श दर्शन!

Summer Heat : दिवसा उकाडा, रात्री तडाखा

Soybean Seeds : उगवणशक्ती तपासूनच सोयाबीनचे घरचे बियाणे वापरावे

Water Crisis : महाडला पाणीटंचाईचे उग्ररूप

Water Crisis : जिंतूर तालुक्यात जलसंकटाची गडद छाया; सेलू तालूक्याला प्रशासनाचा आधार सोडणार आवर्तन

SCROLL FOR NEXT