India Youth Issue Agrowon
संपादकीय

India Youth : तरुणांचा म्हातारा देश!

Article by Vijay Sukalkar : तरुणांकडून काम करून घ्यायचे असेल, तर कौशल्यवृद्धीबरोबर त्यांचे मानसिक-शारीरिक आरोग्यही चांगले पाहिजे

विजय सुकळकर

India's problem : आपण जागतिक आर्थिक महासत्तेची स्वप्ने पाहत आहोत. भारताची अर्थव्यवस्था झपाट्याने वाढत असल्याचे भासविले जातेय. परंतु संभाव्य विकासदर सरासरी सहा टक्के असा राहिला, तर २०४७ पर्यंत भारताची अर्थव्यवस्था निम्न मध्यम स्वरूपाची राहील. भारत वेगाने विकसित झाला नाही तर हा देश श्रीमंत होण्याआधी म्हातारा होईल, असे परखड मत भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केले.

हा केवळ वरवरचा अंदाज नाही तर यासाठी त्यांनी तर्कशुद्ध आणि अभ्यासपूर्ण विश्‍लेषणसुद्धा दिले आहे. भारताची आजची संभाव्य वाढीची क्षमता सहा टक्के असून, १२ वर्षांनी देशाचा विकासदर दुप्पट होईल, तर तो चौपट होण्यासाठी २४ वर्षे लागतील. सध्या देशाचे दरडोई उत्पन्न हे अडीच हजार डॉलरहून कमी आहे.

त्यातही चार पट वाढ झाल्यास ते दहा हजार डॉलरपर्यंत पोहोचेल. यानुसार विचार केल्यास देशाचा विकासदर वाढला, तरी २०२४ पर्यंत देश श्रीमंत या वर्गवारीत न जाता तो निम्न मध्यमच असेल. आज आपण तरुणांचा देश म्हणून सर्वत्र शेखी मिरवतोय. याच मनुष्यबळाच्या आधारे आपण जागतिक महासत्तेची स्वप्ने पाहतोय.

परंतु तरुणांच्या देशात बहुतांश जणांच्या हाताला काम नाही. निर्मिती उद्योग आणि सेवा क्षेत्राची अपेक्षित वाढ नाही. बहुतांश तरुणांमध्ये व्यावसायिक शिक्षण आणि त्यामुळेच कौशल्याच्या अभावाने बेरोजगारीच्या सर्वोत्तम पातळीवर आपण आहोत. आज मोठ्या संख्येने तरुण असलेला वर्ग एकदाच वृद्धदेखील होईल. त्या वेळी वृद्धांच्या लोकसंख्येचा भार अर्थव्यवस्थेवर पडणार आहे, याचा विचार आज कोणीही करताना दिसत नाही.

देशात सर्वत्र विकसित भारत संकल्प यात्रा सुरू आहे. या यात्रेला ग्रामीण भागातून जोरदार विरोधही होत आहे. प्रगत देशात मनुष्यबळ महागडे असते. त्या तुलनेत विकसनशील भारत देशात ते स्वस्त आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. अशावेळी प्रगत देशातील गुंतवणूक भारत देशात करून त्याची येथील मनुष्यबळाशी सांगड घालणे अपेक्षित होते.

अशा प्रकारच्या संयोगातून निर्मिती आणि सेवा क्षेत्रात झपाट्याने वाढ करून वस्तू-उत्पादने तसेच सेवाही जगभर निर्माण करण्याची संधी आपल्याला होती. परंतु ही संधी आपण गमावत आहो. ही संधी चीनने साधली आणि आज आपण पाहतोय चीनची अर्थव्यवस्था झपाट्याने वाढतेय. भारतासह इतरही अनेक देशांत चिनी बनावटीच्या अनेक वस्तू-उत्पादने दिसतात.

चीनमध्ये मनुष्यबळ मुबलक आहे. चीनचे मनुष्यबळ सुदृढ आणि स्वस्त आहे. अशा मनुष्यबळाला कौशल्यपूर्ण शिक्षण देऊन त्यांनी त्यांच्यात कौशल्यवृद्धी साधली. परकीय गुंतवणूकही चीनमध्ये झाली. म्हणून संपूर्ण चीनचा कारखाना झाला. आणि सलग तीन दशके दहा टक्क्यांहून अधिक विकासदराने प्रगतीची भरारी चीनने घेतली.

आपल्याकडे नेमके याच्या उलट घडत आहे. आपण मनुष्यबळ विकासाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. आपल्याकडे व्यावसायिक शिक्षणाचा प्रचंड अभाव आहे. त्यामुळे तरुणांमध्ये कौशल्यवृद्धी झाली नाही. अलीकडे काही कौशल्यवृद्धीचे अभ्यासक्रम, कार्यक्रम घेतले जात आहेत. त्याला फार वेळ झाला असून, ते फारच त्रोटकही आहेत.

तरुणांकडून काम करून घ्यायचे असेल, तर कौशल्यवृद्धीबरोबर त्यांचे मानसिक-शारीरिक आरोग्यही चांगले पाहिजे. आपल्याकडे तरुणांमध्ये सुदृढतेचाही अभाव दिसतो. हाताला काम नसणारे अनेक बेरोजगार मानसिकदृष्ट्या वैफल्यग्रस्त आहेत. शिवाय व्यसनाधीनतेने त्यांना आरोग्याच्या समस्यादेखील निर्माण होत आहेत.

त्यामुळे युवकांची श्रमशक्ती कमी होत आहे. आपल्या अर्थव्यवस्थेच्या संथगतीचे अजून एक कारण आहे. शेतीमाल असो, की कारखान्यातील कोणतेही उत्पादन त्याचे मूल्यवर्धनातही आपण कमी पडतोय. त्यातूनही रोजगाराच्या अनेक संधींना आपण मुक्त आहोत. तरुणांचे आरोग्य, शिक्षण आणि कौशल्यवृद्धीवर लक्ष केंद्रित केले तरच भविष्यात आपल्या अर्थव्यवस्थेचा गाडा रुळावर राहील.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Maharashtra 2026 : दुष्काळाच्या स्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Maharashtra Cabinet Decisions: साखर कारखाने, ऊस शेतकऱ्यांना दिलासा; ७५० कोटींच्या सॉफ्ट लोन धोरणाला मंजुरी, मुख्यमंत्र्यांची माहिती

Dam Water Storage Update: यावल, रावेरातील प्रमुख सिंचन प्रकल्प भरले

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

SCROLL FOR NEXT