Indian Agriculture
Indian Agriculture Agrowon
संपादकीय

Agriculture : महाराष्ट्राच्या शेतीची नवी दिशा

डॉ. भास्कर गायकवाड

महाराष्ट्र राज्याचा विचार केला, तर १७५ लाख हेक्टर क्षेत्रापैकी ३० टक्के क्षेत्रावर तृणधान्ये, २० ते २१ टक्के क्षेत्रावर प्रत्येकी तेलबिया, कडधान्ये, कपाशी आणि पाच टक्के क्षेत्रावर उसाचे पीक घेतले जाते. यांपैकी महाराष्ट्राने कडधान्यांच्या बाबतीत मोठी क्रांती केली. परंतु तेलबियांच्या बाबतीत राज्य मागे आहे. कापसाच्या क्षेत्रात वाढ होत असताना त्याची उत्पादकता कमी आहे. ऊस पिकामध्ये राज्याने मोठी आघाडी घेत साखरनिर्मितीमध्ये देशात पहिला तर देशाने जगात ब्राझीलनंतर दुसरा क्रमांक मिळविला आहे. याचबरोबर ऊस शेतीतून इथेनॉल निर्मितीमध्येही आघाडी घेत आज महाराष्ट्र देशातील अव्वल नंबरचे राज्य झाले आहे. अर्थात, या पाच टक्के उसाच्या क्षेत्रासाठी राज्यातील ६० टक्के पाणी वापरले जाते, यावरही विचार करावा लागेल. राज्याचा विचार केला तर फळे- भाजीपाला उत्पादनामध्ये देशात आघाडी घेतलेली आहे. प्रतिकूल परिस्थितीतही महाराष्ट्राचा शेतकरी देशात सतत अग्रेसर राहिला आहे. देशातील एकूण उत्पादनापैकी ६३ टक्के कांदा, ७५ टक्के केळी, ७५ टक्के संत्रा, ४२ टक्के टोमॅटो, ९० टक्के डाळिंब आणि हापूस आंबा, ७८ टक्के बिनबियांची द्राक्षे महाराष्ट्रात तयार होतात, ही नक्कीच अभिमानाची बाब आहे.

कोकणातील आंबा, काजू, भात शेती याबरोबरच ७२० कि.मी. समुद्र किनाऱ्यातून ५.५० लाख टन माश्यांचे उत्पादन आणि १५०० कोटी रुपयांचे परकीय चलन ही सुद्धा गौरवास्पद कामगिरी महाराष्ट्राने केलेली आहे. पीक उत्पादनाबरोबरच पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसायामध्येही राज्याने मोठ्या प्रमाणात प्रगती केली आहे. कृषी आणि कृषिपूरक व्यवसायांमध्ये झालेल्या प्रगतीमुळेच राज्यातील ६० ते ६५ टक्के समाजाला रोजगार उपलब्ध झाला. महाराष्ट्राचा प्रगत शेतकरी इतर राज्यांतील शेतकऱ्‍यांसाठी अनुकरणीय, वंदनीय झाला. प्रगतिपथावरून जात असताना वेळोवेळी बदल केले नाहीत तर प्रगतीची गती थांबते किंवा अधोगती सुरू होते. मागील १५-२० वर्षांत महाराष्ट्राची कृषिक्षेत्रात अधोगती म्हणता येणार नाही, परंतु प्रगतीचा वेग नक्कीच मंदावला आहे. ज्या राज्याचा कृषी क्षेत्राचा विकास दर ४.४ टक्के होता तो २.४ टक्क्यांपर्यंत खाली आला. राज्याच्या एकूण सखल उत्पादनामध्ये शेतीचा वाटा ३४ टक्के होता तो १३ टक्क्यांपर्यंत घसरला. राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये शेतीच्या विकासासाठीचे अर्थसाह्य घटत गेले. दुष्काळ, अतिवृष्टी या नैसर्गिक आपत्तींना तोंड देता देता त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना शेतीमालाच्या भावाच्या पडझडीला तोंड देणे नकोसे झाले. त्यातच कर्जबाजारी झाल्यामुळे संस्थात्मक कर्ज नाकारल्यामुळे आजही ५० टक्के शेतकरी सावकारांच्या दावणीला बांधलेले आहेत.

शेतमजुरीच्या वाढत्या दरांबरोबरच कृषी निविष्ठांचे वाढलेले दर आणि शेती उत्पादनाच्या दरामध्ये कासवाच्या गतीने होणारी वाढ यामुळे शेतकरी कर्जबाजारी होऊ लागला. वीज आहे तर पाणी नाही, पाणी आहे तर वीज नाही ही वस्तुस्थिती. आयात- निर्यातीचे चुकीचे आणि धरसोडीचे धोरण, शेतीमाल विक्रीसाठीच्या पायाभूत सुविधांचा अभाव, कृषी उत्पादन तंत्रज्ञान निर्मिती आणि प्रसारामध्ये उदासीनता या सर्वांचा परिणाम म्हणजे आज शेतकरी हतबल झाला आहे. आजचा तरुण शेती- गाव सोडून शहराकडे जात आहे. शहरीकरण वाढत असताना आणि पुढील काळात गावापेक्षा शहरांची लोकसंख्या जास्त असणार आहे याचा विचार करून अर्बन, पेरीअर्बन फार्मिंगवर भर द्यावा लागेल. शहरालगतच्या ५०-६० कि.मी. परिसरामध्ये लवकर नाशिवंत होणारे फळे, भाजीपाला तसेच काही प्रमाणात पशुसंवर्धन यावर भर देऊन तेथे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल.

जे विकेल तेच पिकविण्यासाठीचे तंत्रज्ञान आणि मार्केट चेन तयार करावी लागेल. व्हर्टिकल फार्मिंग, हायड्रोपोनिक, अ‍ॅक्वाकल्चर, अ‍ॅक्वापोनिक, करार शेती यासारख्या संकल्पनांचा वापर करून उत्पादक ते ग्राहक यांच्यामधील दरी कमी करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. शहरापासून दूर असलेल्या गावामध्ये अन्नधान्ये, तेलबिया, कडधान्ये, कापूस, ऊस यासारख्या पिकांवर भर देता येईल. महाराष्ट्राने कडधान्यांच्या बाबतीत आघाडी घेतली असली तरी तेलबियांच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात काम करायला वाव आहे. तेलबिया विशेषतः सूर्यफूल, करडई, मोहरी या पिकांवर भर देता येईल. यासाठी क्लस्टर तयार करून विशेष कार्यक्रम राबविला आणि तेलबियांच्या आधारभूत किमती वाढवून त्यानुसार खरेदी केल्या तर तेलबियांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन वाढू शकते. राज्यातील २०० पेक्षा जास्त साखर कारखान्यांनी साखर आणि इथेनॉल निर्मितीचे रेकॉर्ड केले असले, तरी त्यांना यापुढे पाणी व्यवस्थापनावर भर द्यावा लागेल. विशेषतः मराठवाडासारख्या विभागाला तर हे अधिक गंभीरतेने घ्यावे लागेल. एक एकर उसाच्या पाण्यापासून चार-पाच एकर तेलबिया, कडधान्ये, फळबागांचे व्यवस्थापन करून ते जास्त उत्पन्न घेऊ शकतात.

महाराष्ट्रामध्ये फक्त १९ टक्के जमीन ओलिताखाली आहे. राज्यामध्ये ४८.२५ लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येईल एवढी क्षमता असताना फक्‍त २९.५४ लाख हेक्टर पिकाखाली क्षेत्र भिजते. पाणी वापर कार्यक्षमता पश्‍चिम महाराष्ट्रात ७६.४ टक्के, विदर्भात ४७.४ टक्के, तर मराठवाड्यात फक्त ३८.३ टक्के आहे. त्यामुळे पाणी वापर कार्यक्षमता वाढविण्यासाठी सूक्ष्म सिंचन तसेच इतर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे. मधमाशीपालनामध्ये राज्य सर्वांत पिछाडीवर असून येथील पीक पद्धतीचा विचार केला तर फार मोठा वाव आहे. मधमाशीपालनातून राज्यातील तेलबिया, कडधान्ये तसेच फलोत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. पीक उत्पादन वाढीबरोबर या व्यवसायातून कमीत कमी २० ते २५ हजार युवकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. दुग्ध व्यवसायामध्येही मोठी क्रांती करण्याची गरज आहे. जनावरांच्या एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापनासाठी ‘टोटल मिक्स रेशन’चा (टीएमआर) वापर वाढला तर हा व्यवसाय फायदेशीर होईल आणि त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगारही मिळेल. पशुधनाची गुणवत्ता आणि उत्पादकता वाढविण्यासाठी भ्रूणरोपण तंत्रज्ञान (ईटीटी), चांगल्या देशी गायींबरोबर बॅक क्रॉसिंग करून बदलत्या हवामानात शाश्‍वत उत्पादन मिळण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. कुक्कुटपालन, शेळीपालन, रेशीम उद्योग, मत्स्यपालन, प्रक्रिया उद्योग यासारख्या व्यवसायांचे राज्यात ठिकठिकाणी क्लस्टर तयार करून त्याचे नेटवर्क तयार करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

छोटे उद्योगधंदे- जसे की पिकांच्या परागीभवनासाठी मधमाशीपालन, प्रक्रिया उद्योग, खाद्यतेल निर्मिती, पिकांच्या अवशेषांपासून इथेनॉलनिर्मिती, टीएमआर निर्मिती, शेतीसाठी छोटी अवजारेनिर्मिती, शेतातील मत्स्यपालन यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. पीकविमा, शेती व्यवसायांना कर्ज तसेच विक्री व्यवस्था जास्त बळकट करण्याची गरज आहे. बदलत्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी कृषी तंत्रज्ञान निर्मिती तसेच विस्तार यंत्रणांना पारंपरिक पद्धतीत मोठा बदल करून पुढे जावे लागेल, अन्यथा त्यांचे अस्तित्व अबाधित राहणार नाही. शेती आणि शेतकरी आज एका वेगळ्या वळणावर आलेला आहे. योग्य मार्ग दाखवला तरच महाराष्ट्रातील शेतकरी आणि राज्य पुढे जाईल, अन्यथा चुकीच्या मार्गाने गेल्यानंतर होणारे नुकसान कधीही भरून निघणार नाही.

(लेखक शेती प्रश्‍नांचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT