NEET 2024  Agrowon
संपादकीय

NEET Exam : परीक्षा घ्यावी ‘नीट’

NEET 2024 :नीट सारख्या परीक्षांवरील विद्यार्थी तसेच पालकांचा विश्वास उडाला तर या देशातील शिक्षण व्यवस्था उध्वस्त होईल.

विजय सुकळकर

NEET-UG 2024 Result : वर्ष २०२४ साठीच्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ५ मे रोजी झालेल्या ‘राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षे’तील (नीट) गोंधळ दिवसेंदिवस वाढत असताना सर्वोच्च न्यायालयाने शेवटी नीट परीक्षा आणि त्यानंतरचे समुपदेशन रद्द करण्यास नकार दिला आहे. त्यानंतर आता वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीचे समुपदेशन आणि प्रवेश प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे.

राष्‍ट्रीय पातळीवर होणाऱ्या नीट परीक्षेद्वारे एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, फिजिओथेरपी अशा समाजात अत्यंत प्रतिष्ठेच्या अभ्यासक्रमासाठी संपूर्ण देशातून विद्यार्थी निवडले जातात. या परीक्षेचा निकाल १४ जूनऐवजी ४ जूनलाच ‘एनटीए’ने (नॅशनल टेस्टींग एजन्सी) घाईगडबडीने जाहीर केला.

एवढेच नाही तर यावर्षी नीट परीक्षेत देशभर मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे पुढे आले आहे. वैद्यकीय प्रवेशासाठीच्या नीट परीक्षेत आत्तापर्यंत केवळ दोन ते तीन मुलांना ७२० पैकी ७२० मार्क पडत होते. यावेळी मात्र तब्बल ६७ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क मिळाले आहेत. एवढेच नाही तर ७१८, ७१९ असे तांत्रिकदृष्ट्या शक्य नसलेल्या मार्क पडण्याचे अजबही यावर्षी घडले. शिवाय कट ऑफ खूपच वाढला आहे.

मिळालेले गुण आणि दिलेला रॅंक यामध्ये सुद्धा काही विद्यार्थ्यांना तफावत आढळून आली आहे. खुल्या वर्गात ५८०-५९० मार्क मिळविल्यास शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये ‘एमबीबीएस’साठी प्रवेश जवळपास निश्चित होत असताना यावर्षी ६१५ गुण मिळविले तरी प्रवेशाची खात्री मिळताना दिसत नाही. त्यामुळे विद्यार्थी तसेच पालकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे.

६७ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क तर काहींना ७१८, ७१९ मार्क पडण्याचे कारण अनेकांना वेळेच्या नुकसानीच्या बदल्यात ग्रेस मार्कांच्या वाटलेल्या खिरापतीचा परिणाम आहे, तर कट ऑफ वाढण्याचे कारण हे बिहारसह अन्य काही राज्यांत पेपर फुटीचा परिणाम आहे. या विरोधात देशभरातून तक्रारीचा पाऊस पडला असून उच्च-सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल झाल्या आहेत.

नीट परीक्षा रद्द करून पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी अनेक विद्यार्थी-पालकांनी लावून धरली आहे. लोकसभा निवडणूक निकालाच्या धामधुमीतच हे सगळे घडल्यामुळे प्रसार माध्यमांसह विरोधकांचेही याकडे दुर्लक्ष झाले. आता उशिराने राहुल गांधी यांनी हा विषय संसदेत लावून धरणार असल्याचे स्पष्ट केले. पश्चिम बंगालने नीट नंतरच्या समुपदेशनावर स्टे आणला. महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील नीट परीक्षा रद्द करण्याबाबत न्यायालयात जात असल्याचे सांगितले.

नीट पेपर फुटीचे प्रकार तर एनटीए मान्यच करायला तयार नाही. शिवाय ग्रेस मार्क देण्याचे सूत्र पूर्णपणे अशास्त्रीय असून त्यात कुठेच पारदर्शकता नाही. असे असताना ग्रेस मार्कांची समस्या ही केवळ सहा सेंटर आणि १६०० विद्यार्थ्यांपुरतीच मर्यादित असल्याचे एनटीएने स्पष्ट करून त्यांच्याच मार्कांची एक समिती नेमून पुनर्रतपासणी केली जाईल, असे सांगितले आहे. हे सर्व अतिगंभीर आहे.

सर्वोच्च न्यायालयाने नीट परीक्षा आणि समुपदेशन रद्द करण्यास नकार देताना यावर्षी नीट च्या पावित्र्याला धक्का बसल्याचे निरीक्षण नोंदविले. याबाबत तुम्हाला उत्तर द्यावे लागेल, असेही एनटीएला खडसावले आहे. देशभरातील शहरी-ग्रामीण भागातून लाखो विद्यार्थी नीट च्या परीक्षेला बसतात.

शेतकऱ्यांसह सर्वसामान्य पालकांची आर्थिक परिस्थिती बिकट असताना आपल्या मुलामुलींचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी क्लासेसवर लाखो रुपये खर्च करतात. विद्यार्थी देखील खासगी मेडिकल कॉलेजमधील फीस परवडत नाही म्हणून शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी वर्ष-दोन वर्षे जिवाचे रान करतात.

अशा सर्व विद्यार्थ्यांवर असे गैरप्रकार हा घोर अन्याय आहे. त्याहूनही गंभीर बाब म्हणजे नीट सारख्या परीक्षांवरील विद्यार्थी तसेच पालकांचा विश्वास उडाला तर या देशातील शिक्षण व्यवस्था उध्वस्त होईल. हे लक्षात घेऊन एनटीएसह केंद्र सरकारने नीट परीक्षेतील गैरप्रकार यापुढे पूर्णपणे थांबतील, ही काळजी घ्यायला हवी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election : शेतकरी संघटनांना भुलवतेय आमदारकीची मोहमाया

Maharashtra Assembly Election : पुणे जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाची ससेहोलपट

Sanjay Kulkarni Death : ‘जलसंपदा’ला दिशा देणारे संजय कुलकर्णी यांचे निधन

Rabi Crop Loan : रब्बीसाठी पीक कर्जाचे ६८५ कोटींचे उद्दिष्ट

Maharashtra Weather : मध्य महाराष्ट्रात थंडीची चाहूल

SCROLL FOR NEXT