Monsoon
Monsoon Agrowon
संपादकीय

कोसळती श्रावण धारा

टीम ॲग्रोवन

श्रावण सरी बरसू लागताच सृष्टीचं रूप पालटून जातं. धरित्रीच्या हिरव्यागार गालिच्यावर फुलांची सप्तरंगी उधळण सुरू होते. क्षणात ऊन, क्षणात पाऊस अशा निसर्गाच्या खेळाचा सृष्टी आनंद घेत असते. त्यामुळे हा खेळ असाच चालत राहावा, असं मनोमन वाटत राहतं. सण-वारांच्या रेलचेलीने महिलांमध्येही हर्षोल्लासाचे वातावरण असते. शेतीमातीतही एक वेगळाच उत्सव या काळात असतो. रिमझिम पावसात खरिपातील पिके कळीतून फुलात येत असतात. कापूस, सोयाबीन, मूग, उडीद, मका, भात अशा बहरात असलेल्या पिकांना आपलं रुपडं कोणाला दाखवू, कोणाला नको असं होतं. सर्वत्र चैतन्य, आनंदाचे वातावरण! त्यामुळे निसर्ग कवींच्या नजरेतून श्रावण सुटला असे कधी झाले नाही. या वर्षीचा श्रावण मात्र थोड्या वेगळ्या स्वरूपाचा पाहावयास मिळतो. या वर्षी श्रावणात सरी बरसत नाहीत, तर धारा कोसळत आहेत.

या वर्षी जुलैअखेर राज्यात २७ टक्के अधिक पाऊस पडला. या पावसाने खरीप पिकांची अनेक ठिकाणी नासधूस केली. नद्यांना पूर आले. धरणेही ओसंडून वाहिली. ओल्या दुष्काळाची स्थिती राज्यभर निर्माण केली. ऑगस्टमध्ये एक-दोन दिवसांची उघडीप दिल्यानंतर मागील चार दिवसांपासून पुन्हा सर्वत्र पावसाची रिपरिप सुरू आहे. विशेष म्हणजे ऑगस्ट-सप्टेंबर या मॉन्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ९६ ते १०४ टक्के पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला होता. परंतु याच अंदाजाबरोबर ऑगस्टमध्ये राज्याच्या बहुतांश भागांत सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती.

असे असताना ऑगस्टच्या पहिल्या १० दिवसांत राज्यात दमदार पाऊस पडत आहे, कोकण, मध्य महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. नदीनाल्याकाठची पिके मातीसह वाहून गेली. सखल भागातील बहुतांश पिके पाण्याखाली आहेत. इतरत्रही सततचा पाऊस आणि ढगाळ वातावरणाने पिकांना सूर्यदर्शन होत नसल्याने ते पिवळे पडून त्यांची वाढ खुंटली आहे. पिकांवर रोग-किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. फळपिकांमध्ये फुलगळ, फळगळ सुरू आहे. काही ठिकाणी पशुधन वाहून गेले. जीवितहानी झाली आहे. शेतशिवारात असे भयावह वातावरण आहे. पुढील दोन दिवसांत राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. जुलैमधील अतिवृष्टी, पुराने झालेल्या नुकसानीचे बहुतांश ठिकाणी पाहणी-पंचनामे झाले नाहीत. त्यात सध्याच्या नुकसानीने अनेक शेतकरी खचून गेले आहेत. अशावेळी जुलै-ऑगस्टमध्ये झालेल्या नुकसानीचे तत्काळ पाहणी-पंचनामे करून त्यांना मदत मिळायला हवी.

आतापर्यंतच्या पावसाने पुन्हा एकदा अचूक हवामान अंदाज आणि पडणाऱ्या पावसाचे असमान वितरण या दोन्ही बाबी ऐरणीवर आल्या आहेत. ८ ऑगस्टला पुण्यात रेड अलर्ट होता. परंतु त्या दिवशी फार काही पाऊस पडला नाही. अनेक वेळा रेड, ऑरेंज, यलो असे अलर्ट विविध जिल्ह्यांसाठी दिले जातात. परंतु त्यानुसार पाऊस काही पडत नाही. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो, त्या वेळी हवामान अंदाज वर्तविणे सोपे जाते. पण ज्या वेळी असा कमी दाबाचा पट्टा नसतो, त्या वेळी बहुतांश अंदाज चुकतात. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मध्य भारतातच या वर्षी चांगला पाऊस पडतोय. उत्तर भारतात ऑगस्ट मध्यावर आला तरी अजूनही पाऊस नाही. पुढील महिन्यात उत्तर भारतातून पावसाच्या परतीचा प्रवास सुरू होतो, तर तेथे पाऊस पडणार कधी? ही खरेच चिंतेची बाब आहे. गहू आणि तांदूळ ही दोन्ही पिके आपल्या अन्नसुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहेत. त्यात देशात सध्या गव्हाचा तुटवडा भासतोय. त्यातच आता उत्तर भारतातील भात लागवड कमी पावसामुळे धोक्यात आली आहे. आता पाऊस कमी तर पुढे गव्हाचे पीकही कमी होऊ शकते. जागतिक पातळीवरील युद्ध आणि या वर्षीच्या अनियमित मॉन्सूनने एकंदरीत देशाची अन्नसुरक्षा धोक्यात आणली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : विदर्भात वादळी पाऊस, कोकणात उष्ण लाटेचा इशारा

Soybean Rate : हिंगोली, परभणी बाजार समित्यांत सोयाबीन दर कमी

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

SCROLL FOR NEXT