Fish Processing Agrowon
संपादकीय

Fish Migration : माशांचे स्थलांतर गंभीरच!

Fish Farming : समुद्रात माशांचे बीज आपण सोडत नाही. माशांच्या नैसर्गिक प्रजननातून आणि उपलब्ध खाद्यावर उत्पादित माशांवर ही मासेमारी चालते. या मासेमारीला मर्यादाही आहेत.

Team Agrowon

Fish : रत्नागिरी जिल्ह्यात सागरी मासेमारीत वर्षभरात ४० हजार टनांची घट झाली आहे. २०२०-२१ मध्ये एक लाख टनाहून अधिक असलेले मत्स्योत्पादन २०२२-२३ मध्ये ६२ हजार टनांवर आले आहे. मासे उत्पादनात घटीची ही समस्या रत्नागिरी जिल्ह्यापुरती मर्यादित नसून महाराष्ट्र, भारत देश आणि जगातील इतर देशांतही आहे. जागतिक तापमानवाढीचा परिणाम शेती क्षेत्रावर स्पष्ट दिसत असल्याने त्याची नोंद तर घेतली जात आहे. परंतु इतर जीवसृष्टी, जैवविविधता यावर गंभीर परिणाम होत असले तरी त्याची नोंद, फारसी दखल घेताना कोणी दिसत नाही. समुद्रातील पाण्याचे प्रदूषण वाढतेय. वाढत्या प्रदूषणामुळे अनेक मासे मृत पावत आहेत तर काही प्रजाती स्थलांतर करीत आहेत. जागतिक तापमानवाढीत समुद्राच्या पाण्याचे तापमानही वाढत आहे.

अशा प्रकारच्या तापमानवाढीमुळे देखील माशांसह समुद्रातील एकंदरीतच जीवसृष्टीवर प्रतिकूल परिणाम होत आहे. अरबी समुद्र तसेच बंगालच्या उपसागरातील काही भागांमध्ये झीरो ऑक्सिजन झोन निर्माण झाले आहेत. प्राणवायूची कमतरता असलेल्या अशा भागांतून देखील मासे इतरत्र स्थलांतरित होत आहेत, समुद्रातील जीवसृष्टीही धोक्यात येत आहे. जिताडा, शेवंड, मांदेली, कर्ली, कोळंबी, पापलेट, सुरमई तसेच खेकडे अशा अनेक प्रजातींचा समुद्रातील आढळ मागील काही वर्षांपासून कमी झाला आहे. काही माशांच्या प्रजाती तर लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे स्थानिक मश्चिमारांना मासे मिळत नसल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. समुद्राच्या पाण्याचे तापमान वाढत असल्याने कमी दाबाचे पट्टे निर्माण होऊन वादळे उठण्याचे प्रमाणही वाढले आहे. वादळी वारे, अचानक येणाऱ्या पावसामुळे राज्यातील शेती उध्वस्त होत आहे. ही खूपच चिंतेची बाब असली तरी त्याचे गांभीर्य कोणालाही नाही.

समुद्रात माशांचे बीज आपण सोडत नाही. माशांच्या नैसर्गिक प्रजननातून आणि उपलब्ध खाद्यावर उत्पादित माशांवर ही मासेमारी चालते. या मासेमारीला मर्यादाही आहेत. भविष्यात सागरी मासेमारीतून अधिक उत्पादन मिळवायचे असेल, तर काही ठोस पावले आपल्याला उचलावीच लागणार आहेत. राज्याच्या हद्दीत मासेमारी करायचे म्हटले, तर जाळ्याला मासे नाही तर प्लॅस्टिकच लागत आहे. इतका समुद्र प्रदूषणाचा विषय गंभीर बनला आहे. समुद्रात सोडले जाणारे सांडपाणी, टाकाऊ कचरा आणि परिसरातील रसायने-औषधी उद्योगातील तेल-पाण्यामुळेही समुद्राचे प्रदूषण वाढत आहे. प्लॅस्टिक, सांडपाणी, कारखान्यांतील टाकाऊ तेलपाणी याशिवाय प्रदूषण वाढविणारा कोणताही घटक थेट समुद्रात येणार नाही ही काळजी घ्यायला हवी.

शिवाय जागतिक तापमानवाढ रोखण्यासाठी जागतिक स्तरावर काय उपाययोजना केल्या जात आहेत, त्याचा अभ्यास करून आपल्याकडेही अवलंब झाला पाहिजेत. शिवाय माशांचा अधिवास वाढविण्यासाठी शासनाकडून कृत्रिम भित्तिकांचा प्रयोग तत्काळ सुरू करायला हवा. राज्याच्या सागरी भागात पिंजऱ्यातील मत्स्यशेतीला प्रोत्साहन दिल्यास या पद्धतीने मत्स्योत्पादनात मोठी वाढ होऊ शकते. या पद्धतीने अनेक देशांनी मत्स्य संवर्धन करून उत्पादनवाढ साधली आहे. सागरी मत्स्योत्पादन कमी होण्यामागे प्रदूषण, जागतिक तापमानवाढीबरोबरच बेकायदेशीररीत्या अनियंत्रितपणे होणारी मासेमारी देखील जबाबदार आहे. परराज्यांतील ट्रॉलर्सच्या घुसखोरीमुळे स्थानिक मच्छीमारांचे आर्थिक शोषण होत आहे. यातून संघर्षही वाढतोय. एलईडी लाइटमुळे एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मासे गोळा होतात तेव्हा पर्ससीन जाळे टाकून मासेमारी होत असल्याने सागरी क्षेत्रातील मत्स्यसाठे धोक्यात आले आहेत. ट्रॉलिग, पर्ससीन, गिलनेट किंवा डोलनेट यांचा वापर करणाऱ्या परराज्यांतील यांत्रिक तसेच यंत्रचलित मासेमारी नौकांना पूर्णपणे प्रतिबंध घालायला हवा. हे करीत असताना मत्स्योद्योगात वाढ करून अधिकाधिक रोजगारनिर्मितीसाठीचे ‘महामत्स्य अभियान’ राज्यात प्रभावीपणे राबवायला हवे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Global Development Trust : ग्लोबल विकास ट्रस्टच्या कृषिकूलचे उद्घाटन

Agriculture University Promotion : कृषी विद्यापीठातील पदोन्नतीचे आदेश न काढणे कायदेशीर : आनंदकर

Agriculture University Rating : महात्मा फुले कृषी विद्यापीठाला ‘ए’ ग्रेड उत्कृष्ट मानांकन

Agriculture Department : ‘महसूल’ पाठोपाठ यंत्रणा असलेला कृषी विभाग विस्कळित

Soybean Rate : सोयाबीनच्या दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांत संताप

SCROLL FOR NEXT